सायाळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सायाळ
IndPorcupine.jpg
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: कुरतडणारे प्राणी
कुळ: Hystricidae
जातकुळी: Hystrix
शास्त्रीय नाव
Hystrix indica

अनुक्रमणिका

वर्णन [संपादन]

सायाळ, साळिंदर, साळू या नावाने ओळखला जाणारा मोठा, साधारण तीन फुटांपर्यंत वाढणारा, कुरतडणारा, पशू आहे. सस्तन प्राणी असल्याने सायाळ मादी पिलांना जन्म देते आणि त्यांना आपले दूध पाजते. सायाळ कुटुंब एकत्र राहणारे असल्याने पिले मोठी झाल्यावर नर आपला वेगळा घरोबा इतरत्र करतात तर मादी पिले मोठी झाल्यावरही आपल्या आईच्या सोबतच राहतात.

शरीर [संपादन]

सायाळच्या कातडीचा मुख्य रंग काळा असून याच्या पाठीकडून मागच्या बाजुला असलेले केस विशेष पद्धतीने विकसीत झाले आहेत. हे केस कडक झाले असल्याने ते काट्यासारखे टोकदार झाले आहेत. हे 'काटे' पांढर्‍या तपकिरी रंगाचे आणि पूर्णपणे पोकळ असतात. पाठीवरील असे केस ३० सें. मी. पर्यंत लांब असतात. सायाळच्या जीवाला धोका असल्यास तो आक्रमण करणार्‍याकडे पाठ करून उभा राहतो, अंगावरील काटेदार केस उभे करतो. शिकारी जास्तच जवळ येत असल्याचे दिसल्यावर सायाळ त्याच्या अंगावर उलट दिशेने वेगाने धावून जातो आणि आपले अतिशय टोकदार काटे त्याच्या अंगात सोडतो आणि क्षणात समोरच्या दिशेने धावतो. सायाळच्या या विशेष हत्याराने वाघ, बिबटेही जखमी होतात.

काट्यासारखे कडक आणि टोकदार झालेले केस परत परत उगवतात. या विशेष केसांशिवाय सस्तन पशूंना असतात तसे साधे केसही सायाळला जन्मतःच असतात. सायाळ हा बाणासारखे काटे फेकून मारतो असा एक गैरसमज याच्या विषयी पसरला आहे.

आढळ [संपादन]

सायाळ दक्षिण आशिया ते मध्यपूर्व येथे सर्वत्र आढळतो. उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण वनांच्या पोकळ, खडकाळ प्रदेशात तसेच पानगळीच्या जंगलात, कमी उंचीच्या जंगलात, शेतात वगैरे जमिनीत बिळे करून सायाळ राहतो. बिळाच्या गाभ्यात एक स्वतंत्र कोठडी तयार केलेली असते. सर्व सायाळ कुटुंब तेथे एकत्र राहते आणि साठवून ठेवलेले अन्नही याच मुख्य कोठडीत असते. गाभ्याकडून सर्व दिशांनी दूरपर्यंत बोगदे केलेले असतात. जमिनीवर चरतांना कुठल्याही दिशेने आक्रमण होत असेल तर सहसा मुख्य सायाळ सोडून लहान पिले अशा बोगद्यातून आपल्या घरात शिरतात.

भक्ष/आहार [संपादन]

सायाळचे दात आतल्या बाजुने घासून धारदार केलेले असतात. हे दात नेहमी झिजतात पण लवकरच त्यांच्या जागी नवीन दातही वाढतात. विविध प्रकारची कडक कवचाची फळे, त्यांच्या बिया हे पशू सहजपणे फोडून खातात. तसेच मृत हरणांची शिंगेही हे पशू चघळतात आणि खातात. यामुळे सायाळच्या काट्यांच्या वाढीला पुरक आहार मिळतो.



Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.