विल्यम कॅरे
| विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा. |
विल्यम कॅरे (en:William Carey) यांचा जन्म इंग्लंडमध्ये नॉर्दॅम्प्टन परगण्यात टोस्टर(Towcester)जिल्ह्यात पॉलरस्परी(Paulerspury)या खेड्यात १७ ऑगस्ट १७६१ रोजी झाला. वडील शाळामास्तर. घरची गरिबी. त्यामुळे शालेय शिक्षण फारसे नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी एका चांभाराकडे उमेदवारी केली. सोळाव्या वर्षापासून अठ्ठाविसाव्या वर्षांपर्यंत चर्मकाराचा व्यवसाय केला. जोडे शिवीत असताना समोरच्या येशू ख्रिस्ताच्या चित्राकडे पाहून मिशनरी व्हावयाचे ठरवले. धंदा सोडून बॅप्टिस्ट पंथात दाखल. त्यानंतर जॉन थॉमस आणि विल्यम कॅरे पहिले बॅप्टिस्ट मिशनरी म्हणून भारतात आले(११ नोव्हेंबर १७९३. जहाजावरील प्रवासादरम्यान जॉन थॉमसकडून बंगाली भाषेची तोंडओळख. भारतात बंगालमध्ये आल्यावर माल्दा येथे शेती केली, पण जमली नाही. त्यामुळे जवळच मदनवती येथे निळीच्या मळ्यात पाच वर्षे नोकरी केली. या काळात राम बसु यांच्या मदतीने बंगालीचा सखोल अभ्यास केला. त्याकरिता जरूर पडली म्हणून संस्कृतचे अध्ययन केले. व्याकरण आणि ग्रंथ यांच्या साहाय्याने ९ वर्षात वेद वाचण्याइतकी प्रगती केली. त्यानंतर ते १० जानेवारी १८०० रोजी कलकत्त्यापासून २९ किलोमीटरवर असलेल्या श्रीरामपूर(Serampur)या डॅनिश वसाहतीत आले. तेथे त्यांनी एक चर्च व एक शाळा काढली आणि एक छापखाना उभारला.
पंचानन कर्मकार नावाच्या लोहाराकडून त्यांनी अनेक भाषांचे खिळे करून घेतले आणि छपाईला सुरुवात केली. छापखान्यातून १८३४ पर्यंत बंगाली, मराठी, नागरी, संस्कृत, हिंदी, कोंकणी, गुजराथी, कानडी, तेलुगू , पंजाबी , उडिया, अरेबिक, पर्शियन, चिनी इत्यादी इत्यादी चाळीस भाषांमधून ख्रिस्ती धर्मग्रंथांच्या दोन लक्ष बारा हजार प्रती छापून प्रसिद्ध केल्या. पौर्वात्य भाषांच्या छपाईचा त्यांनी पाया घातला.
विल्यम कॅरे यांनी लिहिलेले इतर ग्रंथ:-मराठी भाषेचे व्याकऱण, मराठी-इंग्रजी शब्दकोश(हा कोश मोडी लिपीत होता), संस्कृत व्याकरण, कन्नड आणि तेलुगू व्याकरणे. हे सर्व ग्रंथ १८१७ पर्यंत प्रसिद्ध झाले. विल्यम कॅरे मराठी आणि मोडी गद्य मुद्रणाचा ओनामा करणारे पहिले इंग्रज पंडित, वनस्पतिशास्त्रज्ञ, कोशकार, व्याकरणकार व बहुश्रुत आणि बहुभाषी भाषांतरकार होते.
कलकत्त्याच्या फ़ोर्ट विल्यम कॉलेजमध्ये ते बंगाली व संस्कृत भाषा आणि पौर्वात्य संस्कृती या विषयांचे १८०१ ते १८३० पर्यंत प्राध्यापक होते. ते या भाषांशिवाय इंग्रजी, फ़्रेंच, लॅटिन, ग्रीक, हिब्रू या भाषांत पारंगत होते. त्यांचा देहान्त श्रीरामपूर(बंगाल) येथे १ जून १८३४ ला झाला.
- इ.स. १८०१मध्ये विल्यम कॅरे यांनी पंडित वैजनाथ यांच्या मदतीने पहिला मोडी लिथोग्राफ,श्रीरामपूर बंगालयेथे बनवला.