Jump to content

नारायण महाराज, हरिहर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बालपण

[संपादन]

देवनहळ्ळी या बंगलोर जवळच असलेल्या गावात उग्रप्पाशास्त्री व सीतम्मादेवी या दांपत्याची ओळख नित्य अन्नसंतर्पण व गरिबांना आर्थिक मदत करणारे अशी होती. उग्रप्पाशास्त्री हे बाजीराव पेशवे यांचे दिवाण होते. दिवाण म्हणून निवृत्त झाल्यावर ते देवनहळ्ळी येथे आले. शास्त्रीबुवा हे गोसेवेचा वसा घेतलेल्यांपैकी एक होते. घराण्याचे कुलदैवत उग्र नरसिंह हे होते. म्हणूनच त्यांचे नाव उग्रप्पा ठेवले गेले. श्रीमंती भरपूर होती पण पोटी पुत्रसंतान नव्हते.

भगवान नरसिंह प्रसन्न झाले व मुलगा दत्तक घ्यावा अशी आज्ञा झाली. त्याप्रमाणे उग्रप्पाशास्त्री यांनी बाबुराव या मुलाला दत्तक घेतले व त्याचे नाव नरसिंहशास्त्री ठेवले. नरसिंहशास्त्री यांचा विवाह यज्ञम्मा यांच्याशी झाला. त्‍यांना झालेल्या चार मुलांपैकी धाकटे सुब्बाशास्त्री व पत्‍नी लक्षम्मा यांच्या पोटी अहोबल या तिसऱ्या मुलाचा जन्म सन १९०० मध्ये झाला. तोच मुलगा पुढे नारायण महाराज म्हणून प्रसिद्ध झाला. त्‍यांची जन्मतिथी उपलब्ध नाही.

सुब्बाशास्त्री यांना गायी पालनाचा छंद होता. गायीच्या प्रेमापोटी घरची परिस्थिती नाजुक असल्याने त्यांनी अहोबल या मुलाला गवत विक्रेत्याला विकून गाय घेतली. त्या गवत विक्रेत्याच्या आईला हे आवडले नाही. तिने छोट्या अहोबल याला आई वडिलांच्या स्वाधीन केले.

साधना

[संपादन]

घरची आर्थिक परिस्थिती चांगली नाही हे पाहून अहोबल याने देवळाच्या पायरीवर डोके आपटून घेत आक्रोश केला. त्यातच त्यांना समाधी लागली. थोड्या वेळाने समाधी उतरली तेव्हा एक दगड अहोबल याने भिरकावला. तो दगड पुन्हा त्यांच्या पायाशी एका खडीसाखरेच्या रूपात येऊन पडला. छोटा अहोबल पुढे असे चमत्कार करू लागला. सुब्बाशास्त्री यांना बंगलोरचे लोक गायी दान देऊ लागले. सुब्बाशास्त्री व त्यांची गाय यांना अचानक देवाज्ञा झाली. घराची जबाबदारी अहोबलवर आली.

सद्‌गुरूच्या शोधात अहोबल हे सज्जनगडावर पोहोचले. तेथे श्रीरामघळीत एक वर्षभर तपस्येसाठी राहिले. ध्यानात असताना आदेश झाला की ’तुझे गुरू गोंदवलेकर महाराज आहेत. त्यांच्याकडे जा.’ यथावकाश, अहोबलना ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा अनुग्रह प्राप्त झाला. महाराज त्यांना उठवत म्हणाले ’तुझीच मी वाट बघत होतो, हनुमान, ऊठ’.

[ संदर्भ हवा ] गुरुपरंपरा -- विष्णू भगवान - ब्रह्मदेव - वसिष्ठ - श्रीराम - समर्थ रामदास - कल्याण स्वामी - बाळकृष्ण महाराज - चिंतामणी महाराज (चिन्मयानंद, उमरखेड ) - तुकामाई (येहळेगाव)- ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज - अहोबल ( नारायण महाराज, हरिहर ).

अहोबल महाराज (हनुमान) यांच्या जीवनात एक घटना श्रीसद्गुरूंनी लीला म्हणून घडवून आणली. आज्ञेनुसार अहोबल महाराज (हनुमान) भिक्षा मागून रामनाम घेत बंगलोर जवळच्या हलसूर गावी नागेशराय व त्यांच्या पत्‍नी राजम्मा यांच्या घरी उतरले. सहा महिन्यांपूर्वी त्यांचा नारायण नावाचा मुलगा मृत्यू पावला होता. हा हनुमान आपला पुत्र नारायणासारखाच आहे असे समजून अहोबल (हनुमान ) यांना नारायण म्हणून बोलावू लागल्या. अशा रितीने अहोबल हनुमान झाला व आता त्यास नारायण हे नाव प्राप्त झाले. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचेकडून समर्थ संप्रदायाची दीक्षा अगोदरच होती. त्यामुळे आता ते श्री समर्थ नारायण महाराज झाले होते. ते नेहमी कफनी वापरीत.

आता नारायण महाराज हे १५ वर्षाचे झाले होते. गावाबाहेर अश्वत्थ वृक्षाखाली बसून अखंड रामनाम घेणे हा त्यांचा दिनक्रम होता. हनुमानाच्या प्रमाणेच झाडावर बसून जप करत होते, फळे भक्षण करीत होते.

पुढे १२ वर्षे भारतात भ्रमण करून त्यांनी अनेक विद्या आत्मसात केल्या. तेरा कोटीच्या श्री रामनाम जपयज्ञाची सांगता करण्यासाठी नामजप सप्ताह सुरू केले. दिवसभरात वीस तास तरी जप करत होते. दोन वनगायी जंगलात त्यांच्याबरोबर असत. त्यांचेच दूध ते पीत होते. प्रवासात नारायण महाराज यांना त्यांचे भाऊ नृसिंहशास्त्री व मोठी बहीण सुभद्रम्मा यांची भेट झाली. नामसप्ताहप्रसंगी त्यांनी सामूहिक मुंजी व लग्ने लावून दिली.

भारत भ्रमणानंतर नारायणमहाराज सन १९४० साली बनशंकरी येथे विवाहबद्ध झाले. पद्मावती आम्मा गोड गळ्याच्या होत्या. भजने सुंदर म्हणत. म्हैसूरच्या राणीने त्यांच्या गाण्यावर खूष होऊन त्यांना माॅरिस कार भेट दिली होती.

नारायण महाराज व सौ पद्मावती आम्मा यांचा फोटो मठात त्यांच्याच खोलीत आहे. महाराजांच्या श्रीचरणपादुका देखील पूजेत ठेवलेल्या आहेत.

आज ज्या भागात हा मठ व गोशाळा आहे, त्या ठिकाणी एके काळी निजामानें कत्तलखाना चालविला होता. सद्‌गुरू नारायण महाराज यांनी या मठाच्या स्थापनेबरोबरच मठात सन १९७० साली मारूतीची स्थापना केली. कत्तलखान्यात जे लोक काम करायचे, त्यापैकीच एक नारायणमहाराजांचा प्रथम शिष्य झाला.

मठाची परंपरा

[संपादन]

सद्गुरू श्री नारायण महाराज यांना दोन कन्या, मीराबाई आणि लक्ष्मीबाई.

श्री माणिकप्रभु संस्थान, हुमणाबाद यांची परंपरा - श्री माणिक प्रभु - श्री मनोहर महाराज - श्री मार्तंड माणिकप्रभु - श्री शंकर माणिकप्रभु - त्यांचे चिरंजीव सिद्धराज माणिकप्रभु.

श्री नारायण महाराज यांची कन्या मीराबाई यांचा विवाह सिद्धराज माणिकप्रभु यांच्याशी झाला.

आज मीराबाई यांचे चिरंजीव ज्ञानराज महाराज हे संस्थानचे प्रमुख आहेत.

त्यांची भक्त मंडळी श्री सिद्धराज माणिकप्रभु यांचा जयजयकार करीत त्यांच्यासोबत जात असत. ही पद्धत नारायण महाराजांच्या शिष्यांना आवडली व तसे त्यांनी श्री महाराजांना सांगितले. नारायण महाराज ( हरिहर) यांनी लगेच एक चतुष्पदी रचली. ती पुढीलप्रमाणे आहे.

||जय महारूद्र, दास जनोद्धार,
ब्रह्मांड मठ, उदास पंथ
अलक्षमुद्रा, सिद्धासन,
षड्दर्शन निमित्त निगमादि पंथ, चालिलें आत्मनिवेदन
विमलब्रह्म श्रीसद्गुरू समर्थ नारायण महाराज की जय ||

या चतुष्पदीचा घोष आजही श्री नारायण महाराज मठ, जियागुडा येथे विद्यमान मठपती श्री प्रभुदत्त महाराज करीत असतात. किंबहुना हा घोष श्री नारायण महाराज यांनी स्थापन केलेल्या सर्वच मठात नित्य होत असतो.

सद्गुरू श्री नारायण महाराजांच्या दुसऱ्या कन्या म्हणजे लक्ष्मीबाई यांचा विवाह अरविंद कामतीकर यांच्याशी झाला. बिदर काॅलेजातून प्राध्यापक म्‍हणून निवृत्त होऊन ते हरिहर येथील नारायण महाराज मठ सांभाळत आहेत. त्यांच्या तीन कन्या आहेत; प्रभुदत्त महाराज हे त्यांचेच चिरंजीव आहेत. ते आज विद्यमान मठपती म्हणून जियागुडा भागातील रामदासी मठ सांभाळून गौशाळेतील प्रत्येक गायील आपल्या मातेप्रमाणे सांभाळत आहेत.

सद्गुरू श्री नारायण महाराज यांच्या कार्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी यज्ञसंस्कृती जपली होती. अणुग्रहशांति यज्ञ, रूद्रस्वाहाकार, अश्वमेध यज्ञ असे १०८ यज्ञ नारायण महाराजांच्या अधिपत्याखाली संपन्न झाले होते. त्यापैकी गजलक्ष्मी यज्ञ हा एक होता. त्याची आठवण म्हणून मठात एक मोठा हत्ती व त्यावरील अंबारीत बसलेली लक्ष्मीमाता अशी मोठ्या आकारातील मूर्ती आहे.

प्रभुदत्त महाराज हे जियागुडा भागातील रामदासी मठ व नारायण महाराज (हरिहर) मठ, येथील विद्यमान मठपती म्हणून आश्रमाची देखभाल व आल्यागेल्या अतिथीची अत्यंत आपुलकीने चौकशी व आदरातिथ्य करतात. इंग्रजी, तेलुगूव्यतिरिक्त मराठी भाषेतही ते सर्वांशी संवाद साधतात.