सदस्य:Bhaktiras
राष्ट्र अनेक समस्यांनी ग्रस्त असतांना क्रिकेटसामने पहाण्यात वेळ घालवणे, हा राष्ट्रद्रोहच !'
भारतात चालू असलेल्या आयपीएल् क्रिकेट स्पर्धेने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या स्पर्धेतील सामने रोमांचकारी होण्याबरोबरच यातील अर्थकारणाच्या घोटाळयामुळे क्रिकेटरसिकांच्या व्यतिरिक्त राजकारणी, अर्थकारणी आणि आतंकवादी यांचेही लक्ष या स्पर्धेकडे वळले आहे. अर्थकारणामुळे निर्माण झालेला ललित मोदी-शशी थरूर वाद सध्या गाजत असतांनाच काल चिन्नास्वामी स्डेडियमवर सामन्यापूर्वी केलेल्या बाँबस्फोटाद्वारे आतंकवाद्यांनी त्यांचा आयपीएल्मधील सहभाग दर्शवला. तसे पहायला गेल्यास प्रारंभीपासूनच या स्पर्धेला आतंकवाद्यांचा धोका होता; परंतु `आम्ही आतंकवाद्यांच्या धमक्यांना भीक घालत नाही आणि देशात सर्व काही सुरळीत चालू आहे', असे जनतेला दाखवण्यासाठी कडेकोट संरक्षणात प्रत्येक सामना भरवण्यात आला. हेच शासन कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल म्हणून हिंदूंना त्यांच्या सणांच्या दिवशी इतर धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवरून जाणार्या मार्गावरून मिरवणूक काढायला देत नाही. त्या वेळी पोलीस आणि शासन यांचे हे धाडस कोठे जाते ? आयपीएल् स्पर्धेमुळे काही जणांचे आर्थिक हित सांभाळले जाते आणि त्यासाठीच हे धाडस केले जाते. हे धाडस करण्यासाठी स्पर्धेतील सामन्यासाठी जमणार्या असंख्य भारतियांचे प्राण दावणीला बांधले जातात. भारतियांचे क्रिकेट वेड, हे राष्ट्राला अधोगतीकडे नेणारे ! गेला दीड महिना प्रत्येक दिवशी किमान दोन सामने भारतातील विविध राज्यांत भरवले जात आहेत. हे सामने सायंकाळी प्रकाशझोतात खेळवले जातात. आधीच भारतातील कित्येक घरांत वीज नाही. ज्यांच्याकडे आहे त्यांना ती भारनियमनामुळे काही तासच मिळते. विजेच्या तुटवड्यामुळे कित्येक उद्योगधंद्यांना आवश्यक प्रमाणात वीज मिळत नाही; परंतु क्रिकेटच्या उद्योगाला मात्र वीज मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. हे कसे ? शासनाकडे याचे उत्तर नाही. क्रिकेटच्या या उद्योगामुळे जनतेला किंवा देशाच्या विकासाला हातभार लागणे तर दूरच उलट राष्ट्राची अधोगती मात्र होते. गेला दीड महिना या स्पर्धेचे सामने पहाण्यात देशाचे मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात वाया गेले. ऐन परीक्षांच्या काळात सामने असल्यामुळे क्रिकेटच्या वेडापोटी कित्येक विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले, ते वेगळेच. प्रत्येक सामन्यात अर्धनग्न अवस्थेत हिडीसपणे नाचणार्या युवतींमुळे जे काही संस्कृतीहनन झाले, ते भरून न येण्यासारखे आहे. या स्पर्धेमुळे राष्ट्राला किमान आर्थिकदृष्ट्या लाभ होणे तर दूरच उलट सर्वच स्तरांवर राष्ट्राची हानी झाली, हेच खरे !
आयपीएल् ही क्रिकेटची सर्कस !' ऑस्ट्रेलियात प्रारंभी `पॅकर्स सर्कस' नावाने अशा प्रकारे व्यावसायिक स्तरावर क्रिकेटचे सामने भरवण्यात आले. पॅकर्सच्या या सर्कशीला बराच विरोध झाला. हीच सर्कस सध्या भारतात वेगळया तर्हेने भरत आहे. पॅकर्सनी या प्रकाराला `सर्कस' असे संबोधण्यामागे तसेच कारण आहे. सर्कशीत हत्ती, वाघ, सिंह, माकड यांसारखे प्राणी, विदूषक, रिंगमास्टर, तसेच उंचावर झोका घेणारे, एका चाकावर सायकल चालवणारे आदी त्यांचे कौशल्य दाखवतात आणि प्रेक्षक टाळया वाजवून त्यांना दाद देतात. आयपीएल् क्रिकेट सामन्यांमध्ये खेळणार्या खेळाडूंचीही अशीच स्थिती आहे. या स्पर्धेत खेळणार्या खेळाडूंना भारतातील काही धनाढ्यांनी अक्षरश: लिलावाद्वारे विकत घेतले आहे. पूर्वी खेळ हा मनाला विरंगुळा म्हणून, तसेच थोडाफार शारीरिक व्यायाम म्हणून खेळला जायचा. आज खेळामागचा मूळ उद्देश दुर्लक्षिला जात आहे. त्यामुळेच क्रिकेट हा व्यापारी नफा कमावण्यासाठीचे साधन बनले असून त्याला आमचे क्रिकेटवीर बळी पडत आहेत. क्रिकेटच्या या व्यापारात ललित मोदींनी चांगलेच यश प्राप्त केले; परंतु ते नैतिकता आणि औचित्य विसरले. त्यामुळे त्यांच्या व्यवहाराविषयी त्यांच्या विरोधकांनी शंका उपस्थित केली आणि मोदींच्या कार्यालयांवर प्राप्तीकर खात्याच्या धाडी पडल्या. कोणतीही गोष्ट मर्यादेत आणि नैतिकतेला धरून करावी, हेच यातून शिकण्यासारखे.
राष्ट्र आतंकवादग्रस्त असतांना, भ्रष्टाचाराने कळस गाठलेला असतांना, महागाईमुळे सामान्य जनतेला जिणे असह्य झाले असतांना आणि अशा असंख्य समस्यांनी देश जळत असतांना देशात आयपीएल्चे सामने भरवले जाणे आणि भारतियांनी ते पहाणे यासारखा राष्ट्रद्रोह तो कोणता ?