Jump to content

मुस्लिम सण आणि उत्सव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इस्लाम धर्मातील काही महत्त्वाचे सण पुढीलप्रमाणे आहेत - []

बारह वफात - (ईद ए मिलाद)

[संपादन]
टांझानिया मधील ईद ए मिलाद साजरा करणारे झंडे

प्रेषित मोहमद हे इस्लामी दिनदर्शिकेप्रमाणे रवि उल अव्वल या तिसऱ्या महिन्याच्या बाराव्या दिवशी, बारा दिवसांच्या आजारानंतर मरण पावले, म्हणून या दिवसाला बारह वफात असे म्हणतात. (बारह = बारा, वफात = मृत्यू). या कारणाने या रवि उल अव्वल महिन्याला बारह वफात असे दुसरे नावदेखील दिले गेले आहे. प्रेषित मोहम्मद यांचा जन्मदिनसुद्धा हाच आहे, त्यामुळे हा दिवस प्रेषितांच्या जयंतीचा व त्यांच्या पुण्यतिथीचाही दिवस आहे. प्रेषित मोहम्मद यांच्या मृत्यूच्या दिवशी कुराण वाचतात. सुन्नी मुस्लिमांच्या दृष्टीने हा विलाप करण्याचा दिवस असतो. हा दिवस प्रेषितांचा जन्मदिवसही असल्याने सर्व इस्लामी देशात आनंद साजरा केला जातो. या दिवशी प्रेषितांच्या जीवनाचे दर्शन घडविणारे कार्यक्रम, सभा भरविल्या जातात.

शब्बे मेराज

[संपादन]

इस्लामी वर्षाचा सातवा महिना "रज्जब" या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवसाची रात्र ही शब्बे मेराज म्हणून साजरी केली जाते. मेराज म्हणजे आरोहण करणे. या रात्री प्रेषितांना बुराख नावाच्या पंख असलेल्या घोड्यावर बसवून स्वर्गात अल्लाच्या समक्ष नेण्यात आले असे मानले जाते. ही घटना प्रेषितांच्या जीवनातील महत्त्वाची घटना आहे. एके रात्री मक्का येथील मशिदीत प्रेषित झोपले असताना देवदूत गॅब्रिएल तेथे आला. प्रेषिताना घेऊन येण्याची अल्लाचा (ईश्वराचा) त्याला आदेश होता. प्रथम देवदूताने त्यांना मक्केपासून दूर असलेल्या जेरुसलेम या पवित्र नगरीत नेले. तेथे प्रेषितांनी दुसऱ्या अनेक प्रेषितांबरोबर नमाज अदा केली. तेथे असलेल्या एका प्रचंड दगडावरून बुराख या घोड्यावर स्वार होऊन त्यांना स्वर्गात नेण्यात आले. वाटेत त्यांना अब्राहाम, मोशे, येशू असे अनेक प्रेषित भेटले. तसेच त्यांना नरकाचे दर्शन घडविण्यात आले. त्यानंतर त्यांना अल्लाच्या समक्ष हजर करण्यात आले. अल्लाने त्यांना विचारले ," तू मला कोणती भेट आणली आहेस.?" तेव्हा प्रेषित म्हणाले, " मी इबादत (प्रार्थना) आणली आहे." त्यांच्या या उत्तरावर खुश होऊन अल्लाने जाहीर केले की, " हा माझा प्रेषित आहे." व त्यांना वर मागण्यास सागितले. महंमद म्हणाले, " मला स्वतःकरिता काही नको, पण माझे अनुयायी पापी आहेत त्यांना तुझी कृपा मिळू दे." अल्लाने तसे करण्याचे कबूल केले. परंतु अल्ला त्यांना म्हणाला, " मी त्यांच्यावर कृपा करीन पण त्यांनी रोज पन्नास वेळा नमाज पढला पाहिजे व वर्षातून सहा महिने उपवास केले पाहिजेत." तेव्हा प्रेषित म्हणाले , माझे अनुयायी अशक्त आहेत त्यांना इतके नमाज व उपवास जमणार नाहीत." तेव्हा अल्लाने सागितले, " ठीक आहे त्यांनी रोज पाच वेळा नमाज पढावा व वर्षातून एक वेळा उपवास करावा. म्हणजे त्यांना रोज पन्नास वेळा नमाज पढल्याचे व सहा महिने उपवास केल्याचे पुण्य लाभेल." अशा रीतीने अल्लाची कृपा प्राप्त करून प्रेषित बुराख घोड्यावर बसून मक्केला परत आले.

शब्बे बरात (किंवा शब-ए-बारात)

[संपादन]

इस्लामी दिनदर्शिकेचा आठवा महिना 'शबान'च्या चवदाव्या दिवशी हा सण साजरा केला जातो. 'बरात' म्हणजे संरक्षणाची हमी आणि 'शब' म्हणजे रात्र. या रात्री प्रार्थना केल्यास आपल्या भविष्याच्या बाबतीत संरक्षणाची हमी मिळते, अशा कल्पनेने या रात्रीला शब्बे बरात असे म्हणतात. ही रात्र प्रार्थना व जागरण करून घालविली जाते. या रात्री ईश्वर प्रत्येक माणसाच्या पुढील आयुष्यातील घटनांची नोंद करीत असतो अशी समजूत आहे. म्हणून अशा वेळी प्रार्थना केल्यास आपल्या भवितव्यात चागलेच लिहून ठेवले जाईल असे मानले जाते. या सणाच्या रात्री सतत कुराणाचे पठण व जागरण करावे असे सांगितले आहे. काही लोक या दिवशी आपल्या नातेवाइकाच्या कबरीजवळ जाऊन प्रार्थना करतात, व कुराणातील अल फातिहा ही प्रार्थना म्हणतात. या दिवशी मृतात्म्यांना नरकातून मुक्ती मिळते अशी मान्यता असल्याने ही प्रार्थना केली जाते. शिया पंथाचे मुस्लिम हा दिवस इमाम मेहदीचा जन्मदिवस म्हणून साजरा करतात. आणि हसन, हुसेन हे जे हुतात्मे होऊन गेले त्यांचे स्मरण करतात.

रमझान

[संपादन]

रमझान (रमझान-उल मुबारक) हा इस्लामी दिनदर्शिकेचा नववा महिना आहे. हा उपवास करण्याचा महिना आहे. प्रत्येक मुस्लिमाने आचरल्याच पाहिजेत अशा ज्या मूलभूत गोष्टी आहेत, त्यांत रमझान महिन्यातील सर्व दिवस उपवास ही एक आहे. या महिन्यातले पहिले चंद्रदर्शन ज्या संध्याकाळी होईल त्यानंतर उजाडणाऱ्या सकाळपासून या महिन्यातील उपवास सुरू होतो. आणि शेवटचे चंद्रदर्शन झाल्यावर हा उपवास संपतो. या रमझान महिन्यातच स्वर्गातून प्रेषिताद्वारे कुराण पृथ्वीवर उतरले असे मानले जाते. या महिन्यात स्वर्गाची द्वारे उघडली जातात व नरकाची द्वारे बंद होतात अशी मान्यता आहे. या महिन्यात रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत कडक उपवास पाळला जातो. सायंकाळनंतर उपवास सोडतात. रमझानच्या काळात मशिदीत विशेष सामूहिक प्रार्थना होतात. रोज कुराण पठण केले जाते.

शिया पंथाचे मुस्लिम लोक या महिन्याच्या एकवीस-बाविसाव्या दिवशी अलीच्या कबरीची ताबुताप्रमाणे मिरवणूक काढतात. ते अलीला पहिला धर्मगुरू व प्रेषितांप्रमाणेच मानतात. काही मुस्लिम या महिन्यात काही कालपर्यंत मशिदीच्या एका भागात पडदा लावून एकांतवास करतात. या महिन्याच्या सत्ताविसाव्या रात्री, आपण वर्षभरात केलेल्या सर्व बऱ्या वाईट कर्माबद्दल अल्लाह निकाल देतो, अशा कल्पनेने त्याची करुणा भाकण्यासाठी प्रत्येक मुस्लिम अल्लाची प्रार्थना करतो. या रात्रीला शब्बे कदर म्हणतात. परंतु शब्बे कदरची रात्र ही सत्ताविसावी रात्रच असेल असे नक्की नसल्याने बरेच मुस्लिम शेवटच्या दहा दिवसातील प्रत्येक विषम रात्री प्रार्थना करतात.

रमझान हा शब्द रम्झ म्हणजे जळणे या मूळ शब्दावरून आला. मुस्लिम दिनदर्शीकेत बदल होण्यापूर्वी हा महिना, जाळून टाकणाऱ्या उन्हाळ्यात येत असे म्हणून, किवा या उपासाने सर्व पापे जळून जातात अशी श्रद्धा असते म्हणून या महिन्याला रमझान हे नाव पडले असावे. या महिन्यातील एक रात्र अशी मानली जाते की जी प्रेषित महमद यांच्याशिवाय दुसऱ्या कोणालाही माहीत नसते. या रात्री सर्व प्राणीमात्र व वनस्पती ईश्वराला आदरपूर्वक वाकून वंदन करते असे मानले जाते.

रमझान संपल्यावर येणाऱ्या बीजेच्या दिवशी ईद-उल-फ़ित्र ऊर्फ रमझान ईद साजरी होते. रमझान महिन्यानंतर सुमारे ७० दिवसांनी येणाऱ्या दशमीला ईद-उल जुहा किंवा बकरीद म्हणतात.

शब्बे कदर (लैलत उल कदर)

[संपादन]

शब म्हणजे रात्र व कदर म्हणजे न्यायदान, शब्बे कदर म्हणजे न्यायदानाची रात्र. रमझान महिन्यातल्या शेवटच्या दहा दिवसातली ही एक रात्र असते. बहुदा ही सत्ताविसावी रात्र असते असे मानले जाते, परंतु त्याबद्दल निश्चिती नसल्याने शेवटच्या दहा दिवसातील विषम दिनाच्या रात्रीपैकी ती कोणतीही एक रात्र असू शकते. (एकविसावी, तेविसावी, पंचविसावी, सत्ताविसावी, किवा एकोणतिसावी) ही रात्र नेमकी कोणती हे प्रेषित महमद यांच्याशिवाय कोणालाच माहीत नसते असे मानले जाते. रमझान महिन्याच्या या रात्रीपर्यंतच्या वर्षात मानवाने जी कृत्ये केलेली असतात, त्याबाबतचे न्यायदान या रात्री ईश्वर करतो व त्यासाठी पृथ्वीवर अनेक प्रेषित पाठवितो असे मानले जाते. म्हणून आपल्या हातून वर्षभरात झालेल्या पापाबद्दल प्रत्येक माणसाने या रात्री क्षमा मागावी व त्यासाठी प्रार्थना करावी असे कुराणात सागितले आहे. माणसाने वर्षभरात केलेल्या कृत्यांचा निवाडा करून त्याला मृत्यू केव्हा येणार , त्याला आजार कधी येणार, त्याचा उत्कर्ष कितपत होणार वैगेरे गोष्टी या रात्री ठरविल्या जातात व त्यासाठी देवदूत पृथ्वीवर पाठविले जातात. या रात्री मनापासून ईश्वराची क्षमा मागितली तर पूर्वीच्या वर्षातील सर्व पापे माफ होतात अशी श्रद्धा आहे.

रमझान ईद (ईद उल फित्र)

[संपादन]

हा सण इस्लामी दिनदर्शीकेचा दहावा महिना शव्वाल याच्या पहिल्या दिवशी साजरा करण्यात येतो. हा आनंदाचा सण आहे. इस्लामी कॅलेंडरचा नववा महिना (रमझान) हा कडक उपासाचा पाळला जातो. ईद उल फित्र (रमझान ईद) या सणाद्वारे रमझान महिन्याच्या कडक उपासाची सांगता केली जाते. म्हणून या उपासाला रमझान ईद असे म्हणले जाते. दान (जकात) देणे या गोष्टीला या दिवशी खूपच महत्त्व दिले जाते. ही ईद व बकरी ईद हे मुस्लिम लोकांचे आंतरराष्टीय सण आहेत.

बकरी ईद (ईद उल अजहा)

[संपादन]

बकरी ईद म्हणजे बळी देण्याचा उत्सव. इस्लामी कॅलेंडर मधील शेवटचा महिना जिल्हज या महिन्याच्या दहाव्या दिवशी हा सण साजरा करतात. या दिवशी बकरीचा बळी दिला जातो. असा बळी देणे हा एक धार्मिक विधी असतो. इस्लाम धर्मात जे अनेक प्रेषित मानले जातात त्यात अब्राहाम नावाचे एक प्रेषित होते. त्याची सत्त्वपरीक्षा पाहण्यासाठी ईश्वराने त्याला सागितले की, तुझा मुलगा मला बळी दे. ईश्वराची आज्ञा पालन करण्यासाठी अब्राहामने आपल्या मुलाला बळी देण्याची तयारी केली. इतक्यात एका देवदुताने त्याला थांबविले व तेथे प्रकट झालेला एक बकरा त्याला मुलाऐवजी बळी देण्यास सांगण्यात आला. व अब्राहामचा मुलगा त्याला परत मिळाला. अब्राहाम ईश्वराच्या परीक्षेत खरा उतरला. अब्राहामच्या या ईश्वरनिष्ठेची स्मृती म्हणून या दिवशी बकऱ्याचा बळी देण्याची प्रथा सुरू झाली. काही मुस्लिम या दिवशी सामुहिकरित्या गाय किवा उंट यांचा बळी देतात. हा बळी देणाऱ्या लोकांना मृत्यूच्या पुलावरून घोड्याच्या वेगाने स्वर्गाकडे नेले जाते अशी श्रद्धा आहे. बळी दिलेल्या प्राण्याच्या मांसाचे तीन हिस्से केले जातात. एक हिस्सा दानधर्मासाठी, दुसरा बळी देणाऱ्यासाठी, आणि तिसरा त्याच्या नातेवाईक व आप्तमित्रात वाटण्यासाठी केला जातो.

मोहरम

[संपादन]

मुस्लिम वर्षातील पहिला महिना मोहरम, आणि त्या महिन्यातील हा सण आहे. हा सण सुमारे दहा दिवस साजरा केला जातो. या सणाची सुरुवात त्या महिन्यातील पहिल्या चंद्रदर्शनापासून होते. दहावा दिवस उपवास, प्रार्थना, हुतात्म्यांचे पुण्यस्मरण यात घालविला जातो. वास्तविक हा सण आनंदाचा सण नाही. तर पवित्र हुतात्म्यांचे पुण्यस्मरण करण्याचा सण आहे. सुबुद्ध विचारी मुस्लिम हा सण पवित्र व दुःखपूर्ण वातावरणात, व प्रार्थना करण्यात घालवितात. मोहरम या शब्दाचा एक अर्थ पवित्र असा आहे. मुस्लिम ज्या व्यक्तींना परमपवित्र मानतात ( प्रेषित महमद, त्यांची मुलगी फातिमा, जावई अली, आणि हसन व हुसेन हे दोन नातू) , त्यातील शेवटच्या दोन व्यक्तींच्या, म्हणजे हसन व हुसेन यांच्या दुःखद हत्येबददल शोक करण्याचा हा दिवस आहे. प्रेषित महमद यांच्या मृत्यूनंतर त्यांचा जावई अली व त्यानंतर त्यांचा नातू हसन हे खलिफा झाले. हसन खलिफा असताना मुआविया नावाचा एक सरदार सिरीयाचा सुभेदार म्हणून काम पाहत होता. तो वारल्यानंतर त्याचा मुलगा याजीद हा त्या प्रांताचा सुभेदार झाला. त्याने हसनचा खून करविला. आपला भाऊ हसन याच्या मृत्यूमुळे हुसेन याला फार दु;ख झाले. याजीद्च्या विरुद्ध जाऊन काही लोकांनी हुसेनला मदत करण्याचे आश्वासन दिले. व त्याला हसनच्या खुनाचा सूड उगविण्याची चिथावणी दिली. हुसेनने सैन्याची जमवाजमव करून याजीद्च्या विरुद्ध करबला या ठिकाणी युद्ध केले. परंतु या युद्धात हुसेन व त्याचे सर्व कुटूंबिय मारले गेले. याच घटनेच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा दिवस पाळला जातो. हा सण फक्त शिया पंथीय लोक साजरा करतात. सुन्नी पंथीयांचा या सणाला सक्त विरोध आहे.

या दिवशी ताबुताची मिरवणूक काढली जाते. पवित्र हुतात्म्यांच्या प्रतिमा, पवित्र तख्ताची प्रतिमा, प्रेषित मोहमद ज्या घोडयावरून (बुराख) जेरुसलेमला व तेथून स्वर्गात गेले त्या पंखधारी घोडयाची प्रतिमा, प्रेषित महमदाची काल्पनिक तलवार, राजसत्तेच्या निशाणाच्या प्रतिमा इत्यादी अनेक प्रतिमा किवा तागुत एखाद्या खास इमारतीत (आशूरखान्यात) ठेवतात. व त्यांची मिरवणूक काढली जाते. मोहरमच्या नवव्या व दहाव्या दिवशी बरेच मुस्लिम उपवास करतात. मोहरमच्या दहाव्या दिवसाला अशुरा असे म्हणतात. या दिवशी काही लोक गोडधोड करून गरिबांना वाटतात.

जुम्मा (दर शुक्रवार)

[संपादन]

मुस्लिम लोकात शुक्रवार हा साप्ताहिक सुट्टीचा व सामुदायिक प्रार्थनेचा दिवस म्हणून पाळतात. यालाच जुम्मा असे म्हणतात.

  1. ^ पु. वि. हर्षे. (सण आणि सुट्ट्या - सर्व धर्माच्या).

यांना शुद्धा पाहा

[संपादन]