हजरत जर जरी जर बक्ष उरुस
हजरत जर जरी जर बक्ष उर्फ शेख मुन्तज्बोद्दिन यांचा उरूस(याञा) दरवर्षी डिसेंबर महिन्यात असतो. ७२६ वर्षांची परंपरा लाभलेला खुलताबादचा उरूस म्हणजे सर्वधर्मसमावेशकतेचे प्रतीकच. जातीयवादी आणि धार्मिक तेढ वाढविणा-या आजच्या काळात विविध धर्मीय खुलताबाद उरुसात सहभागी होतात.
मराठवाड्यातील सर्वात मोठा उरूस म्हणून खुलताबाद जिल्हा औरंगाबाद उरुसाची ओळख आहे. संदल मिरवणूक वाजतगाजत रात्री उशिरा हजरत ख्वाजा शेख मुन्तज्बोद्दिन उर्फ जर जरी जर बक्ष यांच्या दर्ग्यात पोचल्यानंतर चादर चढविली जाते. चौदाव्या शतकात खुलताबाद हे इस्लाम धर्माचे आध्यात्मिक केंद्र होते. अनेक सुफी संत येथे होऊन गेले. परमेश्वर प्रेममय आहे. प्रेम व भक्ती या मार्गांनीच त्यांच्यापर्यंत पोहचता येते , अशी या संतांची श्रद्धा होती. सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करावे , परमेश्वराचे चिंतन करावे , साधेपणाने राहावे , माणुसकीचा धर्म पाळावा , अशी त्यांची शिकवण होती. भारतात आलेल्या सुफी संतांपैकी ख्वाजा मोईनोद्दीन चिश्ती विख्यात तत्त्वज्ञ होते. त्यांच्याप्रमाणेच शेख निझामुद्दीनअवलीयाही थोर सुफी संत होते. सुफी संतांनी हिंदू-मुस्लिमांना त्यांच्या ईश्वरविषयक कल्पनातील साम्यस्थळे दाखविली. भागवत धर्मातील भक्ती कल्पनेचा सुफी पंथीयांवर प्रभाव पडला. पवित्र कुराणाप्रमाणे ते इतर धर्मग्रंथाचाही आदर करीत. सुफी संतांच्या शिकवणीचा परिणाम जसा मुसलमान समाजावर झाला तसा तो हिंदू समाजावरही झाला. आणि दोन्ही समाज जवळ येण्यास फार मोठा हातभार लागला. उत्तरेकडून दक्षिणेकडे इस्लाम धर्माच्या प्रचारासाठी आलेल्या सुफी संतांचे खुलताबाद हे मुख्यकेंद्र होते. खुलताबाद येथूनच धर्म प्रचारासाठी सुफी संत चारही दिशांना जात होते. हजरत ख्वाजा शेख मुंतजबोद्दिन हे बाबा फरिदोद्दिन यांचे लाडके शिष्य. अत्यंत कमी वयात त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांची दिल्ली येथे काझी म्हणून नियुक्ती केली. अल्पावधीतच काझी म्हणून ते सर्वत्र प्रसिद्ध झाले. धार्मिक गुरू बाबा फरिदोद्दिन यांच्या आदेशानुसार त्यांनी दिल्ली त्यागली. खुलताबादला आलेल्या हजरत ख्वाजा शेख मुंतजबोद्दिन उर्फ जर जरी जर बक्ष यांनी बंधुत्व आणि एकात्मतेचा संदेश दिला. धर्मासाठी ते वाटेल तेवढे द्रव्य देत असे , म्हणून त्यांना ' जर बक्ष ' असे म्हणत. ख्वाजा शेख मुंतजबोद्दिन जर जरी जर बक्ष १३१०मध्ये पैगंबरवासी झाले. खुलताबाद येथे दरवर्षी इस्लामी महिन्यानुसार रब्बीअवलची चार ते आठ तारखेस उरूस भरतो. या उरुसामध्ये हिंदू-मुस्लिम मोठ्या भक्तीभावाने सहभागी होतात.