एच.जी. वेल्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एच. जी. वेल्स
H G Wells pre 1922.jpg
पूर्ण नाव हर्बर्ट जॉर्ज वेल्स
जन्म सप्टेंबर २१, १८६६
ब्रोमली, केंट, इंग्लंड
मृत्यू ऑगस्ट १३, १९४६
लंडन, इंग्लंड
कार्यक्षेत्र कादंबरीकार, इतिहासकार, पत्रकार, शिक्षक
राष्ट्रीयत्व इंग्लिश लोक Flag of England (bordered).svg
साहित्यप्रकार विज्ञानकथा
प्रभाव डार्विनचा उत्क्रांतिवाद, राज्यशास्त्र, इतिहास, मार्क ट्वेन, मार्क शेली
प्रभावित इसाक असिमव
वडील जोसेफ वेल्स
आई साराह निल
पत्नी (१) इसाबेल वेल्स (२) ॲमी कॅथरीन रॉबिन्स

हर्बर्ट जॉर्ज वेल्स आणि प्रसिद्ध फ्रेंच लेखक जुल्स व्हर्न हे दोघे विज्ञानकथेचे जनक म्हणून ओळखले जातात. दोघांनी केवळ कल्पनेने रंगवलेल्या अनेक वस्तू किंवा गोष्टी भविष्यात शोधल्या गेल्या आहेत, किंवा खऱ्या ठरल्या आहेत. एच.जी.वेल्स यांच्या कथा लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच पसंत पडतील अशा आहेत.

हर्बर्ट वेल्स यांचा जन्म इंग्लंड देशातील केंट काउंटीमधल्या ब्रोमली या गावी दि. सप्टेंबर २१ १८६६ झाला. कनिष्ठ मध्यमवर्गातील जोसेफ वेल्स आणि सारा नील यांचे ते चौथे अपत्य. वडील जोसेफ हे आधी माळी काम करीत असत, काही काळानंतर हर्बर्टच्या जन्माआधी त्यांनी किराणा मालाचे एक छोटेसे दुकान सुरू केले तर आई सारा ही मोलकरीण म्हणून काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत असे. हर्बर्टचे शिक्षण कसेबसेच सुरू झाले. आपल्या कुटुंबाची ओढाताण दिसत असल्याने हर्बर्ट लहानपणी केंट विभागाकडून क्रिकेट खेळून चार पैसे मिळवीत. १८७४ साली एका छोट्या अपघातात त्यांचे पायाचे हाड मोडले, सक्तीच्या विश्रांती काळात वडिलांनी आणून दिलेल्या पुस्तकांमुळे वाचनाची आवड निर्माण झाली. त्यामुळे शाळेत अनेक शिष्यवृत्त्या मिळवून आपला शिक्षणाचा खर्च त्यांनी स्वतःच पेलला. पुढे १८९० साली विज्ञान विषयातील पदवी मिळाल्यानंतर त्यांना विज्ञान शिक्षक म्हणून नोकरी मिळाली.

शिक्षकी पेशा सोडून हर्बर्ट यांनी पत्रकार म्हणून पॉल मॉल गॅझेटमध्ये लेख, गोष्टी वगैरे लिहिण्याचे काम सुरू केले. त्यामुळे त्यांना प्रसिद्धी आणि पैसे मिळू लागले. १८९१ साली त्यांची चुलत बहीण इसाबेल वेल्सशी हर्बर्ट यांनी विवाह केला मात्र १८९४ साली तिला सोडून ॲमी कॅथरीन रॉबिन्स हिच्याशी लग्न केले. एच. जी. वेल्स हे आपल्या बायकोशी प्रामाणिक राहिले नाहीत, त्यांचे बऱ्याच मुलींशी संबंध होते. ॲमी रॉबिन्स मात्र शेवटपर्यंत (मृ. १९२७) हर्बर्टशी पूर्ण प्रामाणिक राहिली. दरम्यान एच. जी. वेल्स यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा खप खूप होऊ लागला. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे युरोपातील सर्वच भाषांत भाषांतरे होऊ लागली.

पत्नीच्या निधनानंतर एच. जी. वेल्स यांनी राजकारणात प्रवेश केला, तेथे मात्र ते अयशस्वी ठरले. जागतिक महायुद्धामुळे झालेली प्रचंड हानी पाहून हर्बर्ट खचून गेले, निराशावादी बनले. दि. ऑगस्ट १३ १९४६ रोजी मधुमेह किंवा यकृताच्या कर्क रोगाने त्यांचे निधन झाले. त्यांच्या आजाराविषयी निश्चित माहिती मिळू शकली नाही.


साहित्य निर्मिती[संपादन]


एच. जी. वेल्स यांची The Time Machine, The Invisible Man, The First Men On The Moon, The War Of The Worlds, Outline Of History, The Science Of Life, The Island Of Dr. Moreau, When The Sleeper Walks, इ. पुस्तके विशेष गाजलेली आहेत. याशिवाय, वेल्स यांची एकूण १०० च्या वर पुस्तके, लेख , पत्रके, वगैरे प्रकारचे लिखाण प्रसिद्ध आहे. त्यांच्या काही पुस्तकांतील कथानकांवर चित्रपटही निघाले आहेत.