कॅरल गिलिगन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

(२८ नोव्हेंबर १९३६). अमेरिकन स्त्रीवादी विचारवंत, जागतिक ख्यातीच्या मानसशास्त्रज्ञ , नीतितज्ज्ञ आणि सुप्रसिद्ध लेखिका. ‘नैतिक समस्यांकडे पाहण्याचा स्त्रियांचा दृष्टिकोण’ या विषयावर त्यांनी सखोल संशोधन केले. आज गिलिगन या अत्यंत प्रभावशाली स्त्रीवादी विचारवंत मानल्या जातात. १९९७ मध्ये ‘लिंगभेद अभ्यास’ या विषयाच्या हार्व्हर्ड विद्यापीठातील त्या पहिल्या प्राध्यापिका  ठरल्या.

            गिलिगन यांचा जन्म न्यू यॉर्क येथे झाला. त्यांनी स्वार्थमोर महाविद्यालयातून इंग्रजी साहित्यात पदवी संपादन केली (१९५८). १९६१ मध्ये रॅडक्लिफ महाविद्यालयातून त्यांनी ‘वैद्यकीय मानसशास्त्र’ या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे हार्व्हर्ड विद्यापीठातून पीएच्. डी. करण्यासाठी गिलीगन यांनी ‘सामाजिक मानसशास्त्र’ या विषयाची निवड केली.

  अमेरिकन मानसशास्त्रज्ञ एरिक एरिकसन (१९०२ ̶ ९४) आणि लॉरेन्स कोलबर्ग (१९२७ ̶ ८७) या दोन प्राध्यापकांसोबत त्यांनी अध्यापनास प्रारंभ केला. या दरम्यान त्या कोलबर्ग यांच्या संशोधन सहायक म्हणूनही कार्यरत होत्या. गिलिगन यांच्यावर कोलबर्ग यांचा सखोल प्रभाव असला, तरी त्यांच्या विचारांशी मात्र त्या पूर्णपणे सहमत नव्हत्या. गिलीगन यांच्या इन अ डिफरंट व्हॉईस (१९८२) या पुस्तकाद्वारे त्यांची मानसशास्त्र आणि शैक्षणिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण झाली. हे पुस्तक मुख्यत्वे दोन कारणांसाठी गाजले. एक म्हणजे या पुस्तकाद्वारे गिलिगन यांनी कोलबर्गच्या नैतिकतेच्या सिद्धांताच्या उपयोजनाविषयी शंका उपस्थित केली आणि दुसरे म्हणजे या पुस्तकातून स्त्रीवादी समीक्षेला नवा आयाम मिळाला.

  स्त्रियांचा आवाज आणि अनुभव मानसशास्त्राकडून दुर्लक्षित झाला आहे, असे गिलिगन यांचे स्पष्ट म्हणणे होते. त्यांच्या मते स्त्री–पुरुषांमध्ये गुणात्मक फरक आहेच; पण या फरकावरून त्यांच्यावर विशिष्ट मूल्यात्मक मते लादता येऊ शकत नाहीत. गिलिगन यांचा हा विशिष्ट दृष्टिकोण ‘भिन्नत्वाधिष्ठित स्त्रीवाद’ (डिफरन्स फेमिनिझम) म्हणून ओळखला जातो. त्यांनी केलेल्या संशोधनातून पुढे आलेले स्त्रियांच्या नैतिक विकासाविषयीचे आणि निर्णयक्षमतेविषयीचे निष्कर्ष त्यांनी आपल्या पुस्तकात ठळकपणे नोंदवले आहेत. गिलिगन यांना त्यांच्या संशोधनासाठी शिक्षणक्षेत्रातील ‘ग्रॉमेयर पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले होते (१९९२). तसेच टाईम नियतकालिकाने प्रकाशित केलेल्या १९९६ या वर्षातील २५ अत्यंत प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत त्यांचा समावेश होता.

  • कोलबर्गच्या नैतिक विकासाच्या सिद्धांताची कॅरल गिलिगनने केलेली समीक्षा : हार्व्हर्डमध्ये कोलबर्ग आणि गिलिगन एकत्रच कार्यरत होते; परंतु तरुणांची नैतिक पातळी ठरवण्यासाठी कोलबर्ग जी  पद्धत वापरत होते ती गिलिगन यांना मान्य नव्हती. नैतिक पातळी मोजण्यासाठी कोलबर्ग त्यांच्या विद्यार्थ्यांसमोर काल्पनिक नैतिक द्वंद्वे ठेवत आणि त्यांच्याकडून गणिती स्वरूपातील उत्तरांची (योग्य/अयोग्य) अपेक्षा करीत.

गिलिगन यांचे निगेचे नीतिशास्त्र (Ethics of Care) : कोलबर्ग यांच्या मूळ सिद्धांतानुसार पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया नैतिक कारणमीमांसेत दुय्यम ठरत. सदर सिद्धांताच्या संदर्भात विचार करताना गिलिगन यांना अजून एक अडचण लक्षात आली आणि ती म्हणजे कोलबर्ग यांचा हा सहा पायऱ्यांचा सिद्धांत केवळ श्वेतवर्णीय पुरुषांच्या संशोधनावर आधारित होता .  गिलिगन यांनी संशोधनाद्वारे नैतिक विकासाचे त्रिस्तरीय नमुनारूप विकसित केले. ते खालीलप्रमाणे :

१. नैतिकता - स्वकेंद्री दृष्टिकोण : गर्भपाताचाविचार करणाऱ्या ज्या २९ महिलांवर गिलिगन यांनी संशोधन केले त्यापैकी काही स्त्रियांसाठी नैतिकतेचा अर्थ हा आत्मकेंद्रितता आणि केवळ स्वतःचा विचार करणं हा होता.

.२. नैतिकता - स्वार्थत्याग : गिलिगन यांच्या मते, पहिल्या स्तरावरील स्त्रियांच्या विचारात आढळणाऱ्या स्वार्थाची जागा या द्वितीय स्तरावर पोहचलेल्या स्त्रियांमध्ये ‘स्वार्थत्यागाने’ घेतलेली असते. या स्तरावर पोहचलेल्या स्त्रिया इतरांची काळजी करण्याच्या आपल्या क्षमतेच्या आधारावर स्वतःची नैतिक पातळी ठरवतात.

३. नैतिकता – परिणामांची जबाबदारी स्वीकारणे : गिलिगन यांच्या मते या तिसऱ्या पायरीवर पोचण्याचा निकष म्हणजे आपल्या निर्णयांच्या परिणामांची जबाबदारी स्वीकारण्याची मानसिकता आणि तयारी. म्हणूनच हे करू शकणाऱ्या स्त्रिया त्यांच्या नमुनारूपात सर्वोच्च स्तरावर आहेत.

अश्या प्रकारे त्यांनी आपले विचार लोकांपर्यंत पोहचवले .