फळबाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फार प्राचीन काळापासून मनुष्याच्या आहारात फळांचा समावेश असल्याचे आढळून येते. मनुष्य भटक्या स्थितीत फिरत असताना तो प्राण्याची शिकार व जंगलातील लहान मोठी फळे यांवर उदनिर्वाह करीत असे. कालांतराने तो शेती करू लागल्यावर फळझाडांची लागवड निवासस्थानाभोवती लहान प्रमाणावर होऊ लागली असावी. ईजिप्शियन लोक, खजूर, द्राक्षे, ऑलिव्ह, अंजीर, केळी, लिंबू गटातील फळे आणि डाळिंब या फळझाडांची लागवड करीत. फळझाडांपैकी मनुष्याने सर्वप्रथम खजुराच्या झाडाची इ. स. पू. ७००० वर्षे या काळात लागवड सुरू केली. डाळिंबाची लागवड इ. स. पू. ३५०० वर्षे या काळात होत असे. भारतातही फळझाडांची लागवड प्राचीन काळापासून होत असल्याचे आढळून आले आहे. इ. स. पू. चौथ्या शतकात लिहिलेल्या कौटिलीय अर्थशास्त्रात द्राक्षाच्या लागवडीसंबंधी उल्लेख आहे. सु. ४००० वर्षांपासून आंबा लागवडीत आहे असे दिसते. आंबा, केळी, द्राक्षे, अंजीर आणि खजूर ही फळे प्राचीन काळात लोकप्रिय होती. केळी, नारळ व आंबा ही फळे देवाला अर्पण करण्याची पद्धत आणि घरांचे दरवाजे व रस्त्यावरील कमानी सुशोभित करण्यासाठी आंबा व केळी या झांडांच्या पानांचा उपयोग हे फळझाडांच्या पूर्वापार लागवडीसंबंधी पुष्टी देणारे पुरावे आहेत. फणस, आवळा, चिंच आणि बेल ही फळझाडेही पुरातन काळापासून लागवडीत असावीत; परंतु सर्वसामान्यपणे फळझाडे शेताच्या बांधावर लावण्याची पद्धत असे व त्यांपासून कौटुंबिक गरजा भागत. मोठ्या प्रमाणावर फळझाडे लावण्याची पद्धत एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत फारशी अस्तित्वात नव्हती. व्यापारी तत्त्वावर फळबाग लावण्याची पद्धत विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात सुरू झाली. याचे कारण म्हणजे फळांचे आहारातील महत्त्व लोकांना कळू लागले व त्यामुळे मागणी वाढली.

आहारातील फळांचे महत्त्व: फळांत पचनास सुलभ अशा प्रकारची शर्करा असते, त्यामुळे ती लहान मुले व उतार वयाच्या अथवा अशक्त प्रौढांसाठी फार उपयुक्त आहेत. सर्वसामान्य प्रकृतीच्या मनुष्यांसाठीही त्यांतील जीवनसत्त्वे व खनिज पदार्थांमुळे ती उपयुक्त आहेत. शिवाय ती सारक असून निरनिराळ्या फळांत विशिष्ट औषधी गुणधर्मही असतात. आंबा, पपई, फणस आणि खजूर या फळांत अ जीवनसत्त्व काजू, अक्रोड, बदाम, जरदाळू, केळी, सफरचंद यांत ब१ जीवनसत्त्व; बेल, लिची, पपई, अननस, डाळिंब यांत ब२ जीवनसत्त्व आणि पपई, लिंबू गटातील फळे, स्ट्रॉबेरी, बोर, आवळा व अननस या फळांत क जीवनसत्त्व पुष्कळ प्रमाणात असतात.

प्रत्येक मनुष्याच्या आहारात दर दिवसाला कमीत कमी ६० ग्रॅ. फळांचा समावेश असणे आवश्यक आहे; परंतु, भारतात हे प्रमाण फक्त १५ ग्रॅ.च्या आसपास आहे (अमेरिकेत ते ४५० ग्रॅ. आहे). एकक क्षेत्रफळातून मिळणाऱ्या ऊर्जेच्या (कॅलरींच्या) दृष्टीनेही फळझाडांच्या लागवडीला फार महत्त्व आहे.

क्षेत्र व उत्पादन : जागतिक उत्पादनाच्या दृष्टीने सफरचंद, द्राक्षे, संत्रे, मोसंबे व लिंबू गटातील इतर फळे, केळी आणि आंबा ही फळे विशेष महत्त्वाची आहेत. त्याखालोखाल ऑलिव्ह, नासपती, पीच (सत्पाळू), अलुबुखार ही फळे असून त्यानंतर खजूर, अननस, जरदाळू, ॲव्होकॅडो व स्ट्रॉबेरी या फळांचा क्रमांक लागतो. जगात सर्वांत अधिक उत्पादन द्राक्षाचे असून त्याखालोखाल लिंबू गटातील फळांचे आहे. त्यानंतर अनुक्रमे केळी व सफरचंद यांचा क्रमांक लागतो.