होरेशियो नेल्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
होरेशियो नेल्सन

लॉर्ड होरेशियो नेल्सन, पहिला व्हायकाउंट नेल्सन (सप्टेंबर २९ इ.स. १७५८ - ऑक्टोबर २१, इ.स. १८०५:ट्रफालगार) हा इंग्लंडच्या इतिहासातील अतिशय शूर नौदल ॲडमिरल होता. हा लॉर्ड नेल्सन या नावाने ओळखला जातो. व काहींच्या मते आजवरचा सर्वोत्तम नौदल योद्धा होता. नौदलीय युद्धातील त्याच्या डावपेचांमुळे इंग्रज नौदलाला १९व्या शतकाच्या सुरुवातीला त्याने जबरदस्त दरारा मिळवून दिला. युरोपात जमीनीवर नेपोलियनची सद्दी असली तरी नेपोलियन समुद्रावर नियंत्रण मिळवणार नाही याची त्याने खबरदारी घेतली व नेपोलियनचा आरमारी युद्धात त्याने अनेक वेळा पराभव केला. ऑक्टोबर २१ १८०५ रोजी त्याने फ्रेंच व स्पॅनिश आरमाराचा ट्रफालगर येथे जबरदस्त पराभव केला. स्वता: नेल्सन या युद्धात मारला गेला. युद्धाआधी सैनिकांना केलेले आवाहन England expects that every man will do his duty (देशाची अपेक्षा आहे की प्रत्येक जण आपापले कर्तव्य निभावेल) व मरणापूर्वी त्याचे उद्गागरलेले शेवटचे वाक्य Now I am satisfied, that I have done my duty (मी समाधानी आहे की मी माझे कर्तव्य पार पाडू शकलो) इंग्लंडमध्ये आजही प्रेरणादायी आहे. त्याच्या धाडसी स्वाभावामुळे त्याला युद्धांमध्ये एक डोळा व एक हात गमवावा लागला होता. अतिशय प्रभावी सेनापती व शूर योद्धा म्हणून नावजलेल्या हा योद्धा ट्रफालगारच्या युद्धात लढताना मरण पावला व इंग्लंडच्या इतिहासातील सोनेरी पानांमध्ये नेल्सनचा समावेश झाला.