Jump to content

स्नेह (आयुर्वेद)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्नेह या पानावरून पुनर्निर्देशित)

स्नेह द्रव्याच्या व शरीराच्या २० गुणांपैकी स्निग्ध गुणयुक्त द्रव्य आहे. हे पृथ्वी व जल गुणसंपन्न द्रव्य आहे. स्नेह हा मानवी शरीराचा उत्तम प्रतीचा घटक आहे. शारीर घटक स्नेहभूयिष्ठ आहेत, ते स्नेहाने प्राप्त होतात म्हणून स्वास्थ्याकरिता व रोगनाशाकरिता स्नेहाचा उपयोग करावा लागतो. तूप, वसा व मज्जा हे तीन जंगम आणि तेल हा स्थावर असे स्नेहाचे चार प्रकार आहेत. जंगमात गायीचे तूप व स्थावरात तिळाचे तेल श्रेष्ठ आहे.

  1. यमक — तूप व तेल अशा दोन स्नेहांचे मिश्रण,
  2. त्रिवृत् — कोणत्याही तिन्हीचे मिश्रण,
  3. महा — चारही स्नेहांचे मिश्रण असे मिश्रणाचे प्रकार आहेत.

प्रकार पान, अनुवासन, अभ्यंग, शिरोबस्ती, उत्तर बस्ती, नस्य, कर्ण-पूरण व आहार यांमध्ये अवस्थानुरूप स्नेहाचा उपयोग करतात. शरीराला स्निग्ध करणे ( स्नेहन ) व रुक्षत्व नाहीसे करणे हे स्नेहाचे कफ स्वभावी कर्म आहे. मलाचा अवरोध नष्ट करणे, शरीराला मार्दव आणणे व वातनाश करणे यांसाठी स्नेहपान हे एक प्रधान कर्म आहे. शरीरातील दोष व मल यांची शुद्धी करण्यापूर्वी अनुरूप औषधिसिद्ध स्नेहपान हे अत्यावश्यक कर्म आहे.

ज्यांना शेकणे व शोधन देणे आवश्यक आहे अशा मद्यपी, व्यायामी, चिंता वा चिंतन करणारे, वृद्ध, बाल, अबल, कृश, रुक्ष, क्षीणशरीर, क्षीणशुक्र, वातरोगी, डोळे आलेले, दृष्टी कमी झालेले इ. व्यक्ती स्नेहन करण्यास योग्य आहेत.

स्नेहसेवनाचा उपयोग

[संपादन]

अग्नी प्रदीप्त होतो व कोठा शुद्ध राहतो. धातुघटक ताजेतवाने व बलवर्णसंपन्न होतात, इंद्रिये बळकट होतात, वार्धक्य हळूहळू येते व मनुष्य दीर्घायुषी बनतो. बहुतेक जीर्ण रोगांत औषधिसिद्ध तूप, तेल इ. स्नेह फार उपयुक्त होतात. शरीरातील पाचकाग्नी व धातूंचे अग्नी स्नेहाचा उपयोग करून जर प्रदीप्त केले असतील, तर ते अतिजड आहार देखील पचविण्यास समर्थ बनतात.