सदस्य:Gawas Deepti

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पूजा धांडा[संपादन]

पूजा धांडा (जन्म १ जानेवारी १९९४) ही हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील बुदाना गावातील एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू/पैलवान आहे. पूजाने बुडापेस्ट येथे झालेल्या २०१८च्या विश्व चॅम्पियनशिप मध्ये ५७ किलो वजनगटात कांस्यपदक पटकावले होते. तिने २०१०च्या उन्हाळी युवा ऑलम्पिकमध्ये आणि २०१८ मधील गोल्डकोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल खेळांमध्ये अनुक्रमे ६० किलो आणि ५७ किलो वजनगटात रौप्य पदके जिंकली होती. २०१४च्या आशियाई कुस्ती स्पर्धेतही तिने कांस्य पदक जिंकले होते.[1] क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी भारत सरकारने तिला अर्जुन पुरस्कारने गौरविले आहे. [2]

वैयक्तिक जीवन आणि पार्श्वभूमी[संपादन]

पूजाच्या आईचे नाव कमलेश आहे आणि तिचे वडील अजमेर हे स्वतः एक अॅथलेट होते. [1] पूजा धांडाला कुस्तीमध्ये पाहिल्याच प्रयत्नात  यश प्राप्त झाले नाही. लहानपणापासूनच तिचा कल सर्वसाधारणपणे खेळांकडे आणि कुस्तीकडे होता, तरी सुरुवातीला तिने जुडोमध्ये यश मिळवले. २००७ मध्ये तिचे वय पाहता तिला दोन्हीपैकी कोणताही एक खेळ निवडायचा होता (कारण कुस्ती महासंघाद्वारे मान्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी एक विशिष्ट वय गाठावे लागते). आणि तेव्हा  पूजाने कुस्ती हा खेळ निवडला, आणि तिचा निर्णय सार्थ ठरवत राष्ट्रीय स्तरावर पदके जिंकून दाखवली. एवढेच नव्हे तर २००७ मध्ये हैदराबाद येथे आशियाई कॅडेट जुडो चॅम्पियनशिपमध्ये तिने तिचे पहिले कांस्य पदक मिळवले, आणि २००८ मध्ये तिने आणखीन चांगली कामगिरी करत त्याच स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. [3] [4]

एवढे यश संपादन करूनही भारताचे माजी कुस्तीपटू आणि प्रशिक्षक कृष्णा शंकर बिश्नोई यांनी तिला जुडोपेक्षा कुस्तीमध्ये करियर करण्याचा सल्ला दिला व त्याच दिशेने प्रोत्साहनसुद्धा दिले. पूजाने त्यांचा सल्ला ऐकला आणि २००९ मध्ये हिसार येथे सुभाष चंदर सोनी यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. [3]

त्यानंतर अगदी वर्षभरात पूजाने २०१० मध्ये सिंगापूरमधील समर युथ चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर यशाला गवसणी घातली. [3]

मग तिने २०१३च्या राष्ट्रीय चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात प्रसिद्ध कुस्तीपटू बबिता फोगाटला पराभूत करून सर्वांच्या आशा पल्लवित केल्या. त्यानंतर २०१४ मध्ये आशियाई चॅम्पिअनशिपमध्येही तिने कांस्यपदकाला गवसणी घातली. २०१५ ला अस्थिबंधाच्या दुखापतीमळे तिचा हा यशस्वी प्रवास जवळजवळ संपला होता. पण तिचे पालक आणि प्रशिक्षक कुलदीपसिंग बिश्नोई यांनी तिला खचू दिले नाही.[1] हे आव्हान फक्त मानसिक नव्हते तर आर्थिक अडचणींचेसुद्धा. तिच्यावर मुंबईत अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या आणि त्यानंतर पुनर्वसनासाठी बराच काळ लागणार होता. सरकारने तिच्या उपचाराचा खर्च उचलला मात्र त्यानंतरचा पुर्नवसनाचा खर्च, फिजिओथेरपींची फी आणि भाडे, असे अनेक अडथळे तिच्यापुढे होते. पूजा तेव्हा हरियाणा क्रिडा विभागात कुस्ती प्रशिक्षक म्हणून कार्यरत होती, मात्र ती विनापगार रजेवर होती.[3][1]

व्यावसायिक यश[संपादन]

२००९ मध्ये कुस्तीकडे वळल्यानंतर पूजाचे पहिले आंतराष्ट्रीय यश २०१०च्या युवा ऑलम्पिकमध्ये ६० किलो वजन गटात आले. [1]

२०१३ मध्ये तिने प्रथमच जागतिक कुस्ती स्पर्धेत भाग घेतला, पण पहिल्या फेरीत पराभवानंतर ती बाहेर पडली. [1]

मात्र, त्यानंतर त्याच वर्षी तिने बबिता फोगाटचा पराभव करत राष्ट्रीय कुस्ती जेतेपद पटकावले.

पुरस्कार[संपादन]

२०१४ मध्ये अस्ताना येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत तिने कांस्यपदक पटकावले. [1]

२०१७ मध्ये पूजाने नॅशनल चॅम्पिअनशिपच्या रिंगणात  विजयासह शानदार पुनरागमन केले.

२०१८च्या प्रो-रेसलिंग लीगच्या तिसऱ्या पर्वात तिने ऑलम्पिक चॅम्पियन हेलन मारौलिस हिचा पराभव केला. त्यानंतर तिने राष्ट्रकुल खेळांमध्ये रौप्यपदक आणि त्याच वर्षी जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक जिंकले. [1]

खेळातील या उत्कृष्ट कामगिरीसाठी पूजाला २०१९ मध्ये भारताच्या प्रतिष्ठित अर्जुन पुरस्काराने [1] गौरविण्यात आले. [2]

वर्ष पदक कार्यक्रम स्थळ वजनी गट
२०१८ रौप्य राष्ट्रकुल खेळ गोल्डकोस्ट ५७ किलो
२०१८ कांस्य जागतिक स्पर्धा बुडापेस्टpestpest ५७ किलो
२०१७ कांस्य आशियाई इनडोअर आणि मार्शलआर्ट चॅम्पिअनशिप अशगाबात ५८ किलो
२०१४ कांस्य आशियाई कुस्ती स्पर्धा अस्ताना ५८ किलो
२०१० रौप्य युवा ऑलिंपिक खेळ सिंगापूर ६० किलो
पूजा धांडा
वैयक्तिक माहिती
Citizenship भारतीय
जन्म १ जानेवारी १९९४
बुदाना गाव, हिसार, हरियाणा
Sport
खेळ महिला फ्रीस्टाईल कुस्ती
Coached by सुभाष चंदर सोनी, कुलदीप बिश्नोई