Jump to content

सदस्य चर्चा:बसवंत

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

काटेसावर(Bombax Ceiba): पक्षांचा जूसबार लेखन- बसवंत विठाबाई बाबाराव

(सगळ्यांना मोहात पाडेल असे सुंदर झाड, जाणकार शेतकरी आपल्या शेतात, बांधावर एकतरी काटेसावर नक्की लावतो. हे झाड शेतकऱ्यांची दिवसभराची थकवा घालवतो. पक्षांना स्वतःकडे आकर्षित करतो. सावरीवर येणारे पक्षी शेतात पिकावर येणारी किडीवर ताव मारतात. चांगला माळी त्याच्या बागेत लावण्यासाठी नक्कीच निवडेल. वनाधिकारीही त्याच्या अखत्यारीत येणाऱ्या जंगला काटेसावरीचे एक दोन झाडे आवर्जून लावेल.)

सायर, सावर, सायरी, शेवरी, काटेसावर आदी नावाने ओळखल्या जाणाऱ्या झाडाचे कौतुक करावे तितके कमीच. झाडाच्या खोडावर अरुंद व जाडसर काटे असतात यामुळे याला काटेसावर म्हणतात. हिंदीमध्ये सेमल तर बंगालीत शेमुल म्हटले जाते. याचे संस्कृत नाव शाल्मली असे आहे. भारतीय उपखंडात मोठ्या संख्येत असलेल्या झाडामुळे, एकेकाळी भारताला शाल्मली द्वीप म्हणून संबोधले जायचे. शाल्मली या नावावरूनच सालमालिया मलबारिका असे एक पर्यायी वनस्पतीशास्त्रीय नाव आहे. डिसेंबर जानेवारी महिन्यात या झाडाची पानगळ सुरु होते. मार्च एप्रिल मध्ये या झाडावर एकही पान शिल्लक राहत नाही व झाड पूर्णतः फुलांनी बहरून जाते. सूर्य उगवताना व मावळताना जेंव्हा किरणे या झाडावर पडतात तेव्हा असे वाटते की सूर्य जणू याच झाडासाठी उगवतो. सावरीचे फुलं मध्ये रात्री उगवतात. या झाडावर पहिल्यांदा हजेरी लावतात ते वटवाघळे. नंतर जसजसे सकाळ होते, तस तसे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी झाडावर यायला सुरुवात होतात. काही पक्षी फुलातील रस पिण्यासाठी येतात. काही पक्षी फुलाच्या पाकळी खाण्यासाठी तर काही फुलात फसलेले किडे खाण्यासाठी येतात. कोल्हापुरातील रमण कुलकर्णी यांनी काटेसावरीच्या झाडावर फेब्रुवारी-मार्च या फुलोऱ्याच्या दिवसात निरीक्षण, नोंदी करून २४ वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येतात ये शोधलं आहे. त्याच्या निरीक्षणानुसार शिंजीर, बुलबुल, सारखे पक्षी फुलातील मधुरस पिण्यासाठी येतात. छोटे पोपट हे फुल व कळ्या खाण्यासाठी, कोतवाल हा पक्षी किडे खाण्यासाठी. काही पक्षी किडेही खातात व मधुरसही पितात. अशा प्रकारे पक्षांची जणू शाळाच भरते. अनेक प्रकारचे पक्षी मोठ्या संख्येत या झाडावर जमतात म्हणून या झाडाला पक्षांसाठीचे जूसबार असेही म्हंटले जाते. पक्षांची झुंबड सुरु असताना त्यांच्या जोडीला खारुताई सुधा इकडे तिकडे उड्या मारत असते. जेव्हा पक्षी, वटवाघळे, खारुताई झाडावर खेळत असतात तेव्हा अनेक फुलं खाली पडतात. हे फुल खाण्यासाठी झाडाखाली भेकर, ससा, हरीण यांची स्पर्धा सुरु होते. पक्षांची फोटोग्राफी करण्यासाठी हे झाड खूपच उपयुक्त. बसल्या जागेवर अनके पक्षी कामेऱ्यात टिपता येतात.

काटेसावरीचा मूळ वसतीस्थान भारत, बांग्लादेश, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, भूतान आणि म्यानमार असे भारतीय उपखंड आहे. चीनच्या काही भागात व दक्षिण अमेरिकेच्या जंगलात देखील हा झाड आढळतो. इंगार्जीमध्ये याला रेड सिल्क कॉटन ट्री आणि इंडिअन रेड कपोक म्हणून ओळखले जाते. याचे वनस्पतीशास्त्रीय नाव बॉम्बँक्स सिबा (Bombax Ceiba) असे आहे.

काटेसावरीचे कापूस खूप प्रसिद्ध आहे. विमानातील गाद्या प्रामुख्याने या कापसापासून बनविल्या जायच्या. कापूस गरम व वजनाने खूपच हलके असते. घरगुती उशामध्येही हा कापूस वापराता येते. काटेसावरीच्या खोडावर जो डिंक निघतो तो ताप व जुलाब कमी करण्यासाठी औषधी असतो. झाडाची कोवळी फुले व फळ, ज्याला दोडे म्हणतात याची चवदार भाजी होते. कळसुबाई, जव्हार परिसरातील लोक याची भाजी करतात. काही फळे भाजीसाठी कापून वाळवलेही जातात. सावरीच्या झाडाचा लाकूड हलका व लवकर कुजणारा असतो. लाकडाचा वापर फळासाठी व इतर वस्तूंच्या पार्सल साठी खोकी बनविण्यासाठी केला जातो. झाडाचा उपयोग कागद बनविण्यासाठी सुधा केला जातो. विशेषतः वृत्तपत्राचा कागद हा काटेसावरीच्या झाडापासून बनवला जातो.

झाड आपल्या प्रसारसाठी बियांची रचना हलके व फळातील कापसातून सहज उडू शकेल असे केले आहे. मे-जून मध्ये फळे पक्व होऊन एक एक करून फुटू लागतात. वाऱ्याच्या मदतीने कापूस व बी सहस जवळपासच्या कुंपणात स्वतःसाठी सुरक्षित जागा शोधून घेतात. जिथे जनवारे चरण्यासाठी जाऊ शकत नाही अशा कुंपणात पहिल्या पावसातच सावरीचे मोठ्याप्रमात रोपे उगवून येतात. उगवलेल्या रोपापैकी जवळपास निम्मी रोपे टिकतात. उन्हाळ्यात जंगलातून फिरत असतांना जर एखाद्याला तहान लागली तर एका-दोन वर्षाच्या आतील सावरीचे झाडे उपसून मुळी ऊसासारखे खाता येतात. काही आदिवासी बांधव ह्या मुळी विस्तवामध्ये भाजून देखील खातात. सावरीची पाने प्रथिनयुक्त असल्यामुळे चारा म्हणून अतिशय उपयुक्त झाड आहे. काटेसावरीच्या लाकडापासून काडीपेट्ट्या मधील कड्या व खेळणी, वेगवेगळे ब्रशचे हंडल बनविल्या जातात. राजस्थानमधील कथोडी जमातीचे आदिवासी लोकं सावरीच्या खोडापासून ढोलक व तंबोरा ही वाद्य बनवितात. भिल्ल समुद्यातील लोक या झाडापासून स्वयपाकघरातील चमचे, पळी बनवितात. या व अशा अनेक कारणामुळे आदिवासी व दुर्गम भागात राहणाऱ्या लोकाच्या जीवनात काटेसावरील खूप मोलाचे स्थान आहे.

झाडाची रचना फेब्रुवारी मार्च महिन्यात पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीशेजारील भव्य काटेसावरीचे झाड आपल्या नजरेस पडले नाही असे होणारच नाही. साधारण २०-२५ मीटर उंच. दोन माणसाच्या हातात बसेल इतका घेर असलेला बुंधा. खरबरीत खोड. खोडावर खैरावर असतात त्याहून जाडसर काटे असतात. पूर्ण वाढ झालेल्या झाडावरील काट्यांची संख्या हळू-हळू कमी होत जाते. पाने हिरवी चकचकीत पाच-पाच च्या जुड्ग्यात असतात. फुले लाल भडक. टेनिसच्या रॉकेटच्या व त्यापेक्षा थोडे मोठ्या आकाराचे. पाच पाकळ्या असलेले लुसलुशीत फुलं असतात. फुलात पुंकेसारांच्या ९ ते १२ दांड्याचे सहा गुच्छ असतात. पाच गोल पाकळ्याच्या लगोलग तर एक गुच्छ मध्य भागी असते. प्रत्येक पुंकेस्राच्या टोकाशी बारीक काळा गोंडा असतो. फळ बोंड प्रकारचे असते. साधारण ५ ते ७ इंच लांब व तीन ते चार इंच रुंद असते. फुलाच्या पाकळ्या प्रमाणे फळाचे पाच कप्पे असतात. कप्प्या-कप्यात कापूस व बिया असतात. पक्व फळे अलगद फुटून आतील कापसाला मोकळी वाट करून देतात. बिया कापसात गुंतलेल्या असतात. ज्वारीच्या आकारापेक्षा थोडेसे मोठे, रंगाने फिकट काळ्या असतात. कापसाबरोबर उडत दूरवर प्रवास करून आपलं प्रसार करीत असतात.


रोपवाटिका कशी करावी? मे-जून मध्ये पक्व झालेल्या फळातील बिया गोळा करावे. झाडाखाली बिया सहज उपलब्ध होतात. पक्व बिया २४ तास थंड पाण्यात भिजत ठेवावे. भिजवलेल्या बिया कोकोपीट व मातीचे निम्मे निम्मे प्रमाण घेऊन केलेल्या बेड मध्ये टाकावे. किंवा पिशवी मध्ये सुधा रुजवू शकता. रुजवलेल्या बिया १० ते १५ दिवसात उगवतात. पक्व बिया असतील तर ९९ टक्के बिया अंकुरतात. बिया अंकुरल्या नंतर पहिले एक दोन वर्षे उन्हाळ्यात काही रोपांचे पानगळ होतात. पानगळ झाल्यावर फक्त खुरटे काडी शिल्लक असतात. अनेकांना ती रोपी आता जगणार नाहीत असे वाटण्याची शक्यता आहे. मात्र त्या कड्यांना पाणी देत राहावे. येणाऱ्या पावसाळ्यात त्या कड्यांना पुन्हा अंकुर फुटतात. मुबलग पाणी असेल तर दोन ते तीन वर्षात एक सात आठ फुट वाढतात. वनविभागाने जंगलामध्ये नको तितके ग्लीरीसिडीलावण्यापेक्षा काटेसावरीचे दोन-चार झाडे लावावीत. त्यातून जंगलाला खऱ्या अर्थाने जंगलपण प्राप्त होऊ शकते. जाणकार शेतकरी आपल्या शेतीत किमान एक दोन तरी ही झाडे लावीत असतो. यावर येणारे पक्षी हे शेतामधील कीड नियंत्रणासाठी खूप चांगल उपाय असतो. शेहरात रस्त्या कडेला व बागेमध्ये लावण्यासाठी देखील हा खूपच सुंदर पर्याय आहे.

- बसवंत विठाबाई बाबाराव: प्रकल्प समन्वयक, पर्यावरण शिक्षण केंद्र, पुणे

[]

  1. ^ बसवंत विठाबाई बाबाराव. वनराई. मराठी: ४. Missing or empty |title= (सहाय्य)

Start a discussion with बसवंत

Start a discussion