Jump to content

सुगरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सुगरण (पक्षी) या पानावरून पुनर्निर्देशित)

मराठी नाव : सुगरण, बाया, विणकर, गवळण
हिंदी नाव : बाया, सोनचिडी
संस्कृत नाव : सुगृहकर्ता, सूचिमुख, पीतमुंड, कलविण
इंग्रजी नाव : Weaver Bird
शास्त्रीय नाव : Ploceus philippinus


सुगरण हा चिमणीच्या आकाराचा लहान पक्षी आहे. पिवळ्या धम्मक रंगातील हा पक्षी त्याच्या घरटी बांधण्याच्या कलेसाठी प्रसिद्ध आहे. गावाजवळ एखाद्या बाभळीच्या झाडावर सुगरण पक्ष्यांची अनेक सुबक घरटी लटकताना दिसतात. डॉ सलीम अली यांचा सुगरण पक्ष्याचा बराच अभ्यास होता.

मादी आणि विणीच्या हंगामात नसलेला नर हे मादी चिमणी सारखेच दिसतात, मातकट-काळ्या रंगाचे. विणीच्या हंगामात नराचे डोके पिवळे, पाठीवर पिवळ्या-तपकिरी रेषा, छातीचा भाग पिवळा तर उर्वरित भाग फिकट पांढरा, सायीसारखा असतो.

सुगरण भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार इ. देशांत आढळतो. हा पक्षी स्थानिक निवासी असला तरी काही उपजाती स्थलांतर करणाऱ्या आहेत. रंग आणि आकारावरून याच्या किमान तीन उपजाती आहेत. १. पट्टेरी सुगरण(Streaked Weaver)(Ploceus manyar)(संस्कृतमध्ये कलविंक, कौलिक, चंचुसूचि); २. काळ्या छातीची सुगरण(Blackbreasted/throated Weaver)(Ploceus benghalenis), वगैरे. पण या सर्वांत बाया हा सर्वात जास्त आढळणारी उपजात आहे.

विशेषतः भात शेतीच्या प्रदेशात थव्याने राहणारा सुगरण उभ्या पिकावर चरायला येतात, कीटक आणि धान्य खातात.

मे ते सप्टेंबर हा याच्या विणीचा हंगाम असून सुगरण पक्ष्यांमध्ये नर हा मुख्यत्वे घरटी बांधण्याचे काम करतो. एकावेळी ४ ते १० अर्धवट घरटी बांधून झाल्यावर नर सुगरण घरट्यांच्याजवळ एखाद्या ठिकाणी बसून मादीला आकृष्ट करण्यासाठी छान गाणी म्हणतो. मादी आल्यावर प्रत्येक घरटे तपासून पाहते. घरटे पसंत पडल्यावरच त्या नराशी मादीचे मीलन होते. मग मादी उर्वरित घरटे पूर्ण करते. असे घरटे एखाद्या झाडाला किंवा विहिरीत किंवा अन्यत्र टांगलेले असते. सुगरण पक्ष्याच्या घरट्यात खालच्या बाजूने प्रवेशद्वार असते. खालून निमुळते आणि लांब बोगदा असलेले घरटे वर गोलाकार होत जाते. वरच्या भागात दोन किंवा जास्त कप्पे असतात. हे घरटे गवत, कापूस, केस आणि इतर वस्तूंनी तयार केलेले आणि व्यवस्थित विणलेले असते. घरट्याच्या फुगीर भागात ओल्या मातीचा गिलावा असतो. मादी एकावेळी २ ते ४ अंडी देते. ही अंडी शुभ्र पांढऱ्या रंगाची असतात. अंडी उबविणे, पिलांना खाऊ घालणे वगैरे कामे मादी एकटीच करते.

एका मादीशी संबंध आल्यावर नर दुसऱ्या मादीला बोलाविण्यासाठी परत गाणी म्हणतो. नर सुगरण एकावेळी एकपेक्षा जास्त मादींचा "दादला" असतो. पण अर्धवट बांधलेल्या घरट्यांपैकी जर एकही घरटे मादीला पसंत पडले नाही तर नर ते झाड किंवा तो संपूर्ण परिसर सोडून अन्यत्र नवीन घरटी बांधायला सुरू करतो.

चित्रदालन

[संपादन]