सदस्य:Rtpcr999

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पंजाबमधील असंतोष[संपादन]

पंजाब राज्यात अकाली दल हा प्रमुख राजकीय पक्ष होता. १९७३ मध्ये अकाली दलाने ‘आनंदपूर साहिब’ ठराव मंजूर केला. त्यानुसार चंदीगढ पंजाबला द्यावे, इतर राज्यांतील पंजाबी भाषिक प्रांत पंजाबमध्ये समाविष्ट करावेत, सैन्यामधील पंजाबचे संख्याप्रमाण वाढवावे, पंजाब राज्यास अधिक स्वायत्तता द्यावी अशा अनेक गोष्टींची मागणी या ठरावात होती. १९७७ मध्ये अकाली दल पंजाबमध्ये सत्तेवर आला. अकाली दलाने सत्ता घेताना जुन्या मागण्यांबरोबर पंजाबला नदी पाणीवाटपात पाणी वाढवून द्या, अमृतसर शहराला पवित्र शहर किताब द्या अशा मागण्या केल्या. १९८० मध्ये पंजाबमध्ये ‘स्वतंत्र खलिस्तान’ या चळवळीने मूळ धरले. या काळात अकाली दलाचे नेतृत्व संत हरचरणसिंग लोंगोवाल करत होते. ते सुवर्ण मंदिरात बसून आपल्या कार्यकर्त्यांना निदर्शने करण्याच्या सूचना देत होते. सुवर्णमंदिराच्या दुसऱ्या बाजूस कट्टर खलिस्तानवादी जर्नेलसिंग भिंद्रानवाले याच्याभोवती सशस्त्र अनुयायी गोळा होऊ लागले. या काळात दहशतवादी अतिरेकी कारवायांना सुरुवात झाली. १९८१ मध्ये संपादक लाला जगतनारायण यांच्या खून प्रकरणी भिंद्रानवाले यास अटक झाली. येथून पुढे वातावरण अधिक चिघळत गेले. यातूनच १९८३ मध्ये पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. भिंद्रानवाले अकाल तख्त या धार्मिक स्थळी राहायला गेला. भिंद्रानवालेच्या अनुयायांनी सुवर्णमंदिर परिसर आपल्या ताब्यात घेऊन तेथे वाळूची पोती रचली. परिसराला किल्ल्याचे स्वरूप आले. यामुळे पंजाबातील शांतता धोक्यात आली. लोकशाहीसमोर हे मोठे आव्हान होते.