Jump to content

सदस्य:सुबोध कुलकर्णी/धूळपाटी २५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मीना मंगेशकर-खडीकर या गायिका व भावगीतांच्या, बालगीतांच्या संगीतकार आहेत. मीना या मा. दीनानाथ व माई मंगेशकर यांच्या द्वितीय कन्या होत.

जन्म

[संपादन]

७ सप्टेंबर १९३१

बालपण

[संपादन]

मा. दीनानाथ यांनी मीना यांना बालवयातच शास्त्रीय संगीत शिकवायला सुरुवात केली.

शिक्षण

[संपादन]

मा. दीनानाथांनी रागदारी चिजांच्या लतासाठी व मीनासाठी अशा दोन वह्या तयार केल्या होत्या. मीना दहा वर्षांची असताना मा. दीनानाथांचे निधन झाले आणि त्यांच्या आयुष्यातील शास्त्रीय संगीत गायिका होण्याचे स्वप्न अपुरे राहिले. १९४२ सालच्या एप्रिल महिन्यात मा. दीनानाथांचे निधन झाले. मास्टर विनायकांच्या प्रफुल्ल चित्रपट कंपनीत लता यांना काम मिळाले आणि लतासह मंगेशकर कुटुंबीय कोल्हापूरला आले. लता मंगेशकरांनी तिथे मीना यांना शाळेत घातले. घरच्या परिस्थितीमुळे त्यांना पुढे कुणाकडे गाणे शिकणे शक्य झाले नाही; परंतु त्यांच्या आई, माईंच्या प्रोत्साहनामुळे, धाकामुळे घरी रियाझ सुरू होता.

कौटुंबिक माहिती

[संपादन]

१९६२ साली मीना मंगेशकरांचे लग्न झाले आणि त्यांना योगेश व रचना ही अपत्ये झाली.

कारकीर्द

[संपादन]

==


मा. विनायकांनी १९४५ साली कंपनी मुंबईला आणायचे ठरविले. त्यामुळे लताबरोबर मीनाही मुंबईला आल्या व मा. विनायकांच्या घरी राहू लागल्या. मा. विनायकांनी मीनास त्यांची मुलगी नंदाबरोबर बालमोहन शाळेत घातले. काही काळानंतर लता यांच्या वेगळ्या बिर्‍हाडाची सोय नाना शंकरशेट चौकात झाली आणि मग सारी मंगेशकर भावंडे माईंबरोबर एकत्र राहू लागली. तेवढ्यात १९४७ साली विनायकराव वारले आणि मंगेशकर कुटुंबीयांना पुन्हा दु:खद परिस्थितीला सामोरे जावे लागले. हळूहळू लता यांना पार्श्वगायनाच्या क्षेत्रात काम मिळू लागले. त्यानंतर लता मंगेशकरांनी मीनास पुन्हा बालमोहन शाळेतून काढून सेवासदन शाळेत घातले. ‘माझं बाळ’ या चित्रपटात मीना मंगेशकरांनी पहिल्यांदा गायन व अभिनय केला. त्यास दत्ता डावजेकरांचे संगीत होते. प्रभातफेरीच्या प्रसंगामध्ये लता, मीना, आशा, उषा व हृदयनाथ या सर्वांवर ‘चला चला नवबाला’ हे गाणे चित्रित करण्यात आले होते. या गाण्यामध्ये त्या पहिल्यांदा ‘कोरस’मध्ये गायल्या. त्यानंतर मधली काही वर्षे त्या चित्रपटात अजिबात गायल्या नाहीत; गाणे ऐकणे मात्र सुरू होते, आणि सकाळी तंबोर्‍यावर गाण्याचा रियाझ सुरू होता.

मा. विनायक गेल्यावर प्रफुल्ल कंपनीतील लोकांनी एक नवीन चित्रपट कंपनी काढली, तिचे नाव होते, ‘उदय कला चित्र’. या कंपनीमध्ये दिनकर द. पाटील, माधवराव शिंदे व इतर अनेक कलावंत होते. त्यांनी एक चित्रपट काढायचे ठरविले. त्याचे नाव होते, ‘राम राम पाव्हणं’, आणि त्याच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी लता मंगेशकरांवर सोपविली. या चित्रपटाच्या गीतकार शांताबाई शेळके या होत्या. या चित्रपटामध्ये लता यांच्या संगीत दिग्दर्शनात मीना खडीकरांनी दोन गाणी म्हटली. त्यांतील एक गाणे, ‘हात जोडिते, पदर पसरते, आई अंबिके तुला’ हे एकलगीत होते, तर दुसरे गाणे, ‘माझ्या शेतात सोनंच पिकतंय, पानापानांत लखलख करतंय’ हे द्वंद्वगीत मीना यांनी सी. रामचंद्र यांच्याबरोबर गायले होते. ही दोन्ही गाणी गाजली. पुढे मीना वसंत प्रभू, वसंत देसाई, शंकरराव कुलकर्णी, सी. बालाजी इ. संगीतकारांकडे गायल्या. ‘तारका’ या वसंत प्रभूंच्या चित्रपटात मीना खडीकर लता मंगेशकरांबरोबर द्वंद्वगीत गायल्या, तर संगीतकार वसंत पवार यांच्या संगीत दिग्दर्शनात, ‘गाठ पडली ठकाठका’ या चित्रपटात, ‘नको जाऊ नारी यमुनाकिनारी’ हे गीत लता व उषा यांच्यासमवेत गायल्या. ‘अंतरीचा दिवा’ या चित्रपटात मीना आपले धाकटे बंधू हृदयनाथ यांच्या संगीत दिग्दर्शनात गायल्या, तर ‘थोरातांची कमळा’ या चित्रपटात दत्ता डावजेकर यांनी त्यांच्याकडून एक गाणे गाऊन घेतले. ‘वसंत हसला’ (‘कांचनगंगा’, संगीत : वसंत देसाई), ‘बावरले मी बावरते’ (‘एक होता राजा’, संगीत : शंकरराव कुलकर्णी), ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ (‘कांचनगंगा’, संगीत : वसंत देसाई), ‘दयाळा तूच आता सांभाळ’ (‘संत भानुदास’, संगीत : सी. बालाजी), ‘माझं नाव शोभलं मैना’ (‘पाटलाचं पोर’, संगीत : वसंत प्रभू) ही मीना खडीकरांची काही गाजलेली चित्रपटगीते होत. पण नंतर त्यांनी पार्श्वगायन संपूर्ण सोडून दिले. लता आणि मीना यांच्या आवाजात कमालीचे साम्य आहे. त्यामुळे ‘पाटलाचं पोर’ या चित्रपटातील ‘माझं नाव शोभलं मैना’ ही लावणी अनेक लोकांना लता मंगेशकरांनी गायलेली आहे असे वाटते. पुढे त्या संगीत दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आल्या. माधवराव शिंदे यांच्या आग्रहामुळे ‘माणसाला पंख असतात’ या चित्रपटास त्यांनी संगीत दिले (१९६०). या चित्रपटात त्यांनी लता व हृदयनाथ यांचा आवाज पार्श्वगायनासाठी वापरला. या चित्रपटातील लता यांनी गायलेले ‘ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता’ हे गाणे आजही लोकप्रिय आहे. मुले थोडी मोठी झाल्यावर त्यांनी पुन्हा संगीत क्षेत्राकडे वळायचे ठरविले आणि विशेषत: बालगीतांच्या क्षेत्रात कार्य केले. राजा मंगळवेढेकर, मंगेश पाडगावकर, शांता शेळके यांची बालगीते मीना खडीकरांनी निवडली आणि मुलगा योगेश, मुलगी रचना आणि शमा खळे (संगीतकार श्रीनिवास खळे यांची मुलगी) यांच्याकडून ती गीते बसवून घेतली. ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’, ‘कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा’, ‘सांग सांग भोलानाथ’, ‘खोडी माझी काढाल तर’, इत्यादी बालगीते ध्वनिमुद्रित झाली आणि ती लोकप्रियही झाली. आज लहान मुलांची तिसरी पिढीसुद्धा ही गाणी आवडीने ऐकते. बालगीतांबरोबर मीना खडीकर यांनी काही भावगीतांनासुद्धा संगीत दिले आहे. त्यांची बहुतांश भावगीते उषा मंगेशकरांनी गायलेली आहेत. ‘साजणी सई ग’, ‘तू नुसता मजसंगे’, ‘कान्हु घेऊन जाय’ ही उषा यांनी गायलेली भावगीते मीना खडीकरांनी स्वरबद्ध केलेली आहेत. ‘मनी जे दाटले’, ‘आनंदघन क्षणाचा’ ही गाजलेली भावगीते त्यांनी प्रसिद्ध गायक श्रीकांत पारगावकर यांच्याकडून गाऊन घेतलेली आहेत. मीना खडीकर यांनी मराठीव्यतिरिक्त हिंदी, पंजाबी व बंगाली भाषांत गीते गायलेली आहेत. ‘रथ जगन्नाथाचा’ या चित्रपटाला त्यांनी संगीत दिले. त्यातील सुरेश वाडकरांच्या एका गाण्याला राज्य सरकारचा त्या वर्षीचा उत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळाला. त्याच चित्रपटात मीना यांनी हिंदीतील पार्श्वगायक शैलेन्द्रसिंग यांच्याकडून मराठी भाषेत एक गीत गाऊन घेतले. आजचे तरुण गायक शान, सागरिका, दुर्गा व शारंगदेव जसराज, साधना सरगम इत्यादींकडून मीना खडीकरांनी ते लहान असताना अनेक बालगीते गाऊन घेतली आहेत. — अद्वैत धर्माधिकारी संदर्भ : १. धर्माधिकारी, अद्वैत; मीना मंगेशकर-खडीकर यांची मुलाखत, ‘स्वरप्रतिभा’ दिवाळी अंक; २००६.