सदस्य चर्चा:Arjunnalavade

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शेतकरी समाजाकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन[संपादन]

मित्रांनो, आज महराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीचा आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विचार करता शेती क्षेत्राकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देणं गरजेचे आहे.त्यानुषंगाने डॉ. मुकुंद गायकवाड़ यांनी उपस्थित केलेले प्रश्न आजच्या शेतकऱ्यांच्या सामाजिक परिस्थीतीची वास्तव जाणीव करु देतात. ते म्हणतात की, १०० वर्षापुर्वी ब्रिटिशांनी फेमिन ऍक्ट करून सावकरांच्या ताब्यात असणारी जमीन शेतकऱ्यांना मोकळी करून दिली. तशी परिस्थिती आज निर्माण होईल को ? समाजकंटक, मध्यस्थ, दलाल आणि व्यापारी यांच्या कात्रीत सापडलेला शेतकरी या व्यवस्थेविरुद्ध बंड करुन उठेल का  ? महासत्तेची स्वप्न पाहणाऱ्या या भारत देशात शेतकऱ्यांना किमान वर्षभर चरितार्थ चालवा, इतकं उत्पन्न २०२० साली मिळेल का  ? कधी ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ यांच्याशी दोन हात करण्याची ताकद शेतकऱ्यांच्यात निर्माण होईल का  ? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे आम्ही गेली ६५ वर्षात देऊ शकलेलो नाही. आणि म्हणून आज १० वर्षाचा असणारा बालक भविष्यात २५ वर्षाचा होईल तेंव्हा त्याला या प्रश्नांची उत्तरं समाधानकारकपणे मिळाली नाहीत तर तो दहशतवादी आणि नक्षलवादी संघटनेत सामील झाल्याशिवाय राहणार नाही. तरीसुद्धा हा पर्याय असू शकत नाही. हे समजावून सांगताना कवी भरत दौंडकर असं म्हणतात की , संघटना म्हणजे तर बिन दावणीचा जनावर सैल सोड नाहीतर खेचून धरा ते हात दुखवत म्हणजे दुखवत संघटनेच गाढव फक्त लाथा मारायला शिकवत आम्हाला हिंसेतून शेतकऱ्यांना विकास करायचा नाही. तर सहकार्यातून आणि समन्वयातून शेतकऱ्यांच्या सामाजिक परिस्थितीचा विकास घडवून आणायचा आहे. आज शेतकऱ्यांची अवस्था ही खाणमजुरसरखी झाली आहे. कारण खाणमजुर खाणीतून एंखादा हिरा तर बाहेर काढतो. पण त्याच्यावरती पैलू पाडण्याची कला त्याच्याकडे नसल्यामुळे त्याची किंमत त्याला मिळत नाही. नेमकी तशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. कारण, शेतकरी मोठ्या कष्टाने शेतीमाल तर पिकवतो पण बाजारात भाव न मिळाल्यामुळे आणि त्याच्यावरती प्रक्रिया करता येत नसल्यामुळे त्याव्हा तो शेतीमाल रस्त्यावर फेकून द्यावा लागतो. हि खरी वस्तुस्थिती आहे. आज या महाराष्ट्रात दरवर्षी १२००० विद्यार्थी कृषी विद्यापीठातून, कृषी महाविद्यालयातून कृषी पदवी घेऊन बाहेर पडतात. त्यातील किमान २००० विद्यार्थ्यांना नोकरी लागते. उरलेले आपले नशीब आजमाविण्यासाठी, अनिश्चत ध्येयाने, काही स्पर्धापरीक्षा करण्यासाठी पुणे आणि मुंबई सारख्या शहराकडे वळतात. मला प्रामाणिकपणे अस वाटत, शेतीपूरक उद्योग केंद्रामध्ये ह्या विद्यार्थ्यांनी सामील व्हावं, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे गांभीर्य लक्षात घ्यावं, आणि मग त्यानंतर शेतकऱ्यांच्या सामजिक परिस्थितिच्या विकासाचं गणित मांडाव. तेंव्हाच आमचा शेतकरी राजा, बळीराजा सुखासमाधानाने जगू शकेल. जगात भारत लोकसंख्येच्या बाबतीत पहिला, तंत्रज्ञानात तिसरा, संशोधनात नववा, दुध, साखर, अंडी, बटाटा, गहू, तांदूळ उत्पादनात दुसरा, ३३ % गुरंची पैदास आमच्या भारतात होते. तरीसुद्धा जागतिक व्यापारात भारताताचा सहभाग किती असा जर कोणी प्रश्न विचारला तर त्याचा उत्तर आहे फक्त १ %…पूर्वी आमच्या समाजात म्हण होती कि, "उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ट नोकरी करी विचार" पण कालांतराने जागतिकीकरणानंतर आम्ही आमच्या सोयीने त्याचा उलटा अर्थ लावला कि,"उत्तम नोकरी, दुय्यम व्यापार, कनिष्ट शेती, असा करी विचार" याचा परिणाम असा झाला कि, शेती, उद्योग, सेवा या टप्प्याटप्प्या च्या मार्गावरून न जाता शेती क्षेत्रावरून सरळ सेवा क्षेत्रावर उडी घेताली. परिणामी देशात बेरीजगारांची संख्या वाढायला सुरुवात झाली. मध्यंतरी बिहारच्या निवडणुका पार पाडल्या. ती बिहारची निवडणूक जिंकून देणारा मास्टर मांइंड म्हणून ज्या व्यक्तीला ओळखले जाते तो व्यक्ती म्हणजे प्रशांत किशोर. व्यवस्थापन शास्त्रातील या विद्वान माणसाने ही निवडणूक जिंकून दिली. मला वाटतं अशाप्रकारे व्यवस्थापन शास्त्रातील हुषार विद्यार्थ्यांनी शहरांकडे न जाता आमच्या शेतकरी समाजाकडे वळाव. तेव्हाचं शेतकरी आत्महत्या थांबतील. १५ मार्च १९४७ मध्ये डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी घटना सामितीला एक घोषणापत्र सदर केले होते. त्यामध्ये "राज्यसमाजवाद " नावाची संकल्पना मांडली . त्यानुसार शेती हा राज्याचा उद्योग असावा असे सुचविण्यात आले. तत्कालीन परिस्थितीमध्ये सरंजामदार, भांडवलदार, जमीनदार आणि सावकार यांचे हितसंबंध शेतीमध्ये गुंतलेले असल्याने त्यांनी प्रचंड विरोध केला. तरीसुद्धा शासनाने शेती हा जरी उद्योग समजला असता तरी आमच्या शेतकऱ्याचा शेतीमाल रस्त्यावर कुजत पडला नसता आणि " वावरभर कापूस पिकला अन वाऱ्यावर पिंजला गेला "अस म्हणण्याची वेळ आमच्या शेतकरी समाजावर आली नसती. जगाच्या तुलनेत आमच्या शेतकरी अनुदानाचा विचार केला तर युरोपमध्ये शेतकऱ्यांना १०० % अनुदान दिल जात. डेन्मार्कमध्ये १०० % अनुदान दिल जात. अमेरिका तर ३०००० डॉलर्स शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी बाजूला काढून ठेवते आणि भारतीय शेतकऱ्यांचा विचार केला तर त्यांच्या आत्महत्येनंतर त्याच्या मरणाची किंमत म्हणून त्याच्या वाट्याला एक लाख रुपये येतात. तेंव्हा त्या शेतकऱ्याचा मुलगा आर्जव स्वरात म्हणतोच की, कायदा त्यांच्या कागदावर नियम त्यांच्या कार्यकर्त्यांच्या धाब्यावर तवा म्या कोर्टाच्या पायरीवर अन माझ्या बापाचं मढ चारचौघांच्या खांद्यावर… विषयाच्या अंतिम टप्प्यात आमच्या शेतकरी बांधवाना एक विनंती आहे. तुमची शेती आता हि एक कंपनी आहे असच समजा त्यानुसार वक्रता कार्यक्रम तंत्र, गतिमान कार्यक्रम तंत्र, फेरबदल कार्यक्रम तंत्र यांचा वापर करा त्याला आधुनिकतेची जोड द्या. आणि मग पहा… आमच्या कोकणातील कोकम, वसईची केळी, नागपूरची संत्री, सांगलीची द्राक्षे, कोल्हापूरचा ऊस, सोलापूरचा कांदा आणि देशावरचा गहू जगाच्या बाजारपेठेत अव्वल ठरल्याशिवाय राहणार नाही. शेवटी एकच आशावाद की, झाला असेल सूर्यास्त अंधार अजून पडला नाही मनाच्या गाभाऱ्यातील पणती अजूनही विझली नाही पणती ती जपून ठेवा तिचाच एक दिवस सूर्य होईल आणि हे जग पुन्हा एकदा एका नव्या विचाराने प्रकाशमान होईल

अर्जुन नलवडे

म्हणे... स्त्री सबलीकरण अन स्त्री संरक्षण !!![संपादन]

विधिमंडळात स्त्रियांच्या संरक्षणावर आणि संरक्षणावर आणि सबलीकरणावर प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलं; पण हे ज्यांनी उभं केलं त्यांच्या पुरुषी मानसिकतेचं एकदा संशोधन केलं पाहिजे. आज जो-तो स्त्रियांच्या संरक्षणाच्या मुद्द्यावरती सोशल नेटवर्किंग साईट्सवर बोलत सुटलाय. बलात्कार करण्याऱ्याचे हात-पाय काढा, त्याला भर चौकात फाशी द्या, त्याचं लिंग छाटा, त्यांना जनतेच्या हवाली द्या वगेरे वगेरे... ह्या भावना सामाजमाध्यामांवर उमटणे साहजिकच आहे; पण हे सर्व अंतिम आहे का? तर नाही. कारण हे सर्व पुरुषी मानसिकता असणाऱ्या झाडांच्या फांद्या कापण्याचा प्रकार आहे. आणि तो तात्पुरता आहे. गरज आहे ती पुरुषी मानसिकतेच्या मुळाशी हात घालण्याची. स्त्रियांच्या बलात्काराची प्रकरणं दिवसेंदिवस वाढत आहेत. असं म्हणणे हे संकुचितपणाचे लक्षण आहे. कारण हे बलात्कार पूर्वीपासून चालत आलेले आहेत. इतिहासाचार्य वि.का.राजवाडे आपल्या ‘भारतीय विवाह संस्थेचा इतिहास’ या पुस्तकात असं लिहितात कि, हरिवंश नावाच्या ग्रंथात वसिष्ठ नावाच्या राजाने शतरूपा नावाच्या स्वत:च्या मुलीवर बलात्कार केला. तर त्याच ग्रंथात सत्ताविसाव्या अध्यायात असं लिहून ठेवलंय की, जान्हवी नावाच्या राजाने गंगा नावाच्या स्वत:च्या मुलीलाच आयुष्यभर आपली पत्नी मानली. तिथपासून ते आत्ताच्या कोपर्डी बलात्कारापर्यंत हे सर्व अन्याय, अत्याचार अन बलात्कार केवळ स्त्रियांच्यावरतीच झाले. तर स्त्री संरक्षणावरती भाष्य करणाऱ्या याची लाज वाटते का? स्त्री अत्याचाराचं विश्लेषण करताना भूतकाळापासून चालू वर्तमानकाळापर्यंत अभ्यास केला तर सर्वात पहिल्यांदा मनूच्या विचारांची विसंगती जाणवते. तो एकीकडे असं म्हणतो कि, ‘’यत्र नार्येस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवात:’’ म्हणजे जेथे स्त्रियांचा मानसन्मान केला जातो तेथे देवतांचा वास असतो. तर दुसरीकडे तो असंही म्हणतो की, ‘’न स्त्री स्वतंत्र्यम अहर्ती’’ म्हणजे स्त्रीला कोणत्याही प्रकाराचे स्वतंत्र्य देऊ नका. म्हणजे याच मनुने आपल्या मनाच्या मर्जीप्रमाणे स्त्रीयांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन ठरविला. पूर्वी समाजात ज्याप्रमाणे ब्राह्मण, क्षेत्रीय, वैश्य आणि शुद्र ही चार वर्ण होती त्याचप्रमाणे पाचवं वर्ण मनुने जन्माला घातलं ते म्हणजे स्त्री... जे की चारही वर्णात ते आढळते.

आज आत्ता स्त्रीयाच्याकडे पाहण्याचीब समाजाची मानसिकता काय आहे? हे सांगत असताना सुशीलाबाई वैद्य यांचं उदाहरण महत्वाचं ठरतं. कारण त्या आपल्या एका आजीच्या उचापती या पुस्तकात असं म्हणतात की, संसारात माझी भूमिका होती घोड्याच्या टांग्याची. चल म्हंटल की चालायचं... थांब म्हंटल कि, थांबायचं माणसासारखे माझे पती होते. रेस खेळणारा आता निघून गेला. आता मी खऱ्या अर्थानं वृद्धश्रमात सुखी आणि आनंदी आहे कारण मी आज स्वतंत्र भारताची स्वतंत्र नागरिक आहे. जर नव्वद वर्षाच्या आजीबाईंचे बोल असे असतील तर त्या नव्वद वर्षातील एक-एक दिवस काढणाऱ्या अनेक आजीबाईंची अवस्था काय असेल? ग्रामीण भागामध्ये सहज म्हंटल जात की, ‘’ज्याच्या पदरी पाप त्यानं व्हावं पोरीचा बाप’’ म्हणजे आजही मुलगा जन्माला आला की जल्लोष केला जातो आणि मुलगी जन्माला आली की माझं नशिबाच फुटकं असं म्हणून नशिबाला दोष दिला जातो. आजही आमचे बडेबुजुर्ग लोक नवविवाहित स्त्रीला आशीर्वाद देताना काय देतात ‘अष्टपुत्र सौभाग्यवती भव:’ परंतु असा आशीर्वाद त्या बिचारीच्या वाट्याला कधीच येत नाही की, ’अष्टपुत्री सौभाग्यवती भाव:’ म्हणजे एक वेलांटी स्त्रियांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन स्पष्ट करते. स्त्रयांच्या दुख:च वर्णन करताना संत बहिणाबाई म्हणतात की, लेकीचा जन्म घातला कुणी येड्यान पराया घरी बैल राबती भाडयान लेकीचा जन्म जसा बाभळीचा पाला वारा वावटळानी तसा वाहुनी नेला म्हणजे आजच्या स्त्रियांची अवस्था ही राबणाऱ्या बैलासारखी अन उडून जाणाऱ्या वाळलेल्या पानासारखी झाली आणि म्हणे... स्त्री सबलीकरण अन स्त्री संरक्षण!!! स्त्रियांना सबल करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘हिंदू कोड बिलाच्या’ माध्यमातून प्रयत्न केला होता; पण काही प्रस्थापित राज्यकर्त्यांच्या संकुचीतपणामुळे तो कायदाच पास होऊ शकला नाही. आणि आज स्त्री संरक्षणाचा आगडोंब माजवला जातोय. तो केवळ सहानुभूतीचा दिखावा करण्याचा प्रयत्न केला जातोय. असं माझं स्पष्ट मत आहे. कारण तसं जर नसत पूर्वी दिल्लीच्या निर्भया प्रकारणाचं पाणी वेगळ्या दिशेनं जावं यासाठी सचिनला एक दिवसीय क्रिकेट सामन्यात निवृत्ती घेण्यास भाग पाडलाच नसत. आज कित्येक आमदार, खासदार, राजकीय नेत्यांवर स्त्री अत्याचाराचे गुन्हे नोंद आहेत. दुर्दैव हे की अशा राजकीय पक्षाच्या नेत्यासुद्धा स्त्रियाच असताना आढळतात. दर २९ व्या मिनिटाला एका स्त्रीवर बलात्कार होतोय. त्याच काय? हे घाणेरड राजकारण पाहिल्यानंतर असं वाटत की आजच्या समाजाची अवस्था हि गांधीजींच्या माकडाप्रमाणे झाली आहे. स्त्रियांच्या किंकाळ्या जरूर ऐकू येतात; पण समाज न ऐकल्याप्रमांणे करतो... स्त्रियांच्या अत्याचाराला वाचा फोडता येत असतानासुद्धा मुक्याची भूमिका बजावतो हा समाज... आणि स्त्रियांचे अत्याचार डोळ्यांनी दिसत असतनासुद्धा आंधळ्याची भूमिका बजावतो हा समाज.... आणि म्हणे स्त्री सबलीकरण अन स्त्री संरक्षण!!! स्त्रियांच्या सबलीकरणासाठी शासनाने असंख्य योजना जाहीर केल्या; पण ह्या सर्व योजना माझ्यासाठी आहेत हि भावनाच इथल्या स्त्रियांच्यामध्ये निर्माण करू हे शासन. पूर्वी सरकारकडून आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या स्त्रियांना शिलाई मशीन पुरवलं जायचं; परंतु त्य शिलाई मशिनवर एखाद्या साडीचा पिको-फॉल केला तर त्याचे पैसे आपल्या पतीला दारू पिण्यासाठी द्यावे लागतात... आज असंख्य स्त्रियांसाठी अनेक रोग निदान शिबीराचा आयोजन केलं जात; पण ऐंशी टक्के स्त्रियांच्यामध्ये हिमोग्लोबिनचे कमीच आढळते. बलात्काराची प्रकरणे लवकरात लवकर निकालात काढण्यासाठी फास्ट ट्रेक न्यायालयाची मागणी केली जाते; पण आतापर्यंत किती प्रकाराने निकालात निघालीत. साधं स्त्रियांना जे महिला बचत गटातून कर्ज दिल जात, हे खरं आहे; परंतु माझ्या पत्नीने महिला बचत गटामध्ये सामील व्हाव की न व्हावं हे ठरविण्याचा अधिकार तिच्या पतीचा असतो. बलात्कार करणाऱ्या गुन्ह्र्गाराला फाशी देणे योग्य आहे का? असा प्रश्न विचारलाच तर मी त्याचं उत्तर ‘नाही’ असंच देईन. कारण त्याने ज्या स्त्रीवर बलात्कार केला आहे त्या स्त्रीला मारायलाही मागेपुढे पाहणार नाही. (जे कोपर्डी प्रकरणात झालंच) कारण त्याच्या गुन्ह्याचा एकमेव सबळ पुरावा असते ती म्हणजे स्त्री... मग तुम्ही म्हणाल याला पर्याय काय? तर पहिला पर्याय आहे. तो म्हणजे कैलीफोर्नियात व पोर्तुगालमध्ये वापरला जाणारा... गुन्हेगाराला ‘डेपो प्रोव्हेरा’ नावाचं इंजक्शन देवून त्याला कायमचाच नपुसकलिंगी करणे. आणि दुसरा पर्याय म्हणजे त्याला मरेपर्यंत जन्मठेप देणे. स्त्री सक्षमीकरणावर हवेत आश्वासाने आणि भाषणे देवून काही होणार नाही किंवा पुन्हा पुन्हा त्याच त्याच गोष्टीवर काथ्याकुट करून प्रत्यक्ष स्त्रियांवरचे अत्याचार थांबणार आहेत, असंही नाही. जोपर्यंत समाजाची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत स्त्रीविषयक कायद्यांची कठोर अंमलबजावणी केली पाहिजे. सोशल नेट्वर्किंग साईट्सवरून स्त्रियांच्या ताकदीच महत्त्व पटवून दिलं पाहिजे. आर्थिक उन्नतीच्या व शिक्षणाच्या माध्यमातून स्त्रियांना सक्षम करणे आणि सामाजिक क्षेत्रात स्त्रियांना जास्तीतजास्त सहभागी करून घेणे. ही जबाबदारी पुरुषांनी स्वीकारली तरी स्त्रिया सक्षम होण्यासाराख्या आहेत. कारण आपल्या भारताचा इतिहास आम्हाला सांगतो की, स्त्रियांच्या अत्याचाराला वाचा फोडणारे पहिले पुरुषच होते. अगदी राजा राममोहन रायपासून महात्मा जोतीबा फुल्यापर्यंत आणि महर्षी कार्व्यांपासून गोपाल गणेश आगरकरांच्यापर्यंत या सर्वांनी स्त्रियांच्या अस्तित्वासाठी लढा दिला. शेवटी अप्रत्यक्षपणे पारतंत्र्याच्या जोखडात जखडून ठेवलेल्या स्त्रियांबद्दल इतकंच म्हणेन की, अंधाराच्या फालाकावरती प्रकाशाचा वेध घ्या सामर्थ्याच्या शास्त्राला अस्मितेची धार द्या दास्यांच्या शृंखलांना विवेकाने काट द्या परंपरेच्या वेदनांना कंठामधून वाट द्या उद्याच्या स्त्रीला स्वातंत्र्याची भेट द्या

अर्जुन नलवडे

'स्पर्धा परीक्षा' : एक संसर्गजन्य रोग![संपादन]

प्रामाणिकपणे अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांचं खच्चीकरण व्हावं, असा या लेखाचा मुळीच उद्देश नाही; पण स्पर्धा परीक्षेचा बाजार मांडणार्‍या खासगी संस्था, व्यक्ती, अधिकारी आणि स्पर्धा परीक्षा पास झालेल्या उमेदवारांना या वास्तवाची जाणीव व्हावी आणि स्पर्धा परीक्षेच्या विश्‍वात नव्याने प्रवेश करू पाहणार्‍या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची दुसरीदेखील ही एक बाजू आहे, हे लक्षात यावं याचसाठी हा लेखन अट्टाहास... दुपारचे चार वाजले होते. जयकर ग्रंथालयातून बाहेर पडलो. तशी ही आमची चहा घेण्याचीच वेळ. समोरच असणार्‍या अनिकेत कॅटिंनचा रस्ता आम्ही चालू लागलो. माझ्यासोबत स्पर्धापरीक्षा करणारे (खरंतर दांडगा अनुभव असणारे) काही मित्र होते. चालताना गहण (हल्ली स्पर्धापरीक्षा करणार्‍या विद्यार्थ्यांच्या चर्चा म्हणजे गहण विषय असा एक गैरसमज झाला आहे) विषयाला सुरूवात झाली. तोपर्यंत टेबलावर चहा आलाच होता. चहा पिताच आमच्या या अनुभवी मित्रांना तरतरी आली. चहा पित पित नेट-सेट झालेले, सध्या पी.एच.डी चा अभ्यास करणारे आमचे एक मित्र म्हणाले, ‘‘जर तुम्हाला तुमच्या शत्रूचं वाटोळं करायचं असेल तर त्याच्या महाविद्यालयीन शिक्षण घेणार्‍या मुलाला विश्‍वासात घ्या. त्याला तुमच्या अँड्रॉइड मोबाईलवरून सा. फु. पुणे विद्यापीठाच्या वाय-फाय सुविधेवरून फुकट डाऊनलोड केलेल्या... स्पर्धापरीक्षा पास झालेल्या उमेदवारंची अन् अधिकार्‍यांची प्रेरणादायी (?) व्याखानांच्या चित्रफिती दाखवा. त्यानंतर त्याला वास्तव परिस्थितीचं आकलन न समजवता त्याला फक्त स्पर्धापरीक्षेचं अवास्तव महत्त्व पटवून द्या. थोडक्यात त्याचा ब्रेन वॉश करा. एकदा का तुम्ही हे केलं तर तो स्पर्धापरीक्षेच्या नादाला लागतो; मग आपल्या आयुष्याची आठ-दहा वर्षे त्यात खर्च करतो... झाला ना... तुमचा उद्देश साध्य!’’ माझ्यासोबत चहा पिणार्‍या मित्रांनी ते हसण्यावरी घेतलं; पण मी काही क्षणासाठी गंभीर झालो. थोड्या वेळापुरतं वाटलं की, खरंच स्पर्धापरीक्षा करणार्‍या विद्यार्थ्यांची वाटचाल ही अशाश्‍वत ध्येयाच्या दिशेने चालू आहे का? स्पर्धापरीक्षांच्या अभ्यासक्रमाची ठरलेली पुस्तकं जेवढ्या प्रमाणात विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणं गरजेचं आहे. तेवढ्या प्रमाणात ती पोहचत नाहीत. त्यापेक्षा जास्त प्रमाणात ग्रामीण आणि निमशहरी भागातील विद्यार्थ्यांपर्यंत स्पर्धापरीक्षा पास झालेल्या उमेदवारांची आणि अधिकार्‍यांची प्रेरणादायी (?) व्याख्यानं आणि महत्त्वाचं म्हणजे अधिकार पदावरून लोकसेवेच्या कार्याची सुरूवातच शून्य असताना आपल्या जीवनाचा प्रवास (स्पर्धापरीक्षा पास होईपर्यंतचा) किती खडतर होता, हे रंगवून सांगणारी अर्धवट चरित्रं पुस्तकांच्या रूपानं पोहचली. खाजगी क्लासेसवाल्यांनी तर नुसती भरच घातली नाही तर त्याची सुरूवातच करून दिली. मुळात जी माणसं स्पर्धापरीक्षा पासच होऊ शकली नाहीत (त्यांच्यावेळी एवढी जीवघेणी स्पर्धा नसताना सुद्धा) त्यांनी प्रेरणादायी पुस्तकं काढण्याचा सपाटाच लावला. आपल्याबरोबर अभ्यास करताना अधिकारी झालेल्या मित्रांच्या मुलाखती घेणे. त्या पुस्तकरूपानं छापणे. त्यातून जिद्द, चिकाटी, आत्मविश्‍वास, प्रयत्न, सातत्य, कष्ट, सहनशीलता, ध्येय हे शब्द केवळ अधिकारी होण्याकरिताच लागू होतात असा बडेजावपणा आणून विद्यार्थ्यांच्या आशा, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा इतक्या मोठ्या प्रमाणात फुगविल्या की, शिक्षण घेऊन सुशिक्षित बेकार होणार्‍या मुला-मुलींची लाट केवळ स्पर्धापरीक्षांकडेच वाहू लागली. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांतील (गडचिरोलीपासून ते सोलापूरपर्यंत आणि धुळे-नंदुरबारपासून धाराशीव -लातूरपर्यंत) पदवी घेणार्‍या आणि पदवी शिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश होतो.

आप्तस्वकियांची व नातलगांची शुद्ध फसवणूक[संपादन]

बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या अन् केवळ स्पर्धापरीक्षा करणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ही पुण्याच्या पेठांमध्ये हजारोंच्या घरात आहे. यामध्ये सामाजिक, राजकिय व आर्थिक सुबत्ता असणार्‍या उच्चविद्याविभूषीत पार्श्‍वभूमी असणार्‍या घरातून आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि कोणतीही सामाजिक, आर्थिक, राजकीय पार्श्‍वभूमी नसणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या यांच्या प्रचंड तफावत आढळते. गावाकडून येणार्‍या मुलांनी आपल्या आप्तस्वकियांना शिक्षणाचे कारण देऊन घर सोडलेले असते. ही मुले इथं आल्यानंतर आपलं मूळ शिक्षण बाजूला करून स्पर्धापरीक्षा अभ्यास सूरू करायला लागतात. शिक्षणाची ठराविक वर्षे संपून गेली तरी हा मुलगा काय करतोय? असा प्रश्‍न पालकांना पडतो. कारण पालकांना स्पर्धापरीक्षा करतोय हे बर्‍याचदा माहिती नसतं. स्पर्धापरीक्षेत दोन वर्षे झाली... तीन वर्षे झाली... पाच वर्षे झाली... दहा वर्षे झाली, तरी आपला मुलगा कोणतं शिक्षण घेतोय? हे प्रश्‍नचिन्ह त्यांच्यासमोर कायम उभं असतं. शेवटी नाइलाज म्हणून वैतागलेल्या भाषेत पालक सांगून टाकतात की, ‘‘आपल्याच्यानं तुला पैसे पुरवणं होणार नाही.’’ त्या मुलावर घरातील सदस्यांकडून, शेजार्‍यांकडून सतत विचारलं जातं की, ‘‘तुझ्या नोकरीचं वगेरे काय झालं? लागतीय की नाही कुठं?’’ असा विचारण्यामुळे, आजूबाजूची एक-दोन आपल्यासोबतची मुले स्पर्धापरीक्षा पास झाल्यामुळे, वाढत जाणार्‍या वयामुळे आणि स्पर्धापरीक्षेच्या वयोमर्यादेमुळे सतत तणाव वाढत जातो. अशी कितीतरी तणावग्रस्त विद्यार्थी आपल्याला पुण्याच्या सदाशिव पेठेमध्ये सापडतील. यामध्ये काही मुले असेही आहेत की, घरून महिन्याच्यामहिन्याला पैसे येत आहेत. त्यापैशांचा वापर चंगळवादासाठीसुद्धा ते करत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘कला’ शाखेच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना विचरलं असता. ते म्हणतात ‘‘फक्त नावाला एम्.ए ला प्रवेश घ्यायचा अन् एकदा का प्रवेश मिळला तर त्याचा फायदा घेऊन दोन वर्षे जयकर ग्रंथालयाचा वापर स्पर्धापरीक्षेच्या अभ्यासासाठी करायचा. एम्.ए कडे थोडसं दूर्लक्ष झालं तरी कोण विचारतं?’’ सुरूवातीला हे बोलताना त्याच्या चेहर्‍यावर निश्‍चिय दिसतो; पण कालांतराने जयकर ग्रंथालयामध्ये अभ्यास करताना एखाद्या मैत्रिणीशी गाठ पडते. ती ही स्पर्धापरीक्षा करणारीच असते. (दूधात साखर पडल्यासारखा अवस्था) हळुहळु एम्.ए कडे यांचं दूर्लक्ष झालेलं असतं. त्याचप्रमाणे स्पर्धापरीक्षेकडेही दूर्लक्ष व्हायला लागतं. यांच्या मित्रत्वाचे संबंध प्रेमाकडे झुकायला सुरूवात होते.परिणामी आई-वडीलांनी पाठवलेले पैशाची उधळपट्टी सुरू होते. ग्रंथालयामध्ये अभ्यास करायला तो आणि ती ठरलेल्या वेळात येतात. थोड्या वेळाने चहा-पाण्याची होते. या चहा-पाण्याक अर्धा तास जातो. पुढे तास-दोन तास वृत्तपत्र वाचण्यात घालवतात. तोपर्यंत बारा वाजत आलेले असतात. जेवणाची वेळ होते. दोघे सोबतच जेवायला बाहेर पडतात. एखाद्या झाडाखाली जेवायला बसतात. त्यात बोलत-बोलत दीड-दोन तास निघून जातो. पुन्हा अभ्यासाला ग्रंथालयात. मग स्पर्धापरीक्षेचा ढीग समोर ठेवून थोडसं वाचनात लक्ष... थोडसं मोबाईलवरील व्हॉट्सऍपवर आलेल्या गुलाबी मेसेजवर लक्ष. अशातच चार वाजतात. पुन्हा चहा-पाण्याची वेळ. पुन्हा तास-अर्धा तास. असे करत करत येणार्‍या प्रत्येक दिवसातले पाच-सहा तास अभ्यासाच्या नावाखाली टंगळ-मंगळ करण्यातच घालवतात. मग रविवार येतो. अभ्यासातून विश्रांती म्हणून यांचे हे सुट्टीचे दिवस. या सुट्टीच्या दिवशी नवीन आलेले सिनेमे पहायचे, पुण्यातील प्रेक्षणीय स्थळे पहायची. (पुन्हा-पुन्हा पहायची) पालकांनी पाठवलेल्या पैशाची अशी उधळपट्टी करायची. पुण्यातून फिरून आल्यानंतर मग एखाद्या ठिकाणी म्हणजेच सारसबाग, झेड ब्रीज यासारख्या ठिकाणी प्रेमाच्या गुलाबी गप्पा रंगवत बसायचे. यातून समाधान नाही झालं तर सा. फु. पुणे विद्यापीठाच्या घनदाट झाडीमध्ये प्रेमाचे (?) अश्‍लिल चाळे करत बसायचे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुले आघडीवर आहेत असं अजिबात नाही तर मुलीदेखील मुलांच्या खांद्याला खांदा लावून पुढाकार घेतात. सुरूवातीला एम्.ए कडे दूर्लक्ष... मित्रत्वाचे प्रेमात रूपांतर... नंतर अभ्यासाकडे... त्यानंतर स्पर्धापरीक्षेच्या अभ्यासाकडे... नंतर पैशाचा अपव्यय... नंतर वेळेचा अपव्यय... प्रेमाचे अश्‍लिल चाळ्यात रूपांतर... त्यानंतर मग वेळ उरलाच तर पुन्हा स्पर्धापरीक्षेचा अभ्यास... असा दुष्टचक्रात विद्यार्थ्यांचा अनिश्‍चित ध्येयाच्या दिशेने प्रवास सुरू आहे. या विद्यार्थ्यांना आपण (काही अपवाद वगळता) आप्तस्वकीयांची आणि नातलगांची फसवणूक करत आहोत. याची जाणीव का होत नाही.

स्वप्नं विकणारी दुकानं'''

मी आठवीत होतो. त्यावेळा कोल्हापूरातून एक विद्यार्थी आयएएसची परीक्षा पास झाला होता. त्याचं उदाहरण आमचे शिक्षक वर्गात देत असत. या घटनेला सहा-सात वर्षे उलटून गेला असावीत. तरीसुद्धा त्याचा फोटो आजही स्पर्धापरीक्षेतील आघाडीवर असणारे क्लासेसवाले जाहिरातीत दाखवून विद्यार्थ्यांचा दिशाभूल करत आहेत. त्यांच्या त्या जाहिरातीत स्पर्धापरीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या फोटोंचा संख्या इतकी मोठा असते की, जणू काही दरवर्षी क्लासेसमधून इतके विद्यार्थी पास होत आहेत; परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. ह्याच जाहिरातीला पाहून विद्यार्थी फसतो. हे क्लासेसवाले सुरूवातीला ’प्रवेश विनामूल्य’ या बॅनरखाली व्याख्याने भरवतात. त्यातून स्पर्धापरीक्षेच्या क्लासेसची गरज कशी आहे... आम्ही मार्गदर्शक म्हणून कशी भूमीका बजावतो... आमच्या क्लासेस-ऍकॅडमीमधून आत्तापर्यंत किती आयएएस, आयपीएस आणि आयएफएस झाली यांची रसभरीत वर्णनं सांगितली जातात. अप्रत्यक्षपणे ‘क्लासेस स्पर्धापरीक्षा करण्याकरता किती गरजेचे आहे.’ हे विद्यार्थ्यांच्या मनावर पुन्हा-पुन्हा बिंबवले जातं. पुण्यात आघाडीवर असणार्‍या ऍकॅडमी-क्लासेस यांच्या प्रवेश शुल्क पाहता अन् त्यांचं गणित मांडता डोळे विस्फारले जातील. अशी स्थिती आहे. यामध्ये साधारणपणे एका विद्यार्थ्याकडून ’एमपीएससी’साठी साठ-सत्तर हजार आणि ’युपीएससी’साठी ऐंशी-पंच्च्यानव हजार वसूल केले जातात. अशी एका बॅचमध्ये किमान शंभर मुले असतात. अशा दिवसाच्या चार-पाच बॅच असतात. एमपीएससीचा विचार केला तर साठ हजार गुणीले चारशे आणि युपीएससीचा विचार केला तर ऐंशी हजार गुणीले चारशे... असं जर गणित मांडलं तर आश्‍चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. या बॅचेसचा कालावधी साधारणपणे तीन महिने, सहा महिने आणि एक वर्ष असतो. हे ऍकॅडमीवाले-क्लासेसवाले फक्त क्लास घेऊन थांबत नाहीत तर स्वत:चीच ‘प्रकाशन’ संस्था निर्माण करून पुस्तके प्रकाशित करत आहेत. जो क्लास लावेल त्या विद्यार्थ्याला पन्नास टक्के सवलतीत ही स्पर्धापरीक्षेची पुस्तके दिली जातात. या क्लासेसवाल्यांच्या ऍडमिशन फिज् आर्थिक परिस्थिती नसतानाही पालक कर्ज काढून भरतात. ही वस्तुस्थिती आहे. अन् इतके पैसे भरून, क्लासेस करून स्पर्धापरीक्षा विद्यार्थी पास होतात हा निव्वळ गैरसमज आहे. या क्लासेसवाल्यांच्या जाहिराती क्लासेसच्या वैशिष्ट्यांमध्ये एक वैशिष्ट्य ठळकपणे दिलं जातं की, ‘तज्ज्ञांचे विशेष मार्गदर्शन’ पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळी असते. पूर्वीच्या बॅचमधील एखादा विध्यार्थी जो स्पर्धापरीक्षा पास झालेला नाही किंवा स्पर्धापरीक्षेची तयारी करतोय अशा विद्यार्थ्यालाच किमान वेतनावरती लेक्चर घ्यायला लावतात. इतकं सगळं करूनसुद्धा विद्यार्थ्यांना सांगतात काय? ‘‘आम्ही फक्त दिशा दाखवण्याचं काम करतोय, यश मिळेलच याची शाश्‍वती देत नाही’’ हे महत्त्वाचं वाक्य वापरून, पैसे घेऊन जबाबदारी डावल्याचे स्पष्ट दिसून येते. विद्यार्थ्यांना लाल दिव्याच्या गाडीची स्वप्नं दाखवून, जाहिरातीत त्यांची दिशाभूल करून, पाठांतराचा अस्सल नमुना असणार्‍या अधिकार्‍यांची व स्पर्धापरीक्षा पास झालेल्या उमेदवारांची भाषणं (प्रेरणादायी व्याख्यानं बरं का) घडवून आणून स्पर्धापरीक्षेच्या नावाखाली कोट्यवधी रूपये ऍकॅडमीवाले-क्लासेसवाले कमावत आहेत. याकडे आपलं लक्ष जाणार आहे का?

सुप्त कला-कौशल्यांची हत्याच! स्पर्धापरीक्षा करणारे विद्यार्थी हे वेगवेगळ्या शाखेतून आलेले असतात. यामध्ये ‘शास्त्र’ शाखेचे विद्यार्थी युपीएससी किंवा एमपीएससीसाठी प्रयत्न करताना दिसतात.(एमबीबीएस, बीएचएमएस, एमडी, बीई, एमई, एमटेक, बीटेक) यामधील हुशार विद्यार्थी स्पर्धापरीक्षा करण्याच्या फंदात पडतात. यांच्या या शाखीय शिक्षणाचा समाजाला प्रत्यक्ष फायदा होणार असतो; परंतु अधिकारी पदावरून आपल्याला प्रशासकीय व्यवस्थेत जाऊन व्यापक स्वरूपाचं काम करता येईल या निर्बुद्ध आशेनं स्वत:च्या अंगभूत कला-कौशल्याची हत्याच केली जाते. ‘वाणिज्य आणि शेतकी’ शाखेतील विद्यार्थी हे बँकिंगच्या स्पर्धापरीक्षा देत असतात. वास्तविक पहाता शेतकी पदवी घेणारा विद्यार्थी शेती क्षेत्रात भरीव योगदान देईल किंवा विविध बदल घडवून आणेल अशी अपेक्षा असते; परंतु हे विद्यार्थी स्पर्धापरीक्षेच्या नादाला लागतात आणि आपल्या आयुष्याची उमेदीची वर्षे यात खर्च करतात. त्यानंतर ‘कला’ शाखेतील विद्यार्थ्यांचा विचार केला तर ह्या स्पर्धापरीक्षा ‘पोरांचं भविष्य नष्ट करण्याच्या उद्देशानंच निर्माण झाल्यात की काय?’ अशी एक भीती वाटते. खरंतर एकाच आखाड्यात बी.ई करणारा हुशार विद्यार्थी आणि त्याच आखाड्यात बी.एची परीक्षा ‘एटीकेटी’ने पास होणारा विद्यार्थी यांची बौद्धिक कुस्ती लावली जाते. साहजिकच विजय ठरलेला असतो. कला शाखेच्या विद्यार्थ्यांमध्ये अंगभूत कला असतात. कोण उत्तम कवी असतो. कोण उत्तम गायक असतो. कोण उत्तम चित्रकार असतो. कोण उत्तम लेखक असतो. कोण उत्तम वक्ता असतो तर कोण उत्तम खेळाडू असतो. अशा विविधांगी कलांनी गच्च भरलेली मुलं आपापल्या क्षेत्रात नावारूपाला येणारी असतात; परंतु स्पर्धापरीक्षेच्या नादाला लागून या मुलांनी स्वत:च्या कलेची एक प्रकारची हत्याच केलेली असते. याला पालक देखील काही प्रमाणात कारणीभूत आहेत. स्पर्धापरीक्षेचा झालेला प्रचार अन् प्रसार यामुळे अंगभूत कलेची हत्या करून प्रत्येक विद्यार्थी (स्पर्धापरीक्षा करणाराच) हा माझ्या शेजारचा, माझ्या सोबतचा मुलगा किंवा मुलगी स्पर्धापरीक्षा करते म्हणून मीही स्पर्धापरीक्षा करते किंवा करतो. हे चारचौघात मान्य करायला कोणी तयार नसतं. हे वास्तव आहे. आणि म्हणून एकाकडे पाहून दुसरा... दुसर्‍याकडे पाहून तिसरा अन् तिसर्‍याकडे पाहून चौथा स्पर्धापरीक्षा करत सुटतो. याचा परिणाम म्हणून विद्यार्थी ‘स्पर्धापरीक्षाग्रस्त’ व्हायला लागतात. त्यातून मग स्पर्धापरीक्षा-एक संसर्गजन्य रोग आहे हे सिद्ध व्हायला लागते. हा रोग झपाट्याने वाढत आहे. या रोगावर नियंत्रण मिळवण्यापेक्षा हा रोग वाढेल कसा... या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत किंवा तशाप्रकारचं अनुकूल वातावरण निर्माण केलं गेलं आहे.

पुण्याची ओळख ‘स्पर्धापरीक्षे’च्या गर्तेतच पुण्याच्या विविध पेठांमध्ये बारकाईने पाहिले असता, एक बाब जाणीवपूर्वक लक्षात येते की, ज्याप्रमाणे दर पन्नास मीटर अंतरावर एक मंदिर आहे अगदी त्याचप्रमाणे दर शंभर मीटर अंतरावर स्पर्धापरीक्षेची केंद्रं आणि अभ्यासिकासुद्धा आहेत. या अभ्यासिकांमध्ये हजारो विद्यार्थी स्पर्धापरीक्षांमध्ये आपलं नशिब अजमावत आहेत. पुण्याच्या सास्कृतिक ओळखीमध्ये पुण्यातील प्रशस्त ग्रंथालये आणि विविध प्रकारची पुस्तकं मिळणारा अप्पा बळवंत चौक (एबीसी) ही महत्त्वाची भूमिका बजावत होती; पण आज पुण्यातील ग्रंथालये आणि अप्पा बळवंत चौक हा फक्त स्पर्धापरीक्षेच्या संदर्भातच ओळखला जातोय. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये पुण्यातील साहित्य विश्‍व हे नेहमीच आघाडीवर राहिलेले आहे. आणि दरवर्षी होणार्‍या अखिल भारतीय आणि अखिल विश्‍व साहित्य संमेलनामध्ये पुण्याची भूमिका ही महत्त्वाची असते. परंतु अशा प्रकारची साहित्य संमेलने ही जशी जातीची, धर्माची, विचारसरणीची सुद्धा होऊ लागली. त्यामध्ये आणखी एकाची भर पडली. ती म्हणजे ‘स्पर्धापरीक्षा साहित्य संमेलना’ची. पूर्वी आमच्या गल्लीत लताबाई कांबळे नावाची बाई होती. तिला आम्ही माई म्हणायचो. कारण तिचा मुलगा आमच्यासोबत क्रिकेट खेळायला यायचा. ही माई ‘मटका’ खेळण्यात आणि सांगण्यात (मटक्याचा आकडा) तरबेज होती. आमच्या गल्लीतले पेंटर, गवंडी, खोद कामगार, बिगारी इतकंच काय... लॉंड्रीवाला, समोरच असणार्‍या हॉटेलमधला वेटरसुद्धा मटक्याचा आकडा विचारायला माईकडे यायचा. ही माई त्याला आकडा सांगायची. याठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की, माई पूर्ण अशिक्षित होती आणि देशी दारूच्या नशेत या लोकांना आकडा सांगायची. सायंकाळी पाचच्या दरम्यान त्याचा निकाल लागायचा. तेव्हा हे सारे लोक आपण लावलेल्या आकड्याचा निकाल पहायला गर्दी करायचे. प्रत्येकाच्या चेहर्‍यावरती ‘माझाच आकडा लागेल’ असा भाव असायचा. त्या गर्दीतल्या लोकांमध्ये एखाद-दुसर्‍याला तो आकडा लागायचा. बाकी सर्वांचा अपेक्षाभंग झालेला असायचा; पण त्या फळ्यावर लिहिलेल्या आकड्याकडे पाहून अपेक्षाभंग झालेला प्रत्येकजण चुकचुकायचा की, ‘‘जरासं चुकलं रे , एक अंक पुढं सरकला असता तर पैसा माझाच होता’’ या कथेमध्ये घटना फिरवली आणि पात्रं बदलली तर वास्तव आपल्या लक्षात येईल की, मटकाकिंगची भूमिका स्पर्धापरीक्षा घेणारं आपलं शासन, माईची भूमिका हे क्लासेसवाले व ऍकॅडमीवाले तर आकडा लावणार्‍या माणसांची भूमिका ही स्पर्धापरीक्षेचे विद्यार्थी पार पाडत आहेत. फरक इतकाच की मटका लावणार्‍या लोकांचं मेरीटलिस्ट काळ्या फळ्यावर लिहिलेलं असायचं आणि स्पर्धापरीक्षा करणार्‍या विद्यार्थ्यांचं मेरीटलिस्ट हे इंटरनेटच्या ऑनलाईन पडद्यावर टाकलं जातंय.

अर्धवट जीवनाची अर्धवट चरित्रं...[संपादन]

मुळात एखादं पुस्तक वाचताना (कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र) त्या पुस्तकातील नायकाच्या जागी वाचक स्वत:ला ठेवतो. आणि मग त्या नायकाच्या जीवनात घडणार्‍या घटना, त्याचा तो खडतर प्रवास याचा वाचक स्वत:च्या जीवनात घडणार्‍या घटना... स्वत:चा खडतर प्रवास यांची तुलना करायला लागतो. अशा पुस्तकांत वाचक हा नायक आणि स्वत: यामध्ये जास्तीत-जास्त साम्य शोधण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये बर्‍याच वेळेला वाचक यशस्वी होतो अन् काही वेळेला तो अयशस्वी होतो. ज्यावेळी तो अयशस्वी होतो. त्यावेळी तो जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. इथंच वाचक फसतो. अशी फसवणूक... स्पर्धापरीक्षा पास झालेल्या उमेदवारांची आणि अधिकार्‍यांची ‘अर्धवट’ चरित्रात्मक जी पुस्तकं निघाली त्यातून सर्रासपणे झालेली दिसेल. मी अशा पुस्तकांना ‘अर्धवट जीवनाची अर्धवट चरित्रं’ असं म्हणतो. कारण अशा चरित्राचे नायक किंवा लेखक हे आपल्या कार्यकर्तृत्वाची सुरूवात ज्याठिकाणी होणार असते.त्याठिकाणापर्यंतचा आपला जीवनप्रवास त्यांनी मांडलेला असतो. सामान्य वाचक म्हणून आमची अपेक्षा अशी असते की, जिथं तुमच्या कार्यकर्तृत्वाचा आरंभ झाला तिथून पुढचा प्रवास मांडणं गरजेचं आहे. थोडक्यात अधिकार पद मिळाल्यानंतर त्या अधिकार पदाचा वापर करून समाजाच्या भल्यासाठी तुम्ही किती झगडलात आणि त्यामध्ये किती यश मिळवलंत हे सांगणं तुमच्या चरित्रात अपेक्षित असतं. ही खरी प्रेरणा असू शकते. पण दुर्दैवानं ही उणीव स्पर्धापरीक्षा पास झालेल्या उमेदवारांच्या आणि अधिकार्‍यांच्या अर्धवट चरित्रात आढळते. (याला काही अपवाद आहेत) दुसरी बाब अशी की, हे लिखाण ‘वाचक’ डोळ्यासमोर ठेवून केलेलं लिखाण आहे. ज्यावेळी असा वाचक डोळ्यासमोर असतो. त्यावेळी आर्थिक गणितं ही मांडलेली असतात. अशावेळी एखादी घटना, प्रसंग रंगवून किंवा अतिशयोक्ती करून सांगण्याचा निश्‍चित प्रयत्न होतो. साहित्याच्या इतर प्रकारामध्ये ते शक्य आहे; परंतु चरित्र आणि आत्मचरित्र यामध्ये ते शक्य नाही. (आणि ते शक्य करण्याचा कोणी प्रयत्नही करू नये) या बोरूबहाद्दरांनी ते शक्य करून दाखवलं. या सर्वाचा परिणाम असा झाला की, स्पर्धापरीक्षेच्या अभ्यासक्रमाची पुस्तकं वाचण्यापेक्षा ही ‘अर्धवट जीवनाची अर्धवट चरित्रं’ जास्त प्रमाणात वाचली जाऊ लागली. याचा परिणाम म्हणून स्पर्धापरीक्षेचं कारण देऊन महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधून स्थलांतर करणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या साहजिकच वाढू लागली. हे स्पष्ट दिसणारं वास्तव आहे. खरंतर स्पर्धापरीक्षेच्या विश्‍वात उतरल्यानंतर दोन महिन्यातच ‘मी पास होईल की नाही... हा अभ्यासक्रम मला झेपेल की नाही’ अशा प्रश्‍नांची उत्तरं प्राथमिक पातळीवर अंतर्मनात मिळतात. थोडक्यात आपली पात्रता आणि मर्यादा प्रत्येकाने ओळखलेली असते. तरीसुद्धा विद्यार्थी स्पर्धापरीक्षेच्या संसर्गजन्य रोगाला बळी पडतात आणि अशाश्‍वत ध्येयाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू होते. या वाटचालीत शे-पाचशेच्या जागांसाठी लाखो अर्ज येतात. ‘जागा कमी अन् जीवघेणी स्पर्धा जास्त’ अशी स्थिती होते. सतत भासणारी आर्थिक चणचण, वाढते वय, घरची जबाबदारी, सामाजिक तणाव, यशाची अजिबात खात्री नाही, सततच्या अपयशामुळे येणारे नैराश्य, गावाकडची दुष्काळी परिस्थिती, स्वत:ची घुसमट, कमी दर्जाची कामं करण्याची नसलेली मानसिकता, मुलींच्या बाबतीत घरातून लग्नासाठी होत असलेली घाई... त्यातून मुलींचा वाढत जाणारा तणाव या सर्व ‘नकारात्मक बाजू’ ह्या स्पर्धापरीक्षेच्या क्लासेसवाल्यांनी निर्माण केलेल्या वातावरणातून जन्म घेतात. विद्यार्थी आणि पालक सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे बर्‍याचदा निराशा पदरात पडते.

स्वप्न हीच स्पर्धा ‘स्वप्ने पहा, स्वप्ने जगा’ हे ऐकायला खूप चांगलं वाटतं; पण एकच स्वप्न लाखो जणांनी पाहिलं आणि त्या स्वप्नांची वाटचाल एकाच मार्गावर सुरू झाली तर ती स्वप्न... स्वप्नच रहात नाहीत. तर ती एक स्पर्धा होते. खरंतर ती एक जीवघेणी स्पर्धा होते. त्यात काहीजणांचा जीवानीशी बळी जातो, काहीजण स्वप्न भंगली असली तरी त्या स्वप्नातून बाहेर पडत नाहीत. अशा परिस्थितीत ती मुलं स्वप्नंच जगायला लागतात, स्वप्नातच वावरायला लागतात. वास्तव परिस्थितीचं भान न ठेवता एखाद्या संमोहित झालेल्या रूग्णासारखं. अशा स्वप्नांना (खरंतर स्पर्धापरीक्षेच्या वातावरणाला) आहारी गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या काही कमी नाही. त्याचा टक्का आज कमी वाटत असेलसुद्धा; पण भविष्यात ती वाढणार नाहीत... असंही नाही. काही वर्षापूर्वी पुणे जिल्ह्यातील दोन विद्यार्थी ‘आपण स्पर्धापरीक्षा पास होऊन अधिकारी झालो’ असं सांगत आपल्या आप्तस्वकियांची, समाजाची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वत:ची फसवणूक करत राहिले आणि दुसर्‍याचीही. त्यातील पहिला श्रीकांत पवार आणि दुसरा हनुमंत खाडे. यांच्या या कृत्यामागे अधिकारी होण्याची स्वप्नं, मिळणारी सामाजिक प्रतिष्ठा, तो मानसन्मान, जागोजागी होणारा सत्कार, व्याख्यानांसाठी येणारी आमंत्रणं आणि समाजात निर्माण होणारा दरारा ही कारणं होती. अशावेळी अक्षय कुमारचा ‘स्पेशल 26’ या चित्रपटाची आठवण होते. कारण ‘चोर होऊन चोर्‍या करणं तसं अवघड काम... पण अधिकारी होऊन चोर्‍या करणं तसं सोपं काम’ हे स्पष्ट आहे. असो! दोष या बोगस अधिकार्‍यांचा, स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करणार्‍या मुलांचा असेलही; परंतु त्याहूनही जास्त दोष स्पर्धापरीक्षेचं कृत्रिम वातावरण तयार करणार्‍या खाजगी क्लासेस आणि ऍकॅडमीवाल्यांचाही आहे. हे देखील आपल्याला नाकारता येणार नाही. परवाच सा. फु. पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या आवारात असणार्‍या बाकावर बसलो होतो. त्या बाकावरून समोरच दिसणार्‍या त्या वडाच्या झाडाला एकटक पहात राहिलो. मागील वर्षी घडलेला तो प्रसंग डोळ्यासमोरून जाता जात नव्हता. मी अस्वस्थ व्हायला लागलो. काय होता तो प्रसंग? तर अर्थशास्त्रामध्ये दोन वर्षापूर्वी एमए झालेला, हुशार असलेला, स्पर्धापरीक्षेची तयारी करणारा बालाजी मुंडे नावाच्या विद्यार्थ्याने त्याच वडाच्या झाडाला फास लावून आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी काही मिनिटं, काही तास, काही दिवस काय विचार केला असेल त्यानं? काय प्रश्‍न असतील त्याच्यासमोर? त्या पडणार्‍या प्रश्‍नांची उत्तरं मिळणारच नव्हती, का त्याला? इतरांच्या अपेक्षांच ओझं घेऊन तो जगत होता का? का स्वप्नंच अशक्यप्राय होती त्याला? काय झालं असेल त्या रात्री? या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरं मिळणारी होती, नक्कीच होती. परंतु पाहिलेलं स्वप्न आपण जगूच शकत नाही! असं वाटल्यावर! (तिथंच त्याच्या विचारशक्तीनं स्वहत्या केली होती) त्यानं आत्महत्येसारखा सोपा पर्याय निवडला. एक बालाजी स्वत:ला संपवून गेला... पण याची सुरूवात तर त्यानं करून दिली नाही... ना!!

- अर्जुन नलवडे, पाटण ७३८५६११३५३

तरूण अनिश्‍चित ध्येयाच्या व अस्थिरतेच्या खड्ड्यात ढकलला जातोय[संपादन]

हल्ली कोणीही उठतंय अन् म्हणतंय की भारत हा तरूणांचा देश आहे. त्याच देशातील तरूणांची अवस्था काय आहे? तो तरूण नक्की काय करतोय? कशा अवस्थेत जगतोय? याकडे मात्र सोईस्करपणे दूर्लक्ष केलं जातंय. बहुढंगी व बहुरूपी संघटनाकर्ते तरूणांच्या अल्लडपणाचा फायदा घेऊन स्वत:ची विचारसरणी बिंबवण्यात मश्गूल आहेत... कल्याणकारी राज्याची जबाबदारी घेतलेल्या राज्यकर्त्यांनी तर आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी विविध अमिषं दाखवून तरूणांचा वापर करण्याचा सपाटाच लावलाय... त्यात भर म्हणून नव्याने अधिकारी झालेल्या अन् असलेल्या अधिकार्‍यांनी स्वत:ची प्रसिद्धी करत प्रचंड क्रयशक्ती असणार्‍या तरूणांना चार भिंतीच्या चौकटीत (अभ्यासिकेत) स्पर्धा परीक्षेचा जुगार खेळण्यास अप्रत्यक्षपणे भाग पाडलंय... त्यामध्ये स्पर्धा परीक्षेचा अड्डा (क्लासेस-अ‍ॅकॅडमी) चालवणारे गब्बर बनत चाललेत, हे उघड्या डोळ्यांना दिसणारं धडधडीत वास्तव आहे. या सर्वांच्या मुळाशी एकच कारण आहे ते म्हणजे बेरोजगारी! केंद्रिय मंत्री राजीव प्रताप रूडी यांनी अभियांत्रिकी शाखेततील विद्यार्थी टंचाई हा मुद्दा अधोरेखित केला. केवळ याच शाखेत हा प्रश्‍न आहे का? तर नाही. अध्यापक शाखेतसुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाल्यामुळे खासगी आणि सरकारी अध्यापक महाविद्यालये ओस पडलेली दिसतात. अशीच परिस्थिती फार्मसी व शेतकी शाखेची होण्याच्या मार्गावर आहे. इतकंच काय... तर शासनाच्या जिल्हा परिषदेच्या शाळासुद्धा विद्यार्थी टंचाईमुळेच कमी-जास्त बंद पडल्या आहेत. याचं मु‘य कारण, राज्यकर्त्यांच्यातून निर्माण झालेले शिक्षणसम्राट! यामध्ये देशात काँग्रेस आणि राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता तर सर्वच राजकीय पक्ष शिक्षणाचा धंदा करण्यात आघाडीवर आहेत. दरवर्षी 19 लाख अभियांत्रिकीचे विद्यार्थी रोजगाराच्या बाजारात उतरत असतील तर असा कित्येक शाखेचे कित्येक विद्यार्थी 'जास्तिच्या पुरवठ्या'मध्ये सामील होत असतील याची कल्पनाच केलेली बरी!

आज भारतात दिल्ली आणि महाराष्ट्रात पुणे ही स्पर्धा परीक्षेसाठी नावारूपाला आलेली शहरे. स्पर्धा परीक्षेच्या मैदानात बहुतांशी विद्यार्थी हे अभियांत्रिकीचे शाखेचे असताना दिसतात. कारण लोकसेवा आयोगाचा सी-सॅटसारखा अवघड पेपर हा अभियांत्रिकीची पार्श्‍वभूमी असणार्‍या विद्यार्थांना सोपा जातो, असा विद्यार्थ्यांचा समज आहे. शेतकी शाखेचे विद्यार्थी बँकिंगच्या स्पर्धा परीक्षेकडे वळतात कारण शेतकी शाखेचा अभ्यासक्रम बँकिंगसाठी जास्त गुण देणारा ठरतो, असा या विद्यार्थ्यांचा समज आहे. पद्युत्तोर विद्यार्थ्यांना अध्यापक व्हायचं असेल तर अध्यापक महाविद्यालयात न जाता एका खोलीत स्पर्धा परीक्षेच्या माध्यामातून नेट-सेट चा अभ्यास करून प्राध्यापक होता येतं, भले विद्यार्थ्यांना शिकवण्याचं कसब नसले तरी चालेल. प्रत्यक्ष कार्यानुभवाची अनिवार्यताच यांच्याकडे नाही. वरील सर्व शाखेचे विद्यार्थी पालकांच्या आणि शासनाच्या पैशावर शिक्षण घेत असतात आणि आता हे शिक्षण घेऊन करतात काय ? तर... शिक्षणाची तयारी! मग हे शिक्षण अधिकारी होण्याकरिताच घेतलं होतं का? असा प्रश्‍न निर्माण होतो. 'अधिकारी होणं चांगली गोष्ट आहे; पण सरसकट सर्वच तरूणांनी अधिकारी होणं , ही गोष्ट बुद्धीला पटण्यासारखी नाहीय.' आपण जे शिक्षण घेतलं त्याचा देशाच्या विकासासाठी कितपत उपयोग होणार आहे? हा प्रश्‍न आताच्या तरूणांनी स्वत:ला विचारावा.

अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालेल्या यंत्रयुगात किमान मनुष्यबळाचा वापर करून यंत्राच्या आधारे कमाल नफा मिळवणे हा येथील खासगी उद्योगांचा उद्देश आहे. हेच कारण बेरोजगारीच्या मुळाशी आहे, ही बाब चौफेर अभ्यास करणार्‍या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याच्या लक्षात येत नाही का? आली तरी तो त्याच्याकडे दूर्लक्ष का करतो? दुसरीकडे कौशल्य शिक्षण प्राप्त विद्यार्थी लाखोंच्या संख्येने बाजारात दाखल झाले. याचा फायदा प्रभावी जाहिरात करून क्लासेस-अ‍ॅकॅडमी यांनी घेतला. ह्या जाहिरातीला भुलून विद्यार्थ्यांचा आशावाद आणखी वाढला. म्हणजे बेकार झालेल्या विद्यार्थ्यांची लाट स्पर्धा परीक्षेच्या भिंतीवर आदळली. यातूनच जन्म झाला तो 'स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या मोर्चांचा' त्यांच्या मोर्चेचं प्राथमिक उद्देश हा आपल्या मागण्या शांततेच्या मार्गाने निवेदनाद्वारे शासनाकडे मांडायच्या. पण तसं अजिबात झाले नाही. कारण मोर्चेमध्ये... वर्तमानपत्रात छापून आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या फोटोला आपल्या पेनमधील शाई फासणे, जय भवानी जय शिवाजी... शासनाचे खाली मुंडकं वर पाय... लडेंगे भाई लडेंगे... भारत माता की... यासार‘या असंबंध घोषणा देणे, आता शांततेत आलोय याची दखल शासनाची दखल घेतली नाहीतर पुढच्यावेळी हिंसा केल्याशिवाय राहणार नाही. अशाप्रकारच्या चर्चा मोर्चांमध्ये होत होत्या. भविष्यात अधिकारी होण्याची स्वप्न पाहणार्‍या विद्यार्थ्यांची चळवळ अशाप्रकारची असेल तर हे विद्यार्थी सक्षम अधिकारी होण्यास लायक आहेत का? खरंतर अगोदरच आपल्या आयुष्यातील उमेदीची पाच-दहा वर्षे यामध्ये वाया घालवलेली असतात त्यामुळे हे विद्यार्थी 'स्पर्धापरीक्षाग्रस्त' झालेले आढळतात. आजही हे विद्यार्थी तणावपूर्ण मनस्थितीतच वावरत आहेत.

सरकारी नोकरभरतीचा निर्णय घेण्यापेक्षा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्‍या उमेदवारांचं वय वाढवून देणं हे अधिक सोपं म्हणून शासनाने जो ’वय’वाढीचा निर्णय घेतला तो चुकीचा आहे. कारण संपूर्ण वयोमर्यादा संपेपर्यंत उमेदवार तयारीच करतोय. परिणामी अनिश्‍चित ध्येयासाठी तारूण्यातील उमेदीची वर्षे यात खर्च करून बसता आहेत. दुसरा निर्णय आहे तो माध्यमिक शाळेत 'स्पर्धा परीक्षा केंद्र' उभे करण्याचा... हा तर शासनाच्या निर्बुद्धतेचा कळसच आहे. अगोदरच खासगी क्लासेसवाल्यांनी यामध्ये कहर केलाय... त्यात ही भर! या विद्यार्थ्यांच्या आंदोलनापाठीमागे क्लासेसवाले, काही राजकीय पक्ष, आणि संघटना कार्यकर्ते (जे स्पर्धा परीक्षा कमी आणि संघटनेचं काम जास्त करतात) असताना दिसतात. येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तरूणांची मते आकर्षित करण्यासाठी स्थानिक नेत्यांनी आपल्या वार्डमध्ये मोफत वाय-फाय सुविधा, अभ्यासिका आणि स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांची ग्रंथालये उभारण्याचा प्रयत्न चालवलाय. आपला पाल्य अधिकारी होऊन करणार काय? हा प्रश्‍न पालकांना विचारला तर म्हणतात की 'एकदा का आपलं पोरं सायब झालं तर खोर्‍यानं पैसा वढंल आन हुंडाबी चांगला मिळंल. एकीकडे ही पालकांची मानसिकता तर दुसरीकडे समाजात मानसन्मान, प्रतिष्ठा आणि शासनाच्या सुविधा मिळतील, ही विद्यार्थी यांची मानसिकता... परंतु यावर उघड चर्चा होताना दिसत नाही. चर्चा या गोष्टीवर होते की समाज विकासासाठी सक्षम अधिकार्‍यांची गरज आहे. हे काही प्रमाणात खरे असेलही ; पण स्पर्धा परिक्षेतून अधिकारी होणं हे आजच्या तरूणांच ध्येय असू शकत नाही. हेदेखील तितकंच खरं आहे. अशावेळी सोईस्करपणे तरूणांची बेकारी अन् त्यांची उदासिनता यावर मात्र 'हाताची घडी, तोंडावर बोट' अशी भूमीका घेतली जाते. याला जबाबदार कोण? तर शासनव्यवस्था आहेच; परंतु स्पर्धा परीक्षेचं अनाठायी महत्त्व वाढवणार्‍या अधिकार्‍यांची भाषणं आणि स्वप्नं विकत देणारे आणि विद्यार्थ्यांच्या पैशावर कोट्यवधी रूपयांची उलाढाल करणारे खासगी क्लासेस-अ‍ॅकॅडमीवालेसुद्धा जबाबदार आहेत. यामध्ये राजकीय हस्तक्षेपसुद्धा वाढत चाललेला दिसतोय. या निर्माण केलेल्या कृत्रिम वातावरणाचे परिणाम आता दिसायला सुरूवात झालेली आहे. उदाहरणार्थ दिल्लीमध्ये युपीएससीची तयारी करणारा डॉ. विकास बोंदर याची आत्महत्या... सा. फु. पुणे विद्यापीठात बालाजी मुंढे याने केलेली आत्महत्या... श्रीकांत पवार व हनुमंत खाडे यांसार‘या बोगस अधिकार्‍यांचा राजरोस वावर आणि आता शासनाच्या विरोधात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे निघणारे मोर्चे ही सर्व परिस्थिती पाहता आजचा तरूण अनिश्‍चित ध्येयाच्या व अस्थिरतेच्या खड्ड्यात ढकलला जातोय. हे वास्तव आता आम्हाला नाकारून चालणार नाही.

सुवर्ण पदकांची अपेक्षा करणार्‍या व्यवस्थेला राही सरनोबत आणि ललिता बाबर यांनी सरळ प्रश्‍न केला की, आम्हा खेळाडूंना तुम्ही अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिलीत का? शेतकी शाखेतील विद्यार्थ्यांनी शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याची गरज आहे, ती त्यांनी केली का? 1913 नंतर साहित्यामध्ये एकही भारतीयाला साहित्याचा नोबेल मिळू नये, ही खंत का व्यक्त करावी लागते? जर डॉ. विकास बोंदर यांच्यासारख्यानी आत्महत्या केली तर भविष्यात डॉ. आमटे, बंग. कोल्हे तयार होतील का? दहावी-बारावीला 90-95% मार्क्स पाडणारे विद्यार्थी केवळ आयएएस आणि आयपीएस स्वप्नं पाहत असतील तर देश फक्त अधिकार्‍यांच्या जीवावर महासत्ता होणार आहे का? अभियांत्रिकीचं शिक्षण चालू असतानाच अनेक उपग्रह अवकाशात सोडणारे विद्यार्थी भविष्यात स्पर्धा परीक्षेच्या मैदानात उतरणार असतील तर जागतिक पातळीवर इतर बलाढ्य देशांशी काय स्पर्धा करणार? या सर्वांचा विचार करता तरूणांच्या हाताला त्यांच्या शैक्षणिक कौशल्यानुसार शाश्‍वत रोजगार निर्माण करून देणं हे शासनाची प्रमुख जबाबदारी आहे. ही जबाबदारी शासन गंभीरतेने पार पाडेल इतकीच अपेक्षा करणं आपल्या हातात आहे.

अर्जुन नलवडे