सदस्य:Uniquepune

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पत्रकारितेबद्दल स्वतःची निश्चित भूमिका असलेल्या तरुण मित्रांच्या प्रयत्नांतून युनिक फीचर्स या माध्यमसंस्थेची स्थापना झाली. एकाहून अधिक लोकांनी एकत्र येऊन आपापल्या शक्तिस्थानांचा वापर केला तर निर्माण होणा-या सामूहिक ऊर्जेतून अधिक परिणामकारक काम होऊ शकतं, या भूमिकेतून तरुण पत्रकारांचा मोठा संच या माध्यमसंस्थेने उभा केला. त्यातून मराठीतीलच नव्हे तर भारतातील एकमेवाद्वितीय माध्यमसंस्था उभी राहिली. सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी, संतोष कोल्हे, प्रसाद मिरासदार, राजेश्वरी देशपांडे, राजेंद्र साठे या मित्रांनी या संस्थेची उभारणी केली. आज २० वर्षांचा टप्पा पूर्ण करत असताना या संस्थेने अनेक नवे पायंडे पाडले आहेत. वृत्तपत्रांना वृत्तलेखसेवा देण्याच्या प्राथमिक उद्देशापासून सुरू झालेल्या या संस्थेच्या छत्राखाली आज अनेक कल्पक आणि यशस्वी उपक्रम राबवले जातात. सध्या सुहास कुलकर्णी आणि आनंद अवधानी हे पत्रकार, तरुण आणि उत्साही सहका-यांच्या सोबतीने ते नवनवीन कल्पना प्रत्यक्षात आणू पहात आहेत. http://www.uniquefeatures.in

पत्रकारिता : वृत्तपत्रांसाठी[संपादन]

आपल्या देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातली गुंतागुंत संवेदनशीलतेने टिपून परिणामकारक भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न म्हणजेच वर्तमानपत्रांसाठी केली जाणारी ‘युनिक ’ पत्रकारिता. युनिक फीचर्सने दोन पद्धतींनी ही पत्रकारिता केली. पहिला प्रकार म्हणजे महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ, पुढारी, लोकमत अशा राज्यस्तरीय वर्तमानपत्रांसोबत विशिष्ट प्रकल्पांसाठी काम करणे. यात शोधलेख, लेखमाला, विशेष पुरवण्या आणि स्वतंत्र संपादकीय प्रकल्प अशा अनेक अंगांनी हे काम युनिकने केलं. या प्रकारे पहिली सुमारे १० वर्षं ‘युनिक फीचर्स’ने महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांतील मराठी भाषेतील दैनिकांसाठी मुबलक प्रमाणावर काम केलं. ’महाराष्ट्र टाइम्स‘ व ’लोकसत्ता‘ या दैनिकांतील लेखांची तर महाराष्ट्रभर चर्चा झाली. या लेखांवर आधारित पुस्तक लवकरच ‘समकालीन प्रकाशना’तर्फे प्रकाशितही होत आहे. दुसरा प्रकार ’फीचर्स सिंडिकेशन‘चा. एकच लेख एकाच वेळी अनेक दैनिकात प्रसिद्ध केला जाणं असा या ’सिंडिकेशन‘चा अर्थ. ’युनिक फीचर्स’नं काम सुरू करण्यापूर्वी मराठी पत्रकारितेला या प्रकाराची फारशी ओळख नव्हती. महाराष्ट्राच्या विविध भागांत आपापल्या कार्यक्षेत्रापुरत्या मर्यादित असलेल्या दैनिकांचे गट बनवून एकाचवेळी एकच लेख प्रसिद्ध करण्याची ही पद्धत ‘युनिक फीचर्स’ने आणली. तालुका आणि जिल्हा स्तरावरून प्रकाशित होणारी अशी किमान २५ सशक्त वर्तमानपत्रं मराठीत आहेत. ’युनिक‘नं त्यांच्यासाठी आशयाचा पूल बांधला. एकच रविवार पुरवणी तयार करून ती एकाच वेळी १० वर्तमानपत्रांची बनवली. या प्रत्येक वर्तमानपत्राचा भौगोलिक विभाग वेगळा असल्याने दैनिकांच्या संपादकांना त्याविषयी हरकत नव्हती. पण एरवी स्थानिक मर्यादांमुळे सकस मजकूर वाचकांना देण्यात जी अडचण येत होती ती यामुळे दूर झाली.

अग्रोवन[संपादन]

‘सकाळ’ माध्यम समूहाने जेव्हा फक्त शेतकरी वाचक डोळ्यासमोर ठेवून दैनिक काढण्याची योजना आखली तेव्हा त्याच्या संपादकीय नियोजनाची जबाबदारी ‘युनिक फीचर्स’ वर सोपवण्यात आली. या नवीन दैनिकाच्या घडणीत ‘युनिक’ ने महत्त्वाचा वाटा उचलला. प्रकाशनापूर्वीच्या नियोजनात आणि नंतर अंकाच्या महत्त्वाच्या पहिल्या तीन वर्षांतही ‘युनिक’ने आपला सहभाग दिला. शेती व बिगरशेती विषयांवरील लेखांची पाने ‘युनिक’कडून पुरवली जात होती.

लोकजागर[संपादन]

१९९० नंतर देशभर शहरीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू होऊन आर्थिक व्यवस्थेत शहरं महत्त्वाची बनू लागली होती. त्यातून शहरी लोकसंख्येत मोठी भर पडून इथले प्रश्नही वाढत होते व गुंतागुंतीचे बनत होते. ही गुंतागुंत वाचकांसमोर आणण्याचा प्रयत्न ’लोकजागर‘ या महालेखमालेद्वारा ‘युनिक फीचर्स’ने केला. ’लोकसत्ता‘सोबत पुणे व नगर आवृत्त्यांसाठी ‘लोकजागर’ ही मालिका १९९५ मध्ये लिहिली गेली. महानगरपालिका क्षेत्रातील वॉर्ड पिंजून काढत लोकांचे प्रश्न समजून घेऊन नगरसेवक व महापालिकेतील अधिकारी यांच्याशी चर्चा करून हे लेख लिहिले गेले. त्यातून नागरिकांच्या प्रश्नांचं स्वरूप, त्यांच्या महापालिकेकडूनच्या अपेक्षा, नगरसेवक व अधिकारी यांचा त्या संदर्भातला दृष्टिकोन, आयुक्त व महापौर यांची भूमिका हे सगळं समोर येत होतं. या लेखमालिकांना वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला व प्रश्न सोडवण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणात अधोरेखित झाली. अशाच लेखमालिका ’लोकसत्ता‘सोबत नागपूर व अमरावती येथेही प्रत्यक्षात आणल्या गेल्या. याशिवाय सातार्‍यात ’ऐक्य‘, मुंबईत ’महानगर‘, औरंगाबादमध्ये ’सांजवार्ता‘ आणि नाशिकमध्ये ’देशदूत‘ या दैनिकांसोबत अशा मालिका चालवल्या गेल्या. शोधलेख आणि सर्वेक्षण या दोन फॉर्म्सच्या मिश्रणांचं रसायन ’लोकजागर‘ मध्ये केल्याने एक नवा फॉर्म या मालिकेतून मराठी पत्रकारितेला मिळाला. प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय नेतृत्व यांना टोकदारपणे जबाबदार धरण्याची प्रथाच या मालिकेमुळे रुजली.

अंतरंग[संपादन]

मोठ्या शहरातील विविध विभागांमध्ये राहणार्‍या वाचकांना शहरातील घडामोडींप्रमाणेच आपापल्या भागातील बातम्या व लेख वाचण्यात रस असू शकतो ही बाब ओळखून ’लोकसत्ता‘च्या मुंबई आवृत्तीने छोट्या विभागीय आवृत्त्या सुरू केल्या. तिची जबाबदारी विश्‍वासाने ‘युनिक फीचर्स’वर सोपवली गेली. ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, दादर अशा आठवडी पुरवणी आवृत्त्या निघू लागल्या. या पुरवण्यांच्या संपादन व संयोजनाची जबाबदारी ‘युनिक फीचर्स’ने वर्षानुवर्षं पेलली.

राजकीय विश्लेषण[संपादन]

निवडणुकांमध्ये येणार्‍या राजकीय बातम्या आणि विश्‍लेषण यांच्याऐवजी ‘युनिक ’ने २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये एक वेगळी वाट चोखाळली. राजकीय अंदाज व गॉसिपच्यापलीकडे राजकारणाची गंभीर चर्चा व्हावी, यासाठी पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या सहकार्याने दैनिक ’सकाळ‘च्या सर्व आवृत्त्यांमध्ये सलग ४५ दिवस एक लेखमालिका चालवली गेली. त्यात महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील मागच्या पन्नास वर्षांच्या राजकारणाचा थोडक्यात आढावा, आजची परिस्थिती, शेती-उद्योग-सहकार-सेवाक्षेत्र यांची परिस्थिती आणि त्यांचा राजकारणाशी असलेला संबंध उलगडून दाखवला गेला. त्या त्या जिल्ह्यातील राजकीय घराणी आणि त्यांनी जिल्ह्यातील सत्तास्थानं आपापसात वाटून घेण्याचे प्रयत्न यावरही प्रकाश टाकला गेला. राजकीय विश्‍लेषण हे पत्रकाराच्या वैयक्तिक संबंधावर अथवा त्याच्या कुवतीवर अवलंबून न ठेवता एकूण राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करून करायचं असतं ही गोष्ट या लेखमालेने ठसवली.

उद्योगभरारी[संपादन]

शोधपत्रकारितेप्रमाणेच ‘युनिक फीचर्स’ने विकास पत्रकारिताही केली. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ’उद्योगभरारी‘. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला प्रतिसाद म्हणून मराठी तरुणांमध्ये उद्योजकीय कौशल्याचा विकास करण्याच्या हेतूने हा प्रकल्प दैनिक ‘लोकसत्ता’मधे राबवला गेला. या लेखमालेची संकल्पना प्रत्यक्ष आणण्यात ‘युनिक फीचर्स’ने आपला संपादकीय सहभाग दिला. माहितीच्या कक्षा रुंदावणारा दररोज एक लेख, महाराष्ट्रभर एकेक दिवसाची ५० सल्ला शिबिरं आणि १२ प्रमुख शहरांमध्ये व्याख्यानमाला असा हा प्रकल्प होता. http://www.uniquefeatures.in/unique

पत्रकारिता : नियतकालिका[संपादन]

कौटुंबिक विषय, उपयुक्ततावादी विशेषांक या चौकटीत फिरणार्‍या नियतकालिकांमध्ये आपल्या वैशिष्ट्यपूर्ण मजकुराने ‘युनिक’नं स्वतःचं स्थान निर्माण केलं. ‘युनिक’ ने सविस्तरपणे मांडलेले सामान्यांच्या जगण्याला स्पर्श करणारे विषय वाचकांना भावले. नेमक्या अशाच सविस्तर लेखनाच्या प्रतीक्षेत मराठीतला सुजाण वाचक होता,असं लक्षात आलं. पुढे ‘युनिक’मुळे अशा संपादकीय विषयांची वाट पाहणारा, ते वाचून त्यावर चर्चा करणारा वर्ग पुण्या-मुंबईसह महाराष्ट्रात तयार झाला. ‘युनिक फीचर्स’च्या सुरुवातीच्या काळात ’लोकप्रभा’, ’चित्रलेखा‘ व ’साप्ताहिक सकाळ‘ या तिन्ही महत्त्वाच्या साप्ताहिकांसाठी नियमितपणे लेखन केलं गेलं. ‘टेबलमेड’ लेखांऐवजी महाराष्ट्रभर फिरून, लोकांशी बोलून लेख लिहिण्याचा प्रकार ‘युनिक फीचर्स’ने रुळवला. पुढे सुमारे १० वर्षं ’साप्ताहिक सकाळ‘च्या कव्हर स्टोरीज् तयार करण्यातही साप्ताहिकाच्या संपादकीय टीमचा भाग बनून मोलाचा वाटा उचलला. विषय ठरवणं, विषयाची चौकट तयार करणं, विषय प्रत्यक्षात आणणं अशी सर्व जबाबदारी ‘युनिक फीचर्स’ने उचलली. नंतर ’साप्ताहिक सकाळ‘ आणि ‘युनिक फीचर्स’ ही दोन नावं लोक जोडीने घेऊ लागली एवढा या सहकार्याचा प्रभाव पडला. ‘साप्ताहिक सकाळ’च्या सलग दिवाळी अंकामध्ये नऊ वर्षं प्रकाशित होत असलेल्या लेखमालिकेवर आधारित ‘अर्धी मुंबई’ हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. ‘मैत्रेय’ या उद्योगसमूहातर्फे प्रकाशित होणार्‍या ’भटकंती‘ व ’मैत्रीण‘ या दोन मासिकांच्या संकल्पना व संयोजनात ‘युनिक’चा वाटा महत्त्वाचा होता. पर्यटन व कुटुंब या विषयांभोवती फिरणारं नियतकालिक कसं असावं, हे निश्‍चित करून त्याची पहिली दोन वर्षांची जबाबदारी ‘युनिक’ने पेलली. टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी ‘रिमोट कंट्रोल’ हे पाक्षिकही ‘युनिक फीचर्स’च्या मदतीने लाँच केलं गेलं. दिवाळी अंक हे गंभीरपणे व विस्तृतपणे विषय मांडण्यासाठी उत्तम माध्यम आहे हे ओळखून ’युनिक फीचर्स‘ने सुरुवातीपासूनच दिवाळी अंकांसाठी भरपूर लेखन केलं. हे लेखन प्रामुख्याने शोधलेखांच्या फॉर्ममधे केलेलं होतं. हे लेख चार-सहा पत्रकारांच्या टीमने चारचार-सहासहा महिने मेहनत करून लिहिलेले होते. सजग आणि विचारी वाचकांना या लेखनाने स्वत:कडे ओढून घेतलं. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, साप्ताहिक सकाळ, अक्षर, दिपावली, कालनिर्णय, ललित, माहेर आणि अनुभव या दिवाळी अंकांसाठी लिहिलेले लेख वर्षानुवर्षं स्मरणात राहिलेले आहेत. ’तनिष्का‘ हे सकाळ उद्योग समूहातर्फे प्रकाशित होणारं महिलांसाठीचं हे मासिक. त्याच्या संकल्पनेपासून अंक प्रत्यक्षात आणण्यापर्यंतच्या प्रक्रियेत ‘युनिक फीचर्स’ने आपला महत्त्वाचा सहभाग दिला. आज या मासिकाचं संपादकीय संयोजन ‘युनिक’तर्फे केलं जात आहे.

पत्रकारिता : स्वयंसेवी संस्थांसाठी[संपादन]

रचनात्मक आणि संघर्षमय अशा दोन्ही प्रकारे काम करणार्‍या स्वयंसेवी संस्थांना लोकांपर्यंत पोहचण्यासाठी माध्यमाची गरज असते. वर्तमानपत्रांमधून आणि वृत्तवाहिन्यांमधून त्यांच्या कामाला प्रसिद्धी मिळते. पण प्रबोधनासाठी तेवढं पुरंसं नसतं. संस्थेच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या विषयाची माहिती असते, पण ती पुस्तिकेतून कशी मांडायची, याची कला अवगत नसते. म्हणूनच ’युनिक‘ने या विषयात योगदान देण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय पातळीपासून ते गावपातळीपर्यंतच्या स्वयंसेवी संस्थांबरोबर आपला विकास पत्रकारितेचा सांधा जोडून घेतला.

पत्रकारिता : शासकीय संस्थांसाठी[संपादन]

शासनव्यवस्था ही लोकांसाठी असते. पण ती लोकांसाठी नेमकं काय करते, हे अनेकदा लोकांनाच माहिती नसतं. लोकशाहीत ही माहिती पोचवण्याचं काम प्रसिद्धी माध्यमांनी करणं अपेक्षित असतं. पण ते गरजेइतकं आणि नेमकेपणानं होताना दिसत नाही. ग्रामपंचायतींपासून ते राज्यशासनापर्यंत सर्व सरकारी संस्था लोकोपयोगी निर्णय घेत असतात. त्यांच्या कामात अनेक उणिवा, त्रुटी असतात हे सर्वांनाच मान्य आहे. पण प्रसिद्धी माध्यमं फक्त उणिवा दाखवण्याचं काम करतात. त्याचबरोबर विकासाच्या योजना आणि प्रकल्प लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करत नाहीत. त्यामुळे शासनाला स्वतःची प्रकाशनं काढावी लागतात. त्यामध्ये ‘युनिक’ आपली जबाबदारी पार पाडते. लोकसंवाद ‘युनिक’ने नेमकी हीच गरज ओळखून विविध महापालिकांसाठी नियतकालिकं तयार करायला सुरुवात केली. या प्रयत्नाला महापालिकांच्या आयुक्तांनी चांगला प्रतिसाद दिला. शहर चालवताना केवढी मोठी यंत्रणा काम करत असते, त्यात कोण लोक असतात, ते कसं काम करतात, नव्या योजना कशा आकाराला येतात, आपत्कालीन प्रसंगांचा सामना कसा केला जातो याची माहिती गोळा करून त्या पालिकेच्या आयुक्तांशी चर्चा करून अंकाचं संपादकीय नियोजन ‘युनिक’ करते आणि मग संपूर्ण अंकाचं लेखन, संपादन, मांडणी, सजावट इथपासून ते छपाई आणि अंकाच्या वाटपापर्यंत संपूर्ण जबाबदारी घेते. आजवर ज्या ज्या शहरांमध्ये ‘युनिक’ने ‘लोकसंवाद’चे उपक्रम राबवले त्या त्या ठिकाणी महापालिका, स्वयंसेवी संस्था आणि सर्वसामान्य जनता यांचा खूप चांगला प्रतिसाद या उपक्रमाला लाभला. महापालिकांप्रमाणेच नगरपालिका, जिल्हा परिषदा किंवा पंचायत समित्यांच्या कार्यकक्षेतही असे उपक्रम करण्याचा ‘युनिक’च्या टीमचा मानस आहे.

पत्रकारिता : कॉर्पोरेटसाठी[संपादन]

कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) या विभागाच्या माध्यमातून सर्वच कॉर्पोरेट कंपन्या लोकांसाठी काम करण्याचा प्रयत्न करत असतात. त्या निमित्ताने समाजात मिसळत असतात. कॉर्पोरेटस् च्या या उपक्रमांमध्ये ‘युनिक’चा सहभाग असतो. टाटा, एशियन पेंटस्, सिन्जेंटा, लॉर्ड, मॅरिको अशासारख्या कंपन्यांबरोबर विविध स्वरुपाचे उपक्रम ‘युनिक’ची कॉर्पोरेट प्रोजेक्टस विंग राबवत असते. कॉर्पोरेट क्षेत्राच्या व्यावसायिक वाटचालीला या प्रकल्पांमुळे आणि त्यातल्या युनिकच्या सहभागामुळे एक सामाजिक आयाम लाभतो. मी आणि माझे शहरः ‘जनरेशन नेक्स्ट’ला आपल्या परिसराचं भान आणून देणारा प्रकल्प काही मान्यवर कंपन्या आणि ‘युनिक फीचर्स’ मिळून संयुक्तपणे ‘मी आणि माझे शहर’ हा उपक्रम चालवला जातो. या प्रकल्पाचा भाग म्हणून ‘मी आणि माझे शहर’ ही मध्यवर्ती संकल्पना असलेले पुस्तक तयार केलं जातं. माध्यमिक शाळांमधल्या मुलांना आपण ज्या शहरात राहतो त्या शहराचं भान आणून देणं, ते शहर कसं चालतं, त्यासाठी किती मोठी यंत्रणा राबत असते हे त्यांच्यापुढे मांडणं, हा त्याचा हेतू आहे. शहराशी निगडित वेगवेगळे विषय घेऊन ही संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. उदा. नागरिकत्व म्हणजे काय किंवा आपल्या शहराचं जलचक्र कसं चालतं किंवा जागतिक तापमानवाढीचा माझ्या शहराशी असलेला संबंध इ. विषयांच्या गरजेप्रमाणे ज्या शहरात हा प्रकल्प राबवला जात असेल त्या शहराची सर्व माहिती, आकडेवारी गोळा केली जाते. शालेय मुलांसाठी योग्य अशा पद्धतीनं त्या माहितीचं सादरीकरण केलं जातं. पुस्तकाच्या प्रकाशनाचा समारंभ करून त्यामध्ये शहरातले त्या त्या विभागाचे शासकीय अधिकारी, स्वयंसेवी संस्था, शाळांमधले विद्यार्थी-शिक्षक-मुख्याध्यापक, माध्यमांचे प्रतिनिधी या सगळ्यांना पाचारण केलं जातं. त्यानंतर ‘युनिक’ची टीम खासगी आणि सरकारी शाळांमध्ये या पुस्तकाचं वाटप करते. या पुस्तकावर आधारित विद्यार्थ्यांसाठी निबंधस्पर्धा आयोजित केली जाते. आजपर्यंत हा प्रकल्प पुणे, नाशिक, नागपूर, गोवा या ठिकाणी राबवला गेला आहे. त्यासाठी टाटा, एशियन पेंटस, लॉर्ड केमिकल्स आणि सिन्जेंटा या कंपन्या कॉर्पोरेट पार्टनर्स म्हणून सहभागी झाल्या आहेत. शासनसंस्था, स्वयंसेवी संस्था, शाळा, माद्यमं आणि कॉर्पोरेट्‌स असे सर्व या प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जाणीव-जागृती करण्यासाठी एकत्र येतात.

पत्रकारिता : दृकश्राव्य माध्यमासाठी[संपादन]

छापील माध्यमाप्रमाणेच ‘दृकश्राव्य माध्यमांमध्ये सुद्धा ‘युनिक’ची भरपूर मुशाफिरी चालू असते. टेलिव्हीजनवर टॉक शोज, डिस्कशन शोज, ट्रॅवल शोज यासारख्या कथाबाह्य कार्यक्रमांसाठी संशोधन करण्याचं काम ‘युनिक’ची टीम करत असते. अशा प्रकारच्या मालिकांची निर्मिती आणि दिग्दर्शनही ‘युनिक’कडून केलं जातं. त्याचबरोबर विविध सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांसाठी माहितीपट तयार करून देण्याचं कामही केलं जातं.

प्रिया तेंडुलकर शो[संपादन]

‘प्रिया तेंडुलकर शो’ हा भारतीय टेलिव्हीजनवरचा पहिला टॉक शो होता. ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांच्या संकल्पनेमधून तयार झालेल्या या कार्यक्रमाची मुख्य जबाबदारी ‘युनिक फीचर्स’वर होती. टॉक शो साठी विषयांची निवड करणं, त्या विषयांचा सखोल अभ्यास करणं, ते विषय कार्यक्रमात कसे मांडावेत हे ठरवणं शिवाय कार्यक्रमासाठी स्टुडिओत प्रमुख पाहुणे आणि प्रेक्षक कोण असावेत हे ठरवणं असं सगळं काम ‘युनिक’ची टीम अगदी पहिल्या भागापासून करत होती. दूरदर्शन (मेट्रो वाहिनी) आणि नंतर झी वाहिनीवर प्रक्षेपित झालेला कार्यक्रम देशभर खूप गाजला. पुढच्या पंधरा वर्षांत तयार झालेल्या सर्व इंग्रजी-हिंदी मराठी टॉक शोजना या कार्यक्रमानं निश्‍चित अशी दिशा दाखवली. त्याखेरीज सिद्धार्थ काक व रेणुका शहाणे यांचा ‘सुरभी’, शत्रुघ्न सिंन्हा यांचा ‘शॉटगन शो’, जावेद अख्तर यांचा ‘....’ या स्टार प्लस व झी टीव्ही या हिंदी चॅनेल्सवरील कार्यक्रमासाठी संशोधनाची जबाबदारी ‘युनिक फीचर्स’ने सांभाळली.

भटकंती[संपादन]

‘भटकंती’ हा मराठी टेलिव्हीजनवरचा पहिला ट्रॅव्हल शो. मिलिंद गुणाजी आणि शर्वरी जमेनीस हे निवेदक असलेल्या कार्यक्रमाची संकल्पना, लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती असं सबकुछ ‘युनिक’ होतं. कोकणच्या किनारपट्टीपासून ते सह्याद्रीच्या कडेकपारीपर्यंत पसरलेल्या महाराष्ट्राची अनेक विलोभनीय रूपं या कार्यक्रमात दाखवली गेली. पण ‘युनिक’च्या पत्रकारांनी प्रत्येक ठिकाणाचं संशोधन करून त्या त्या ठिकाणांचे अनवट पैलू या कार्यक्रमातून प्रेक्षकांपुढे आणले. आज अनेक वर्षांनंतरही हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

मैफल गप्पांची[संपादन]

‘मैफल गप्पांची’ हा टीव्हीवरती गप्पांचा फड जमवणारा वेगळ्या ढंगाचा कार्यक्रम ‘युनिक’नं तयार केला. मराठीतले स्टार निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या अनौपचारिक शैली हे कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्यं होतं. नाटक, चित्रपट, साहित्य, कला, क्रीडा, राजकारण अशा विविध क्षेत्रांमधल्या मान्यवर व्यक्ती या कार्यक्रमात सहभागी होत असत. कोणत्याही विषयांवर त्यांनी सुधीर गाडगीळ यांच्याशी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा हेच कार्यक्रमाचं स्वरूप होतं. त्यामुळे आमची रविवारची सकाळ खूप प्रसन्न होते, असं अनेक प्रेक्षक सांगत असत.

सारांश[संपादन]

‘सारांश’ ही चर्चात्मक कार्यक्रमाची मालिकाही ‘युनिक’नं तयार केली होती. ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर हे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होते. समाजातल्या समकालीन महत्त्वाच्या विषयांवर त्याच्या दोन्ही बाजूंना उभ्या असणार्‍या व्यक्तींना एकाच मंचावर बोलावून त्यांच्यामध्ये खुली चर्चा घडवून आणली जात असे. एखाद्या गंभीर प्रश्‍नांचे अनेक पैलू समजावून घेण्यात रस असणारा मोठा प्रेक्षकवर्ग महाराष्ट्रात आहे. हा वर्ग ‘सारांश’ कार्यक्रमाची वाट पाहत असे.

सांजसावल्या[संपादन]

‘सांजसावल्या’ ही दैनंदिन मालिका ‘युनिक’ने सलग दोनशे दिवस सादर केली. एका वृद्धाश्रमाची पार्श्वभूमी लाभलेली ही कथामालिका खूपच लोकप्रिय झाली होती. मराठीमधली पहिली मल्टिस्टार मालिका असं या मालिकेचं वर्णन केलं जाई. कारण नाटक, चित्रपट आणि टीव्ही या तीनही माध्यमांत गाजलेले कलावंत ‘सांजसावल्या’मध्ये अभिनय करत होते. ही मालिका बंद झाल्यानंतरही दीर्घकाळ प्रेक्षकांच्या मनात रेंगाळत राहिली. याशिवाय ‘थेटभेट’(सूत्रधार - सुधीर गाडगीळ व चंद्रकांत कुलकर्णी) हा कार्यक्रम, तसेच कथात्मक मालिकांची निर्मितीही ‘युनिक’ने केली. दृकश्राव्य माध्यमात टीव्हीपलिकडेही खूप मोठ्या प्रमाणात ‘युनिक’नं काम केलं आहे. ‘आक्सफॅम’साठी मराठवाड्यातील पाणी प्रश्नाचं शोध घेणारी ‘एक थेंब पाणी’,‘बाएफ’साठी भारतातील पाच राज्यांतील अति गरीब लोकांच्या परिस्थितीचा अभ्यास करणारी डॉक्युमेंट्री, आणि ‘यशदा’साठी पोपटराव पवार यांच्या कामाची ओळख करून देणारी डॉक्युमेंट्री या काही निवडक डॉक्युमेंट्रीज.