Jump to content

सदस्य:Channvir Mallinath Gogaonkar

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दडकर, जया

दडकर, जयवंत केशव

संपादक, लेखक

३१ मे १९३५

जयवंत केशव दडकर यांचा जन्म शिरोडे या गावी झाला. त्यांचे शालान्त परीक्षेपर्यंतचे शिक्षण शिरोड्यालाच झाले. पुढे सिद्धार्थ महाविद्यालयामधून ते बी.ए. (१९५६) झाले. इतिहास हा त्यांचा विषय होता. १९५५ पासून १९८७ पर्यंत त्यांनी एका ब्रिटीश फर्ममध्ये नोकरी केली. वयाच्या ५२ व्या वर्षी ते स्वखुशीने सेवानिवृत्त झाले.

‘एक लेखक आणि एक खेडे’ हे त्यांचे पहिले पुस्तक १९७३ मध्ये प्रसिद्ध झाले. वि.स.खांडेकर यांची साहित्यिक म्हणून जी जडणघडण झाली, त्यात शिरोडे या गावाचा कसा वाटा आहे; याचे तपशीलवार चित्रण या पुस्तकात दडकरांनी केले आहे. पुढे २००१ साली त्यांनी खांडेकरांच्या जीवनचरित्राचा वेध घेऊन ‘सचित्र चरित्रपट’ ग्रंथ लिहिला. चिं.त्र्यं.खानोलकर हे दडकरांसाठी आणखी एक आदरणीय व्यक्तिमत्त्व होय. त्यांच्यासंबंधी त्यांनी अभ्यासू वृत्तीने सखोल संशोधन करून ‘खानोलकरांच्या शोधात’ (१९८३)[] हे पुस्तक लिहिले. या ग्रंथात त्यांनी लेखकाचे लौकिक चरित्र आणि मानस या दोघांचा व खानोलकरांच्या साहित्यिक व्यक्तिमत्त्वाचा अन्वयार्थ शोधण्याचा केलेला वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. खांडेकर आणि खानोलकर यांच्या व्यक्ती वैशिष्ट्याने दडकर झपाटून गेल्याचे दोन्ही ग्रंथांवरून जाणवते. त्याचप्रमाणे ‘वि.स. खांडेकर वाङ्मयसूची’ (१९८५), ‘काय वाट्टेल ते/ कीचकवधाचा तमाशा[]’ ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. लघुनियतकालिकांच्या चळवळीत लेखनाच्या रूपाने ते सहभागी झाले होते. संक्षिप्त मराठी वाङ्मयकोशाच्या संपादनात त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. याशिवाय, संपादित साहित्यात ‘श्री.दा. पानवलकर’ (१९८७), निवडक पत्रे: नरहर कुरुंदकर (१९९२), प्रकाशक रा.ज. देशमुख (१९९५) या पुस्तकांचा समावेश आहे.

खांडेकरांच्या चरित्रपटावरून त्यांचा छायाचित्रणाचाही छंद कलापूर्ण दृष्टीचा आहे, हे जाणवते. त्यांनी अनेक लेखकांना आपल्या छायाचित्रांच्या चौकटीत पकडले आहे. त्यांचा हा छायाचित्रणाचा छंद व मोजकेच पण दर्जेदार आगळ्यावेगळ्या स्वरूपाचे साहित्य यांसाठी ते साहित्यक्षेत्रात प्रसिद्ध आहेत.

- संपादक मंडळ

  1. ^ www.bookganga.com https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5512883579555787903. 2019-02-22 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ www.bookganga.com https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/4867694111544782909. 2019-02-22 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)