कुंजलता
कुंजलता (इंग्लिश: काऊशीप क्रीपर; लॅटिन: पर्गुलॅरिया मायनर) ही वनस्पती अॅस्क्लेपीएडेसी कुलातील वनस्पती आहे. ही मूळची हिमालयातील असून ती विस्तृत, बहुशाखित (पुष्कळ फांद्यांची) आणि वेढे देत चढणारी वेल आहे. याची पाने सु. ७.५–८ सेंमी. लांब, अंडाकृती, तळाशी हृदयाकृती व टोकदार असतात. फुले एप्रिल-जूनमध्ये येतात व ती पिवळसर हिरवी असून त्यांना मंद मधूर वास असतो. त्यांचे फुलोरे कुंठित व चामरकल्प असतात. ही वेल तिच्या सुवासिक फुलांमुळे फार मोठ्या प्रमाणात बागेतून लावली जाते. या फुलांपासून अत्तर काढतात.
कुंजलतेची अभिवृद्धी छाटकलमांनी अगर दाबकलमांनी करतात. याच्या लागवडीसाठी सर्व प्रकारची जमीन चालते. जमीन उन्हाळ्यात १५ ते २० सेमी. खोल खणून, तापू देऊन, खत घालून चांगली मशागत करतात. कलमे पावसाळ्यात कायम जागी लावतात. ती चिकटून वेल वाढू लागले म्हणजे मांडवावर चढवितात. जरुरीप्रमाणे खतपाणी देऊन, छाटणी करून त्यांना योग्य आकार देतात.