अजय-अतुल
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. |
अजय अशोक गोगावले, अतुल अशोक गोगावले | |
---|---|
अजय-अतुल | |
आयुष्य | |
जन्म | अजय- ऑगस्ट २१, इ.स. १९७६ अतुल- सप्टेंबर ११, इ.स. १९७४ |
जन्म स्थान | डेक्कन पुणे पुणे जिल्हा, महाराष्ट्र |
संगीत कारकीर्द | |
कार्यक्षेत्र | संगीतदिग्दर्शन, गायन |
अजय- अतुल ही भारतीय संगीतातील आघाडीची संगीतकार जोडी आहे. त्यांनी भारतीय संगीतक्षेत्रात हिंदी भाषा, मराठी, तेलुगू सारख्या विविध भाषांमधील चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले आहे. "विश्वविनायक" या संगीत गीतसंग्रहाद्वारे संगीतक्षेत्रात पदार्पण केले. अजय अतुल हे संगीत दिग्दर्शानासोबत संगीत संयोजन, पार्श्वसंगीत व पार्श्वगायन देखील करतात. अजय अतुल या जोडगोळीने सावरखेड एक गाव, अगं बाई अरेच्या!, जत्रा, जबरदस्त, चेकमेट, साडे माडे तीन, उलाढाल, एक डाव धोबीपछाड, जोगवा आणि नटरंग सारखे मराठी चित्रपट तर विरुद्ध, गायब, सिंघम सारखे हिंदी व शॉक सारख्या तेलुगू चित्रपटांना संगीतबद्ध केले आहे. राजीव पाटील दिग्दर्शित जोगवा या चित्रपटाच्या संगीतासाठी २००९ च्या उत्कृष्ठ संगीताच्या राष्ट्रीय पुरस्कारावर त्यांचे नाव शिक्कामोर्तब केले गेले.
बालपण
[संपादन]अतुल अशोक गोगावले (सप्टेंबर ११, इ.स. १९७४) आणि अजय अशोक गोगावले (ऑगस्ट २१, इ.स. १९७६) यांचा जन्म पुणे (महाराष्ट्र) येथील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. अतुल दोघांपैकी थोरला. वडलांची सरकारी नोकरी असल्याकारणाने गावोगावी बदली होत असे. त्यांचे लहानपण व प्राथमिक शिक्षण शिरूर, राजगुरुनगर, पुणे येथे झाले. लहानपणापासून शिक्षणाची खूप गोडी नसली तरी संगीताची आवड होती. दहावीच्या प्राथमिक परीक्षेत अतुलने गणिताच्या परीक्षेत चित्रे काढली होती. सांगीतिक वारसा नसला तरी घरात संगीतमय वातावरण असे. शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे व कलाकार दादा कोंडके उपस्थित असलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी गायलेल्या पोवाड्याचे शाल, श्रीफळ वा हार देऊन कौतुक केले गेले होते, त्यांनी ते हार काही दिवस पाणी शिंपडून जतन करून ठेवले होते. एन सी सी च्या एका कार्यक्रमात शिकवलेली धुन न वाजवता त्यांनी मनाला वाटलेली धुन वाजवून पुरस्कार पटकावला होता. सांगीतिक जडण घडणीची ही सुरुवात होती. संगीत क्षेत्रात पुढे जाण्यास घरचा विरोध नव्हता पण संगीत वाद्ये विकत घेणे त्यांना शक्य नव्हते, म्हणून ते ज्या मित्रांकडे वाद्ये असत त्यांच्याशी मैत्री करत. मंदिरात, शाळेत व बॅंड पथकांसोबत फिरून सांगीतिक भूक भागवत. कॉलेज शिक्षणापर्यंत वडिलांनी की बोर्ड आणून दिला जी त्यांची सर्वांत आवडती भेट ठरली व संगीताचे प्रयोग सुरू झाले. शिक्षणानंतर त्यांनी मुंबई गाठली व टाइम्स म्यूज़िकच्या विश्वविनायक या गणपतीच्या संचीकेने त्यांचा संगीत क्षेत्रात श्री गणेशा झाला.
संगीत शिक्षण
[संपादन]अजय अतुल यांनी शास्त्रशुद्ध संगीताचे शिक्षण घेतलेले नाही. पण काळानुरूप व संगीताच्या प्रदीर्घ आवडीमुळे त्यांनी संगीतात प्रयोग करणे सुरू केले व तीच प्रयोगशीलता रसिकांना आवडू लागली. इलयाराजा यांना ते आपले गुरुस्थानी मानतात.
संगीत कारकीर्द
[संपादन]या लेखाच्या निःपक्षपाती दृष्टिकोनाबद्दल विवाद आहे. कृपया तशी परिस्थिती निर्माण होईपर्यंत, हा संदेश हटवू नका. |
शिक्षणानंतर त्यांनी(?) मुंबईत येऊन टाइम्स म्युझिक च्या विश्वविनायक या संगीत संचिके(सीडी)साठी काम सुरू केले. त्यात एस. पी. बालसुब्रमणीयम, शंकर महादेवन सारख्या आघाडीच्या कलाकारांचा समावेश होता. या संचिकेत आदिदैवत श्री गणेशावर संस्कृत गीते गायली गेली आहेत. त्या काळी चित्रपटाच्या गाण्यांच्या चालीवर आधारित भक्तिगीतांची लाट सुरू असल्याकारणाने यात नवीनपणा जपण्याचा प्रयत्न त्यांनी या संचिकेद्वारे केला. ही संचिका प्रसिद्ध व्हायला काही काळ गेला. व त्यानंतर त्यावर प्रतिक्रिया सुरू झाल्या. यानंतर तोंडी प्रसिद्धीने या संचिकेस उत्तम प्रतिसाद मिळाला. यातले श्री गणेशाय धीमही हे शंकर महादेवन यांनी गायलेले गीत खूप गाजले.
यानंतर त्यांनी(?) राम गोपाळ वर्मा यांच्या गायब व महेश मांजरेकर यांच्या विरुद्ध या चित्रपटास संगीत दिग्दर्शन केले. या सुरुवातीच्या काळात मराठी चित्रपट व रंगभूमी वरील नाटकांकडे कल घेतला.या वेळी त्यांनी केदार शिंदेच्या सही रे सही हे नाटक संगीतबद्ध केले. व यासाठी त्यांनी अल्फा गौरव(नंतर झी गौरव) चा पुरस्कार पटकावला. याच काळात त्यांची वर्ल्ड म्युझिक निर्मित मीराबाईच्या पारसी भजनांची मीरा कहे नावाने व सही रे सही व तरुणाईसाठी बनलेली सागरिका म्युझिक निर्मित बेधुंद या दोन संचिका बाजारात आल्या. केदार शिंदे यांच्या अगं बाई अरेच्चा! चित्रपटाच्या संगीतानंतर त्यांनी रसिकांच्या मनात घर करायला सुरुवात केली. या चित्रपटातील शंकर महादेवन यांनी गायलेल्या मन उधाण वाऱ्याचे , अजय गोगावले व शाहीर साबळे यांच्या आवाजातले मल्हारवारी , व वैशाली सामंत च्या आवाजातले चम चम सारखी गीते रसिकांच्या पसंतीस उतरली. यातली दुर्गे दुर्घट भारी ही आरती त्यांना(?) गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या कडून गाऊन घ्यावयाची होती पण काही कारणास्तव योग जुळाला नाही व ते गीत अजय गोगावले च्या आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आले. त्यांनी याच काळात श्रीयुत गंगाधर टिपरे व बेधुंद मनाच्या लहरी सारख्या झी मराठी व ई टीव्ही मराठीच्या बहुचर्चित मालिकांसाठी पार्श्वसंगीत दिले.
राजीव पाटील यांच्या सावरखेड एक गाव या चित्रपटात कुणाल गांजावाला यांनी वाऱ्यावरती गंध पसरला हे गाणे गायले जे रसिकांना भावले. तर याच चित्रपटातील आई भवानी हे अजय गोगावले ने गायलेले गोंधळ खूप गाजले. केदार शिंदे यांच्या जत्रा या विनोदी चित्रपटातील अजय गोगावले च्या आवाजातले ये गो ये मैना व वैशाली सामंत व आनंद शिंदे यांचे कोंबडी पळाली ही गाणी तुफान गाजली.
नंतर त्यांनी(?) संग संग हो तुम, कॉलेज कॉलेज व तेलुगू भक्तिगीतांचा विश्वात्मा अश्या संचिका बाजारात आणल्या. बेधुंद संचिकेतले स्वप्निल बांदोडकर याने गायलेले गालावर खळी (जे परत मराठीत बनवले गेले) हे गाणे तरुण पिढीला खूपच पसंत पडले. याच काळात त्यांनी दाक्षिणात्य संगीत क्षेत्रात उडी घेतली व राम गोपाळ वर्मा यांच्या शॉक या चित्रपटास संगीतबद्ध केले.ज्यात चक्रि,चित्रा, श्वेता पंडित, एस. पी. बालसुब्रमणीयम, कौशल्या सारख्या नामवंत पार्श्वगायकांचा समावेश होता.ज्यांची गाणीही विक्रमी खपाने प्रसिद्ध झाली. नंतर त्यांनी महेश कोठारे यांच्या जबरदस्त या चित्रपटास संगीत दिले. या संगीतात त्यांनी(?) पाश्चात्य संगीतावर भर दिला.. ज्यात प्रामुख्याने स्वप्निल बांदोडकर ,अजय गोगावले व रॅपर अर्ल डीसुझा यांच्या गाण्यांचा समावेश होता. याच चित्रपटातले आयचा घो हे गाणे विशेष लोकप्रिय ठरले. त्याच वर्षी त्यांनी बंध प्रेमाचे नावाच्या चित्रपटाला संगीतबद्ध केले ज्यात शंकर महादेवन, सुरेश वाडकर, स्वप्निल बांदोडकर, प्रीती कामत सारख्या गायकांचा समावेश होता. तर २००७ चे विशेष आकर्षण ठरलेला झी टॉकीजच्या साडे माडे तीन या चित्रपटाच्या शीर्षक गीतास त्यांनी संगीत दिले.
२००८ मध्ये संगीतबद्ध केलेल्या चित्रपटात त्यांनी(?) संगीत शैलीमध्ये विविधता राखली. प्रसिद्ध छायाचित्रकार,दिग्दर्शक संजय जाधव यांच्या चेकमेट या चित्रपटाचे शीर्षक गीत त्यांनी वेस्टर्न व रॅप पद्धतीने रॅपर अर्ल डिसूझा कडून गाऊन घेतले. तर याउलट तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं सारख्या चित्रपटात नवरी आली सारखी टाळ्यांच्या आधारावरली व काळी धरती, चांगभलं सारखी पारंपरिक गीते देखील त्यांनी साकारली. त्याच वर्षी त्यांनी मुंबई आमचीच सारख्या वादग्रस्त चित्रपटास देखील संगीतबद्ध केले. अजय सरपोतदार निर्मित उलाढाल या चित्रपटात त्यांनी मोरया मोरया सारख्या श्री गणेशाच्या आरतीचे धविमुद्रण प्रसिद्ध ढोल पथक शिवगर्जनाच्या गजरात केले.हे गीत आजही सर्व ठिकाणी गणपतीच्या नावाने जल्लोषात वाजवले जाते. तर त्याच चित्रपटातील दे ना पैसा देना,सब धोखा हैं सारखी पाश्चिमात्य संगीतावर आधारलेली हिंदी गीते गायक कुणाल गांजावाला कडून गाऊन घेतली.
२००९ हे वर्ष त्यांच्या(?)साठी मैलाचा दगड ठरले. सतीश राजवाडे यांचा एक डाव धोबीपछाड, ज्ञानेश भालेकर यांचा बेधुंद व राजीव पाटील यांचा ऑक्सिजन व जोगवा हे चित्रपट त्यांनी संगीतबद्ध केले. बेधुंद मधले चायला तिच्या मायला हे कुणाल गांजावाला व अजय च्या आवाजातले गाणे प्रसिद्ध झाले. राजीव पाटील यांचा जोगवा चित्रपट त्यांच्या आत्तापर्यंत च्या कारकीर्दीतला सर्वांत विशेष चित्रपट ठरला. या चित्रपटाच्या उत्कृष्ठ संगीतासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच याच चित्रपटातील जीव दंगला या गाण्यासाठी, मराठी संगीतात पदार्पण करणारे हरिहरन यांना उत्कृष्ठ पार्श्वगायक व श्रेया घोषाल यांना उत्कृष्ठ पार्श्वगायिका म्हणून सन्मानित करण्यात आले. जीव दंगला खेरीज या चित्रपटात अजय गोगावले यांच्या आवाजात लल्लाटी भंडार हे गोंधळ गीत, आनंद शिंदे यांच्या आवाजात हरीणीच्या दारात व श्रेया घोषाल यांच्या आवाजात मन रानात गेलं ही गाणी विशेष लोकप्रिय ठरली. याच चित्रपटासाठी त्यांना(?) संस्कृती कला दर्पण, महाराष्ट्र टाईम्स सन्मान सारख्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याखेरीज त्यांनी(?) स्टार प्रवाह व झी मराठी च्या अनेक बहुचर्चित मालिकांसाठी देखील संगीत दिले आहे. नितीन चंद्रकांत देसाई यांच्या राजा शिवछत्रपती या शिवरायांच्या जीवनचरित्रावर आधारलेल्या महामालिकेच्या शिवगौरव शीर्षक गीतासाठी त्यांना महाराष्ट्र टाइम्स सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
२०१० च्या सुरुवातीस त्यांनी संगीतबद्ध केलेला चित्रपट नटरंग प्रदर्शित झाला. ज्याच्या पारंपरिक तमाशा,लावणी, गवळण, कटाव या प्रकारात मोडणाऱ्या संगीतास समीक्षक, रसिक सगळ्यांकडून विशेष कौतुकाची दाद मिळाली. यात त्यांच्या,बेला शेंडे व अजय च्या आवाजातल्या वाजले की बारा, अप्सरा आली ह्या लावण्या विशेष लोकप्रिय ठरल्या. तसेच कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी व खेळ मांडला या गीतांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.या चित्रपटाच्या संगीतासाठी त्यांना व्ही. शांताराम पुरस्कार, झी गौरव,महाराष्ट्र टाईम्स सन्मान, संस्कृती कला दर्पण, राज्य शासन चित्रपट ई. पुरस्कार सन्मानित करण्यात आले.त्यानंतर छायाचित्रकार, दिग्दर्शक संजय जाधव यांच्या रिंगा रिंगा या चित्रपटास त्यांनी संगीत दिले ज्यात सुखविंदर सिंग यांनी घे सावरून हे गाणे, तर बायगो बायगो हे पाश्चात्य संगीतशैलीवर बेतलेले गाणे कुणाल गांजावाला यांनी गायले.
त्यांनी(?) आजपर्यंत गुरू ठाकूर, कवी दासु, संजय कृष्णाजी पाटील, श्रीरंग गोडबोले, जगदीश खेबूडकर सारख्या नामवंत गीतकारांची गीते संगीतबद्ध केली आहेत. संगीत दिग्दर्शनासोबतच अजय गोगावले इतर संगीतकारांसोबत पार्श्वगायन देखील करतात. त्यांनी अगदी आज संचिकेत सोसाट्याचा आला वारा , दिली कोंबड्याने बांग, गाणे तुझ्या अंतरीचे संचिकेत पावसाळी या ढगांनी ही गीते गायली आहेत तर दे धक्का चित्रपटाचे शीर्षक गीत, गाभ्रीचा पाऊस मध्ये सपान हिरवं, रंगीबेरंगी मध्ये दाही दिशा तर आगामी चित्रपट डावपेच मध्ये देवा व राजीव पाटील यांच्या पांगीरा मध्ये घाव पडला ही गाणी गायली आहेत. ते अजय अतुल लाइव्ह या नावाने विविध पार्श्वगायकांसोबत आपला संगीत कार्यक्रम सादर करतात. ज्यात त्यांच्या बहुचर्चित व गाजलेल्या गाण्यांचा समावेश असतो.
२०१६ साली आलेल्या सैराट चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले या चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडले या चित्रपटातील झिंगाट या गाण्याने जगभरातील सर्वांना अक्षरशः वेड लावले याड लागलं आणि आताच बया ही गाणीही सुपरहिट ठरली या गाण्यांसाठी त्यांनी परदेशातील बॅंडचा मराठी चित्रपट गीतांसाठी प्रथमच वापर केला. सैराट चित्रपटाच्या स्ंगीत दिग्दर्शन तसेच गायन (याड लागलं) करिता या जोडगोळीला झी गौरव पुरस्कार प्राप्त झाला. सैराट चित्रपटाचा कन्नड रिमेक "मनसु मल्लिगे" ह्या चित्रपटाकरिता देखिल ह्या दोघांनीच संगीत दिले असून, गाण्याच्या सर्व चाली आणि संगीत नियोजन हुबेहुब सैराटप्रमाणेच असून फक्त कन्नड शब्द वापरले गेले आहेत. सध्याच्या माहितीनुसार ही सर्व कन्नड गीते अल्प काळात अत्यंत लोकप्रिय झालेली आहेत.
अजय अतुल थेट (अजय अतुल लाइव्ह इन् कॉन्सर्ट)
[संपादन]अजय अतुल हे, ’अजय अतुल लाइव्ह इन् कॉन्सर्ट’ या नावाने आपला कार्यक्रम थेट रसिकांपर्यंत पोहोचवतात. यात त्यांच्यासोबत प्रामुख्याने कुणाल गांजावाला, शंकर महादेवन, हरिहरन, आनंद शिंदे, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत, अमृता नातू, योगिता गोडबोले पाठक , अर्ल डिसूझा इत्यादी पार्श्वगायकांचा समावेश असतो. यात त्यांची विश्वविनायकमधली गीते, वाऱ्यावरती गंध पसरला, चम चम, मन उधाण वाऱ्याचे, चिंब भिजलेले, कोंबडी पळाली, साडे माडे तीन, आयचा घो, चेकमेट, झी गौरव गीत, चायला तिच्या मायला, लख लख चंदेरी, सही रे सही , लल्लाटी भंडार, खेळ मांडला, शिवगौरव गीत, जीव दंगला , मोरया मोरया अशी गाजलेली गीते रसिकांसमोर सादर केली जातात.
समाजसेवा
[संपादन]चित्रपट/संचिका/मालिका/नाटक
[संपादन]चित्रपट
[संपादन]वर्ष (इ.स.) | चित्रपट | भाषा | सहभाग | विशेष |
---|---|---|---|---|
२००४ | गायब | हिंदी | संगीतदिग्दर्शन | |
२००४ | अगं बाई अरेच्च्या ! | मराठी | संगीतदिग्दर्शन | संस्कृती कला दर्पणपुरस्कार |
२००५ | गोड गुपित | मराठी | संगीतदिग्दर्शन,पार्श्वसंगीत | |
२००५ | जत्रा | मराठी | संगीतदिग्दर्शन | |
२००५ | सावरखेड एक गाव | मराठी | संगीतदिग्दर्शन | महाराष्ट्र कला निकेतन पुरस्कार,महाराष्ट्र टाईम्स सन्मान |
२००५ | विरुद्ध | हिंदी | संगीतदिग्दर्शन | |
२००५ | वाह! लाईफ हो तो ऐसी | हिंदी | संगीतदिग्दर्शन, फकत हनुमान चालीसा | |
२००५ | स्ट्रगलर | हिंदी | संगीतदिग्दर्शन | |
२००६ | शॉक | तेलुगू | संगीतदिग्दर्शन | |
२००६ | रेस्टॉरंट | मराठी | पार्श्वसंगीत | |
२००७ | पद्मश्री लालू प्रसाद यादव | हिंदी | पार्श्वसंगीत | |
२००७ | जबरदस्त | मराठी | संगीतदिग्दर्शन | महाराष्ट्र टाईम्स सन्मान |
२००७ | बंध प्रेमाचे | मराठी | संगीतदिग्दर्शन | झी गौरव |
२००७ | साडे माडे तीन | मराठी | संगीतदिग्दर्शन, फकत शीर्षक गीत | |
२००८ | चेकमेट | मराठी | संगीतदिग्दर्शन | |
२००८ | तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं | मराठी | संगीतदिग्दर्शन | |
२००८ | मुंबई आमचीच | मराठी | संगीतदिग्दर्शन | |
२००८ | उलाढाल | मराठी | संगीतदिग्दर्शन | व्ही. शांताराम पुरस्कार |
२००९ | एक डाव धोबीपछाड | मराठी | संगीतदिग्दर्शन | |
२००९ | बेधुंद | मराठी | संगीतदिग्दर्शन | |
२००९ | ऑक्सिजन | मराठी | संगीतदिग्दर्शन | |
२००९ | जोगवा | मराठी | संगीतदिग्दर्शन | संस्कृती कला दर्पण, महाराष्ट्र टाईम्स सन्मान, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार |
२०१० | नटरंग | मराठी | संगीतदिग्दर्शन, पार्श्वसंगीत | झी गौरव, व्ही. शांताराम,४७ वा राज्य चित्रपट पुरस्कार |
२०१० | रिंगा रिंगा | मराठी | संगीतदिग्दर्शन | |
२०१० | बाल शिवबा- एनिमेशन | - | संगीतदिग्दर्शन - निर्मितीअवस्थेत | |
२०११ | आत्ता गं बया ! | - | संगीतदिग्दर्शन - निर्मितीअवस्थेत | |
२०११ | धतिंग धिंगाणा | - | संगीतदिग्दर्शन - निर्मितीअवस्थेत | |
२०११ | सिंघम[१] | हिंदी | संगीतदिग्दर्शन | तमिळ सिंगम चित्रपटाची हिंदी पुनरावृत्ती |
२०११ | माय फ्रेंड पिंटो[२] | हिंदी | संगीतदिग्दर्शन | संजय लीला भन्साली व यूटीव्हीद्वारे निर्मित |
२०१२ | अग्नीपथ[३] | हिंदी | संगीतदिग्दर्शन, पार्श्वसंगीत | १९९० च्या अग्नीपथाची पुनःआवृत्ती |
२०१२ | बोल बच्चन | हिंदी | संगीतदिग्दर्शन | रोहित शेट्टी द्वारा निर्देशित व अजय देवगण द्वारा निर्मित |
२०१२ | भारतीय | मराठी | संगीतदिग्दर्शन | गिरीश मोहिते द्वारा निर्देशित व अभिजीत घोलप द्वारा निर्मित |
२०१३ | धतींग धिंगाणा | मराठी | संगीतदिग्दर्शन, पार्श्वसंगीत | |
२०१४ | फॅन्ड्री | मराठी | शीर्षक गीत | |
२०१४ | पी के | हिंदी | संगीतदिग्दर्शन | |
२०१५ | ब्रदर्स (२०१५) | हिंदी | संगीतदिग्दर्शन, पार्श्वसंगीत | |
२०१६ | सैराट | मराठी | संगीतदिग्दर्शन, पार्श्वसंगीत |
संगीत संचिका (अल्बम)
[संपादन]वर्ष (इ.स.) | अल्बम | भाषा | सहभाग |
---|---|---|---|
१९९९ | कॉलेज कॉलेज | हिंदी | संगीत दिग्दर्शन |
२००१ | विश्वविनायक | संस्कृत | संगीत दिग्दर्शन |
२००२ | श्री राम मंत्र | संस्कृत | संगीत संयोजन |
२००३ | बेधुंद | मराठी | संगीत दिग्दर्शन |
२००३ | संग संग हो तुम | हिंदी | संगीत दिग्दर्शन |
२००३ | मीरा कहें | हिंदी, संस्कृत | संगीत दिग्दर्शन |
२००६ | विश्वात्मा | संस्कृत | संगीत दिग्दर्शन |
मालिकागीते
[संपादन]क्रमांक | वाहिनी | मालिका/गीत | |
---|---|---|---|
१. | राजा शिवछत्रपती | स्टार प्रवाह | महाराष्ट्र टाईम्स सन्मान |
२. | झी गौरव | झी मराठी | |
३. | एका पेक्षा एक | झी मराठी | |
४. | लख लख चंदेरी | झी टॉकिज | |
५. | हास्यसम्राट | झी मराठी | |
६. | सा रे ग म प | झी मराठी | |
७. | हफ्ता बंद | झी मराठी | |
८. | क्रिकेट क्लब | झी मराठी | |
९. | भावांजली | मी मराठी | |
१०. | क्या बात है | झी मराठी | |
११. | मिशा | झी मराठी | |
१२. | आमच्यासारखे आम्हीच | झी मराठी | |
१३. | श्रियुत गंगाधर टिपरे | झी मराठी | पार्श्वसंगीत |
१४. | वादळवाट | झी मराठी | पार्श्वसंगीत |
१५. | बेधुंद मनाच्या लहरी | ई टीव्ही मराठी | पार्श्वसंगीत |
नाटक
[संपादन]क्रमांक | नाटकाचे नाव | ठळक गोष्टी |
---|---|---|
१. | सही रे सही | अल्फा गौरव २००३ पुरस्कार |
२. | लोच्या झाला रे | महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्य स्पर्धा पुरस्कार |
३. | रंग्या रंगीला रे | |
४. | मि. नामदेव म्हणे | |
५. | गोपाळा रे गोपाळा | |
६. | कळा या लागल्या जीवा | २००७ महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्य स्पर्धा पुरस्कार |
७. | जाहले छत्रपति शिवराय | |
८. | मन उधाण वाऱ्याचे |
पुरस्कार
[संपादन]वर्ष (इ.स.) | पुरस्कार | पुरस्कारांतर्गत गट | निर्मितीसाठी |
---|---|---|---|
२००३ | अल्फा गौरव (नंतर झी गौरव)[४] | उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक | नाटक : सही रे सही |
२००५ | महाराष्ट्र कला निकेतन पुरस्कार [४] | उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक | चित्रपट : सावरखेड एक गाव |
२००५ | महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्य स्पर्धा [४] | उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक | नाटक : लोच्या झाला रे |
२००५ | महाराष्ट्र टाइम्स सन्मान [४] | उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक | चित्रपट : सावरखेड एक गाव |
२००५ | संस्कृती कला दर्पण [४] | उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक | चित्रपट : अगं बाई अरेच्च्या !) |
२००७ | महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्य स्पर्धा [४] | उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक | नाटक : कळा या लागल्या जीवा |
२००८ | महाराष्ट्र टाइम्स सन्मान [४] | उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक | चित्रपट : जबरदस्त |
२००८ | झी गौरव [४] | उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक | चित्रपट : बंध प्रेमाचे |
२००८ | अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ[४] | उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक | चित्रपट : तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं |
२००८ | अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ [४] | उत्कृष्ट पार्श्वगायक- अजय गोगावले | चित्रपट : तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं |
२००८ | संस्कृती कला दर्पण [४] | उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक | चित्रपट : तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं |
२००९ | महाराष्ट्र टाइम्स सन्मान [४] | उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक | मालिका : राजा शिवछत्रपती |
२००९ | व्ही. शांताराम पुरस्कार [४] | उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक | चित्रपट : उलाढाल |
२००९ | व्ही. शांताराम पुरस्कार [४] | उत्कृष्ट पार्श्वगायक- अजय गोगावले | चित्रपट : उलाढाल ,गीत- मोरया मोरया |
२००९ | श्रीकांत ठाकरे पुरस्कार | उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक | - |
२००९ | संस्कृती कला दर्पण[५] | उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक | चित्रपट : जोगवा |
२००९ | महाराष्ट्र टाइम्स सन्मान | उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक | चित्रपट : जोगवा |
२००९ | महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण | उत्कृष्ट पार्श्वगायक- अजय गोगावले | चित्रपट : उलाढाल ,गीत- मोरया मोरया |
२०१० | राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार | उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक | चित्रपट : जोगवा |
२०१० | झी गौरव [६] | उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक | चित्रपट : नटरंग |
२०१० | झी गौरव[६] | उत्कृष्ट पार्श्वगायक- अजय गोगावले | चित्रपट : नटरंग, गीत- खेळ मांडला |
२०१० | संस्कृती कला दर्पण [५] | उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक | चित्रपट : नटरंग |
२०१० | महाराष्ट्र टाइम्स सन्मान | उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक | चित्रपट : नटरंग |
२०१० | शिवगौरव | प्रभावशाली व्यक्ति | - |
२०१० | ४७ वा राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा | उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक | चित्रपट : नटरंग |
२०१० | ४७ वा राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा | उत्कृष्ट पार्श्वगायक- अजय गोगावले | चित्रपट : नटरंग, गीत- खेळ मांडला |
२०१० | व्ही. शांताराम पुरस्कार | उत्कृष्ट पार्श्वगायक- अजय गोगावले | चित्रपट : नटरंग, गीत- खेळ मांडला |
२०१० | व्ही. शांताराम पुरस्कार | उत्कृष्ट पार्श्वसंगीत | चित्रपट : नटरंग |
२०१० | व्ही. शांताराम पुरस्कार | उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक | चित्रपट : नटरंग |
२०१० | स्टार माझा " माझा सन्मान " | उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक | |
२०१० | बाळ गंधर्व पुरस्कार | उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक | जाहीर केले गेले आहे |
२०१० | बिग एफ एम बिग संगीतकार पुरस्कार | उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक | चित्रपट : नटरंग |
२०१० | बिग एफ एम बिग पार्श्वगायक पुरस्कार | उत्कृष्ट पार्श्वगायक- अजय गोगावले | चित्रपट : नटरंग, गीत- खेळ मांडला |
२०१० | बिग एफ एम बिग गीत पुरस्कार | उत्कृष्ट गीत वर्ष २०१० | चित्रपट : नटरंग, गीत- अप्सरा आली |
२०१० | पु. ल. तरुणाई सन्मान | संगीत क्षेत्र | - |
२०१० | महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण | उत्कृष्ट पार्श्वगायक- अजय गोगावले | चित्रपट : नटरंग, गीत- खेळ मांडला |
२०१० | महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण | उत्कृष्ट गीत | चित्रपट : नटरंग, गीत- वाजले की बारा |
२०११ | मराठी आंतरराष्ट्रीय चित्रपट व रंगभूमी पुरस्कार | उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक | चित्रपट : नटरंग |
२०११ | मराठी आंतरराष्ट्रीय चित्रपट व रंगभूमी पुरस्कार | उत्कृष्ट पार्श्वगायक- अजय गोगावले | चित्रपट : नटरंग, गीत- खेळ मांडला |
२०११ | राम कदम कलागौरव पुरस्कार | संगीत क्षेत्र | - |
२०१२ | झी गौरव | मराठी पाऊल पडते पुढे |
संदर्भ
[संपादन]- ^ "इंडियनएक्सप्रेस.कॉम" (इंग्रजी भाषेत). २०११-०2-25 रोजी पाहिले.
- ^ "मिड डे.कॉम" (इंग्रजी भाषेत). २०११-०2-25 रोजी पाहिले.
- ^ "टाइम्स ऑफ इंडिया.कॉम" (इंग्रजी भाषेत). २०११-०२-०२ रोजी पाहिले.
- ^ a b c d e f g h i j k l m n "अजय अतुल" (इंग्रजी भाषेत). 2014-08-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-09-07 रोजी पाहिले.
- ^ a b "संस्कृती कला दर्पण" (इंग्रजी भाषेत). 2011-07-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-09-07 रोजी पाहिले.
- ^ a b चुका उधृत करा:
<ref>
चुकीचा कोड;loksatta
नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
बाह्य दुवे
[संपादन]- मायबोली.कॉम - 'हितगुज दिवाळी अंक २००९' येथील अजय-अतुल यांची मुलाखत
- 'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावर अजय-अतुल यांनी संगीत दिलेली गाणी
- अजय-अतुल.कॉम
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |