सारस क्रौंच

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सारस क्रौंच जोडी
Grus antigone

सारस क्रौंच अथवा नुसताच सारस (शास्त्रिय नाव :Grus antigone) भारतात मोठ्या प्रमाणावर नसला तरी विपुल प्रमाणात हा क्रौंच आढळून येतो व भारतातील स्थानिक क्रौंच आहे. हा क्रौंच नेहमी त्याच्या जोडीदाराबरोबर असतो व आयुष्यभर बहुतांशी एकच जोडीदार पसंत करतो. याची मुख्य खुण म्हणजे उंच मान, उंच पाय व डोके व चेहरा डोक्यावरील लाल व पांढरा पट्टा बाकी शरीर हलक्या करड्या रंगाचे असते. उंची साधारणपणे ५ फुटाच्या आसपास असते. इतर क्रौंचाप्रमाणे याचे वसतिस्थान पाणथळी जागा, तळी, सरोवरकाठ व नदीकाठ आहे तसेच भातशेतीचे प्रदेश याचे आवडते स्थान आहे.


आढळ[संपादन]

दक्षिण भारताच्या तुलनेत उत्तर भारतात हा जास्त प्रमाणात आढळून येतो. सर्वाधिक वावर राजस्थान व उत्तर प्रदेशातील गंगेच्या खोऱ्यात आहे. अन्नाच्या उपलब्धतेनुसार हे पक्षी स्थलांतर करतात. भरतपुरच्या केवलदेव घाना राष्ट्रीय उद्यानात हा पक्षी हमखास दिसतो.

महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र व कोकणात फारच दुर्मिळ आहे. मुख्यत्वे उत्तर महाराष्ट्राच्या जंगलात (फारच कमी) पण थोड्याफार प्रमाणात व विदर्भात तसा बऱ्यापैकी दिसतो. भंडारा जिल्ह्यातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान तसेच नागझिरा अभयारण्यात, मेळघाटमधील जंगलांच्या पाणथळी जागांमध्ये/भातशेतीमध्ये दिसण्याची शक्यता असते.

भारतीय संस्कृतीमध्ये[संपादन]

भारतीय संस्कृतीमध्ये या पक्ष्याला मानाचे स्थान आहे. असे मानले जाते की वाल्मिकी ऋषींना सारस क्रौंचाच्या जोडीकडे पाहून पहिले काव्य सुचले व रामायणाची निर्मिती झाली. हे पक्षी आयुष्य एकाच जोडीदारबरोबर व्यतीत करीत असल्याने तसेच विणीच्या हंगामात जोडी अत्यंत मोहक असा प्रणयनृत्य करतात. त्यामुळे या पक्ष्यांना प्रेमाचे प्रतिक मानतात. राजस्थानमध्ये या पक्ष्याचे स्थान अतिशय मानाचे असल्याने याची शिकार करत नाही. असे मानतात की या पक्ष्याची शिकार केली तर त्याचा अथवा तिचा जोडीदार झुरून प्राण त्यागतो त्यामुळे याच्या शिकारीचे पाप अत्यंत मोठे आहे.