सुरेश भागवत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुरेश भागवत हे मराठी नाटके, हिदी-मराठी चित्रपटांत आणि दूरचित्रवाणी मालिकांत काम करणारे महाराष्ट्रीय अभिनेते आहेत.

भागवत कुटुंबीय मूळचे कोकणातील देवरुख गावचे असल्याने सुरेश भागवत यांचे शालेय शिक्षण गावातीलच न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला आले. रचना संसद महाविद्यालयातून त्यांनी स्थापत्यशास्त्राची पदवी संपादन केली. शाळेत असताना त्यांनी स्नेह संमेलनात झालेल्या नाटकात काम केले होते.

आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेतले यश[संपादन]

महाविद्यालयात असताना सुरेश भागवत एकदा ग्रंथालयात पुस्तक बदलायला गेले होतो. भवन्स कॉलेजच्या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेसाठी तेथे ऑडिशन सुरू होती. पु.ल. देशपांडे यांचे भाऊ आणि अभिनेते-दिग्दर्शक रमाकांत देशपांडे यांनी ऑडिशन घेतल्यावर एकांकिकेतल्या भूमिकेसाठी भागवत यांची निवड केली. त्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत भागवत यांनी गंगाधर गाडगीळ लिखित बंडू, नानू आणि गुलाबी हत्ती या एकांकिकेतली बंडू ही मुख्य भूमिका केली आणि उत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक मिळवले.

नातलग[संपादन]

मौज प्रकाशन संस्थेचे वि.पु आणि श्री.पु. भागवत यांचे सुरेश भागवत हे सख्खे पुतणे होत.