Jump to content

औदुंबर (कविता)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विशेष लेख
हा लेख मराठी विकिपीडियावरील १[]वा लेख आहे.

॥ औदुंबर रसग्रहण ॥

एखाद्या कुशल चित्रकाराने कुंचल्याच्या अवघ्या चार-सहा फटकाऱ्यांसरशी एखादे सुरेख चित्र निर्माण करावे तद्वत अवघ्या आठ ओळीत बालकवींनी एक सुंदर निसर्गचित्र शब्दांच्या कुंचल्याने या कवितेत रेखाटलेले आहे. हे चित्र रंगविताना कवीने विविध रंग वापरलेले आढळतील. निळासावळा झरा, शेतमळ्यांची हिरवी गरदी, पांढरी पायवाट व काळा डोह-मोजक्या रंगांनी शब्दांच्या चौकटीत बसविलेले हे एक साधे व जिवंत चित्र आहे. बालकवींची रंगदृष्टी येथे आपल्या प्रत्ययास येते.

पहिल्या चार ओळींत टेकड्या, गाव, शेतमळे व झरा यांनी व्यापलेले विहंगम दृश्य दिसते.

शेतमळ्यांच्या हिरव्या गरदीतून वाहणाऱ्या निळ्यासावळ्या झऱ्यावरून जी नजर मागे जाते ती चार घरांचे चिमुकले गाव ओलांडून पैल टेकडीपर्यंत पोचते. केवढा विस्तीर्ण पट कवीने पार्श्वभूमीसाठी घेतलेला आहे! पुढील दोन ओळीत त्या काळ्या डोहाच्या लाटांवर गोड काळिमा पसरून जळात पाय टाकून बसलेला औदुंबर दाखविला आहे.

केवळ निसर्गाचे एक सुरम्य चित्र रंगविण्याचा कवीचा हेतू दिसत नाही. पहिल्या चार ओळींतील आनंदी व खेळकर वृत्तीच्या पार्श्वभूमीवर नैराश्याची छटा पसरविणारे, काळ्या डोहाकडे सरळ चाललेल्या पांढऱ्या पायवाटेचे चित्र पाहून वाचकांची वृत्तीही पार बदलते. जगातील सुखदुःखांकडे विरक्त वृत्तीने पाहणाऱ्या स्थितप्रज्ञासारखा हा औदुंबर वाटतो. विरक्त वृत्तीच्या दत्त या देवतेशी औदुंबराचा निकट संबंध असल्यामुळे या वृक्षाची येथे केलेली निवड औचित्यपूर्ण वाटते.

'ऐल तटावर पैल तटावर, आडवीतिडवी, झाकळुनी जळ गोड काळिमा, जळात बसला असला औदुंबर' या गोड शब्दांत सुंदर अनुप्रास साधला आहे. चिमुकले गाव, निळासावळा झरा, दाट हिरवी गरदी, गोड काळिमा, आडवीतिडवी पायवाट, अशी अर्थवाही व समर्पक विशेषणे वापरून मूळचे चित्र अधिक स्पष्ट केले आहे. औदुंबराला मनुष्य कल्पून येथे 'चेतनगुणोक्ती' हा अलंकार साधला आहे. शब्दमाधुर्य व पदलालित्य यांनी ओथंबलेली ही एक प्रासादिक कविता आहे.

औदुंबर

ऐलतटावर पैलतटावर हिरवाळी घेऊन निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातून.

चार घरांचे गाव चिमुकले पैलटेकडीकडे शेतमळ्य़ांची दाट लागली हिरवी गरदी पुढे.

पायवाट पांढरी तयातुनि अडवीतिडवी पडे हिरव्या कुरणामधुनी चालली काळ्या डोहाकडे.

झाकाळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर.

कवी: बालकवी. (त्र्यंबक बापुजी ठोंबरे)

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ हा लेख या दिवशी लिहिला गेला.