सदस्य:प्रा.नरहरी पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

🌺🌹🌸🌼🌷🌻🌹🌺🌸🌼🌷🌻🌹🌺🌸🌼🌷🌻 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • तडवळे येथील वैशिष्ट्यपूर्ण रामनवमी उत्सव।*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

प्राचीन काळातील दंडकारण्याचा भाग असणाऱ्या व प्रभू श्री रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या तडवळ्यातील जगज्जीवन स्वामी मठ व श्रीराम मंदिर येथे श्रीराम नवमीचा पारंपरिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.या मठाची स्थापना रामदासी संप्रदायातील अग्रणी व समर्थ रामदास स्वामी यांचे पट्टशिष्य असलेले डोमगाव ता.परंडा स्थित श्री कल्याण स्वामी यांचे शिष्य श्री जगन्नाथ स्वामी यांनी 17 व्या शतकात केली .या मठा संबधी माहिती साहित्याचार्य गो.ह.दंडवते यांनी *"देणे ईश्वराचे"* या आपल्या पुस्तकात दिली आहे.संप्रदायाचा विस्तार करत असताना त्यांनी बेंबळी, उस्मानाबाद,पांगरी,ढोकी,तेर, अंबेजोगाई आदी.ठिकाणी मठ व मारुती मंदिरे स्थापन केली.तडवळे येथील या मठाच्या गाभाऱ्यात पृष्ठभागी प्रभू श्रीराम,लक्ष्मण व सीता माईंची पांढऱ्या स्फटिकातील नयन मनोहर एकत्रित मूर्ती असून गाभाऱ्याच्या मध्यभागी श्री जगन्नाथ स्वामींची काळ्या पाषाणातील समाधी आहे.समाधीच्या उजव्या बाजूस गुप्त गंगेचे स्थान असल्याची आख्यायिका आहे.श्रीराम पंचायतानातील धातूच्या व पाषाणातील मूर्ती व उंच पितळी समयांनी नटलेला गाभारा भाविकांचे श्रद्धास्थान आहे.पुढील मारुती,मागील मारुती ,चोहोबाजूंनी चार वृंदावने ,दत्त मंदिर,व्याघ्रेश्वर मंदिर,सर्व पूर्व महंतांच्या समाध्या,नुतनीकरण केलेला भव्य सभामंडप व जुना कीर्तन मंडप, चोहोबाजूंनी असलेले सोपे ,शिल्पकलेचा अप्रतिम आविष्कार असणारे भव्यव उंच शिखर, काही साधकांच्या समाध्या , पाकशाळा, निवास खोल्या व मल्हार तीर्थ असा मंगला नदीच्या पार्श्वभूमीवरील भव्य परिसर असलेले मंदिर संपूर्ण नुतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. श्री रंगनाथ महाराज ,श्री रघुनाथ महाराज ,श्री गजानन महाराज ,श्री सखाराम महाराज ,श्री दत्तात्रय महाराज व श्री कल्याण महाराज अशी महंत परंपरा लाभलेल्या मठामध्ये सध्या श्री रामचंद्र महाराज हे कार्यरत असून त्यांच्या अधिपत्याखाली मा.देवदत्त मोरे यांच्या मार्गदर्शनाखालील विश्वस्त मंडळाकडून या उत्सवाचे योग्य नियोजन करण्यात येते.आपापल्या कार्यकाळात प्रत्येक महंतांनी सांप्रदायिक विस्तार केला.विशेषतः श्री सखाराम महाराजांच्या कार्यकाळात मठाचा लौकिक वाढल्याचे सांगण्यात येते.याच कालावधीत महाराजांचा शिष्य संप्रदाय नाशिक ,मध्य प्रदेशातील धार,देवास ,इंदूर या ठिकाणापर्यंत वाढला.महाराजांच्या अनुग्रहातून अनेक तत्कालीन शिष्य व भाविकांना श्री सखाराम महाराजांच्या दैवी शक्तीची अनुभूती आल्याची आख्यायिका श्रीराम भक्त श्री गोपाळराव पाटील सांगतात.त्यानंतर श्री कल्याण महाराजांच्या कालावधीत शिष्य संप्रदाय महाराष्ट्राच्या अनेक गावाबरोबर मुख्यतः खान्देशात पोहचला.सध्याचे श्री रामचंद्र महाराज यांचा शिष्य संप्रदाय स्थानिक शिष्या बरोबरच नाशिक,बीड,सातारा,पुणे , सोलापूर सह खान्देशात आहे.प्रचलित राम नवमी उत्सवाची परंपरा देखील श्री सखाराम महाराजांच्या काळात सुरू झाल्याचे सांगण्यात येते.या 11 दिवसीय उत्सवाचा शुभारंभ गुढी पाडव्याच्या दिवशी गुढी उभारून नवरात्र स्थापना करून करण्यात येते.दैनंदिन पहाटे काकडा आरती ,सकाळी महाभिषेक,महापूजा, दुपारी वाजंतऱ्यासह छबिना-पालखी,पंचपदी,महानैवेद्य, महाप्रसाद, संध्याकाळी रामरक्षा पठन,शालदीप, सांजआरती,बाण्या,झान्झाचे खेळ व रात्री महाराजांचे कीर्तन असा दिनक्रम असतो.संपूर्ण विधी उपचार श्री रामचंद्र महाराज यांच्यासह सज्जनगड येथील सांप्रदायिक अधिकारी मंडळी व स्थानिक शिष्य गणाकडून पार पाडला जातो.या कालावधीत

  • !!जय जय रघुवीर समर्थ!!*
  • श्री रामदास , जगन्नाथ , सखाराम , दत्तात्रय , कल्याण महाराज की जय...!!!*

असा गजर कार्यक्रमातील उत्साह वाढवतो.गावातील शिष्य व भाविकांकडून 9 दिवस महाप्रसाद जेवण विविध दासबोधातील श्लोकांच्या पठणासह ग्रामस्थांना व भाविकांना देण्यात येते.या उत्सवातील वाल्मिकी रामायणावर आधारित अनोखी कीर्तन परंपरा व त्यातील सोंगे अर्थात कथेवर आधारित बहुरूपी पात्रं वैशिष्ट्यपूर्ण असून भाविकांना याचे मोठे आकर्षण आहे.श्रीराम नवमी हा या उत्सवातील परमोच्च दिवस असून त्यादिवशी सकाळीच लवकर मानाचे सनई-चौघडा व वाजंत्र्यासह छबिना पालखी निघते.पालखी परतल्यानंतर श्री रामचंद्र महाराजांचे जन्मकाळाचे कीर्तन सुरू होते.आंब्याच्या डहाळ्या, नारळाच्या झावळ्या व केळीची खुंटांनी व छत्र ,चामरे,अब्दागिरी,पताका- निशाणांनी सजवलेल्या कीर्तन मंडप, मानाचा चांदीचा राजदंड घेणारे चोपदार,चौरी धारी ,पंचधातूंच्या झान्झा घेतलेले सहकारी,भजनी मंडळी,तबलावादक ,संवादिनी वादक व उत्साहाने सजून आलेल्या भविकासह किर्तनास सुरवात होते.

  • भक्ती रामाची करावी....*
  • वंशावळी उद्धारावी....*

  • रामा हो जय , रामा हो जय*

या पारंपरिक रचनेचे गायन पुढे राम जन्माच्या कथेकडे सरकते.वैशिष्ट्यपूर्ण कथा सांगत महाराज खचाखच भरलेल्या कीर्तन मंडपातील भाविकांचा उत्साह वाढवीत असतात.

  • निर्गुण माळ्याने माळ्याने....*
  • एक बाग लाविला ज्याने...!*

या अभिनव चालीतील पारंपरिक अभंगातून मानवी शरीराचा रचनेचा भक्तीशी संबंध जोडणारे निरूपण सादर होते.सहकारी,सेवेकरी कीर्तनात रंगत वाढवितात.कैकयी ची कथा सांगणारे बहुरूपी पात्र रामजन्माची उत्सुकता वाढविते,अशा प्रकारे कीर्तनाचा प्रवेश रामजन्माच्या कथेकडे होतो.राम जन्माचा शकुन सांगणाऱ्या दैवी साधकांच्या प्रवेशाने कीर्तनाची उत्कंठा वाढत जाते.या साधकांना येथे आराधिनी असे म्हटले जाते.बहुधा तुळजापूर येथील शक्तीपीठाच्या साधकांच्या संबंधाने हा उल्लेख या कीर्तनाच्या लोक परंपरेत असावा असे वाटते.गुढ्या ,तोरणे,पताका या सांकेतिक प्रतिमांनी व एक ,दोन,तीन,चार व पाच बोटांची टाळी वाजवत बरोबर 12 वाजता

  • शुद्ध सुमन वसंत ऋतू ,*
*मधूमासाते विख्यातू ,*
  • चैत्र शुद्ध नवम्यान्तु ,*
  • जन्म रघुनंदनु पावला....*

असे म्हणताच गुलाल उधळला जातो.सर्व उपस्थित प्रभू श्रीराम, स्वामीं व महाराजांच्या दर्शनाने कृतकृत्य होतात.भिजवलेली डाळ,गुळ,साखर,पेढे,बुंदी आशा प्रसादाचे वाटप एकमेकांना करत आलिंगन देत आनंद साजरा करतात.स्थानिक भाविक,ग्रामस्थ,पंचक्रोशीतील गावातील भाविक ,नोकरी व्यवसायनिमित्ताने बाहेर स्थायिक झालेले भाविक ग्रामस्थ ,मुले,लग्न होऊन गेलेल्या मुली,पाहुणे, सगे सोयरे ,महिला ,पुरुष ,राजकारणी,सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार या उत्सवासाठी आवर्जून उपस्थित राहतात.रात्री कीर्तनात रामाचे बारसे सादर केले जाते.दशमी दिवशी अगदी पहाटेच श्री रामचंद्र महाराज मानकरी व सेवेकरी यांच्यासह सांप्रदायिक गाव भिक्षेस निघतात,

  • जय जय रघुवीर समर्थ*
अशी हाळी देऊन घरोघरी भिक्षा मागीतली जाते.या भिक्षेतूनच दशमीच्या महानैवेद्य केला जातो ज्याचे वैशिष्ट्य मोठे आहे.एकादशीस सकाळीच लळीता चे कीर्तन होऊन या उत्सवाचा समारोप होतो. महाराज,मानकरी पाच पाटील व तीन देशपांडे,सेवेकरी,विश्वस्त, कारभारी,उपाध्ये,शिष्य,भक्त, भाविक , ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत स्वामींच्या समाधीवर बुक्का व फुले वाहिला जातो.त्यानंतर महाराजांकडून खारीक प्रसाद वाटला जातो व कार्यक्रमाची सांगता होते,सर्व उपस्थित प्रभू श्रीराम व जगन्नाथ स्वामींचा आशीर्वाद घेऊन नव्या ऊर्जेने व चैतन्याने नव्या वर्षाचे स्वागत व  मार्गक्रमण करतात.सर्व जाती, धर्म,घटकांचा आबालवृद्धांचा सहभाग असणारा हा तडवळ्याचा ग्राम उत्सव मनास खूप भावतो.जीवन जगण्याचे नवे चैतन्य देतो.          

या निमित्ताने मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम चंद्र ,समर्थ रामदास स्वामी , श्री जगन्नाथ स्वामी यांच्या चरणी ही लेखन सेवा अर्पण करतो व अशीच सेवा घडत राहावी अशी प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना करतो.यासह तडवळ्याच्या या महान परंपरेच्या संवर्धनासाठी लिहिलेल्या या लेखन सेवेद्वारे उत्सवात सहभागी सर्व भाविक-भक्त व ग्रामस्थ चरणी वंदन करतो.

  • ।जानकी जीवन स्मरण जय जय राम।*
 *!!जय जय रघुवीर समर्थ!!*                                         
  • शब्दांकन-प्रा.नरहरी पाटील,तडवळे*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🌺☘🌺☘🌸🍀🌸🍀🌹🌿🌹🌿🌼🌱🌼🌱