Jump to content

सदस्य:शंकरराव भाऊराव येवले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शंकरराव भाऊराव येवले (शं. भा. येवले) हे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील एक स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ पत्रकार, लेखक, सामाजिक कार्यकर्ते होते.


• परिचय -

* पूर्ण नाव - शंकरराव भाऊराव येवले.

* जन्म - १२ सप्टेंबर १९२७. (करमाळा, ब्रिटिश भारत.)

* मृत्यू - २४ जून २०१२. (सोलापूर, महाराष्ट्र, भारत.)

* राष्ट्रीयत्व - भारतीय.

* धर्म - हिंदू.

* शिक्षण - जुनी मॅट्रिक, लाइब्रेरियन ट्रेनिंग कोर्स. (एल. टी. सी.)

* यासाठी ओळखले जातात - भारतीय स्वातंत्र्य चळवळ, पत्रकारिता, लेखन, समाजकार्य.


• कौटुंबिक पार्श्वभूमी आणि सुरवातीचे जीवन -

येवले कुटुंब हे मूळचे बीड जिह्यातील शिरूर कासार तालुक्यातील येवलवाडी या गावचे. शंकरराव येवले यांचे वडील भाऊराव येवले यांना ब्रिटीशकालीन सोलापूर जिल्हा लोकल बोर्डात रोड कारकून म्हणून नोकरी मिळाली आणि त्याअंतर्गत येत असलेल्या करमाळा नगरपालिकेत कारकून म्हणून त्यांची नियुक्ती झाली. तेव्हा हे कुटुंब १९२० साली करमाळा या गावी राहायला आले आणि नंतर याच गावात स्थायिक झाले. पुढे भाऊराव यांचा विवाह महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे सहकारी असलेले केरू रावजी भोसले यांची कन्या आणि स्वातंत्र्यसैनिक व समाजवादी नेते भाई अ. के. भोसले यांची बहीण उषाबाई यांच्याशी झाला. भाऊराव आणि उषाबाई यांना ३ मुले व ३ मुली अशी एकूण ६ अपत्ये झाली. त्यातील सर्वात मोठे अपत्य शंकरराव हे होते. पुढे काही वर्षांनंतर भाऊराव यांचा आकस्मित मृत्यू झाला त्यामुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती हालाखीची झाली आणि सर्व कुटुंबिक जबाबदारी युवा अवस्थेत असलेल्या शंकरराव यांच्या खांद्यावर येऊन पडली. त्यावेळी अनेक छोटीमोठी कामे करून शंकररावांनी आपल्या कुटुंबाला हातभार लावला.


• शैक्षणिक माहिती -

शंकरराव येवले यांचे सातवी पर्यंतचे शिक्षण करमाळा येथील ब्रिटीशकालीन नगरपालिकेच्या सेंट्रल स्कूल मुले नंबर १ येथे झाले आणि आठवी ते अकरावी (जुनी मॅट्रिक) पर्यंतचे शिक्षण सोलापूर येथे झाले. परंतू घरची आर्थिक स्थिती हालाखीची असल्यामुळे त्यांना पुढे शिक्षण घेता आले नाही.


• स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग -

शंकरराव येवले यांनी विद्यार्थी दशेत असताना कोवळ्या वयात १९४२ सालच्या चलेजाव चळवळीतील सभा, मिरवणुकांमध्ये सक्रिय भाग घेतला. नंतर १९४६ ते १९४८ सालांदरम्यान हैद्राबाद तथा मराठवाडा मुक्ती संग्रामात देखील सक्रिय भाग घेतला. त्या २ वर्षांच्या काळात निजाम सरकारच्या जुलमी राजवटीविरुद्ध जनमत निर्माण करण्यासाठी भूमिगत राहून गुप्त वाड्मयाचा प्रसार करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांपैकी ते एक होते. सप्टेंबर १९४८ मध्ये हैद्राबाद संस्थानात भारत सरकारचे सैन्य घुसल्याची बातमी येताच शंकरराव येवले यांनी पां. म. जगताप, सरदारसिंग परदेशी, गोकुळसिंग परदेशी, किसनराव खाडे, विठ्ठल आलाट या स्वातंत्र्यसैनिकांसोबत करमाळा गावच्या पूर्व दिशेला काही मैल अंतरावर असलेल्या हैद्राबाद संस्थानातील सीना नदी काठच्या बोरगाव, तांदुळवाडी, काटेवाडी, शेलगाव आदी परिसरात हिंडून तिरंगा ध्वज फडकवत भाषणांमधून जनतेला दिलासा दिला. तसेच त्या भागात निजाम सरकारच्या कागदपत्रांची मोठी होळी करून निजाम सरकार विरुद्ध घोषणा दिल्या. त्यावेळी तांदुळवाडीचा कुख्यात रझाकार शेख अमीर शेख अली याला पकडून त्याच्या मुसक्या बांधण्यात आल्या.


• पत्रकारिता -

शंकरराव येवले यांनी १९४५ साली 'चेतना' नावाचे एक हस्तलिखित त्रैमासिक लिहिले. नंतर ३१ जुलै १९४७ रोजी साप्ताहिक भारती या वृत्तपत्रात 'स्वागताला तयार रहा' हा शंकरराव येवलेंचा पहिला लेख छापून आला आणि याच दिवसापासून त्यांची पत्रकारिता सुरू झाली. साप्ताहिक भारती, साप्ताहिक संयुक्त महाराष्ट्र, दैनिक नवशक्ती, दैनिक नवाकाळ या वृत्तपत्रांचे पत्रकार म्हणून त्यांनी काम सुरू केले. त्याच दरम्यान १९४८ साली त्यांना करमाळा नगरपालिकेत कारकून (लिपिक) म्हणून नोकरी मिळाली. ही नोकरी करत-करत त्यांनी पत्रकारिता देखील सुरू ठेवली. पुढे १९४९ साली नगरपालिकेच्या 'ज्ञानेश्वर वाचन मंदिर' या ग्रंथालयाची स्थापना झाल्यानंतर त्याच्या ग्रंथपाल पदी शंकरराव येवलेंची नियुक्ती करण्यात आली. नंतर पालिकेने त्यांना ग्रंथपाल पदाचे प्रशिक्षण घेण्यासाठी काही महिने पुणे येथे पाठवले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ते पुन्हा ग्रंथालयाच्या दैनंदिन कामकाजात रुजू झाले. पण या नोकरीमुळे त्यांना मुक्तपणे पत्रकारिता करताना अडचणी येऊ लागल्याने आणि पालिकेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर वाद होऊ लागल्याने त्यांनी १९५४ साली आपल्या ग्रंथपाल पदाचा राजीनामा देऊन पूर्णवेळ पत्रकारिता सुरू केली.

सन १९४७ ते सन १९६० या कालावधीत शंकरराव येवलेंनी साप्ताहिक भारती, चंद्रकांत निंबाळकरांचे साप्ताहिक संयुक्त महाराष्ट्र, एस. सदानंदांचे दैनिक नवशक्ती, कृष्णाजी खाडिलकरांचे दैनिक नवाकाळ, आचार्य अत्रेंचे दैनिक मराठा, लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेले दैनिक केसरी या आघाडीच्या वृत्तपत्रांचे पत्रकार म्हणून काम केले. पुढे १९६१ साली पत्रमहर्षी रंगा वैद्य यांनी सोलापूर येथे दैनिक संचार हे वृत्तपत्र सुरू केल्यानंतर शंकरराव येवलेंनी या वृत्तपत्राचे पत्रकार म्हणून काम सुरू केले. त्याच्या जोडीला दैनिक तरुण भारत आणि दैनिक समाचार या वृत्तपत्रांचे पत्रकार म्हणून देखील त्यांनी काही वर्षे काम केले पण रंगा वैद्यांच्या दैनिक संचार या वृत्तपत्रात त्यांनी प्रदीर्घ काळ काम केले. त्यासोबत 'साप्ताहिक सल्ला' हे करमाळा तालुक्यातील पहिले वृत्तपत्र शंकरराव येवलेंनी सुरू केले. या वृत्तपत्राचा पहिला अंक २० ऑक्टोबर १९६९ रोजी प्रकाशित झाला. हे वृत्तपत्र सन १९६९ ते सन १९८० या कालावधीत आणि नंतर सन २००३ ते सन २००८ या कालावधीत नियमितपणे प्रकाशित व्हायचे.

सन १९४५ ते सन २००८ या शंकरराव येवलेंच्या ६३ वर्षांच्या पत्रकारितेच्या प्रदीर्घ अशा कारकिर्दीत त्यांचे हजारो संशोधनात्मात लेख, टीकात्मक लेख, स्तंभ लेख व ललित लेखन विविध वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले. स्थानिक पातळीवरील विषयांपासून ते राष्ट्रीय पातळीवरील विविध विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्ण लेख लिहिले. ७०, ८०, ९० च्या दशकांत त्यांचे बरेचसे अग्रलेख हे उग्रलेख म्हणून प्रसिद्ध झाले. त्यामुळे त्यांना बऱ्याचदा कोर्टाच्या फेऱ्या देखील माराव्या लागल्या. पण शंकरराव येवलेंना त्यांच्या परखड आणि निर्भीड लेखणीमुळे व बातम्या प्रसिद्ध करण्याच्या खास शैलीमुळे सोलापूर जिल्ह्यात प्रचंड प्रसिद्धी मिळाली. कित्येक रंजल्या गांजल्या, गोरगरीब, निरक्षर लोकांना त्यांनी आपल्या पत्रकारितेतून न्याय मिळवून देण्याचे काम केले. सन १९८९ ते सन १९९२ या कालावधीत त्यांनी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाशी संलग्न असलेल्या सोलापूर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिले. तसेच राज्य शासनाच्या पत्रकार अधिस्वीकृती समितीचे पुणे विभागीय सदस्य म्हणून देखील कामकाज पाहिले.


• प्रकाशित पुस्तके -

* शं. भा. येवले लिखित 'सोलापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्यलढा' हे पुस्तक १९९४ साली प्रकाशित झाले. ऑगस्ट क्रांती सुवर्ण महोत्सव समितीमार्फत महाराष्ट्र शासनाने हे पुस्तक शासकीय खर्चातून प्रकाशित केले. या पुस्तकाचे प्रकाशन सोलापुरातील हुतात्मा स्मृति मंदिर येथे राज्याचे अर्थमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते आणि सोलापूरचे माजी खासदार व राज्य शासनाच्या स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकार समितीचे सभापती तुळशीदास जाधव, सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख, सोलापूरचे महापौर मनोहर सपाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

* शं. भा. येवले लिखित 'जय अंबे कमलाभवानी' हे पुस्तक १९९५ साली प्रकाशित झाले. या पुस्तकाचे प्रकाशन करमाळ्यातील नगरपालिकेच्या ज्ञानेश्वर वाचन मंदिर येथे मराठी समीक्षक डॉ. गो. मा. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते तसेच करमाळ्याचे आमदार दिगंबरराव बागल, माजी आमदार रावसाहेब पाटील, करमाळ्याचे नगराध्यक्ष गिरधरदास देवी, प्रा. राजेंद्र दास यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

दैनिक समाचारचे संपादक बाबुराव जक्कल यांनी शंकरराव येवलेंकडून करमाळा, 'काल, आज नि उद्या' या शीर्षकाखाली एकूण ६ लेख लिहून घेतले आणि ते १९६० साली त्यांच्या दैनिक समाचारमध्ये प्रसिद्ध केले. तेच लेख पुढे 'जय अंबे कमलाभवानी' या पुस्तक रूपाने प्रकाशित झाले. करमाळा भागाचा इतिहास, करमाळ्याचे संस्थानिक राजे रावरंभा निंबाळकर व त्यांच्या घराण्याची माहिती आणि तुळजाभवानीचे प्रतिरूप असलेल्या करमाळ्याच्या कमलाभवानी मंदिराची ऐतिहासिक माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.


• भूषवलेली पदे -

* पहिले ग्रंथपाल - ज्ञानेश्वर वाचन मंदिर, करमाळा नगरपालिका.

* संस्थापक/अध्यक्ष - सोलापूर जिल्हा भूमिगत स्वातंत्र्यसैनिक संघटना.

* पुणे विभागीय सदस्य - पत्रकार अधिस्वीकृती समिती, महाराष्ट्र शासन.

* कार्याध्यक्ष - पुणे विभागीय पत्रकार प्रबोधन शिबीर.

* अध्यक्ष - सोलापूर जिल्हा पत्रकार संघ, सोलापूर.

* ऑनररी मॅजिस्ट्रेट तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी - महाराष्ट्र शासन. (सोलापूर जिल्हा कार्यक्षेत्र)

* उपाध्यक्ष - अखिल भारतीय शाहीर परिषद, सोलापूर शाखा.

* अध्यक्ष - श्री जगदंबा कमलाभवानी देवी देवस्थान ट्रस्ट, श्रीदेवीचामाळ, करमाळा.

* संस्थापक/व्हाईस चेअरमन - श्री कमलादेवी औद्योगिक सहकारी वसाहत, मौलालीचा माळ, करमाळा.

* चेअरमन - श्री कमलादेवी औद्योगिक सहकारी वसाहत, मौलालीचा माळ, करमाळा.

* शासनाच्या सोलापूर जिल्हा स्वातंत्र्यलढा इतिहास लेखन समिती, भ्रष्टाचार निर्मूलन समिती, शांतता समिती, दक्षता समिती, अन्याय निवारण समिती या समित्यांचे सदस्य म्हणून देखील शंकरराव येवलेंनी कामकाज पाहिले.


• पुरस्कार -

शंकरराव येवलेंना शासनाकडून तसेच विविध सामाजिक संस्था, संघटनांकडून अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यापैकी काही पुरस्कार -

* भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल करमाळा नगर परिषदेकडून देण्यात आलेला 'नगरभूषण' पुरस्कार.

(सन १९७०)

* बिहार सरकारच्या वृत्तपत्र स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या नियोजित विधेयकाविरुद्ध सोलापूर येथे सत्याग्रह केल्याबद्दल सोलापूर जिल्हा पत्रकार संघाकडून देण्यात आलेले 'गौरव पत्र.'

(सन १९८४)

* पत्रकारितेच्या माध्यमातून केलेल्या प्रदीर्घ जनसेवेबद्दल आणि पत्रकारितेतील ४० वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीबद्दल करमाळा नगर परिषदेकडून देण्यात आलेला 'आदर्श पत्रकार' पुरस्कार.

(सन १९८७)

* रोपळे, माढा येथील कै. पां. ना. तथा राजाभाऊ कुलकर्णी (रोपळेकर) प्रतिष्ठानकडून देण्यात आलेला 'आदर्श पत्रकार' पुरस्कार.

(सन १९९४)

* भारतीय स्वातंत्र्य संग्रामात केलेल्या कामगिरीच्या गौरवार्थ महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आलेले 'सन्मान पत्र.'

(सन १९९७)

* भारतीय स्वातंत्र्य संग्रामात केलेल्या कामगिरीच्या गौरवार्थ नवी दिल्ली येथील अखिल भारतीय स्वातंत्र्य संग्राम सेनानी समितीकडून देण्यात आलेले 'गौरव पत्र.'

(सन २००१)

* सोलापूर येथील देशभक्त डॉ. कृ. भी. अंत्रोळीकर स्मृती न्यासकडून देण्यात आलेला 'गजनफरकार हुतात्मा ए. कुर्बान हुसेन उत्कृष्ट पत्रकार' पुरस्कार.

(सन २००२)

* भारतीय स्वातंत्र्य संग्राम, सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्र आणि करमाळा तालुक्यातील सांस्कृतिक, सामाजिक, औद्योगिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल करमाळा तालुका पत्रकार संघाकडून देण्यात आलेले 'मानपत्र.'

(सन २००२)

* जामखेड (अहमदनगर) येथील मानव सेवा ट्रस्टकडून देण्यात आलेला 'आदर्श मानव' पुरस्कार.

(सन २००६)

* पत्रकारितेतील ६० वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीबद्दल नवी दिल्ली येथील गांधी फोरम या केंद्रीय स्तरावरील संघटनेकडून देण्यात आलेला 'पत्रमहर्षी स्व. रंगा वैद्य' स्मृती पुरस्कार.

(सन २००७)

* भारतीय स्वातंत्र्य संग्रामात केलेल्या कामगिरीच्या गौरवार्थ अकलूज या आशिया खंडातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीकडून आणि अकलूज येथील संग्रामसिंह मोहिते-पाटील मित्र मंडळाकडून संयुक्तपणे देण्यात आलेले 'सन्मानचिन्ह.'

(सन २००९)

* ग्रंथपाल दिन व डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीदिनी करमाळा नगर परिषदेकडून देण्यात आलेला 'आदर्श समाजसेवक' पुरस्कार.

(सन २०१०)

* सोलापूर येथील लोकमंगल प्रतिष्ठान व सोलापूर श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आलेला 'लोकमंगल जीवन गौरव' पुरस्कार.

(सन २०१२)


• गौरवोद्गार -

* "शंकरराव येवलेंमुळे आपले हात बळकट झाले आहेत."

                  - पत्रमहर्षी रंगा वैद्य. (संस्थापक - दैनिक संचार)

* शंकरराव येवले हे एक झपाटलेले स्वातंत्र्य प्रेमी, समाजनिष्ठ, व्रतस्थ पत्रकार आहेत. पत्रकारितेची उंची अशाच व्यक्तिमत्त्वामुळे वाढत असते. भल्या भल्या धेंडांवर त्यांनी आपल्या लेखणीतून जे हल्ले चढवले ते तर्कशुध्द आणि तत्त्वशुद्ध होते. सामाजिक दृष्ट्या जे शुद्ध आणि प्रशस्त आहे ते सांगताना त्यांनी कोणाही उच्चपदस्थाचा देखील मुलाहिजा ठेवला नाही. 'इष्ट असेल ते बोलणार, साध्य असेल ते करणार' या आगरकरी बाण्याचं प्रामाणिक आचरण करणाऱ्या पत्रकारांत मी शंकररावांची गणना निःशंकपणे करू शकतो.

   - डॉ. निर्मलकुमार फडकुले. (संत साहित्याचे गाढे अभ्यासक)

* समाजवादी पक्ष व राष्ट्र सेवा दल यांना शंकरराव येवलेंनी वेळोवेळी सहकार्य केले. अगदी अलीकडे नोव्हेंबर २००२ मध्ये निघालेल्या उस्मानाबाद ते पुणे सेवादल ज्योतीच्या स्वागताची तयारी करण्यासाठी करमाळा तालुक्यातील सालसे, वीट वगैरे गावी ते स्वतः गेले. सर्व व्यवस्था जातीने लक्ष घालून केली. अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ असो की ग्रंथालयाची शंकरराव तिथे हमखास असणार. धडपडणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांना विश्वासाने मान टेकवता यावी असे शंकररावांचे मजबूत खांदे सदैव आधार देत आले आहेत.

                          - पन्नालाल सुराणा. (ज्येष्ठ समाजवादी नेते)

* प्रखर इच्छाशक्ती असलेला मनुष्य परिस्थितीच्या रेट्यामुळे मागे पडत नाही. अडचणीतूनही तो मार्ग काढतोच. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शंकरराव येवले.

                          - द. प्र. नाईकनवरे. (संस्थापक - नाईकनवरे डेव्हलपर्स प्रा. लि., पुणे)

             


• पत्नी व अपत्ये -

शंकरराव येवलेंच्या पत्नी मीनाक्षी आणि अपत्ये विवेक, उदय, संजय, अभय ही आहेत.