जिवंतिका
जरा आणि जिवंतिका या भारतात पूजल्या जाणाऱ्या दोन पुरातन देवता आहेत. या सप्त मातृकांपैकी आहेत, असेही मानले जाते.
काही ठिकाणी जरा-जिवंतिका या देवांचे वैद्य असणाऱ्या अश्विनी कुमारांच्या पत्नी आहेत असाही उल्लेख आहे. जरा-जिवंतिकांविषयी माहिती स्कंद पुराणात आहे.
अर्थ
[संपादन]जरा-जिवंतिका देवी : जरा म्हणजे म्हातारपण, आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी. अर्थात दीर्घायुष्य देऊन माणसाला म्हातारपणापर्यंत जिवंत राखणाऱ्या देवता! अपत्याला भरपूर आयुष्य मिळावे म्हणून हिंदुधर्मीय यांची आराधना करतात. जरे जीवन्तिके देवि बालयुक्ते प्रमोदिनि | रक्षाव्रते महाशक्ति पूर्णकामे नमोस्तुते || अर्थ- हे वृद्ध, बालयुक्त , आनंददायिनी , बालकांचे रक्षण करणारी , महाशक्तिरूपिणी आणि जिच्या सर्व इच्छा तृप्त झाल्या आहेत अशा जीवन्तिका देवी तुला नामाकार असो.
श्रावणामध्ये मराठी स्त्रिया जिवंतिका पूजन करतात. त्यासाठी बाजारात मिळणारा एक जिवतीचा कागद विकत आणतात. एके काळी 'नागोबा-नरसोबा दोन पैसे' असे म्हणत हा कागद विकणारी मुले रस्त्याने फिरत असत. कागदावर हिरण्यकश्यपू. नरसिंह, पोराबाळांना खेळवणाऱ्या दोन ठसठशीत जिवत्या, आणि बुध-बृहस्पती असतात. हा चित्रे ज्यांनी कोणी काढली असतील, त्यांची मात्र कमाल आहे. हळद-कुंकू वाहण्याच्या जागा ठशठशीत काढलेली ही चित्रे शतकानुशतके स्त्रियांना प्रपंचात ओढत राहिली.. कापूस आणि ओल्या कुंकवाची बोटे, लाल-तांबड्या देठांचानी पांढऱ्याशुभ्र कापूसफुलांचा हार या जिवत्यांना घालायचा, पुठ्ठय़ाला चिकटवलेला हा कागद पुजायचा. लेकरेबाळे सुखी राहतात, प्रपंचात काहीही उणे राहात नाही, धान्यधुन्य भरलेले राहते. उगीच नाही, इतक्यासाठी बायका हे व्रत करत असतात.