महादेव मंदिर (पाटणा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हेमाडपंती महादेव मंदिर या पानावरून पुनर्निर्देशित)

पाटणा गावाजवळ हे मंदिर आहे. हे मंदिर १२ व्या शतकातील आहे असे इथले लोक सांगतात.[ संदर्भ हवा ] हे मंदिर पाटणादेवी परिसरात आहे तसेच ते सुस्थितीत आहे.

धुळ्यापासून ७०-७५ किमी अंतरावर, तसेच वेरूळ लेण्यांपासून ६५ किमी अंतरावर असलेल्या पाटणा, (ता.-चाळीसगाव, जि.-जळगाव) गावाजवळ हे मंदिर आहे. हे मंदिर ११ किंवा १२ व्या शतकातील आहे असे मानले जाते.[ संदर्भ हवा ]

चाळीसगावपासून पश्चिमेला २० किमी अंतरावर असलेले पाटणादेवी मंदिर हे एक जागृत चंडिका देवीचे शक्तिपीठ मानले जाते. आज ह्या संपूर्ण परिसराला शासनाने गौताळा अभयारण्य म्हणून संरक्षित केलेला असल्याने परिसर हिरवागार दिसतो.[ संदर्भ हवा ]

पाटणा गाव ओलांडल्यावर वनविभागाचे गेट ओलांडल्या नंतर साधारण २ किमी अंतरावर उजव्या बाजूस पूर्वाभिमुख "प्राचीन हेमाडपंती महादेवाचे मंदिरा"चा एक बोर्ड दिसतो. मंदिर परिसरात जवळजवळ ५-६ अशीच मंदिरे असावीत, कारण आता फक्त त्या ठिकाणी मोठे मातीचे ढिगारे व शिलाखंड भग्नावस्थेत आढळतात. यादव काळात येथे मोठे प्रगल्भ सांस्कृतिक व धार्मिक केंद्र असावे असे अवशेषांवरून लक्षात येते.[ संदर्भ हवा ]

सदर मंदिर हे हेमाडपंथी स्थापत्य शैलीतील उत्कृष्ट नमुना आहे. या शैलीत दोन दगडांना जोडताना कोणतेही जोडमिश्रण न वापरता प्रत्येक दगडांच्या स्तंभात खाचा तयार केल्या जातात. जेणेकरून ह्या खाचांमधे मोठमोठे दगडी स्तंभ ही लीलया अडकतात. या मंदिराचे निर्माण कार्य एका भव्य अशा १० फूट उंचीच्या ओट्यावर झालेले प्रथमदर्शनी वाटते. त्याची लांबीच जवळपास १०० फुटांपर्यंत आहे. नंदीगृह , सभागृह व गर्भगृह अशी मंदिर रचना आहे. नंदीगृहाच्या दर्शनी भागाला उभारलेले दोन जवळपास दहा फूट उंचीचे नक्षीदार खांब आहेत. मंदिर सभागृहाचा विस्तार बराच मोठा आहे. इतर २४ लहान खांबांवर सभामंडपाची उभारणी केलेली आहे. प्रत्येक खांब प्रमाणबद्ध असून सुंदर नक्षीकाम करून सुशोभित केलेला आहे.

प्रवेशद्वारावरच श्रीगणेशाची मूर्ती कोरलेली आहे. तसेच चौकटीवर यक्ष,गंधर्व, किन्नर हे गायन, वादन व नृत्य करत असलेल्या मूर्ती कोरलेल्या आहेत. तसेच गर्भगृहाच्या डाव्या बाजूला एक सुंदर शिलालेख आढळतो. परंतु काही ठिकाणी कडेकडेला त्याचे पापुद्रे काळाने काढले आहेत.

बाहेरून दगडी स्तंभ उभारतांना एका सरळ रेषेत न उभारता अशा पद्धतीने काळजीपूर्वक उभारला आहे की प्रत्येक खांबाचा जोड हा विलग आहे. स्तंभांवरील कोरीवकाम अप्रतिम असून अनेक शिल्पे झिजलेल्या अवस्थेत आहेत. काहींचे मूळ स्वरूप लक्षात येत नाही.

संपूर्ण मंदिरांच्या बाहेरील बाजूने कोरलेल्या मुर्त्यांनी सजवले आहे. या मुर्त्यांमधे अनेक मुद्राभाव असलेली शिवाची, गणेशाची शिल्पे आहेत. तसेच येथे कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराची एक छोटीशी परंतु हुबेहूब प्रतिमा देखील येथे पाहायला मिळते.

बाहेरील खांबाच्या खालच्या पट्टीवर हत्तीशिल्पे दिसून येतात. पण दुर्दैवाने त्यातील एकही हत्ती आज पूर्णपणे शिल्लक नाही. एकेठिकाणी कोरलेली चामुंडा देवीची मूर्ती दिसते. त्यात तिने पायांजवळ दोन दैत्यांचा केशसंभार पकडून त्यांना शरण आणले आहे. पायाखाली एका दैत्याला दाबले आहे, तर मांडीवर एक दैत्य जीवदानाची याचना करत आडवा पडलेला आहे. शुंभ निशुंभ यांचा संहार करणारी दुर्गा सप्तशतीतील रंणचण्डिका कारागिरांनी हुबेहूब कोरली आहे.

ही प्राचीन वास्तू सन १९५८ च्या अधिनियम २४ नुसार पुरातत्त्वीय स्थळ व अवशेष म्हणून जाहीर करण्यात आली आहे.[ संदर्भ हवा ]

चित्रदालन[संपादन]