शिवकुमार शर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पंडित शिवकुमार शर्मा या पानावरून पुनर्निर्देशित)
शिवकुमार शर्मा
शिवकुमार शर्मा
जन्म १३ जानेवारी १९३८ (1938-01-13)
जम्मू
मृत्यू १० मे, २०२२ (वय ८४)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र संगीतकार,
संगीत प्रकार हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत
वाद्ये संतूर
कार्यकाळ १९५५-२०२२
प्रसिद्ध आल्बम कॉल ऑफ द व्हॅलीज
प्रसिद्ध चित्रपट सिलसिला, लम्हे, चांदनी
अपत्ये रोहित, राहुल
पुरस्कार पद्मश्री, पद्म विभूषण
संकेतस्थळ santoor.com

शिवकुमार शर्मा (१३ जानेवारी, इ.स. १९३८; जम्मू, - १० मे, २०२२; मुंबई) हे एक ख्यातनाम भारतीय संतूर वादक होते. संतूर हे काश्मीरचे लोकवाद्य आहे. या वाद्यात शंभर तारा असतात.

सुरुवातीची वर्षे[संपादन]

शिवकुमार शर्मा यांचा जन्म जम्मू येथे झाला असून त्यांची मातृभाषा डोग्री आहे. १९९९ साली त्यांनी रेडिफला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की त्यांच्या वडिलांनी त्यांना केवळ पाच वर्षांचे असल्यापासून शास्त्रीय गायन आणि तबल्याचे धडे द्यायला आरंभ केला. त्यांच्या आई उमा दत्त शर्मा (गायिका) यांनी सखोल अभ्यास करून ठरवले की शिवकुमार यांनी भारतीय शास्त्रीय संगीत संतूरवर वाजवणारे भारतातील पहिले वादक बनावे. म्हणून मग त्यांच्या इच्छेनुसार, शिव कुमार यांनी वयाच्या तेराव्या वर्षापासून संतूर शिकण्यास प्रारंभ केला आणि उमा दत्त शर्मा यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. त्यांनी आपल्या वादनकौशल्याचे पहिले सादरीकरण १९५५ मध्ये मुंबई येथे हरिदास संगीत संमेलनात केले.[१]

सांगीतिक कारकीर्द[संपादन]

सुरुवातीची काही वर्षे कंठगायन केल्यानंतर शिवकुमार शर्मा हे संतूरवादनाकडे वळले. संतूर या वाद्याला लोकप्रिय करण्याचे श्रेय त्यांनाच जाते. १९५६ साली शांताराम यांच्या "झनक झनक पायल बाजे" गाण्यास त्यांनी संगीत दिले. १९६० साली त्यांनी स्वतःचा एकल गीतसंच प्रसिद्ध केला.

१९६७ साली त्यांनी प्रसिद्ध बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया आणि ब्रिज भूषण काब्रा यांच्यासमवेत "कॉल ऑफ द व्हॅली" ही ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध केली. ती कालांतराने खूपच प्रसिद्ध झाली. हरिप्रसाद चौरसिया यांच्या साथीने त्यांनी काही चित्रपटांना संगीतसुद्धा दिले आहे. त्याची सुरुवात १९८० साली "सिलसिला" चित्रपटापासून झाली. या काळात या जोडगोळीने "शिव-हरी" या नावाने संगीत दिले होते. त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांपैकी काही चित्रपट हे: फासले (१९८५), विजय, चाँदनी (१९८९), लम्हे (१९९१), साहिबान, डर (१९९३).[१]

पंडित शिवकुमार शर्मा यांना मिळालेले सन्मान[संपादन]

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी सन्मान स्वीकारताना पं. शिवकुमार शर्मा

पंडित शिवकुमार शर्मा यांना अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सन्मान आणि पुरस्कार मिळाले आहेत.  त्यांना  १९८५ मध्ये  बाल्टीमोर शहराची मानद नागरिकतासुद्धा मिळाली आहे. पंडित शिवकुमार शर्मा यांना सन १९८६ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला, सन  १९९१ साली  पद्मश्री, तसेच  २००१ मध्ये  पद्म विभूषण या सन्मानाने पंडितजी यांना सन्मानित करण्यात आले.

वैयक्तिक आयुष्य[संपादन]

शिवकुमार शर्मा यांचे लग्न हे मनोरमा शर्मा यांच्याशी झाले असून त्यांना रोहित आणि राहुल हे दोन मुलगे आहेत.[२] त्यांचा मुलगा राहुल हासुद्धा संतूर वादक असून १९९६ पासून तो शिवकुमारांना साथ करतो आहे. १९९९मध्ये शर्मा यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, राहुलला देवाकडूनच संगीताची भेट मिळाली असल्यानेच त्यांनी त्याचा शिष्य म्हणून स्वीकार केला आहे.

आत्मचरित्र[संपादन]

शिवकुमार शर्मा यांनी 'जर्नी विद अ हंड्रेड स्ट्रिंग्ज: माय लाईफ इन म्युझिक' या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. या पुस्तकाचे सहलेखन इना पुरी यांनी केले आहे.[३]

निधन[संपादन]

वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मुंबई येथे निधन झाले.[४]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ a b "I had an anna in my pocket and nothing to eat: Shivkumar Sharma". DNA India (इंग्रजी भाषेत). 2022-05-10 रोजी पाहिले.
  2. ^ "I am different from my dad Pt Shivkumar Sharma: Rahul Sharma". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2016-06-18. 2022-05-10 रोजी पाहिले.
  3. ^ शर्मा, शिवकुमार (2018). Journey with a Hundred Strings My Life in Music. Penguin Random House India Private Limited. ISBN 9789353052485.
  4. ^ "प्रसिद्ध संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन". Maharashtra Times. 2022-05-10 रोजी पाहिले.