बहुवारिकीकरण
लहान रेणूंपासून बहुवारिके [लहान, साध्या रेणूंच्या संयोगाने बनणाऱ्या प्रचंड रेणूंची संयुगे ⟶प्लॅस्टिक व उच्च बहुवारिके] बनविण्याच्या विक्रिया. यांचे दोन प्रकार आहेत : (१)समावेशक बहुवारिकीकरण व (२)संघनन बहुवारिकीकरण.
समावेशक बहुवारिकीकरण : या विक्रिया-प्रकारात एकवारिकाचे रेणू एकमेकांत सामावले जातात विक्रियेमध्ये त्यातील अणू किंवा त्यांपासून बनलेली संयुगे वेगळी होत नाहीत. ज्या संयुगांत द्विबंध किंवा त्रिबंध आहेत अशा संयुगांचे रेणू, उदा., CR2 = CR2 (R= H किंवा प्रातिष्ठापित मूलक म्हणजे एका अणूच्या वा अणुगटाच्या ठिकाणी आलेला दुसरा अणुगट).मूलक CH ≡ CH यांचे बहुवारिकीकरण या प्रकारे होते. त्याचप्रमाणे काही वलयी संयुगांच्या वलयांचा भंग झाला म्हणजे विक्रियाशील केंद्रे असलेल्या संरचना निर्माण होतात व त्यामुळे अशा संरचनांपासूनही बहुवारिके बनू शकतात.
बहुवारिकांची संरचना एकवारिकांची पुनरावृत्ती होऊन बनलेल्या, कार्बन अणुंच्या लांब साखळ्यांनी युक्त असते. उदा., पॉलिएथिलीन या बहुवारिकात एथिलिनाची पुनरावृत्ती होऊन झालेल्या कार्बन अणूंच्या साखळ्या असतात (सूत्र २). दोनापेक्षा जास्त विक्रिया केंद्रे असलेल्या एकवारिकांपासून बनलेल्या बहुवारिकांच्या साखळ्या एकमेकींस पार्श्व बंधानी जोडल्या जाऊन जाळ्यांसारख्या संरचनाही बनतात.
एकवारिकाच्या रेणूची संरचना CH2 = CHY (Y = – C1, – COOH, – CN इ.) अशी असली, तरी त्यातील कार्बन अणू समान नसतात. त्यामुळे असे रेणू एकमेकांस जोडले जाऊन जेव्हा बहुवारिक बनेल तेव्हा एकापेक्षा अधिक तऱ्हेने जोडणी होणे शक्य असते.