Jump to content

ब्रह्मेंद्रस्वामी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

धावडशीकर ब्रह्मेंद्रस्वामी (१६४९-१७४५) हे छत्रपती पहिले शाहू आणि पेशवे यांचे गुरू होते. त्यांचे मूळचे नाव विष्णू होते. वऱ्हाडातील दुधेवाडी हे त्यांचे गाव. ते धर्मक्षेत्रांच्या आणि तीर्थक्षेत्रांच्या रक्षणाचे काम करीत. पुढे ते काशीला गेले, तेथे त्यांनी संन्यास पत्करला आणि ब्रह्मेंद्रस्वामी हे नाव धारण केले. तीर्थयात्रा करीत करीत ते कृष्णाकाठी आले. तेथे यवनांनी उच्छाद मांडला म्हणून कोकणात आले.

कोकणातील चिपळूणजवळ मुंबई गोवा मार्गावर लोटे गावी परशुरामाचे देवस्थान आहे, तेथे ते राहू लागले (१६९८). या ठिकाणी बाळाजी विश्वनाथांची व ब्रह्मेंदस्वामींची ओळख झाली. हळूहळू स्वामींचे भक्तमंडळ वाढत गेले त्यांनी परशुरामाच्या देवळाचा जीर्णोद्धार करण्यासाठी भिक्षा मागणे सुरू केले (१७०७). याचवेळी शाहूंची सुटका झाली. त्यावेळी बाळाजी विश्वनाथाने शाहूचा पक्ष स्वीकारण्यात आणि पुढें त्यास पेशवाई मिळवून देण्यात स्वामींची अंंतस्थ खटपट असावी असे म्हणले जाते.

परशुरामपंत प्रतिनिधी, कान्होजी आंग्रे, फलटणकर निंबाळकर, नागपूरकर भोसले, अक्कलकोटकर भोसले वगैरे महाराष्ट्रांतील सर्व प्रमुख मंडळींवर व खुद्द शाहू छत्रपतींवर स्वामींची छाप होती.

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे मूळ गाव धावडशी होत.

धावडशी

[संपादन]

बाळाजी विश्वनाथ पेशवे झाल्यावर त्यांनी ब्रह्मेंद्रस्वामींच्या देवासाठी सातारा जिल्ह्यातील धावडशी हे गाव स्वामींना इनाम दिले. शाहूने वीरमाडे व अनेवाडी ही गावे इनाम दिलीं (१७२५). एकंदर इनामी गावे आठ झाली. स्वामींनी या गावांचा विकास केला. बाळाजी विश्वनाथांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांनातवांवरही स्वामींची कृपादृष्टी कायम होती. ते विद्वान असून लेखकही होते.

सन १७२६ च्या सुमारास स्वामींनी कर्नातकातून आणलेल्या एका हत्तीच्या संबंधात जंजिऱ्याच्या सिद्दीचा व स्वामींचा तंटा झाल्यानें सिद्दीनें परशुरामाचे देऊळ लुटले, तेव्हां स्वामी तेथून निघून धावडशीस येऊन राहिले व येथेही त्यांनी परशुरामाचे देऊळ, तलाव, वाडा वगैरे बांधले.

कारस्थामांचे राजकारण

[संपादन]

१७२५ पासून १७४५ पर्यंत मराठेशाहीतील बहुतेक कारस्थानांत ब्रह्मेंद्रस्वामींचें प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष हात होता. दिल्लीकडील कारस्थाने, निजामाचे उच्चाटन, जंजिऱ्याची व वसईची मोहीम, अशा कित्येक प्रसंगांशी स्वामींचा थोडाबहुत संबंध असून, स्वामींच्या विस्तृत पत्रव्यवहारावरून त्या त्या प्रसंगांच्या हकीकती बऱ्याच खुलासेवार कळून येतात.

तुळाजी आंग्रे आणि मानाजी आंग्रे यांच्या भांडणात तुळाजीने मानाजीच्या बायकामुलांना पकडून कैदेत ठेवले होते. त्यांच्या सुटकेसाठी ब्रह्मेंद्रस्वामींनी मध्यस्ती केली होती.

अखेर

[संपादन]

बाजीराव वारल्यावर स्वामींस पराकाष्ठेचें दुःख होऊन त्यानी आपलें चित्त बहुतेक व्यवहारांतून काढले. इ.स. १७४५ च्या श्रावण महिन्यात कृष्णातीरी स्वामींनी नामस्मरण करीत प्राण सोडला. स्वामींची समाधी धावडशीस आहे.

चरित्र

[संपादन]

स्मारक

[संपादन]

धावडशी गावातील स्वामींच्या समाधिस्थानावर त्यांचे मंदिर उभारण्यात आले आहे. त्‍या मंदिराची रचना आणि बांधकाम सुरेख व रेखीव आहे. मंदिराच्या महाद्वाराच्या शिरोभागी श्रीब्रह्मेंद्रस्वामींचे गुणगान गाणारा सतरा ओळींचा शिलालेख आहे. परशुरामाची काळ्याभोर पाषाणाची रेखीव मूर्ती मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आहे. पेशवाईतील प्रख्यात कारागीर बखतराम यांनी ती मूर्ती घडवली असून तो शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मूर्तींसमोर श्रीब्रह्मेंद्रस्वामींची समाधी आहे.

मुख्य मंदिराच्या पुढील बाजूस भव्य सभामंडप असून, त्याचे बांधकाम लाकडी कलाकुसरीचे आहे. सभामंडपातच मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर श्रीब्रह्मेंद्रस्वामींचा मोठा फोटो आहे. मंदिराच्या परिसरात भलेमोठे बांधकाम असलेली धर्मशाळा आहे. तेथे एकेकाळी उत्सवातील प्रसादपंक्ती होत असत. गावभोजन, विविध कार्यक्रम व सभासंमेलनेही होत. स्वामींचे स्मारक व पुण्यस्मरण म्हणून त्या वास्तूत 'श्री ब्रह्मेंद्रस्वामी हायस्कूल' सुरू करण्यात आले आहे.