पहिले कर्नाटक युद्ध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पहिले कर्नाटक युद्ध
कर्नाटक युद्धे यातील एक भाग
Surrender of The City of Madras 1746.jpg
इंग्रज मद्रासचा ताबा सोडताना
दिनांक १७४६ - १७४८
ठिकाण कर्नाटक, भारत
परिणती ए ला चॅपेलचा तह
युद्धमान पक्ष
Asafia flag of Hyderabad State.png हैदराबादचा निजाम
अर्काटचा नवाब
Royal Standard of the King of France.svg फ्रांस
Royal Standard of the King of France.svg फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी
Union flag 1606 (Kings Colors).svg ग्रेट ब्रिटन
Flag of the British East India Company (1707).svg ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी
सेनापती
अनवरुद्दीन मुहम्मद खान,
मुहम्मद अली खान
जोसेफ फ्रांस्वा डुप्ले,
ला बार्डोनेस
स्ट्रिंजर लॉरेन्स,
एडवर्ड पेटॉन,
एडवर्ड बोस्कॉन

पहिले कर्नाटक युद्ध (मराठी नामभेद: कर्नाटकातील पहिला इंग्रज-फ्रेंच संघर्ष ; इंग्रजी: First Carnatic War, फर्स्ट कर्नाटिक वॉर) हे कर्नाटक युद्धे मालिकेतील इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात भारतातील कर्नाटक प्रांतात इ.स. १७४६ ते इ.स. १७४८ या कालावधीत झालेले पहिले युद्ध होते. या युद्धात इंग्रजांच्या वतीने त्यांची भारतातील व्यापारी कंपनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व फ्रेंचांच्या वतीने त्यांची भारतातील व्यापारी कंपनी फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी यांनी सहभाग घेतला.

पार्श्वभूमी[संपादन]

ऑक्टोबर, इ.स. १७४० मध्ये ऑस्ट्रियाच्या वारसाहक्काच्या युद्धाला सुरुवात झाली. हे युद्ध आठ वर्षे चालले. या युद्धात ऑस्ट्रिया आणि प्रशिया हे दोन परस्परविरोधी मुख्य पक्ष होते. याच युद्धात कित्येक लहान मोठ्या युरोपियन सत्तांनी भाग घेतला. या युद्धात इंग्लंडने ऑस्ट्रीयाचा तर फ्रान्सने प्रशियाचा पक्ष घेतला. इ.स. १७४४ मध्ये इंग्लंड आणि फ्रान्समध्ये युद्धास सुरुवात झाली. त्याच्या परिणामी भारतातील त्यांच्या व्यापारी कंपन्यांमध्येही कर्नाटकात युद्धास सुरुवात झाली.

मुख्य घटना[संपादन]

भारतातील फ्रेंच प्रदेशाचा गव्हर्नर म्हणून जोसेफ डुप्लेने ऑक्टोबर, इ.स. १७४१ मध्ये कारभार स्विकारला होता. पॉण्डेचेरी हे त्याच्या कारभाराचे मुख्यालय होते. याच काळात युरोपात ऑस्ट्रियन वारसाहक्काच्या युद्धाला सुरुवात झाली होती पण भारतीय आघाडीवर शांतता होती परंतु इंग्लंड व फ्रांसच्या सरकारांनी त्यांच्या त्यांच्या कंपन्यांना त्यांच्या युरोपियन विरोधकांच्या हालचालींवर नजर ठेवण्यास सांगितले. यावेळी फ्रेंच जहाजाची एक तुकडी मॉरिशसचा फ्रेंच गव्हर्नर ला बोर्डोनेसच्या नेतृत्वाखाली भारतीय समुद्रात आली. युद्ध झालेच तर ब्रिटिशांविरूद्ध लढण्यासाठी ही तुकडी आली होती. एक वर्षाहून अधिक काळ ही तुकडी युद्धाची वाट पाहत समुद्रात थांबली परंतु युद्ध न झाल्याने ही तुकडी परत मॉरिशसला निघून गेली. इंग्लंड व फ्रांस यांच्यात जेव्हा प्रत्यक्षात युद्धाला सुरुवात झाली त्यावेळी भारतीय समुद्रात कोणतीही फ्रेंच जहाजे नव्हती.

इ.स. १७४५ मध्ये चार युद्ध जहाजे घेऊन बार्नेटच्या नेतृत्वाखाली इंग्लिश आरमार कारोमांडेल किनार्यावर आले. डुप्लेने त्यावेळी आपण मुघलांचा नवाब व मनसबदार असल्याचे सांगितले. डुप्लेने अर्काटचा नवाब अन्वरूद्दिनचे मन वळवून त्याच्या अधिकारक्षेत्रात युरोपियन सत्तांमधील संघर्ष टाळण्यास त्याला राजी केले. एप्रिल, १७४६ मध्ये बार्नेटचा अचानक मृत्यू झाल्याने त्याच्या जागी पेटॉनची ब्रिटिश आरमाराच्या तुकडीचा प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली.

जुलै इ.स. १७४६ मध्ये ला बोर्डोनेस आठ युद्ध जहाजे असलेली नवीन आरमाराची तुकडी घेऊन कारोमांडेल किनार्यावर आला आणि त्याने ब्रिटिश आरमाराच्या तुकडीला आव्हान दिले. ब्रिटिश जहाजांची तुकडी फ्रेंचांसमोर टिकू शकली नाही. कोणताही निर्णय न लागता ब्रिटिश जहाजे सिलोनला परतली व तिथून बंगालकडे गेली व तिथे नवीन ब्रिटिश कुमकेची वाट पाहू लागली.

मद्रास असुरक्षित असल्याचे लक्षात येताच ला बोर्डोनेसने मद्रासवर चढाई करुन त्याची नाकेबंदी केली. दोन आठवड्यांच्या संघर्षानंतर २१ सप्टेंबर, इ.स. १७४६ रोजी मद्रास फ्रेंचांच्या ताब्यात आले. परिणामी इंग्रजांनी अर्काटचा नवाब अन्वरूद्दीन याची मदत घेतली परंतु फ्रेंच गव्हर्नर डुप्लेने इंग्रजांकडून जिंकलेले मद्रास अन्वरुद्दीनला देण्याचे कबूल करुन त्याला शांत बसविले.

इंग्रजांशी करावयाच्या तहाच्या अटींवरुन डुप्ले आणि बोर्डोनेस यांच्यात वाद झाला. फ्रेंच ॲडमिरलने इंग्लिश गव्हर्नर मोर्सशी एक करार करुन त्याच्याकडून भरमसाठ युद्धखंडणी घेऊन त्याच्या हवाली मद्रास करण्याचे ठरविले परंतु हे अत्यंत मोक्याचे ठिकाण डुप्ले फ्रेंचांच्या हाती ठेवू इच्छित होता. ला बोर्डोनेसने मोर्सकडून स्वत:साठी चाळीस हजार पौंडांची रक्कम घेतली असल्याने तो डुप्लेशी भांडला व रागारागाने आपले आरमार घेऊन मद्रासहून निघून गेला.[१]

ला बोर्डोनेस निघून गेल्यानंतर डुप्लेने इंग्रजांशी केलेला करार नाकारला आणि एकाएकी मद्रासच्या सेंट जॉर्ज किल्ल्याचा ताबा घेतला. तिथे असलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सर्व नोकरांसहीत क्लाईव्ह तसेच गव्हर्नर जनरल मोर्स यालाही डुप्लेने कैद करुन पाँडेचेरीला आणले व त्यांना फ्रेंचांच्या विजय संचालनातही भाग घ्यावयास लावले.

ए-ला-चॅपेलचा तह[संपादन]

ऑस्ट्रियन वारसाहक्काचे युद्ध इ.स. १७४८ साली झालेल्या ए-ला-चॅपेलच्या तहाने संपुष्टात आले. त्यामुळे कर्नाटकचे पहिले युद्धही समाप्त झाले. मद्रास इंग्रजांना परत देण्यात आले व त्याबदल्यात फ्रेंचांना उत्तर अमेरिकेतील लुईसबर्ग मिळाले तसेच पॉण्डेचेरीवर आक्रमण न करण्याचे आश्वासन इंग्रजांनी फ्रेंचांना दिले.[२]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. शेल्फर्ड बिडवेल (इ.स. १९७१). स्वॉर्ड्स फॉर हायर, युरोपियन मर्सिनरीज इन एटिन्थ सेंचुरी इंडिया. जॉन मरे, लंडन. (इंग्रजी मजकूर) 
  2. हेन्री डॉडवेल (इ.स. १९२०). डुप्ले ॲन्ड क्लाईव्ह; द बिगिनिंग ऑफ एम्पायर. मेथुयन ॲन्ड कंपनी , लंडन. (इंग्रजी मजकूर) 

हेही पाहा[संपादन]