एस.एन. बोस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सत्येन्द्र नाथ बसु (সত্যেন্দ্র নাথ বসু} (1894-1974) भारतीय शास्त्रज्ञ

बोस-आइन्स्टाईन जोडीतील विश्वविख्यात शास्त्रज्ञ सत्येन्द्र नाथ यांचा जन्म ०१ जानेवारी १८९४ रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे वडील सुरेन्द्र नाथ हे रेल्वेत नोकरीला होते.

सत्येन्द्र नाथ यांचे शालेय ते पदवी पर्यंतचे शिक्षण कोलकाता येथेच झाले. लहानपणापासूनच वर्गात पहिला क्रमांक मिळ्वून उत्तीर्ण होण्याचा जणू त्यांना छंदच होता. पहिला क्रमांक त्यांनी कधीच सोडला नाही. शाळेत असतांना एकदा त्यांना गणिताच्या परिक्षेत १०० पैकी ११० गुण देण्यात आले कारण सगळी गणिते त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आणि अचूक सोडविली होती. त्यांचे मित्रच नव्हे तर इतरही विद्यार्थी म्हणत की सत्येन्द्र नाथ शिकत असतांना पहिला क्रमांक सोडून देऊन इतर क्रमांकासाठीच प्रयत्न करता येतील. सत्येन्द्र नाथ यांनी प्रेसीडेन्सी कॉलेज मधून १९१५ साली आपली पदवी प्राप्त करतांनाही पहिला क्रमांक सोडला नाहीच, यावेळी ते संपूर्ण विद्यापिठातून प्रथम आले होते. त्यांना जगदीश चंद्र बोस आणि प्रफुल्ल चंद्र रॉय यांचे सतत मार्गदर्शन आणि उत्तेजन मिळाले. त्यांना अनेक भाषा येत होत्या आणि व्हायोलीन सारखे एसराज नावाचे वाद्य ते अतिशय उत्तमपणे वाजवु शकत.

१९१५ सालीच सत्येन्द्र नाथ यांनी आइन्स्टाईन यांचा मूळ जर्मन भाषेतील असलेला सापेक्षता सिद्धांत सर्वप्रथम इंग्रजी भाषेत भाषांतरीत केला. १९१६ ते १९२१ या काळात सत्येन्द्र नाथ यांनी कोलकाता येथील विद्यापिठात प्राध्यापक पदावर काम कले. १९२१ साली ते ढाका येथील विद्यापिठातील भौतिक शास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.

१९२३ साली सत्येन्द्र नाथ यांनी प्रसिद्ध गणिती मॉल्ट यांच्या समीकरणांशी संबंधित स्वतःचे शोध इंग्लंड येथून प्रकाशित होणारे मासिक फिलॉसॉफीकलकडे पाठविले पण ते शोध छापण्यास त्या मासिकाने नकार कळविला. या घटनेमुळे सत्येन्द्र नाथ निराश झाले नाहीत, त्यांनी त्यांचा प्रबंध आइन्स्टाईन यांच्याकडे जर्मनीला पाठविला. आइन्स्टाईन यांनी तो लेख जर्मन भाषेत भाषांतरीत करून तेथे तो छापून येण्यास मोलाची मदत केली. लेख जगभरातील गणितींच्या पसंतीस उतरला, त्यामुळे बोस प्रसिद्धिस आले. आपल्या कामाच्या व्यापातून सत्येन्द्र नाथ यांनी सुट्टी काढून ते मादाम क्युरी यांच्यासह पॅरीस येथे १० महिने काम केले. हे काम आटोपून सत्येन्द्र नाथ जर्मनीला गेले. तेथे त्यांचे भव्य स्वागत झाले. आइन्स्टाईन यांच्यामुळे इतर वैज्ञानिक जसे मॅक्स प्लांक, शोडिंगर, पोली, हॅजनबर्ग, सोमरपॅण्ड यांच्याशी अनेक विषयांवर विस्तृत चर्चा करता आल्या.

१९४५ साली सत्येन्द्र नाथ यांनी आपली ढाका येथील नोकरी सोडून ते कोलकाता येथे १९५६ पर्यंत प्रोफेसर म्हणून काम केले. या कामातून सेवानिवृत्त झाल्यावर विश्व भारती विद्याल्याचे उपकुलपति म्हणून त्यांची नेमणूक झाली.

भौतिक विज्ञान विषयाचे त्यांनी २४ लेख लिहिले. या विषयातील हे सर्व लेख अत्यंत महत्त्वाचे समजले जातात.

१९५८ साली सत्येन्द्र नाथ यांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविले आणि त्यांना राष्ट्रीय प्रोफेसर म्हणण्यात येऊ लागले, त्याच वर्षी लंडन येथील रॉयल सोसयटीने त्यांना आपला फेलो म्हणून जाहीर केले.

दि. ०४-०२-१९७४ रोजी सत्येन्द्र नाथ यांचे हृदय रोगामुळे निधन झाले.


[संपादन] संदर्भ

वैयक्‍तिक साधने