Jump to content

गीता साने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गीता जनार्दन साने (३ सप्टेंबर, १९०७ - १२ सप्टेंबर, १९९१) या मराठीतील एक बंडखोर कादंबरीकार होत्या.

त्यांच्या बहुतेक कादंबऱ्यांचे विषय हे भारतीय कुटुंबसंस्थेतील दोष, त्यांच्या मर्यादा आणि त्यात स्त्रीच्या होणाऱ्या घुसमटी संदर्भातील होते. स्त्रीच्या अंतःकरणातील स्वातंत्र्याची जाणीव साने यांनी आपल्या कादंबऱ्यांतून सातत्याने प्रकट केल्यामुळे तत्कालीन काळात त्या बंडखोर ठरल्या.

आई-वडील

[संपादन]

गीता साने यांच्या आईचे नाव भागीरथी होते पण लोक त्यांना त्यांच्या माहेरच्या नावाने, गोदावरी म्हणून ओळखत. साने यांच्या जन्माच्या वेळी त्यांची आई २३ वर्षे आणि वडील जनार्दन भालचंद्र साने २८ वर्षांचे होते. वडiलांनी त्यांचे गीता हे नाव भगवद्गीतेवरून ठेवले.

गीता साने यांची आई आणि वडील दोघेही अतिशय प्रागतिक विचारांचे होते. त्यांनी आपल्या मुलींची लग्ने कोणत्याही धार्मिक विधीशिवाय प्रत्येकी दीड-दीड रुपयांत केली.

बालपण

[संपादन]

साने या लहानपणापासूनच फार बंडखोर होत्या. त्या सहसा कुणाला वेणी घालू देत नसत. खूप घट्ट वेणी घालून केस दुखतात म्हणून. तसेच, फार कढत पाणी घालतात म्हणून न्हायला घातलेले त्यांना आवडत नसे. झाडावर, अंगणाच्या पावसाने विरघळू शकेल अश्या कच्च्या भिंतीवर चढणे हे आवडते उद्योग.

गीता साधारण चार वर्षांची असताना वडिलांनी मराठी वर्णमाला आणून भिंतीवर लावली होती. तिला खांद्यावर घेऊन ते अक्षरे दाखवीत. शाळेत जायच्या आधीच तिला चांगले वाचता येऊ लागले. आकड्यांची ओळखदेखील अर्थात झाली.

गीताला भाऊंनी सहाव्या वर्षी शाळेत घातले. ती मिशनरींची शाळा, गावाबाहेर होती. बैलगाडीने जावे लागे. गीताला शाळा आवडली. तरी एक दिवस ती रडत घरी आली. आईने विचारले तेव्हा सांगितले की तिला वर्गातून काढून दुसरीकडे बसवले. मारकुट्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिक्षकांनी केलेली ही शिक्षा कशासाठी केली ते तिला कळले नव्हते. भाऊसाहेब कोर्टातून आले. हळूच गोदावरीबाईंनी गीता रडत आल्याचे त्यांना सांगितले. ते पुन्हा कोट टोपी घालून मास्तरांच्या घरी गेले. तिथे त्यांना समजले की गीताला डबल प्रमोशन - एक इयत्ता गाळून पुढल्या वर्गात प्रवेश मिळाला होता. नवी पुस्तके घेऊन वडील घरी आले आणि गीताचे रडे मावळले.

हिंगण्याचे शिक्षण

[संपादन]

१९२० साली गीताच्या वडिलांनी गीता-सीताला हिंगण्यास ठेवण्याचे ठरवले. प्रवास वेळखाऊ व त्रासदायक होता. वाशीम ते अकोला बस; पुढे मुुंबईची आगगाडी व कल्याणला उतरून पुणे व पुढे टांग्याने हिंगणे. गीता-सीताला प्रत्येकी दोन परकर, एक पोलके व एक गाठीची चोळी त्यांच्या आईने हाताने शिवून दिली. जमेल तेव्हा आणखी एकेक पोलके शिवायचे कबूल केले. रात्री पोलके धुऊन वाळत घालायचे व चोळी वापरायची, सकाळी पुन्हा तेच पोलके घालायचे. सहा महिन्यांनी गोदावरीबाई आणखी एकेक पोलके शिवू शकल्या. तोवर पहिली विरली होती. हिंगण्याला एक वेगळेच विश्व गीताला दिसले. तिथल्या मोकळ्या वातावरणाची छाप कायम तिच्या मनावर बसली.

हिंगण्याला काही मुली शिक्षिका होऊन बाहेर पडत होत्या. काही नर्सिंगला जात होत्या. वेगवेगळे विचार, ध्येये कानांवरून जात असत. स्त्री शिक्षणाचा ध्यास घेतलेली उत्तुंग व्यक्तिमत्त्वे नजरेेस पडत. ह्या सर्वांचा कायम परिणाम गीता साने यांच्या मनावर झाला. त्यांच्याबरोबर बाळूताई खरे (नंतरच्या मालती बेडेकर) होत्या. वेणूताई नामजोशी या त्यांच्या मेट्रन होत्या. आश्रमाचा परिसर खूप मोठा होता. मुक्त वातावरणात मुली वाढत.

गीता सानेंना वा.म. जोशी यांच्यासारखे शिक्षक लाभले. वा.मं.च्या कादंबऱ्याही गीताने तेव्हा व पुढे वाचल्या. स्त्री-पुरुष यांच्यात निखळ-निर्मळ मैत्री असू शकते हे तिच्या मनावर बिंबविण्यात या कादंबऱ्यांचा हातभार होता.

हिंगण्याला गीता-सीता साने फक्त एक वर्ष होत्या. त्यांना व सीताला तिथे मलेरिया होऊ लागल्याने वडील त्यांना परत वाशीमला घेऊन आले.

हिंगण्याचे वातावरण गीता साने यांना एवढे आवडले होते की पुढे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलींना १९४८ साली, धनबाद ते हिंगणे हा १२०० मैलांचा प्रवास करून शिक्षणासाठी हिंगण्याला आणले. "संसारात पडलेली चौदा वर्षांची मुलगी बाई असते आणि हिंगण्याच्या पटांगणावर वाढलेली अठरा वर्षांची मुलगी, मुलगी असते’ असे गीता साने म्हणत.

अमरावतीची शाळा

[संपादन]

वाशीमला आल्यावर पुन्हा त्याच गावाबाहेरच्या मिशनऱ्यांच्या शाळेत जायचे होते. पण नव्या मुख्याध्यापिकांनी नवा नियम सांगितला, की फक्त ख्रिश्चन मुलींनाच प्रवेश मिळेल. बहुसंख्य मुलींचे शिक्षण बंद पडले.

गीता साने यांचे वडील मुलींना मुलांच्या सरकारी शाळेत घेऊन गेले. मुलींना तिथे घेण्यासाठी भाऊंनी नागपूरहून शिक्षण खात्याची परवानगी आणली. शिक्षणाधिकाऱ्याची परवानगी हेडमास्तरांची तयारी असल्यास मुलींना प्रवेश द्यावा, या अटीवर होती. १९२१ साली हेडमास्तरांनी मुली घेतल्या. पुढच्या वर्षी त्यांची बदली झाली. नव्या हेडमास्तरांनी साफ नकार दिला. ते म्हणाले, मुली सांभाळायला त्रास होतो. ज्या थोड्या मुली मुलांच्या शाळेत आल्या असतील त्याही घरी बसल्या. गीताच्या वडिलांनी मुली अमरावतीला ठेवण्याचे ठरविले. त्याप्रमाणे ११ वर्षांची सीता व ८ वर्षांची तिसरी कन्या शांता हिला १९३२ साली अमरावतीला होस्टेलवर ठेवले. गीताला घरी ठेवायचे दिवस आले होते.

लग्न

[संपादन]

गीता साने यांनी लग्न करायला ठाम नकार दिला. आई व आजी ऐकेनात. तेव्हा त्यांनी अबोला धरला. आपल्या वाट्याची कामे करायची पण घरात बोलायचे नाही. भाऊंचा मूक पाठिंबा होताच. भरीस महिन्याचे ते चार दिवस बाहेर बसायलाही त्यांचा नकार होता. दिवाळीपर्यंत आई व आजीने ताणून धरून पाहिले, पण व्यर्थ. शेवटी दिवाळीनंतर गीताला भाऊ अमरावतीच्या शाळेत दाखल करून आले. तिला इंग्रजी तिसरीत बसवले. ती बोर्डाची परीक्षा असे. सहा महिन्यांनी परीक्षा झाली. गीता साने यांना पहिला वर्ग, गणिताचे पदक व शिष्यवृत्ती मिळाली. त्या गणितात मुला-मुलींत पहिल्या आल्या होत्या.. त्यानंतर त्यांच्या लग्नाचा विषय घरात निघालाच नाही.

गीता साने यांनी लिहिलेल्या सामाजिक आणि राजकीय कादंबऱ्या (एकूण १०)

[संपादन]
  • आपले वैरी (१९४१)
  • आविष्कार (क्रांतिकारकांवर आधारित -१९३९)
  • दीपस्तंभ (१९४७)
  • धुके आणि दहिवर (१९४२)
  • निखळलेली हिरकणी (१९३६)
  • फेरीवाला (१९३८)
  • माळरानात (राजकीय कादंबरी-१९४१)
  • लतिका (१९३७)
  • वठलेला वृक्ष (१९३६)
  • हिरवळीखाली (१९३६)

अन्य वैचारिक ग्रंथ

[संपादन]
  • चंबळची दस्युभूमी (संशोधनपर पुस्तक -१९६५)
  • भारतीय स्त्रीजीवन (२२० पानी पीएच.डी.साठीचा प्रबंध - १९८४; ऑगस्ट १९८६ला पुस्तकरूपाने प्रकाशित झाला)