Jump to content

कुंदन लाल सैगल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुंदनलाल
जन्म कुंदनलाल सैगल
११ एप्रिल इ.स. १९०४
नवा शहर, काश्मीर,
मृत्यू १८ जानेवारी इ.स. १९४७
जालंधर, पंजाब
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र गायक, अभिनेता
कारकीर्दीचा काळ इ.स. १९३२ – १९४७
भाषा हिंदी

कुंदनलाल सैगल (जन्म : ११ एप्रिल १९०४,; - १८ जानेवारी १९४७) हे भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात भारतीय बोलपटांतील सर्वात लोकप्रिय गायक अभिनेते होते. त्यांच्या आवाजाला इंग्लिश श्रोते ‘गोल्डन व्हॉइस’ म्हणायचे. सैगल यांची सर्वच गाणी आजही लोकप्रिय आहेत. त्यांच्या गैरफिल्मी गझलासुद्धा फार श्रवणीय आहेत. ‘बाबुल मोरा’ हे स्ट्रीट सिंगर चित्रपटातील गाणे अजूनही लोकांना फार आवडते.

कुंदनलाल सैगल यांचे वडील अमरचंद हे जम्मू-काश्मीर संस्थानात मामलेदार होते. त्यांची आई केसरबाई धार्मिक वृत्तीची व संगीतप्रेमी होती. त्या सैगल यांना बालपणी धार्मिक समारंभांना घेऊन जात असे. तिथे भजन, कीर्तन, यांसारख्या पारंपरिक शैलीत गायल्या जाणाऱ्या भक्तिगीतांचे संस्कार बालवयात सैगल यांच्यावर झाले. जम्मू येथील रामलीलांमध्ये सैगल अधूनमधून सीतेची भूमिका करीत असत. त्यांचे वडील सेवानिवृत्तीनंतर पंजाबमधील जालंदर येथे स्थायिक झाल्याने सैगल यांचे बालपण तेथेच गेले. त्यांचे शालेय शिक्षण अर्धवट राहिले.

निसर्गदत्त गायकी

[संपादन]

गायनाचे निसर्गदत्त वरदान लाभलेल्या सैगल यांना सलमान युसुफ नावाच्या पीराकडून संगीताचे प्राथमिक धडे मिळाले. याव्यतिरिक्त संगीताचे कोणतेही पद्धतशीर शास्त्रोक्त शिक्षण त्यांनी घेतले नाही. गझल, ठुमरी, पंजाबी लोकसंगीत यांच्या संस्कारांतून त्यांची गायकी घडत गेली. कुंदनलाल सैगल यांना लोक शापित गंधर्व म्हणत.

नोकरी

[संपादन]

अर्थार्जनासाठी त्यांनी काही काळ रेल्वेत टाइमकीपरची नोकरी केली. पुढे रेमिंग्टन टाइपरायटर कंपनीत टाइपरायटर-विक्रेत्याचे काम त्यांनी केले. या फिरतीच्या नोकरीमुळे त्यांना भारतात अनेक ठिकाणी प्रवास करण्याची संधी मिळाली.

कलकत्त्यातील मुक्कामात

[संपादन]

१९३१ साली कलकत्त्यात असताना कुंदनलाल सैगल यांनी अनेक छोट्या-मोठ्या मैफलींमध्ये गाणी गायिली. त्यांच्या गायनाने प्रभावित होऊन बी. एन्. सरकार यांनी सैगल यांना ‘न्यू थिएटर्स’साठी करारबद्ध केले. १९३२मध्ये सैगल यांची भूमिका असलेले मोहब्बत के आँसू (उर्दू चित्रपट), सुबह का तारा व जिंदा लाश हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले; पण ते फारसे चालले नाहीत.

मात्र १९३३ मध्ये पूरन भगत या चित्रपटामुळे गायक-अभिनेते अशी सैगल यांची ख्याती सर्वत्र पसरली. या चित्रपटातील रायचंद (आर.सी.) बोराल यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी गायिलेली भजने लोकप्रिय ठरली. चंडीदास या चित्रपटातील त्यांची भूमिकाही लक्षवेधी होती. दिग्दर्शक पी.सी. बरुआंच्या देवदास (१९३५) या चित्रपटातील सैगल यांची नायकाची भूमिका व गाणी अत्यंत गाजली व त्यांनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. या चित्रपटातील ‘बालम आवो बसो मोरे मन मे’ व ‘दुख के अब दिन बीतत नही’ यांसारखी त्यांची गाणी अजरामर ठरली. सैगल यांनी बंगाली भाषेवर प्रभुत्व मिळवले व ‘न्यू थिएटर्स’ निर्मित सात बंगाली चित्रपटांत भूमिका केल्या, तसेच तीस बंगाली गीते गाऊन बंगाली रसिकांची वाहवा मिळवली. ‘एक बंगला बने न्यारा’ (प्रेसिडेंट), ‘करूं क्या आस निरास भई’ (दुष्मन), ‘सो जा राजकुमारी सो जा’ (जिंदगी, १९४०), ‘बाबूल मोरा’ (स्ट्रीट सिंगर) इ. लोकप्रिय गाण्यांनी त्यांनी रसिकांची मने जिंकली भारतीय चित्रपट-संगीताचा वारसा समृ्द्ध करणारी यांसारखी अनेक गीते सैगल यांनी गायिली. १९४० पर्यंत सैगल ‘न्यू थिएटर्स’मध्ये होते. या काळात आर.सी. बोराल, पंकज मलिक व तिमिर बरन या ज्येष्ठ संगीत दिग्दर्शकांची अनेक अजरामर गाणी सैगल यांनी गायिली.

मुंबईत आगमन

[संपादन]

कुंदनलाल सैगल १९४१ च्या डिसेंबरमध्ये मुंबईत आले व ‘रणजित मुव्हिटोन ‘ या चित्रपट-निर्मिती संस्थेत दाखल झाले. त्यांची गाणी व अभिनय असलेले या संस्थेचे अनेक चित्रपट यशस्वी ठरले. त्यांपैकी भक्त सूरदास (१९४२) व तानसेन (१९४३) हे चित्रपट खूप गाजले तानसेनमधील ‘दिया जलाओ’ हे शु्द्ध कल्याण रागात त्यांनी गायिलेले गीत अविस्मरणीय ठरले. ‘न्यू थिएटर्स’च्या मेरी बहना (१९४४) या चित्रपटातील ‘दो नैना मतवारे’ व ‘ऐ कातिब ऐ तकदीर मुझे इतना बता दे’ ही त्यांची गाणीही लोकप्रिय होती. सैगल यांचा शाहजहॉं हा चित्रपट १९४६ मध्ये प्रदर्शित झाला. त्यातील ‘गम दिए मुत्त किल’, ‘जब दिल ही टूट गया’ यांसारखी आत दर्दभरी गीते रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी होती. परवाना (१९४७) हा त्यांचा अखेरचा चित्रपट त्यांच्या मरणोत्तर प्रदर्शित झाला. सैगल यांच्या गायकीची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या गायनातील उत्स्फूर्तता व सहजता, आर्त दर्दभरा आवाज आणि प्रत्येक गीत भावपूर्णतेने गाण्याची वैशिष्ट्यपूर्ण शैली. त्यामुळे त्यांची गाणी रसिकांच्या हृदयाला भिडत.

कुंदनलाल सैगल यांनी गायलेले गीतप्रकार आणि त्यांचे यशस्वी चित्रपट

[संपादन]

सैगल यांनी विविध गायनप्रकार कौशल्याने हाताळले. गझला, भजने, ठुमरी, अंगाई गीत, बालगीत अशी अनेक प्रकारची गाणी त्यांनी सहजतेने व सफाईने गायिली. गझल व भजन हे त्यांच्या विशेष आवडीचे प्रकार, ‘चाह बरबाद करेगी ‘(शाहजहॉं), ‘ऐ कातिब-ऐ तकदीर’ (मेरी बहना) या त्यांच्या दर्जेदार गझला, तसेच ‘राधेरानी देय डालो ना’ (पूरन भगत), ‘जीवन का सुख आज प्रभु मोहे’ (धूप छॉंव) व ‘मैंया मोरी मैं नही माखन खायो'(भक्त सूरदास) ही त्यांनी गायिलेली भजने अविस्मरणीय ठरली. त्यांनी गायिलेले ‘सो जा राजकुमारी’ हे अंगाईगीत तसेच ‘बाबूल मोरा’ ही भैरवीतल्या करुण स्वरांनी बांधलेली रचना यांचाही समावेश त्यांच्या उत्कृष्ट गीतांत केला जातो. मुकेश, महंमद रफी या गायकांवर सुरुवातीच्या काळात सैगल यांच्या गायनशैलीचा प्रभाव होता.

सैगल यांनी आपल्या पंधरा वर्षांच्या कारकिर्दीत एकूण ३६ चित्रपटांतून भूमिका केल्या. त्यांपैकी २८ हिंदी वा उर्दू, ७ बंगाली व १ तमिळ चित्रपट होता. तसेच त्यांनी एकूण १८५ गाणी गायिली. त्यांतील १४२ चित्रपटगीते व ४३ अन्य प्रकारची (भजने, गझला, होरी इ.) गीते होती.

सैगल यांचे यशस्वी चित्रपट :- दीदी (१९३७; हिंदी आवृत्ती प्रेसिडेंट); देशेर माटी (१९३८; हिंदी आवृत्ती धरती माता); साथी (१९३८; हिंदी स्ट्रीट सिंगर) आणि जीवनमृत्यू (१९३८; हिंदी दुष्मन).

कुंदनलाल सैगल यांची भूमिका असलेले चित्रपट

[संपादन]
  • चंडीदास
  • जिंदगी (१९४०)
  • जिंदा लाश
  • तानसेन
  • दुष्मन (१९३८)
  • देवदास (१९३५)
  • धरती माता
  • धूप छॉंव
  • परवाना
  • पूरन भगत
  • प्रेसिडेंट
  • भक्त सूरदास
  • मेरी बहना
  • मोहब्बत के ऑंसू (उर्दू चित्रपट)
  • शाहजहॉं
  • सुबह का तारा
  • स्ट्रीट सिंगर

कुंदनलाल सैगल यांना मिळालेले सन्मान

[संपादन]
  • बी. एन्. सरकार यांनी सैगल यांच्या जीवनावर आधारित अमर सैगल हा अनुबोधपट १९५५ मध्ये केला होता.
  • मराठी कवी कुसुमाग्रजांनी या सूरसम्राटाला मानवंदना देताना म्हणले होते-

अशीच संगीते आळवी तुझी कलावंता,
घडीभर जागव रे अमुची अशीच मानवता..

  • सैगल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भारतात, आकाशवाणीवर आणि दूरचित्रवाणीवर अनेक कार्यक्रम होतात. सिलोन रेडियोवर सकाळी ०७-३०- ते ०८०० या जुन्या चित्रपट गीतातील कार्यक्रमात शेवटचे गीत सैगल यांचे असे.

तसेच लोककवी मनमोहन एका कवितेत सैगलांबद्दल म्हणतात-
तुझ्याच कंठामध्ये अवचित
मधमाशी घे ‘मोहोळ’ बांधुनी
बुलबुल बसले बनात रुसुनी।

पुण्यातील कुंदनलाल सैगल स्मृती भवन

[संपादन]

ज्यांनी सैगल यांना कधीही पाहिले नाही असे अनेकजण सैगल यांच्या गायकीवर फिदा असतात. असा गायक पुन्हा होणे नाही अशीच सर्वांची भावना असते. पुण्याचे श्रीधर रानडे हे असेच सैगलवर एकलव्यासारखी गुरुभक्ती करणारे रसिक. त्यांनी त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त २५ नोव्हेंबर २०१७ रोजी कोथरूड येथील गणंजय सोसायटीतील स्वतःच्या मालकीच्या ’साहस’ या बंगल्यामध्ये कुंदनलाल सैगल स्मृती भवन साकारले आहे.

साखर कारखान्यासाठी लागणारे विशिष्ट पाईप तयार करणे हा मेकॅनिकल-इलेक्ट्रिकल इंजिनिअर असलेल्या श्रीधर रानडे यांचा व्यवसाय. त्यांचा आवाज सैगलच्या आवाजाशी मिळताजुळता आहे असे कुणीतरी म्हटल्यानंतर, रानडे यांनी आयुष्यभर सैगल यांच्या गीतांचा प्रचार आणि प्रसार करणे हेच जीवनाचे ध्येय मानले. सन १९९६पासून, दरवर्षी सैगल यांच्या ११ एप्रिल या जन्मदिवशी आणि १८ जानेवारी या स्मृतिदिनी श्रीधर रानडे हे १०,००० ते १५,००० भाडे देऊन एखाद्या सभागृहात सैगल यांनी गायलेल्या सुमारे ६० गीतांचा गीतांचा विनामूल्य कार्यक्रम करत. आता त्यासाठी त्यांचे स्वतःचे सभागृह आहे.