पांढऱ्या डोक्याची रेडवा
पांढऱ्या डोक्याची रेडवा किंवा पांढऱ्या डोक्याचा भारीट (इंग्रजी: Whitecapped Bunting; हिंदी: सफेद टोपी भारीट) एम्बेरिझिडे कुळातील एक पक्षी आहे.
ओळखण
[संपादन]हे पक्षी आकाराने चिमणीएवढे असतात. नराचा माथा राखी असतो. डोळा व गळा यांना जोडणारी काळी पट्टी असते. गाल पांढुरके असतात. पाठ व पार्श्व तांबूस असते. शेपटी तपकिरी आणि छाती पांढरी असते. छातीखालील भाग तांबूस असतो. इतर खालील भागाचा वर्ण पिवळसर पांढरा असतो आणि खुब्यावर तांबूस रेषा असतात.
मादीचे डोके राखट तपकिरी असते तर डोळ्यांभोवती पिवळट रंग असतो. कान व मानेची बाजू तपकिरी असते आणि पाठीवर गर्द तपकिरी रेघा असतात. पार्श्व तांबूस आणि कंठ पिवळट असतो. त्यावर गर्द रेषा असतात. छाती तांबूस असते आणि शेष भाग पिवळसर असून, त्यावर गर्द रेषा असतात.
वितरण
[संपादन]हे पक्षी पाकिस्तानमधील पर्वतीय प्रदेश आणि काश्मीर ते गढवाल या भागांत उन्हाळी पाहुणे असतात. वायव्य सरहद्द प्रांत व सॉल्ट रेंज, नेपाळ आणि पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या भागांतील मैदानी प्रदेशात हिवाळी पाहुणे असतात.
निवासस्थाने
[संपादन]पांढऱ्या डोक्याच्या रेडवा गवताने युक्त झुडूपी जंगलात राहतात.
संदर्भ
[संपादन]- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली