Jump to content

सदस्य:शंकरराव येवले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शंकरराव येवले हे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील एक स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ पत्रकार होते.

शंकरराव येवले यांची माहिती :-

• पूर्ण नाव - शंकरराव भाऊराव येवले. (शं. भा. येवले)

• जन्म - १२ सप्टेंबर १९२७. (करमाळा, ब्रिटिश भारत)

• मृत्यू - २४ जून २०१२. (सोलापूर, भारत)

• शिक्षण - जुनी मॅट्रिक, एल. टी. सी.

• कार्यक्षेत्र - भारतीय स्वातंत्र्य संग्राम, पत्रकारिता.

• वडील - भाऊराव • आई - उषाबाई • पत्नी - मीनाक्षी.

• अपत्ये - विवेक, उदय, संजय, अभय.


• भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील सहभाग - विद्यार्थी दशेत असताना कोवळ्या वयात १९४२ सालच्या चलेजावच्या चळवळीत सक्रिय सहभाग व नंतर पुढे १९४६ ते १९४८ सालांदरम्यान हैद्राबाद तथा मराठवाडा मुक्ती संग्रामात देखील सक्रिय सहभाग.


• पत्रकारिता - ३१ जुलै १९४७ रोजी साप्ताहिक भारती या वृत्तपत्रामध्ये 'स्वागताला तयार राहा' हा शंकरराव येवलेंचा पहिला लेख छापून आला आणि याच दिवसापासून त्यांची पत्रकारिता सुरू झाली. साप्ताहिक भारती, साप्ताहिक संयुक्त महाराष्ट्र, दैनिक नवशक्ती या वृत्तपत्रांमध्ये पत्रकार म्हणून त्यांनी काम सुरू केले याच दरम्यान १९४८ साली त्यांना करमाळा नगरपालिकेत लिपिक म्हणून नोकरी मिळाली ही नोकरी करत-करत त्यांनी आपली पत्रकारिता सुरू ठेवली पुढे १९४९ साली करमाळा नगरपालिकेच्या ज्ञानेश्वर वाचन मंदिर या ग्रंथालयाची स्थापना झाल्यानंतर त्याच्या ग्रंथपाल पदी शंकरराव येवलेंची नियुक्ती करण्यात आली पण नगरपालिकेतील नोकरीत मन रमत नसल्याने व या नोकरीमुळे मुक्तपणे पत्रकारिता करताना अडचणी येऊ लागल्याने त्यांनी १९५३ साली आपल्या ग्रंथपाल पदाचा राजीनामा देऊन पूर्णवेळ पत्रकारिता सुरू केली. सन १९४७ ते सन १९६० या कालावधीत शंकरराव येवलेंनी साप्ताहिक भारती, साप्ताहिक संयुक्त महाराष्ट्र, दैनिक नवशक्ती, दैनिक नवाकाळ, लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या दैनिक केसरी, आचार्य प्र. के. अत्रेंच्या दैनिक मराठा या तत्कालीन आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये पत्रकार म्हणून काम केले. पुढे १९६१ साली पत्रमहर्षी रंगा वैद्य यांनी सोलापूर येथे दैनिक संचार हे वृत्तपत्र सुरू केल्यानंतर शंकरराव येवलेंनी या वृत्तपत्राचे पत्रकार म्हणून काम सुरू केले त्याबरोबर दैनिक तरुण भारत या वृत्तपत्राचे पत्रकार म्हणून देखील त्यांनी काहीकाळ काम केले पण रंगा वैद्यांच्या दैनिक संचार या वृत्तपत्रात त्यांनी प्रदीर्घकाळ काम केले. तसेच साप्ताहिक सल्ला हे करमाळा तालुक्यातील पहिले साप्ताहिक शंकरराव येवलेंनी सुरू केले या साप्ताहिकाचा पहिला अंक २० ऑक्टोबर १९६९ रोजी प्रकाशित झाला हे साप्ताहिक सन १९६९ ते सन १९८० या कालावधीत व नंतर पुढे सन २००३ ते सन २००८ या कालावधीत प्रकाशित होत होते. सन १९४७ ते सन २००८ या शंकरराव येवलेंच्या ६१ वर्षांच्या पत्रकारितेच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांचे हजारो संशोधनात्मक लेख, टीकात्मक लेख, स्तंभलेख व ललीत लेखन विविध वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले. स्थानिक पातळीवरील विषयांपासून ते राष्ट्रीय पातळीवरील विविध विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्ण लेख लिहिले. आपल्या अतिशय परखड आणि निर्भीड लेखणीमुळे शंकरराव येवलेंना त्याकाळात सोलापूर जिल्ह्यात प्रचंड प्रसिद्धी मिळाली. पुढे शंकरराव येवलेंनी सन १९८४ ते सन १९८७ या कालावधीत अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाशी संलग्न असलेल्या सोलापूर जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष व नंतर सन १९८९ ते सन १९९२ या कालावधीत अध्यक्ष म्हणून काम केले तसेच महाराष्ट्र शासनाच्या पत्रकार अधिस्वीकृती समितीचे पुणे विभागीय सदस्य म्हणून देखील काम केले.


• प्रकाशित पुस्तके - भारतीय स्वातंत्र्य संग्रामावर आधारित 'सोलापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्यलढा' हे शंकरराव येवलेंनी लिहिलेले पुस्तक मुंबईच्या ऑगस्ट क्रांती सुवर्ण महोत्सव समितीमार्फत महाराष्ट्र शासनाने शासकीय खर्चातून १९९४ साली प्रकाशित केले होते. तसेच करमाळ्याचे श्री कमलाभवनी मंदिर व करमाळा परिसराच्या इतिहासावर आधारित 'जय अंबे कमलाभवानी' हे शंकरराव येवलेंनी लिहिलेले दुसरे पुस्तक १९९५ साली प्रकाशित झाले होते.


• भूषविलेली पदे -

* पहिले ग्रंथपाल - ज्ञानेश्वर वाचन मंदिर, करमाळा.

* संस्थापक/अध्यक्ष - सोलापूर जिल्हा भूमिगत स्वातंत्र्यसैनिक संघटना.

* पुणे विभागीय सदस्य - पत्रकार अधिस्वीकृती समिती, महाराष्ट्र शासन.

* उपाध्यक्ष - सोलापूर जिल्हा पत्रकार संघ.

* अध्यक्ष - सोलापूर जिल्हा पत्रकार संघ.

* कार्याध्यक्ष - पुणे विभागीय पत्रकार प्रबोधन शिबीर.

* विशेष कार्यकारी दंडाधिकारी/ऑनररी मजिस्ट्रेट - महाराष्ट्र शासन.

* उपाध्यक्ष - अखिल भारतीय शाहीर परिषद, सोलापूर शाखा.

* अध्यक्ष - अन्याय निवारण समिती, करमाळा.

* विश्वस्त - श्री कमलाभवानी देवस्थान ट्रस्ट, करमाळा.

* अध्यक्ष - श्री कमलाभवानी देवस्थान ट्रस्ट, करमाळा.

* संस्थापक/व्हाईस चेअरमन - श्री कमलादेवी औद्योगिक सहकारी वसाहत, करमाळा.

* चेअरमन - श्री कमलादेवी औद्योगिक सहकारी वसाहत, करमाळा.

याशिवाय स्वातंत्र्यलढा इतिहास संशोधन व लेखन समिती, राष्ट्रीय एकात्मता समिती, भ्रष्टाचार निर्मुलन समिती, शहर दक्षता समिती या शासकीय समित्यांमध्ये सदस्य म्हणून देखील शंकरराव येवलेंनी काम केले होते.


• शंकरराव येवलेंना महाराष्ट्र शासनाकडून तसेच विविध सामाजिक संस्था-संघटनांकडून अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते त्यापैकी काही पुरस्कार -

* भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल करमाळा नगर परिषदेचा 'नगरभूषण' पुरस्कार. (सन १९७०)

* बिहार सरकारच्या वृत्तपत्र स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या नियोजित विधेयकाविरुद्ध सोलापूर येथील सत्याग्रहात सक्रिय भाग घेतल्याबद्दल सोलापूर जिल्हा पत्रकार संघाचे 'गौरव पत्र.' (सन १९८४)

* पत्रकारितेच्या माध्यमातून केलेल्या प्रदीर्घ जनसेवेबद्दल आणि पत्रकारितेतील ४० वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीबद्दल करमाळा नगर परिषदेचा 'आदर्श पत्रकार' पुरस्कार. (सन १९८७)

* रोपळे, माढा येथील कै. पां. ना. तथा राजाभाऊ कुलकर्णी (रोपळेकर) प्रतिष्ठानचा 'आदर्श पत्रकार' पुरस्कार. (सन १९९४)

* भारतीय स्वातंत्र्य संग्रामात केलेल्या कामगिरीच्या गौरवार्थ महाराष्ट्र शासनाचे 'सन्मान पत्र.' (सन १९९७)

* भारतीय स्वातंत्र्य संग्रामात केलेल्या कामगिरीच्या गौरवार्थ सोलापूर ग्रामीण बँकेचे 'स्वातंत्र्यसैनिक - सन्मान पत्र.' (सन १९९७)

* भारतीय स्वातंत्र्य संग्रामात केलेल्या कामगिरीच्या गौरवार्थ नवी दिल्ली येथील अखिल भारतीय स्वातंत्र्य संग्राम सेनानी समितीचे 'गौरव पत्र.' (सन २००१)

* सोलापूर येथील देशभक्त डॉ. कृ. भी. अंत्रोळीकर स्मृती न्यासचा 'गजनफरकार हुतात्मा ए. कुर्बान हुसेन उत्कृष्ट पत्रकार' पुरस्कार. (सन २००२)

* भारतीय स्वातंत्र्य संग्राम, सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्र आणि करमाळा तालुक्यातील सांस्कृतिक, सामाजिक, औद्योगिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल करमाळा तालुका पत्रकार संघाचे 'मानपत्र.' (सन २००२)

* जामखेड येथील मानव सेवा ट्रस्टचा 'आदर्श मानव' पुरस्कार. (सन २००६)

* पत्रकारितेतील ६० वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीबद्दल नवी दिल्ली येथील गांधी फोरम या केंद्रीय स्तरावरील संघटनेचा 'पत्रमहर्षी स्व. रंगा वैद्य' स्मृती पुरस्कार. (सन २००७)

* भारतीय स्वातंत्र्य संग्रामात केलेल्या कामगिरीच्या गौरवार्थ अकलूज ग्रामपंचायत आणि अकलूज येथील संग्रामसिंह मोहिते-पाटील मित्र मंडळाचे 'सन्मानचिन्ह.' (सन २००९)

* ग्रंथपाल दिन व डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त करमाळा नगर परिषदेचा 'आदर्श समाजसेवक' पुरस्कार. (सन २०१०)

* सोलापूर येथील लोकमंगल प्रतिष्ठान व सोलापूर श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आलेला 'लोकमंगल जीवन गौरव' पुरस्कार. (सन २०१२)


• गौरोदगार -

* शंकरराव येवलेंमुळे आपले हात बळकट झाले आहेत.

   - पत्रमहर्षी रंगा वैद्य. (संस्थापक - दैनिक संचार, सोलापूर)

* सोलापूर जिल्ह्याच्या पत्रकारितेचा इतिहास लिहिताना शंकरराव येवलेंच्या कर्तृत्वाच्या माहितीसाठी एक प्रकरण राखून ठेवावं लागेल.

   - डॉ. निर्मलकुमार फडकुले. (ज्येष्ठ साहित्यिक, सोलापूर)

* धडपडणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांना विश्वासाने मान टेकवता यावी असे शंकरराव येवलेंचे मजबूत खांदे सदैव आधार देत आले आहेत.

   - पन्नालाल सुराणा. (समाजवादी नेते, बार्शी)

* प्रखर इच्छाशक्ती असलेला मनुष्य परिस्थितीच्या रेट्यामुळे मागे पडत नाही अडचणीतूनही तो मार्ग काढतोच.. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शंकरराव येवले.

   - द. प्र. तथा दादासाहेब नाईकनवरे. (संस्थापक - नाईकनवरे डेव्हलपर्स प्रा. लि., पुणे)

Shankarrao Yeole, Karmala.