सदस्य:प्रमोद तावडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माता आणि मातृभाषा[संपादन]

-   प्रमोद तावडे

    मित्रांनो, ‘आई’ म्हटल्यावर आपल्या आईची एक प्रतिमा आपल्या मन:चक्षूसमोर उभी राहते. त्या प्रतिमेत ती टी-शर्ट आणि जीन्स पॅण्ट अशा वेशभूषेत आपल्या डोळ्यासमोर कधीच येत नाही. तशी कल्पना केली तरी तिचे ते रूप आपल्याला आवडण्याची शक्यता कमीच. आपल्या  मराठमोळ्या वेशभूषेतच आपल्याला ती जवळची वाटते. प्रेमाने आपण तिच्या अंगावर अगदी भरजरी शालू किवा पैठणीची कल्पना करू शकतो. पण शर्ट- पॅण्ट ? छे ! बकवास !

    मित्रांनो जे आपल्या आईचं तेच मातृभाषेचं नाही काय? आपली मराठी भाषा लिहिताना ती रोमन लिपीत जेंव्हा दृष्टीस पडते तेंव्हा तिचे ते बेंगरूळ रूप मनाला अस्वस्थ करतं. तीच्यासाठी देवनागरी लिपीच आवश्यक आहे. देवनागरी लिपी हा भरजरी शालू आहे. सत्तेचाळीस मुळाक्षरे आणि बारा स्वरांनी संपन्न असलेली देवनागरी लिपी आणि सव्वीस मुळाक्षरांची तुटपुंजी रोमन लिपी यांची तुलनाच होऊ शकत नाही. उच्चारलेला प्रत्येक ध्वनी सहीसही आणि तंतोतंत अक्षरांकित करू शकणाऱ्या देवनागरी लिपीच्या सक्षमतेला, सर्जनशीलतेला तोड नाही. केवळ तडजोड म्हणून आपल्या मायमराठीला इंग्रजीच्या उधार अक्षरांमध्ये व्यक्त व्हावे लागत असेल तर आपण मराठी मातृभाषा असणारे तिचे वारस कर्मदरिद्री आहोत असेच म्हणावे लागेल. हे आपल्यासाठी लज्जास्पद नव्हे काय? आपली ऐपत आपल्या मावशांना आणि शेजाऱ्यांना दाखवण्यासाठी देवनागरीचा अंगीकार प्रत्येकाने करायलाच हवा. आधुनिक तंत्रज्ञानाने तर ही गोष्ट आता सहजसाध्य केली आहे. गरज आहे ती फक्त आपल्या इच्छाशक्तीची !

मराठीसाठी फार काही नाही तरी किमान एवढं आपण नक्कीच करू शकतो.

·       आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात रोज किमान १० तरी ‘फोन कॉल’ हाताळतोच. दहाही वेळा आपण संभाषणाची सुरुवात ‘हॅलो..!’ अशी करतो. ‘नमस्कार!’ या शब्दाने आपण संवादास सुरुवात केली तर? मराठीत लघुसंदेश (SMS) तसेच दिवसभरात किमान एक ई-मेल मराठीतून नक्कीच करू शकतो.

·       आपली स्वाक्षरी शक्य असल्यास मराठीतून करणे. पालकांनी आपल्या पाल्यांना त्यांची स्वाक्षरी मराठीत करण्यास शिकवावे.

·       बँका, विमा कंपन्या, चलध्वनी कंपन्या यांच्याकडे मराठीतून माहिती- सूचना पुस्तिका- प्रपत्रे (फॉम्र्स) इत्यादी देण्याचा आग्रह करणे.

·       तक्रार, चौकशी याकरिता उत्पादक, सेवापुरवठादार, संबंधित कार्यालयात दूरध्वनीद्वारे संभाषणास सुरुवात करतानाच तेथील संबंधितास शक्य असल्यास मराठीत बोलण्याची मागणी करावी.

·       खरेदी करताना आपल्याशी गोड बोलणाऱ्या दुकानदाराशी मराठीतच बोलून त्याला मराठीत बोलण्यास भाग पाडावे. त्याच्या चुकांना हसू नये तर त्याच्या प्रयत्नांचे कौतुक करावे.

·       आपल्या दरवाजावरील नामफलकावर मराठीचा (देवनागरी लिपी) वापर करावा. जरूर असल्यास सोबत इंग्रजीचाही वापर करायला हरकत नाही.

हे प्रत्यकाला सहज शक्य होतील असे काही साधे, सोपे उपाय आहेत. पहा पटतंय का. ही उपाययोजना करायला लाज वाटत असेल तर बोलणेच खुंटते. अमृताशीही पैजा जिंकणारी ज्ञानेश्वर-तुकोबांची मराठी भाषा अखेर एकविसाव्या शतकात बेवारस निपजली असेच म्हणावे लागेल.