Jump to content

पहिला सुलेमान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सुलेमान, ऑट्टोमन सम्राट या पानावरून पुनर्निर्देशित)
पहिल्या सुलैमानाचे चित्र (चित्रनिर्मिती: इ.स. १५३० अंदाजे)

पहिला सुलैमान (अन्य मराठी लेखनभेद: पहिला सुलेमान, सुलैमान १ ; ओस्मानी तुर्की: سليمان ; आधुनिक तुर्की: I. Süleyman ;) (नोव्हेंबर ६, इ.स. १४९४ - सप्टेंबर ६, इ.स. १५६६) हा ओस्मानी साम्राज्याचा १०वा व सर्वाधिक काळ सिंहासनस्थ राहिलेला सुलतान होता. सुलतानपदावरील त्याची कारकीर्द इ.स. १५२० ते इ.स. १५६६, म्हणजे ४६ वर्षांची होती. पहिल्या सुलेमानाच्या कारकिर्दीत युरोपात व पश्चिम आशियात ओस्मानी साम्राज्याचे सैनिकी, नाविक व आर्थिक वर्चस्व वाढत गेले. सुलेमानाने स्वतःच्या नेतृत्वाखाली बेलग्रेड, हंगेरी या युरोपातील मुलुखांवर यशस्वी चढाया केल्या. इ.स. १५२९ सालातील व्हिएन्नाचा वेढा अपयशी ठरण्यामुळे सुलेमानाची युरोपातील आगेकूच रोखली गेली, तरीही बाल्कन व भूमध्यसागरी प्रदेशांवर त्याने ओस्मानी साम्राज्याची पकड घट्ट केली. इराणातल्या सफवी साम्राज्याशी चाललेल्या संघर्षात त्याने मध्यपूर्वेतील बराचसा भूभाग ओस्मानी साम्राज्यास जोडला. उत्तर आफ्रिकेतही मुसंडी मारत त्याने आजच्या अल्जीरियापर्यंतचा मुलूख काबीज केला. या काळात ओस्मानी आरमाराचा दबदबा भूमध्य समुद्रापासून तांबडा समुद्रइराणच्या आखातापर्यंत पसरला. सुलेमानाने सैनिकी व आरमारी यशासोबतच ओस्मानी साम्राज्यातील कायदेव्यवस्था व प्रशासकीय व्यवस्था सुधारली. त्याच्या मृत्यूनंतरही अनेक शतके ओस्मानी साम्राज्यातील न्यायव्यवस्था त्याच्या कारकिर्दीत अमलात आलेल्या कायद्यांवर आधारलेली होती.

बाह्य दुवे

[संपादन]