साधना (अभिनेत्री)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(साधना या पानावरून पुनर्निर्देशित)

साधना शिवदासानी नय्यर तथा साधना (जन्म : कराची, ब्रिटिश भारत (आताचे पाकिस्तान, २ सप्टेंबर १९४१; - मुंबई, भारत, २५ डिसेंबर २०१५) या एक हिंदी चित्रपट अभिनेत्री होत्या.

कौटुंबिक माहिती[संपादन]

प्रसिद्ध नृत्यांगना साधना बोस यांच्या नाव व रूपावरून त्यांच्या वडिलांनी त्यांचे नाव साधना असे ठेवले होते. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात आले.

सादना शिवदासानी यांचे पुढील शिक्षण मुंबईतच झाले. चर्चगेट येथील जय हिंद महाविद्यालयात त्या शिकल्या. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. यशस्वी अभिनेत्री बनण्याचे त्यांचे स्वप्न होते. कुटुंबाचा त्यांना पूर्ण पाठिंबा होता. वडिलांनी त्यांचे हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी मेहनत घेतली.

१५ वर्षांच्या साधनाला महाविद्यालयातील एका नाटकात भूमिका करताना काही निर्मात्यांनी पाहिले आणि चित्रपटांत काम करण्याची संधी दिली. १९५८ मध्ये "अबाना‘ या भारतातील पहिल्या सिंधी चित्रपटाद्वारे त्यांनी अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटाचे मानधन म्हणून त्यांना एक रुपया मिळाला होता.

त्याआधी १९५५ साली त्यांनी राज कपूर यांच्या 'श्री ४२०' या चित्रपटातील 'मुड मुडके न देख मुड मुडके' या गाण्यावर केलेल्या नृत्याने लोकप्रियतेचा कळस गाठला होता.

प्रसिद्ध निर्माते शशिधर मुखर्जींनी साधना यांचा 'स्क्रीन' मॅगझिनमधील फोटो पाहून त्यांना आपल्या अभिनय प्रशिक्षण शाळेत प्रवेश दिला, आणि 'लव्ह इन सिमला' या चित्रपटात प्रमुख भूमिका दिली. अभिनेता जॉय मुखर्जी यांच्यासोबतचा हा चित्रपट खूप गाजला आणि साधना यांची यशस्वी कारकीर्द सुरू झाली. त्या चित्रपटातील त्यांची हेअरस्टाईल पुढे 'साधना कट' या नावाने खूप प्रसिद्ध झाली.

या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान साधना आणि आर.के. नय्यर यांचे प्रेम जमले. पुढे त्यांनी विवाह केला. सन १९९५मध्ये दम्याच्या आजाराने नय्यर यांचे निधन झाले.

साधना यांनी ‘गीता मेरा नाम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. अनीता, मेरा साया आणि वो कौन थी या चित्रपटांमुळे त्यांना इंडस्ट्रीमध्ये ‘मिस्ट्री गर्ल’ म्हणूनच ओळखले जायचे.

मनोज कुमारसोबत त्यांनी केलेल्या 'वो कौन थी‘ चित्रपटातील त्यांचा डबल रोल खूप गाजला. या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर नामांकनही मिळाले.

स्टाईल आयकॉन[संपादन]

साधना यांची हेअर स्टाईल हिंदी सिनेसृष्टीमध्ये खूपच फेमस झाली होती. साधना कट म्हणून ही हेअर स्टाइल इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहे ती आजपर्यंत. हेअर स्टाईलप्रमाणेच त्यांच्या कपड्यांची स्टाईलदेखील बॉलीवुडमध्ये हिट ठरली होती. ७० च्या दशकात टाइट फिटिंगची चुडीदार सलवार आणि कुर्ता ही स्टाईलदेखील त्यांनीच इंडस्ट्रीमध्ये आणली.

साधनाचे सौंदर्य[संपादन]

साधना नटी ही कोवळ्या, टवटवीत चेहऱ्याची, सडपातळ देहयष्टीची, अतिसुंदर डोळ्यांची व मंजूळ आवाजाची, स्वप्नातली वाटावी अशी अप्सरा होती. तिचे बांडे नाकही तिचे सौंदर्यलेणे ठरले.

साधनाचे सौंदर्य आक्रमक नव्हते, पण त्याचबरोबर ते थंड व निर्जीवही नव्हते. ‘मेरे मेहबूब’मध्ये राजेंद्रकुमारला तिच्या बुरख्याच्या समोरच्या जाळीतून तिचे हरणासारखे डोळे केवळ दिसतात. तो त्या डोळ्यांवरून तिच्या प्रेमात पडतो. प्रेक्षकांना यात काही खटकले नाही कारण तेही या डोळ्यांच्या प्रेमात पडले होते.

साधनाचा अभिनय[संपादन]

त्यांचा अभिनय मनमोकळा व नैसर्गिक होता. मुख्य म्हणजे त्यावर कोणाही बुजुर्ग अभिनेत्रीची छाप नव्हती. कॅमेरासमोर त्या घरात वावरावे तशा सहज वावरायच्या. त्या अभिनय करत आहेत असे वाटायचेच नाही. त्यांच्या कॅमेऱ्यासमोरील वावरात कसला अभिनिवेश नसायचा की खोटेपणा नसायचा. त्यांया डोळ्यांतील पाणी ग्लिसरीनमुळे आले आहे असे बघताना कधीही वाटले नाही.

‘एक मुसाफिर एक हसीना’ (जॉय मुखर्जी), ‘मनमौजी’ (किशोरकुमार), ‘प्रेमपत्र’ (शशी कपूर), ‘आरजू’ (राजेंद्रकुमार), ‘असली नकली’ (देव आनंद), ‘एक फूल दो माली’ (संजय खान व बलराज सहानी) या चित्रपटांतील साधना प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

आजारपण आणि मृत्यू[संपादन]

‘थायरॉइड’च्या दुखण्याने साधनाच्या उज्ज्वल कारकिर्दीचा अकाली अंत केला. वेळीच उपचार न केल्याने तिचा आजार बळावला व तिच्या डोळ्यांची व एकूणच चेहऱ्याची अपरिमित हानी झाली. डोळ्यांसाठी व गोड चेहऱ्यासाठी गाजलेल्या साधनावर असा प्रसंग यावा हा दैवदुर्विलास होय.

मदिरा, धूम्रपान व थायरॉइड यांनी साधनाचा बळी घेतला. शेवटच्या काही वर्षांपासून त्या कर्करोगाशी झुंजत होत्या पण दुर्दैवाने ही झुंज अपयशी ठरली. मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात त्यांचे २५ डिसेंबर २०१५ रोजी सकाळी निधन झाले.

चित्रपट[संपादन]

साधना यांनी जवळपास ३५ हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. त्यांतले काही चित्रपट असे :-

  • अनीता (१९६७)
  • अबना (भारतातला पहिला सिंधी चित्रपट, १९५८)
  • असली नकली (१९६२)
  • अमानत (१९७५)
  • आप आए बहार आयी (१९७१)
  • आरजू ( १९६५)
  • इंतकाम (१९६९)
  • इश्क पर जोर नही (१९७०)
  • उल्फत की नई मंजिल (१९९५)
  • एक फूल दो माली (१९६९)
  • एक मुसाफिर एक हसीना (१९६२)
  • गबन (१९६६)
  • गीता मेरा नाम (१९७२)
  • छोटे सरकार (१९७४)
  • तुलसी (१९८५)
  • दिल दौलत दुनिया (१९७२)
  • दुल्हा-दुल्हन (१९६४)
  • परख (१९६०)
  • पिकनिक (१९६४)
  • प्रेमपत्र (१९६२)
  • बदतमीज (१९६६)
  • मनमौजी (१९६२)
  • महफिल (१९८१)
  • मेरा साया (१९६६)
  • मेरे मेहबूब (१९६३)
  • राजकुमार (१९६४)
  • लव्ह इन सिमला (नायिका म्हणून पहिला चित्रपट, १९६०)
  • वक्त (१९६५)
  • वो कौन थी (१९६४)
  • श्री ४२० (‘मुड़मुड़केना देख’ या गाण्यात समूहनृत्यात, १९५५)
  • सच्चाई (१९६९)
  • साजन की गलिया (देव आनंदबरोबरचा अपूर्ण चित्रपट)
  • स्त्री (उडीया चित्रपट, १९६७)
  • हम दोनों (१९६१)
  • हम सब चोर है (१९७३)

चित्रपटांमध्ये साधना(अभिनेत्री)वर चित्रित केली गेलेली गाणी[संपादन]

  • अजी रूठ कर कहाँं जाइयेगा (आरजू)
  • अभीना जाओ छोड कर कि दिल अभी भरा नही (हम दोनों)
  • अल्ला तेरोना ईश्वर तेरो नाम (हम दोनों)
  • आगे भी जानेना तू (वक्त)
  • आप यूं ही अगर हमसे मिलते रहें (एक मुसाफिर एक हसीना)
  • ए फूलों की रानी बहारों की मलिका (आरजू)
  • एक बुत बनाऊँगा (असली-नकली)
  • ऐ नर्गिसे मस्ताना (आरजू)
  • ओ मेरे राजकुमार (राजकुमार)
  • ओ सजना बरखा बहार आयी (परख)
  • कल की दौलत आज की खुशियाँ (असली-नकली)
  • कैसे रहूँ चुप (इंतकाम)
  • कौन आया (वक्त)
  • गीत तेरे साज का (इंतकाम)
  • जबान-ए-यार मन तुर्की (एक मुसाफिर एक हसीना)
  • जुम्मे की रात हो या दिन (दुल्हा-दुल्हन)
  • जो प्यार तूने मुझको दिया था (दुल्हा-सुल्हन)
  • झुमका गिरा रे (मेरा साया)
  • तुझे कहेते है कल्लू कवाल (दुल्हा-दुल्हन)
  • तुम बिन जीवन कैसे बीता (अनिता)
  • तेरा मेरा प्यार अमर (असली-नकली)
  • तेरे प्यार मे दिलदार (मेरे मेेहबूब)
  • नैना बरसे (वो कौन थी)
  • नैनों में बदरा छायें (मेरा साया)
  • पूछे जो कोई मुझसे (आप आये बहार आयी)
  • प्यार का साज भी है (असली-नकली)
  • बहुत शुक्रिया बडी मेहेरबानी (एक मुसाफिर एक हसीना)
  • बेदर्दी बलमा तुझको (आरजू)
  • मुझेे देखकर आपका मुस्कराना (एक मुसाफिर एक हसीना)
  • मुझे तेरी मोहब्बत का सहारा (आप आये बहार आयी)
  • मेरे मेहबूब तुझे (मेरे मेहबूब)
  • मेहबूबा तेरी तसबीर (इश्क पर जोर नहीं)
  • मैं जिंदगी का साथ निभाता (हम दोनों)
  • मैने देखा था सपनेमें एक चंद्रहार (गबन)
  • लग जा गले (वो कौन थी)
  • लहू को लहू पुकारेगा (गीता मेरा नाम)
  • सुनिये जरा देखियेना (गीता मेरा नाम)
  • हम तुम्हारे लिये (इंतकाम)