सदस्य:Avinashghatage/s1
Appearance
भंडार्याचे गाव पट्टणकोडोली विठ्ठल-बिरदेव चांगभलंचा अखंड जयघोष, खारीक-भंडाऱ्याची उधळण, कैताळ-हलगीचा निनाद अशा वातावरणात विठ्ठल-बिरदेव यात्रेला प्रारंभ होतो. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश आदी राज्यांतून आलेले लाखो भाविक भंडा-यामध्ये न्हाऊन निघत विठ्ठल-बिरदेवाचे दर्शन घेतात. हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील विठ्ठल-बिरदेवाची यात्रा चार दिवस भरते. धनगर समाजाचे विविध राज्यांतील भक्तगण पट्टणकोडोली येथे लाखोंच्या संख्येने दाखल झालेले असतात. धार्मिक परंपरेनुसार यात्रेला प्रारंभ होतो. सकाळी मानाच्या तलवारीचे पूजन चावडीवर होते. गावातील विविध जाती जमातीचे आणि धनगर समाजाचे पंच आदींचा लवाजमा फरांडे बाबांच्या भेटीसाठी वाजतगाजत निघतो. प्रथेप्रमाणे विविध मंदिरांना भेटी देत भक्तगणांचा मेळा दगडी गादीजवळ दाखल होतो. फरांडे बाबा विराजमान झालेले असतात. मानक-यांनी त्यांना आलिंगन देऊन मंदिरात येण्याची विनवणी करतात. त्यानंतर पुन्हा सर्वजण सवाद्य मिरवणुकीने मंदिराकडे निघतात. या वेळी फरांडे बाबांच्या पोटावर तलवारीने वार करत हेडामनृत्य बाबांच्या जयघोषात पार पडते. या वेळी भंडाऱ्याची मुक्तहस्ताने उधळण करत अवघा परिसर पिवळाधम्मक होतो. परंपरेप्रमाणे बाळलोकर, खारीक, पैसे यांचीही उधळण करण्यात येते. मंदिरात पोहोचल्यानंतर पूजाविधी झाल्यानंतर भाकणुकीचा कार्यक्रम पार पडतो.