सदस्य:Shankarrao Bhaurao Yeole

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

◆ शं. भा. येवले म्हणजेच शंकरराव भाऊराव येवले हे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील एक स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ पत्रकार, लेखक, समाजसेवक होते.

शंकरराव भाऊराव येवले यांची माहिती :-

● जन्म :- १२ सप्टेंबर १९२७. (करमाळा येथे)

● मृत्यू :- २४ जून २०१२. (सोलापूर येथे)

● शिक्षण :- जुनी मॅट्रिक, लायब्ररीयन ट्रेनिंग कोर्स.

● भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील सहभाग :- विद्यार्थी दशेत असतानाच कोवळ्या वयात १९४२ सालच्या चलेजावच्या चळवळीत शंकरराव येवले सक्रिय झाले. नंतर पुढे सन १९४६ ते सन १९४८ दरम्यान हैद्राबाद मुक्ती आंदोलनात शंकरराव सक्रिय होते. हैद्राबाद मुक्ती आंदोलनात काही दिवस भूमिगत राहून देखील त्यांनी कार्य केले.

● पत्रकारिता :- ३१ जुलै १९४७ रोजी साप्ताहिक भारती मध्ये 'स्वागताला तयार राहा' हा शंकरराव येवलेंचा पहिला लेख छापून आला आणि याच दिवसापासून त्यांची पत्रकारिता सुरू झाली. साप्ताहिक भारती, साप्ताहिक संयुक्त महाराष्ट्र, दैनिक नवशक्ती या वृत्तपत्रांचे पत्रकार म्हणून त्यांनी काम सुरू केले. दरम्यान १९४८ साली त्यांना करमाळा नगर परिषदेत लिपिक म्हणून नोकरी मिळाली. पुढे १९४९ साली करमाळा नगर परिषदेच्या ज्ञानेश्वर वाचन मंदिर या ग्रंथालयाची स्थापना झाल्यानंतर त्यांच्याकडे ग्रंथपाल पद सोपविण्यात आले. पण नगर परिषदेतील नोकरीमुळे मुक्तपणे पत्रकारिता करताना अडचणी येऊ लागल्यामुळे त्यांनी १९५३ साली ग्रंथपाल पदाचा राजीनामा देऊन पूर्णवेळ पत्रकारिता सुरू केली. सन १९४७ ते सन १९६० या कालावधीत शंकरराव येवलेंनी साप्ताहिक भारती, साप्ताहिक संयुक्त महाराष्ट्र, दैनिक नवशक्ती, दैनिक नवाकाळ, लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या दैनिक केसरी, आचार्य प्र. के. अत्रेंच्या दैनिक मराठा या तत्कालीन आघाडीच्या वृत्तपत्रांचे पत्रकार म्हणून काम केले. आचार्य अत्रेंनी तर शंकररावांना १९५७ साली आपल्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर आग्रहाने बोलावून घेतले होते. कारण सोलापूर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांची आणि जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीची सखोल माहिती आपल्याला शंकरराव येवलेंशिवाय इतर कोणाकडून मिळणार नाही असा आचार्य अत्रेंचा विश्वास होता. पुढे १९६१ साली पत्रमहर्षी रंगा वैद्य यांनी सोलापूर येथे दैनिक संचार हे वृत्तपत्र सुरू केल्यानंतर शंकरराव येवलेंनी या वृत्तपत्राचे पत्रकार म्हणून काम सुरू केले. त्याच दरम्यान दैनिक तरुण भारत या वृत्तपत्राचे पत्रकार म्हणून देखील त्यांनी काही काळ काम केले. पण रंगा वैद्य यांच्या दैनिक संचार या वृत्तपत्रात त्यांनी प्रदीर्घकाळ काम केले. त्याचबरोबर साप्ताहिक सल्ला हे करमाळा तालुक्यातील पहिले साप्ताहिक शंकरराव येवलेंनी सुरू केले. या साप्ताहिकाचा पहिला अंक २० ऑक्टोबर १९६९ रोजी प्रकाशित झाला. हे साप्ताहिक सन १९६९ ते सन १९८० या कालावधीत आणि नंतर पुढे सन २००३ ते सन २००८ या कालावधीत नियमितपणे प्रकाशित होत. सन १९४७ ते सन २००८ या शंकरराव येवलेंच्या ६१ वर्षांच्या पत्रकारितेच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांचे हजारो संशोधनात्मक लेख, टीकात्मक लेख व ललीत लेखन विविध वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले. स्थानिक पातळीवरील विषयांपासून ते राष्ट्रीय पातळीवरील विविध विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्ण लेख लिहिले. आपल्या अतिशय परखड आणि निर्भीड लेखणीमुळे शंकरराव येवलेंना सोलापूर जिल्ह्यात प्रचंड प्रसिद्धी मिळाली. सोलापूर जिल्ह्यातील खासकरून करमाळा तालुक्यातील हजारो वंचित, गरीब, निरक्षर लोकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सतत आवाज उठवून पीडितांना न्याय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.

● प्रकाशित पुस्तके :-

१) सोलापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्यलढा - शं. भा. येवले. (सन १९९४)

२) जय अंबे कमलाभवानी - शं. भा. येवले. (सन १९९५)

● भूषविलेली पदे :-

१) पहिले ग्रंथपाल - ज्ञानेश्वर वाचन मंदिर, करमाळा नगर परिषद.

२) अध्यक्ष - सोलापूर जिल्हा भूमिगत स्वातंत्र्यसैनिक संघटना.

३) पुणे विभागीय सदस्य - पत्रकार अधिस्वीकृती समिती, महाराष्ट्र शासन.

४) विशेष कार्यकारी दंडाधिकारी (ऑनरेरी मजिस्ट्रेट) - महाराष्ट्र शासन.

५) उपाध्यक्ष - सोलापूर जिल्हा पत्रकार संघ.

६) अध्यक्ष - सोलापूर जिल्हा पत्रकार संघ.

७) कार्याध्यक्ष - पुणे विभागीय पत्रकार प्रबोधन शिबीर, करमाळा.

८) उपाध्यक्ष - अखिल भारतीय शाहीर परिषद, सोलापूर शाखा.

९) सचिव - राष्ट्रीय एकात्मता समिती, करमाळा.

१०) अध्यक्ष - अन्याय निवारण समिती, करमाळा.

११) अध्यक्ष - श्री कमलाभवानी देवस्थान ट्रस्ट, करमाळा.

१२) संस्थापक/व्हाईस चेअरमन - श्री कमलादेवी औद्योगिक सहकारी वसाहत, करमाळा.

१३) चेअरमन - श्री कमलादेवी औद्योगिक सहकारी वसाहत, करमाळा.

१४) सदस्य - स्वातंत्र्यलढा इतिहास संशोधन व लेखन समिती, सोलापूर.

१५) सदस्य - शहर दक्षता समिती, करमाळा.

१६) सदस्य - भ्रष्टाचार निर्मुलन समिती, करमाळा.

● मिळालेले पुरस्कार :-

१) भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल करमाळा नगर परिषदेचा 'नगरभूषण' पुरस्कार. (सन १९७०)

२) बिहार सरकारच्या वृत्तपत्र स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या नियोजित विधेयकाविरुद्ध सोलापूर येथील सत्याग्रहात सक्रिय भाग घेतल्याबद्दल सोलापूर जिल्हा पत्रकार संघाचे 'गौरव पत्र.' (सन १९८४)

३) पत्रकारितेच्या माध्यमातून केलेल्या प्रदीर्घ जनसेवेबद्दल आणि पत्रकारितेतील ४० वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीबद्दल करमाळा नगर परिषदेचा 'आदर्श पत्रकार' पुरस्कार. (सन १९८७)

४) रोपळे, माढा येथील कै. पां. ना. तथा राजाभाऊ कुलकर्णी (रोपळेकर) प्रतिष्ठानचा 'आदर्श पत्रकार' पुरस्कार. (सन १९९४)

५) भारतीय स्वातंत्र्य संग्रामात केलेल्या कामगिरीच्या गौरवार्थ महाराष्ट्र शासनाचे 'सन्मान पत्र.' (सन १९९७)

६) भारतीय स्वातंत्र्य संग्रामात केलेल्या कामगिरीच्या गौरवार्थ सोलापूर ग्रामीण बँकेचे 'स्वातंत्र्यसैनिक - सन्मान पत्र.' (सन १९९७)

७) भारतीय स्वातंत्र्य संग्रामात केलेल्या कामगिरीच्या गौरवार्थ नवी दिल्ली येथील अखिल भारतीय स्वातंत्र्य संग्राम सेनानी समितीचे 'गौरव पत्र.' (सन २००१)

८) सोलापूर येथील देशभक्त डॉ. कृ. भी. अंत्रोळीकर स्मृती न्यासचा 'गजनफरकार हुतात्मा ए. कुर्बान हुसेन उत्कृष्ट पत्रकार' पुरस्कार. (सन २००२)

९) भारतीय स्वातंत्र्य संग्राम, सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्र आणि करमाळा तालुक्यातील सांस्कृतिक, सामाजिक, औद्योगिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल करमाळा तालुका पत्रकार संघाचे 'मानपत्र.' (सन २००३)

१०) जामखेड येथील मानव सेवा ट्रस्टचा 'आदर्श मानव' पुरस्कार. (सन २००६)

११) पत्रकारितेतील ६० वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीबद्दल नवी दिल्ली येथील गांधी फोरम या केंद्रीय स्तरावरील संघटनेचा 'पत्रमहर्षी स्व. रंगा वैद्य' स्मृती पुरस्कार. (सन २००७)

१२) भारतीय स्वातंत्र्य संग्रामात केलेल्या कामगिरीच्या गौरवार्थ अकलूज ग्रामपंचायत आणि अकलूज येथील संग्रामसिंह मोहिते-पाटील मित्र मंडळाचे 'सन्मानचिन्ह.' (सन २००९)

१३) ग्रंथपाल दिन व डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त करमाळा नगर परिषदेचा 'आदर्श समाजसेवक' पुरस्कार. (सन २०१०)

१४) सोलापूर येथील लोकमंगल प्रतिष्ठान व सोलापूर श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आलेला 'लोकमंगल जीवन गौरव' पुरस्कार. (सन २०१२)

● गौरवोद्गार :-

१) शंकरराव येवलेंमुळे आपले हात बळकट झाले आहेत.

 - पत्रमहर्षी रंगा वैद्य, सोलापूर.

२) सोलापूर जिल्ह्याच्या पत्रकारितेचा इतिहास लिहिताना शंकरराव येवलेंच्या कर्तृत्वाच्या माहितीसाठी एक प्रकरण राखून ठेवावं लागेल.

 - डॉ. निर्मलकुमार फडकुले, सोलापूर.

३) धडपडणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांना विश्वासाने मान टेकवता यावी असे शंकरराव येवलेंचे मजबूत खांदे सदैव आधार देत आले आहेत.

 - पन्नालाल सुराणा, बार्शी.

४) प्रखर इच्छाशक्ती असलेला मनुष्य परिस्थितीच्या रेट्यामुळे मागे पडत नाही अडचणीतूनही तो मार्ग काढतोच.. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शंकरराव येवले.

 - द. प्र. तथा दादासाहेब नाईकनवरे, पुणे.

● कौटुंबिक माहिती :-

१) वडील - भाऊराव लक्ष्मणराव येवले.

२) आई - उषाबाई भाऊराव येवले.

३) पत्नी - मिनाक्षी शंकरराव येवले.

४) अपत्ये - अभय, संजय, उदय, विवेक.

५) भावंडे - विष्णू भाऊराव येवले (गुरुजी) सोलापूर, चंद्रकांत भाऊराव येवले (सर) सोलापूर.