सदस्य:NiTiN BIRGAD

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्रिकेट हा क्रिकेट मैदानावर प्रत्येकी ११ खेळाडूंच्या दोन संघांमध्ये, चेंडू(बाॅल) आणि फळी (बॅट) ने खेळला जाणारा मैदानी खेळ आहे. क्रिकेटच्या मैदानाच्या मध्यभागी एक २२-यार्ड लांबीची मुख्य खेळपट्टी असते. तिच्या दोन्ही टोकांना प्रत्येकी ३ लाकडी यष्टी असतात. एक संघ फलंदाजी संघ म्हणून खेळतो. हा संघ जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करतो, आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ क्षेत्ररक्षण करतो. खेळाच्या प्रत्येक टप्प्याला डाव असे म्हणतात. संघाचे दहा फलंदाज बाद झाल्यानंतर किंवा निर्धारित षटके पूर्ण झाल्यानंतर दोन्ही संघ आपापली भूमिका बदलतात. एका किंवा दोन डावांत अतिरिक्त धावा मिळून ज्या संघाची धावसंख्या जास्त असेल तो विजेता संघ म्हणून घोषित होतो.

प्रत्येक सामन्याच्या सुरुवातीला, दोन फलंदाज आणि अकरा क्षेत्ररक्षक खेळाच्या मैदानात उतरतात. क्षेत्ररक्षण करणार्‍या संघातील [गोलंदाज] खेळपट्टीच्या एका टोकापासून, दुसर्‍या टोकाला असलेल्या फलंदाजाकडे (या फलंदाजाला स्ट्रायकर म्हणतात.) जेव्हा चेंडू फेकतो, तेव्हा खेळाला सुरुवात होते. स्ट्रायकर खेळपट्टीवर यष्टीसमोर चार फुटांवर क्रीजमध्ये उभा राहतो. बॅटचा वापर करून चेंडू यष्ट्यांवर आदळण्यापूर्वी अडवणे आणि धावा करता येण्याइतपत टोलवणे ही फलंदाजाची भूमिका असते. दुसरा फलंदाज (नॉन-स्ट्रायकर), खेळपट्टीच्या दुसर्‍या टोकाला गोलंदाजाजवळ क्रीजच्या आतमध्ये उभा राहतो. बाद झालेल्या फलंदाजाला मैदान सोडावे लागते, आणि त्याच्या संघातील दुसरा खेळाडू त्याची जागा घेतो. फलंदाजाला धावा करू न देणे आणि त्याला बाद करणे ही गोलंदाजाची उद्दिष्ट्ये असतात. एकाच गोलंदाजाने एका मागोमाग एक सहा वेळा चेंडूफेक केल्यानंतर चेंडूफेकीचे एक षटक पूर्ण होते. त्यानंतरचे षटक दुसरा गोलंदाज, खेळपट्टीच्या दुसर्‍या बाजूने टाकतो.

"क्रिकेट" ह्या संज्ञेबद्दल अनेक शब्द स्त्रोत म्हणून सुचवले गेले आहेत. खेळाबद्दल सर्वात आधीचा निश्चित संदर्भ मिळतो तो १५९८ मध्ये, जेव्हा खेळाला creckett म्हटले जात असे. जुन्या इंग्रजी भाषेत नावाचा एक संभाव्य स्त्रोत आहे, cricc किंवा cryce म्हणजेच crutch किंवा काठी. इंग्लिश लेखक सॅम्युएल जॉन्सनच्या शब्दकोशामध्ये, त्याने "cryce, Saxon, a stick" वरुन क्रिकेट हा शब्द तयार केला.जुन्या फ्रेंच भाषेत, criquet ह्या शब्दाचा अर्थ एका प्रकारची छडी किंवा काठी असा असावा असे दिसते. दक्षिण-पूर्व इंग्लंड आणि बूर्गान्यच्या सरदाराच्या ताब्यातील मुलूख आणि तेव्हाचा फ्लँडर काऊंटी यांच्यामध्ये असलेल्या घनिष्ट मध्ययुगीन व्यापारासंबंधावरुन, असे दिसते की हे नाव मिडल डच वरुन घेण्यात आले असावे krick(-e), म्हणजे बाक असलेली काठी. आणखी एक संभाव्य स्त्रोत म्हणजे मिडल डच शब्द krickstoel, म्हणजे चर्च मध्ये गुडघे टेकवण्यासाठी वापरले जाणारे लांब कमी उंचीचा स्टूल किंवा बाक, ज्याचे साम्य पुर्वी क्रिकेटमध्ये वापरल्या जाणार्‍या दोन यष्टी असणारी लांब खेळपट्टीशी होते. बॉन विद्यापीठातील युरोपीय भाषांचे तज्ञ हेनर गिलमेइस्टरच्या मते, हॉकी साठी वापरला जाणारा वाक्प्रचार met de (krik ket)sen (अर्थात, "काठीसह पाठलाग") ह्यावरुन "cricket" हा शब्द घेतला गेला असावा.