स्फिंक्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्फिंक्स ही ग्रीक पुराणांत वर्णिलेली एक राक्षसी. ही कायमियरा व ऑर्थस यांची कन्या. (दुसऱ्या वृत्ताप्रमाणे एकिडन व टायफॉन यांची मुलगी.) हिला स्त्रीसारखे डोके व छाती, कुत्र्यासारखे शरीर, सापाप्रमाणे शेपटी, पक्ष्याप्रमाणे पंख आणि सिंहाप्रमाणे पंजे होते. हिचा आवाज मात्र मानवी होता. थीब्ज शहराच्या परिसरात ती हिंडत असे व लोकांना कोडी घाली. ज्यांना उत्तर देता येत नसे त्यांना ती खाऊन टाकी. थीब्जच्या लोकांना एकदा समजले की, स्फिंक्सच्या एखाद्या कोड्याचे कुणी बरोबर उत्तर दिलेच, तर ती स्वतःचा नाश करून घेईल. थीब्जचा पालकराजा क्रेओनने जाहीर केले होते की, जो कोणी तिचे कोडे सोडवील त्याला थीब्जचा राजमुकुट व क्रेऑनची भगिनी जोकॅस्टा मिळेल.

इडिपसने स्फिंक्सचे कोडे सोडवल्याबरोबर तिने खडकावर डोके आपटून जीव दिला.

इजिप्शियन स्फिंक्सला सिंहाचे शरीर व पुरुषाचे डोके आहे, पंख नाहीत. इजिप्तमध्ये स्फिंक्स ही होरस देवाची प्रतिमा मानली जाते. त्या देशातील गिझाच्या पिरॅमिडजवळ स्फिंक्सची मोठ्यात मोठी मूर्ती आहे.