Jump to content

सुहासिनी कोरटकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. सुहासिनी कोरटकर (जन्म : ३० नोव्हेंबर इ.स. १९४४; - पुणे, ७ नोव्हेंबर इ.स. २०१७) या भेंडीबाजार घराण्यातल्या शास्त्रीय संगीत गायिका होत्या. []यांचा जन्म कलाप्रेमी सुधारक विचारांच्या कुटुंबात झाला. त्या अविवाहित होत्या.

सुहासिनी कोरटकरांवर लहानपणापासूनच संगीताचे संस्कार झाले. कोवळ्या वयापासून त्या ज्येष्ठ गानगुरू पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांच्याकडे भेंडीबाजार घराण्याचे मार्गदर्शन घेऊ लागल्या. शिस्तबद्ध तालीम, गुरूंचे उत्तम मार्गदर्शन आणि स्वतःची निरंतर साधना यांच्या आधारे या घराण्याची वैशिष्ट्यपूर्ण गायकी ही त्यांनी यशस्वीपणे आत्मसात केली.

डॉ. सुहासिनी कोरटकर या पुणे आकाशवाणी केंद्रात काम संगीत अधिकारी म्हणून करत. त्यावेळी त्यांनी मोनो रेकॉर्डिंग तंत्राची माहिती करून घेतली होती. मोठमोठ्या वाद्यवृंदाच्या वादनाचे ध्वनिमुद्रण त्या स्वतः करीत.

बिघडलेल्या तब्येतीवर मात

[संपादन]

भेंडीबाजार घराण्याच्या गायकीचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर कोरटकर यांना सातत्याने कफ, सर्दी, ताप, थंडीचा त्रास झाला. त्यांची फुप्फुसे कमजोर असल्याने पूर्ण दमाचे आणि पूर्ण श्वासाचे घराणेदार गायन त्यांना झेपणार नाही, असे मत काही वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले. गुरूंच्या मार्गदर्शनावर आणि ओंकारसाधना, प्राणायामाद्वारे कोरटकर यांनी त्यातूनही गाण्यावर परिणाम होऊ दिला नाही.

संगीतसाधना आणि संगीतातली पीएच.डी.

[संपादन]

कोरटकर यांनी भेंडीबाजार हे काहीसे दुर्लक्षित राहिलेले घराणे पुन्हा संगीताच्या मुख्य प्रवाहात आले.

बंदिशींचे आकर्षक प्रस्तुतीकरण, लयीत गुंफलेली सरगम आणि गमकयुक्त ताना, सुरेल गुंजन आणि मिंडयुक्त आलापींनी रागाचे यथार्थ आणि परिणामकारक रूप ही त्यांच्या गाण्याची वैशिष्ट्ये होती.

त्या शास्त्रीय संगीताबरोबरच ठुमरी, दादरा, नाट्यसंगीत, अभंग हे गानप्रकारही गायच्या. दिल्लीच्या ठुमरी गायिका नैनादेवी यांच्याकडून त्यांनी ठुमरीचे मार्गदर्शन घेतले. हिंदी व मराठीत अभंग, गीत, गझल यांना त्यांनी संगीतबद्ध केले. संगीताचे आध्यात्मिक महत्त्व या विषयावर प्रबंध सादर करून पीएच.डी. संपादन केली.

त्यांनी निगुनी या टोपणनावाने अनेक बंदिशी रचल्या.

गुरुभक्ती

[संपादन]

गुरूबद्दलचा अपार श्रद्धाभाव हे वैशिष्ट्य असलेल्या सुहासिनीताई यांनी पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ युवा गायक कलाकाराला प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार सुरू केला होता. गानवर्धन या संगीत प्रचार आणि प्रसाराचे कार्य करणाऱ्या संस्थेकडे त्यासाठी त्यांनी देणगी दिली होती.

संगीतविषयक जाहीर कार्यक्रम

[संपादन]

समाजातील सर्व स्तरांमध्ये अभिजात संगीताची आवड निर्माण व्हावी म्हणून विविध नावीन्यपूर्ण कार्यक्रमांची त्यांनी निर्मिती केली. या कार्यक्रमांतून त्या निवेदनासह विषयाची प्रात्यक्षिकासह साकल्याने मांडणी करीत.

  • कवी बा.भ. बोरकर यांच्या हिंदी-मराठी गीतांवर आधारित दिल चाहे सो गाओ आणि बहुरंगी बोरकर हे कार्यक्रम.
  • उपशास्त्रीय संगीताची ओळख करून देणारा ‘ठुमरी ते कजरी’.
  • स्वरचित बंदिशींवर आधारित ‘शब्द-स्वरांचे लेणे’.
  • विविध ऋतूंमधील रागांवर आणि गीतांवर आधारित ‘ऋतुरंग’.
  • शास्त्रीय संगीताचे सौंदर्य उलगडणारा ‘ख्याल गायनाचा रसास्वाद’ हा कार्यक्रम.

संगीतविषयक पुस्तके

[संपादन]
  • अमर बंदिशी (प्रकाशन दिनांक २३-११-२०१७)

लेखन, चर्चासत्रांत सहभाग आणि ग्रंथरचना

[संपादन]

मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीनही भाषांतून कोरटकरबाईंचे अनेक अभ्यासपूर्ण लेख प्रकाशित झाले आहेत. आकाशवाणीच्या व दूरदर्शनच्या  कार्यक्रमांत त्यांचा अनेकदा सहभाग असे.

भेंडीबाजार घराण्याचा इतिहास, शैली, कलावंत आणि संगीतविश्वाला घराण्याने दिलेले योगदान असा बृहत्प्रकल्प कोरटकरांनी लिहायला घेतला होता. २३ नोव्हेंबर २०१७ रोजी त्याचे ग्रंथरूपात प्रकाशन होणार होते, पण तत्पूर्वीच ७ सप्टेंबरला त्यांचे निधन झाले.

पुरस्कार

[संपादन]
  • सूरसिंगार संसद संस्थेचा सूरमणी पुरस्कार
  • गानवर्धन संस्थेचा स्वर-लय भूषण पुरस्कार
  • सम संस्थेचा संगीत शिरोमणी पुरस्कार
  • पूर्णवाद प्रतिष्ठानचा संगीत मर्मज्ञ पुरस्कार
  • स्वर-साधना समितीतर्फे स्वर-साधना रत्न हा पुरस्कार.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ जानोरीकर, किशोरी. विवेक आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश. साप्ताहिक विवेक.