गाढव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गाढव
गाढव

गाढव हे सस्तनी वर्गातील विषमखुरी गणाच्या ईक्विडी कुलातील एक प्राणी आहे. आशिया खंडात मंगोलिया आणि तिबेटपासून सिरियापर्यंत, तर आफ्रिका खंडाच्या पूर्व आणि उत्तर भागांत गाढवे आढळतात. तुरळक खुरटी झुडपे आणि विरळ हिरवळ असलेल्या सपाट वालुकामय प्रदेशात त्यांचा वावर असतो.

इतिहास[संपादन]

आफ्रिकेत आता गाढवांच्या आढळून येणाऱ्या दोन जाती आहेत; ईक्वस आफ्रिकेनस सोमॅलिकस आणि ईक्वस आफ्रिकेनस आफ्रिकेनस. यूरोप व अमेरिकेत आढळणारी पाळीव गाढवे (ईक्वस आफ्रिकेनस अ‍ॅसिनस) ही आफ्रिकेतील रानटी गाढवांपासून (ईक्वस अ‍ॅसिनस) निपजलेली आहेत. आफ्रिकेत आढळणारी मूळ रानटी गाढवे ईक्वस आफ्रिकेनस आणि आशियाई रानटी गाढवे ईक्वस हेमिओनस या नावांनी ओळखली जातात. आशियातील पाळीव गाढवे मूळ रानटी जातीतूनच उत्पन्न झाली आहेत. आशियाई गाढवाच्या पाच उपजाती खालीलप्रमाणे आहेत :

१) ईक्वस हेमिओनस कुलान गाढव. ही उपजाती मंगोलियात आढळते.

२) ईक्वस हेमिओनस ओनेजर ही उपजाती इराण, तुर्कमेनिस्तान आणि भारत या ठिकाणी आढळते.

३) ईक्वस हेमिओनस कियांग : कियांग गाढवे. ही सर्वांत मोठी आणि देखणी असून ती तिबेट आणि सिक्कीम येथे आढळतात. काही प्राणिशास्त्रज्ञ कियांग ही उपाजाती न मानता वेगळी जाती मानतात.

४) ईक्वस हेमिओनस हेमिप्पस : ही सिरियन गाढवे जवळपास नामशेष झाल्यात जमा आहेत.

५) ईक्वस हेमिओनस खर ही गाढवे भारतात कच्छचे रण, लडाख आणि पाकिस्तान येथे आढळतात.

बराचसा घोड्यासारखा दिसणारा हा प्राणी आकारमानाने घोड्यापेक्षा लहान असतो. खांद्यापाशी त्याची उंची ०.९-१.५ मी. असून त्याचे कान घोड्याच्या तुलनेत अधिक लांब असतात. पाय आखूड असतात. डोक्यासह त्याची लांबी २-२.२ मी. असून शेपटी ४२-४५ सेंमी. लांब असते. शेपटीच्या टोकाला लांब केसांचा झुपका असतो. गाढवाची आयाळ ताठ आणि आखूड केसांची असते. अंगावर केसांचे दाट आवरण असते. रंग पिवळसर करड्यापासून गडद तांबूस अथवा तपकिरी रंगाच्या दरम्यान असतो. सामान्यत: नाक आणि पोटाकडील भाग फिक्कट असतो. खांद्याजवळ आणि चारही पायांवर काळे पट्टेही असतात.

वाळवंटात खुरटे गवत असणाऱ्या काही भागांना बेटे म्हणतात. अशा बेटांवर रात्रीच्या वेळी गाढवे चरताना आढळतात. प्रसंगी काही गाढवे एकेकटीही भटकतात. गाढवांची गुजराण निकस चाऱ्यावर आणि कमी पाण्यावर होत असते.

गाढवाची मादी वर्षभरात प्रजननक्षम होते. गाढवांमध्ये वसंत ऋतूत प्रजनन होते. गर्भावधी सुमारे वर्षभराचा असतो. एका वेळी एकच पिलू होते. शिंगरू सहा महिन्यांपर्यंत स्तनपान करते. गाढवीच्या दुधात लॅक्टोजचे प्रमाण जास्त असून केसीन या दुग्धप्रथिनांचे प्रमाण कमी असते. गाढवाचा आयु:काल २५-४६ वर्षे इतका असतो.

गाढवे सु. १३,००० वर्षांपूर्वीपासून पाळली जात असावीत असा अंदाज आहे. सु. ३,००० वर्षांपूर्वीपासून ईजिप्तमध्ये ओझी वाहून नेण्यासाठी आणि सवारीसाठी गाढवांचा वापर होत आला आहे. काटकपणा आणि सहनशीलता या गुणांमुळे दुर्गम डोंगराळ प्रदेशात दूरवर ओझी वाहून नेण्यासाठी गाढवे अतिशय उपयुक्त ठरतात. प्रतिकूल परिस्थितीत चिकाटीने काम करण्यात गाढवे प्रसिद्ध आहेत.

गाढवांसाठी ‘अ‍ॅस’ हा इंग्रजी शब्द व्यापक अर्थाने वापरतात. डॉंकी, मोक, जेनेट, बरो असे शब्दही अ‍ॅसच्या समानार्थी आहेत. त्यांचा वापर विशेषकरून स्थानपरत्वे होतो.

गाढव (नर) व घोडी यांच्यापासून उत्पन्न झालेल्या संकरजाला ‘खेचर’ म्हणतात. घोडा व गाढवी यांच्यापासून उत्पन्न झालेल्या संकरजाला ‘हिनी’ म्हणतात.


हे सुद्धा पहा[संपादन]