Jump to content

रामेश्वरनाथ काव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रामेश्वरनाथ काव हे भारताच्या ’रॉ’ या गुप्त हेर संस्थेचे प्रनुख होते. बांगलादेश मुक्त करण्यात भारताच्या रामेश्वरनाथ काव यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी मात्र याचे श्रेय स्वतःकडे कधीच घेतले नाही. सार्वजनिक मंचावर त्यांना श्रेय देण्याचा प्रयत्‍न केला असता असे करणाऱ्यांना त्यांनी यापासून परावृत्त केले. ‘इदं न् मम’ या भूमिकेतूनच त्यांनी कर्तव्य पार पाडले. इतकेच नव्हे तर सर्व श्रेय बांगलादेशवासीयांनाच दिले.

१९७७ साली जनता पक्ष सत्तेत आल्यावर मोरारजी देसाई व अटलबिहारी वाजपेयी यांनी काव यांना अपमानास्पद वागणूक दिली. मात्र बराच काळ लोटल्यानंतर १९९९ च्या कारगिल युद्धानंतर आपल्या यंत्रणेचे कोठे चुकले व आपण कुठे कमी पडलो हे जाणून घेण्यासाठी वाजपेयींना याच रामनाथ काव यांचा सल्ला घ्यावासा वाटला. काव यांनीही आधीचा अपमान मनात न ठेवता वाजपेयी सरकारला मोलाचा सल्ला देऊन आपल्या देशनिष्ठेचे व सचोटीचे दर्शन घडविले.

निकटचे सहकारी सोडल्यास कोणासही त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याबाबत मागोवा लागणार नाही याची त्यांनी खबरदारी घेतली. म्हणूनच ते आदर्श हेर मानले जातात. आंतरराष्ट्रीय स्तरावरही गुप्तहेर जगतात त्यांना मानाचे स्थान होते. १९५५ साली चिनी पंतप्रधान चाऊ-एन-लाय यांनी त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ त्यांना विशेष पदक बहाल केले होते. असा सन्मान आपल्या देशातील इतर कोणत्याही गुप्तहेर अधिकाऱ्याला प्राप्त झाला नसावा. या ‘अनसंग हीरो’ने २० जानेवारी २००२ रोजी अनेक संवेदनशील गुपिते कवटाळत व गौरवशाली मोहिमांच्या स्मृती मागे ठेवत या जगाचा निरोप घेतला.