जोन ऑफ आर्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जोन ऑफ आर्क ही इंग्लंड-फ्रान्समधील युद्धाच्या वेळी फ्रेंच लोकांची एकजूट करून इंग्रजांविरुद्ध यशस्वी लढा देणारी एक थोर नायिका होती.

जोन ऑफ आर्क

सुरुवातीचे दिवस[संपादन]

जोनचा जन्म उत्तर फ्रान्समधिल डोम्रेमी या खेड्यात १४१२ साली एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. तिच्या जन्माच्या वेळी फ्रान्स आणि इंग्लंडदरम्यान इतिहासात प्रसिद्ध असलेले १०० वर्षांचे युद्ध सुरू होते. सातत्याने चालत असलेल्या युद्धाने फ्रान्सची जनता त्रस्त झाली होती. इंग्लंडचा राजा पाचवा हेन्ऱी याने फ्रेंचांचा अगीनकोर्ट येथे १४१५ मध्ये जबरदस्त पराभव केला. यानंतर त्याने त्याच्या मुलास फ्रान्सचा राजा घोषित केले. फ्रेंच राजा चार्ल्स सातवा व राजपुत्र डो-फॅन लोरें नदीच्या पलीकडे पळून गेले.

आकाशवाणी[संपादन]

साधारणपणे वयाच्या तेराव्या वर्षी जोनला आकाशवाणी ऐकू येण्याचे भास होऊ लागले. तिचे असे म्हणणे होते की काही महान संतांनी तिला सांगितले आहे की, ती फ्रेंचांना इंग्लंडपासून वाचवणार आहे. जसे तिचे वय वाढत गेले तसे तिचे भास अजून वाढत गेले व सरतेशेवटी १७ व्या वर्षी तिने स्थानिक किल्लेदाराला भेटून डो-फॅनला भेटायची परवानगी मागितली. सुरुवातीला तिची मागणी धुडकावून लावण्यात आली. पण तिने सातत्याने आपल्या मागणीचा पाठपुरावा चालू ठेवला. सरतेशेवटी तिची मागणी मान्य झाली. रोबर्ट डे बॉड्रिकोर्ट याने तिला एक घोडा व काही घोडेस्वार दिले. रातोरात ती इंग्लिश शिपायांची पर्वा न करता लोरें नदीच्या काठच्या चिनॉ येथे डो-फॅन पाशी पोहोचली.

युद्धनायिका[संपादन]

डो-फॅनच्या दरबारात तिचे स्वागत अपेक्षितरीत्या काय हा वेडेपणा, कसं शक्य आहे या सुरातच झाले. एक शेतकरी, ती पण षोडश वर्षाची मुलगी आपल्याला इंग्रजांपासून स्वातंत्र्य देणार ही गोष्टच कुणाला पटली नाही. पण तिने सांगितलेल्या गोष्टीची खात्री म्हणून डो-फॅनने कर्ल्गींना (धर्मगुरूंचे पॅनेल) विचारले. त्यांनी मात्र ती जे काही सांगत आहे ते भास नसून देवाज्ञा आहे असे प्रमाणपत्र दिले. व सर्वांचा हळूहळू तिच्यावर विश्वास बसू लागला.

याच वेळेस फ्रान्सवरचे मोठे संकट म्हणजे ओर्लिन्स वर असलेला इंग्रजांचा वेढा. जर ओर्लिन्स पडले तर पुढील लढा अजून बिकट झाला असता. डो-फॅनने जोनला ४००० सैन्याची फौज मदतीला दिली. १७२९ एप्रिल मध्ये जोन ओर्लिन्सला फौजेसकट पोहोचली. अत्यंत बिकट परिस्थितीत तिने आपल्या बचावासाठी लढणाऱ्या फ्रेंच सैनिकांना आक्रमणासाठी प्रेरित केले. या जोरदार आक्रमणामुळे पाहता पाहता इंग्रजांना वेढा उठवणे भाग पाडले. एवढ्यावरच संतुष्ट न होता तिने त्यांचा पाठलाग केला व इंग्रजांची पळता भुई थोडी केली. आपल्या आक्रमणाचा भाग म्हणून तिने इंग्रजांच्या ताब्यातील फ्रेंच हद्दीवर हल्ले चालू केले व अनेक दशके इंग्रजांच्या ताब्यातील भाग मुक्त करण्यास सुरुवात केली. फ्रेंच घोडदळाच्या मदतीने पटाय येथे इंग्रजांचा मोठा पराभव केला. हा इंग्रजांचा कित्येक दशकांतील सर्वांत मोठा पराभव होता.

या विजयानंतर रेह्म्स कॅथेड्रल येथे तिने १७ जुलै १४२९ रोजी चार्ल्सला राज्याभिषेक केला. व त्याला पुन्हा फ्रेंच राज्यकर्ता म्हणून घोषित केले. हा क्षण जोनच्या कारकीर्दितील अत्युच्च क्षण मानता येईल. पुढील तीन महिन्यात जोनने अनेक लढायांमध्ये लक्षणीय कामगिरी बजावली. व फ्रेंच राज्यपरिवार वॉलोय्सची मक्तेदारी कायम राहील याची काळजी घेतली.

बंदिवास,धर्मिक खटला व शेवट[संपादन]

जोनची वाढती लोकप्रियता व फ्रेंचांचे प्रतिआक्रमण यामुळे जोन इंग्रजांसाठी डोकेदुखी ठरली होती. तसेच व्हालवा राजघराण्याची मक्तेदारी नको असलेले व इंग्रजांशी हितसंबध जुळवलेले अनेक सरंजामदार जोनचे शत्रू बनले होते. त्यापैकी बरगंडीच्या सैनिकांनी जोनला २३ मे, १४३०ला पकडले व पैशाच्या मोबदल्यात तिला इंग्रजांच्या ताब्यात दिले. तिला उत्तर फ्रान्समधील रुआ येथे डांबून ठेवले. इंग्रजांनी तिच्यावर धार्मिक खटला चालवला. यात जर जोन दोषी आढळली तर फ्रेंच जनतेवरील तिचा प्रभाव कमी होईल हा बेत त्यात होता. तिच्यावर अनेक खोटे-नाटे आरोप ठेवण्यात आले. पण देवावर आपार श्रद्धा असलेली जोन त्या आरोपांना सहज सामोरी गेली. तिने ते आरोप मान्य करावेत म्हणून तिचा खूप छळ करण्यात आला. पण इंग्रजांना तिला काहीही करून दोषी सिद्ध करायचे होतेच, सरतेशेवटी तिला युद्धाच्यावेळेस पुरुषी वेष धारण केला म्हणून व तिने कोणतीही संतांची आकाशवाणी ऐकलेली नाही, उलट सैतानाची दूत म्हणून तिला दोषी सिद्ध करून तिला जिवंत जाळण्याची शिक्षा ठोठाविण्यात आली. ३० मे १४३१ रोजी तिला जाळ्ण्यात आले. एका देशभक्त, देवावर आपार श्रद्धा असलेल्या महान नायिकेचा अशा प्रकारे चेटकीण, सैतानाची दूत म्हणून शेवट झाला.

१४५६ मध्ये न्यायालयीन कार्यवाहीत असे लक्षात आले की जोन वरील आरोप पूर्णपणे पूर्वग्रहदूषित होते व तिच्या वर चुकीच्या पद्धतीने खटला चालवण्यात आला होता.

१९२० मध्ये जोनला संत पद बहाल केले गेले.

जोन ऑफ आर्कवरील मराठी पुस्तके[संपादन]

  • संत योद्धा : जोन ऑफ आर्क (मदन पाटील)

बाह्य दुवे[संपादन]