Jump to content

समर्थ कल्याण संवाद--२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सांग बा कल्याणा तुझी स्थिती मज आता |कोण्या योगे कोण्या पंथे ऐक्य रघुनाथा ||धृ ||

उपदेशिले ज्ञान ते तुझे अंतरी आले |भेदबुद्धी सर्वही गेली संशय मावळले | देहे स्मृतीचा लोप जाला कोण मी कळले |ऐसा प्रत्यय जाला की नाही ते सांग ये वेळे ||१||

स्वप्न अवस्था निरसुनि बोध जागृत जाले की |भजनमुद्रा भक्ती कळा निज वोळखिले की | सद्गुरू महिमा ऐसे जाणूनी सुरती भोगिले की |मोहो जाउनी निजस्मृती प्रतीती बाणली की ||२||

वृत्ती निश्चळ होती किंवा चंचळ हे जाली |पाहुनी स्वरूपालागी तटस्थ होऊनि का इतुक्या | सद्गुरू महिमा ऐसे जाणूनी सुरती भोगिले की |माजी येक प्रत्यय सांग ये वेळी ||३||

ते देह की आत्मा होय कोण मज सांग |बद्ध मुक्त कोण कोणा वासनेचा भोग | कैशी स्थिती पाहुनी सेविसी श्रीरंग |रामदासी प्रश्न केला निज अभंग ||४||


कल्याण स्वामींचे उत्तर

सुखरूप जाहलो स्वामी तुमचिया पादसेवे |कल्याण माझे जाले रंगलो सोहंभावे ||धृ ||

चित्त ही वृत्ती माझी चैतन्यी मुराली |संतोष स्वात्मसुख अनुभव किल्ली दिल्ही | निर्विकल्पी वास जाहला अनुभव बोलूं बोली |विश्व हें नाही अवघे श्रीराम स्वरूप पाही ||१||

कनक हे पूर्णपणी नगास ठाव कोठें |चैतन्य मृत्तिका येसी वाया हे घटमठे | नाही हा दृश्याभास अनुभव यैसा स्पष्ट |पूर्ण ब्रह्म सनातन सद्गुरू येकनिष्ठ ||२||

पावलो धालो देवा तुझिया सेवा बळे |वेदांत श्रुती ज्यासी निर्विकल्प बोलती बोले | ते मी स्वयंभ जालो हे शब्द मावळले |मी तू पण अवघे स्वामी गिळूनी उगले ठेले ||३||

रामविण वृत्ती माझी आणिक जाये कोठे |जिकडे तिकडे पाहे श्रीराम माझा भेटे | कल्याण म्हणे सकळ द्वैत्पण जेथे आटे |रामदास स्वामी जईं आनंदघन भेटे ||४ ||