सदस्य:Ajoharapurkar

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फादर वालेस[संपादन]

फादर वालेस हे एक प्रख्यात गणित शिक्षक आणि गुजराती लेखक होते. ते स्पेन देशातून जेसुइट ख्रिस्ती पंथाचे मिशनरी म्हणून भारतात आले आणि वृद्धापकाळापर्यंत गुजरातमधील अहमदाबाद येथे राहिले. त्यांनी अनेक गुजराती पुस्तके लिहिली आहेत. आचार्य काकासाहेब कालेलकर यांच्याप्रमाणे मातृभाषा गुजराती नसतांनाही गुजराती भाषेचे लोकप्रिय आणि श्रेष्ठ लेखक होण्याचे मान त्यांना मिळाला होता.फादर कार्लोस वालेस यांचा जन्म चार नोव्हेंबर १९२५ मध्ये स्पेनमध्ये झाला. त्यांचे वडील एक प्रख्यात इंजिनीअर होते, त्यांनी बांधलेली मोठी धरणे आजही स्पेनमध्ये अभिमानाने दाखविली जातात. तर त्यांचे मातामह स्पेनचे सरन्यायाधीश होते. अशा कुटुंबावर अचानक नियतीचा घाला पडला आणि त्यांचे वडील हृद्रोगाच्या झटक्याने मरण पावले. त्यावेळी फादर वॅलेस दहा वर्षांचे होते. त्यानंतर स्पेनचे यादवी युद्ध सुरु झाले. आणि त्यांच्या आईला दोन मुलांना घेऊन नेसत्या कपड्यानिशी घरदार सोडून जावे लागले. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी स्वखुशीने जेसुइट मिशनरी होण्याची दीक्षा घेतली, आणि तिथल्या मठात त्यांचे शिक्षण सुरु झाले. १९४९ मध्ये त्यांना मिशनने भारतात पाठवले, मद्रासच्या मिशन कॉलेजमध्ये त्यांनी गणिताचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. आणि मग गुजरातमधील आणंद येथील वल्लभ विद्यानगर या विद्यापीठनगरीत ते गुजराती शिकले, आणि त्यानंतर त्यांचे धर्मशिक्षण चार वर्षे पुण्याच्या सेमिनरीत झाले १९६० मध्ये त्यांनी सेंट झेवियर कॉलेज या अमदावादला नवीनच उघडलेल्या महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक म्हणून कारकीर्द सुरु केली. आज त्यांच्या हाताखाली शिकलेल्या तीन पिढ्या गुजरातमध्ये त्यांचे ऋण बाळगत आहेत. त्यासोबतच त्यांनी गुजरातीत ललित साहित्य लिहिणे सुरु केले. आणि गुजराती साहित्यातील सर्वोच्च असा रणजितराम सुवर्णचंद्रक पुरस्कार त्यांना मिळाला. त्याशिवाय अनेक साहित्यविषयक पुरस्कार त्यांना मिळाले. गणित आणि ललित साहित्य या तशा परस्परविरोधी भासणाऱ्या विषयांमध्ये ते आजतागायत गुजरातीतील सर्वात लोकप्रिय लेखक आहेत. निवृत्तीनंतर आता ते मिशनच्या नियमाप्रमाणे स्पेनला परत गेले आणि तिथेच त्यांचे देहावसान झाले. फादर वालेस जेव्हा वल्लभ विद्यानगर (आणंद, गुजरात) येथे गुजराती शिकायला गेले तेव्हा त्यांना विद्यार्थी म्हणून विद्यापीठाच्या वसतिगृहात राहावे लागले. तिथे त्यांच्या खोलीत सोबत होते हरकिशन बेचरलाल शाह नावाचे एक विद्यार्थी. खंबात या गुजरातमधील गावातील हा हा विद्यार्थी खूप धार्मिक आणि नित्यनियमांचे पालन करणारा होता. असे वॅलेस यांनी नमूद केले आहे. त्यांनी म्हटले आहे की त्याच्या सान्निध्यामुळे भारतीय धर्मांचा आणि संस्कारांचा खूप खोलवर आणि चांगला प्रभाव पडला. या मित्राच्या निर्मळ, साध्या सरळ, आणि मोकळ्या वागणुकीने धर्माच्या आचारांचे रोजच्या जीवनात कसे पालन करावे ते फादर वॅलेस यांना कळले. अगदी निर्जळी उपवास करूनही या मित्राच्या चित्तवृत्ती अगदी प्रसन्न असल्याचे पाहून फादर वॅलेस यांना कुतूहलमिश्रित आश्चर्य वाटले होते. त्यानंतर काही वर्षांनी त्यानंतर फादर वालेस यांनी हिंदू आणि जैन समाजांच्या अनेक धार्मिक आणि सामाजिक संमेलनांमध्ये जाहीर व्याख्याने दिली. या प्रसंगांचे वर्णन करताना फादर वॅलेस यांनी एका ठिकाणी म्हटले आहे की विविध धर्मांच्या अनुयायांचा एकमेकांशी रीतसर संवाद होणे गरजेचे आहे. त्यातूनच मैत्रीचा जन्म होतो. “आत्मकथाना टुकडा” (मराठीत आत्मकथेचा अंश)) हे फादर वॅलेस यांचे आत्मचरित्र त्यांच्या निर्मळ जीवनाचा आरसाच आहे.. संन्यासी म्हणजे त्यागाचे अवडंबर माजवणारा नसावा आणि संन्यास हा कसा सहजपणे अंगिकारला जातो याचे चित्रण या पुस्तकात दिसले. गुजराती समाज सनातनी आणि धार्मिक आहे. अशा समाजात एका ख्रिश्चन मिशनऱ्याने लोकांच्या हृदयावर अनेक दशके राज्य केले ही गोष्ट खरोखर प्रेमाशिवाय शक्य आहे का? आपल्या अहमदाबादच्या आयुष्यात फादर वॅलेस हे स्वतःच्या घरी किंवा कॉलेजच्या वसतिगृहात न राहता आळीपाळीने अनेक कुटुंबात राहिले. विशेष म्हणजे ही सगळी कुटुंबे हिंदू किंवा जैन होती. आणि त्यांनी या ख्रिस्ती मिशनऱ्याला अगदी घरच्या वडिलधाऱ्याप्रमाणे वागवले. या संपूर्ण पुस्तकात फादर वॅलेस यांची संन्यस्त वृत्ती ही “जलमे भिन्न कमल है” याप्रमाणे कशी होती हेच पदोपदी जाणवते. मिशनच्या कामाने किंवा गणिताच्या परिषदांसाठी त्यांना त्रिखंडात प्रवास करावा लागला. अशावेळी त्यांचे स्थानिक यजमान त्यांची मोठमोठ्या बादशाही हॉटेलांमध्ये सोय करत. अशा हॉटेलांमध्ये राहणे किंवा अगदी चटईवर झोपणे या दोन्ही स्थितींमध्ये त्यांच्या चित्तवृत्तितील समता आणि आनंद कधीच ढळला नाही. दुसरे म्हणजे त्यांची सेवावृत्ती. त्यांची आई वृद्ध झाल्यावर त्यांनी तिची सेवा केली. पण त्यात तिच्याविषयी ममता असली तरी त्यामुळे त्यांच्या मिशनरी वृत्तीला कुठेही बाधा पोचली नाही. ते त्यावेळी प्राध्यापकीतून निवृत्त झाले होते. त्यामुळे त्यांना मिशनच्या नियमाप्रमाणे मायदेशी जाणे भाग होते, मात्र तेव्हाही त्यांनी आपल्या मिशनची रीतसर परवानगी घेऊनच आपल्या आईची सेवा केली. त्यातही ती आपली आई आहे यापेक्षाही त्या माऊलीने आपल्याला अध्यात्माची गोडी लावली, संन्यासमार्गावर आनंदाने जाऊ दिले याची कृतज्ञताच अधिक दिसते. ईश्वरावरील श्रद्धेमुळे त्यांनी संन्यास घेण्याचा विचार केला तेव्हा त्यांच्या आईने आणि मोठ्या भावाने त्याला आनंदाने संमती दिली. अर्थात त्याला काळजीचा आणि प्रेमाचा अडसर आला नाही असे नाही. पण अंतरंगातून आलेली ही संन्यस्तवृत्ती ही किती मोलाची आहे हे त्या माऊलीने जाणले होते. त्याबद्दलची कृतज्ञता फादर वॅलेस यांनी व्यक्त केली आहे. संन्यस्त वृत्ती धारण करून सोडलेल्या घराची आणि संसाराची काळजी न करणे म्हणजे संन्यास. ही संन्यासातील ऋजुता त्यांच्या अंगी कशी होती ते या चरित्रातील घटनांवरून सहजच लक्षात येते. या आत्मचरित्रातील आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांची प्रासादिक गुजराती भाषा. इतकी रसाळ आणि प्रासादिक गुजराती भाषा वाचून खरोखर आनंद होतो. आत्मचरित्र असूनही अहंकाराचा वासही या पुस्तकाला येत नाही. फादर वालेस यांच्या भारतीय मित्र त्यांना म्हणत की ते पूर्वजन्मी भारतात जन्माला आले होते. आणि त्यांच्या पूर्वीच्या ऋणानुबंधानेच त्यांना या जन्मी भारतात खेचून आणले. ते जेव्हा आफ्रिका, अमेरिका, किंवा युरोपात गेले तेव्हा तिथल्या भारतीय समाजाने मोठ्या आपुलकीने त्यांचा सन्मान केला आणि त्यांनीही तिथे भारतीय संस्कृतीवर परिणामकारक व्याख्याने दिली. ख्रिस्ती मिशनरी भारतात इथल्या समाजाला बाटवण्यासाठी आले आणि येतात असा साधारण समज आहे, आणि त्याला काही अंशी पुरावेही आहेत. फादर वॅलेस यांनी एका ठिकाणी म्हटले आहे की एका माणसाला बाप्तिस्मा देऊन ख्रिस्ती बनवणे यामुळे तुम्ही कदाचित भारतातील समाजात तेढ निर्माण कराल. मात्र तुम्ही जर हिंदू समाजात शिक्षण आणि आरोग्याच्या प्रसारासाठी शाळा आणि इस्पितळे निर्माण करण्याची सवय लावली तर तुम्ही ख्रिस्ताचेच काम जास्त चांगले कराल असे मला वाटते. एकमेकांच्या श्रद्धा न सोडता इतरांचे चांगले ते घेऊन व्यक्ती आणि समाजाचे भले कसे करता येईल याचाच हा वस्तुपाठ आहे. फादर वॅलेस यांच्याविषयी काकासाहेब कालेलकरांनी म्हटले आहे, “इतर ख्रिस्ती मिशनरी हिंदूंना ख्रिस्ती बनवतात, तर फादर वॅलेस हिंदू लोकांना आपला धर्म न सोडता ख्रिस्तावर प्रेम करायला शिकवतात”. फादर वालेस यांच्या आत्मचरित्राचा मराठी अनुवाद अमित जोहरापूरकर यांनी "आत्मकथेचा अंश" या नावाने केलेला आहे.